मी गिरगावातल्या कामत चाळीत राहणारा नाटकवेडा. माझे बाबा पांडुरंग पेम हे स्वत: लेखक-दिग्दर्शक असल्याने त्यांच्या नाटकांच्या तालमी बघत आणि गणेशोत्सवात नाटक करत मी लहानाचा मोठा झालो. मग कामत चाळ आणि आजूबाजूच्या परिसरातील नाटय़वेडे शिरीष कामत, प्रशांत देसाई, हेमंत जाधव, अविनाश कोरगांवकर, वैशाली कामत, अतुल काळे, सर्वेश परब, संगीता पाटकर अशा अनेकांना एकत्र घेऊन ‘अनामय’ संस्था स्थापन केली. मंगला संझगिरी- ज्यांना आम्ही मम्मा म्हणायचो- त्यांच्या संझगिरी सदनच्या गच्चीत ‘अनामय’च्या तालमी व्हायच्या.
‘वरच्या गाठी’, ‘कथा बाबुलच्या प्रेमाची’, ‘रामायण’, ‘माणसाला चार हात असते तर..’ अशा एकांकिका विविध स्पर्धामध्ये लिहून दिग्दर्शित करत आमचा नाटय़प्रवास सुरू झाला. १९९२ साली ‘अनामय’तर्फे केलेल्या ‘प्लॅन्चेट’ एकांकिकेने त्या वर्षी अनेक बक्षिसे पटकावली. जानेवारी १९९३ ला सवाई दिग्दर्शक आणि एकांकिका अशी बक्षिसं मिळवून आम्ही एकांकिकेचे प्रयोग थांबवले. एकांकिकेने खूप बक्षिसं मिळवली की माझा त्या विषयातील इंटरेस्ट संपतो आणि मग मी नवीन विषयाकडे वळतो. अर्थात आम्ही ‘प्लॅन्चेट’चे प्रयोग थांबवले तरी इतर रंगकर्मीनी ते सुरू केले; जे आजपर्यंत सुरूच आहेत. ३००० च्या वर प्रयोग झालेली ही एकमेव एकांकिका असावी. असो.
‘प्लॅन्चेट’चे भूत माझ्या मानेवरून उतरल्यावर पुढे काय, हा प्रश्न मला सतावू लागला. काहीतरी वेगळं करायचं! पण काय, ते सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या सासूबाई- उषा प्रभाकर पाटकर- ज्यांना बोलता आणि ऐकता येत नव्हतं; त्यांच्याशी गप्पा मारताना ‘संवादातून विसंवाद आणि विसंवादातून संवाद’ हा थॉट सापडला. तो थॉट इम्प्रोव्हाइज करून दहा मिनिटांचे स्किट करून पाहिले. निर्जन बेटावर एक भारतीय तरुण आणि एक युगांडाची तरुणी अचानक भेटले तर काय होईल? त्यांना एकमेकांची भाषा कळणार नाही. मुलगा बोलतो ते मुलीला कळत नाही- म्हणजे त्याच्यासाठी ती बहिरीच झाली. आणि तिच्यासाठी तो मुका! ती बोलायला लागल्यावर याच्याच अगदी उलट. म्हणजेच दोघांनाही बोलता आणि ऐकू येत असतानाही एकमेकांसाठी ते मुके, बहिरे झाले.
ते स्किट खूप धमाल झाले. म्हणून मुका व बहिरा अशीच पात्रं घेऊन एकांकिका लिहायला घेतली. त्यात एक आंधळा मित्रही असावा असे वाटल्याने तिसरे पात्र आले. या तिघांना घेऊन मी एक वेगळी एकांकिका लिहून काढली. पण नंतर वाटले की, तीन तरुण आहेत, तर मग एखादी तरुणीही घ्यावी आणि लव्हस्टोरी करावी. झपाझप नवीन एकांकिका लिहून काढली.. ‘ऑल द बेस्ट’!
१९९३ ची ही गोष्ट. खुल्या एकांकिका स्पर्धा सप्टेंबरनंतर चालू होणार असल्याने ‘ऑल द बेस्ट’ अनामयतर्फे न करता आयएनटी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत करायचं ठरवलं. एस. वाय.- टी. वाय. मी दादरच्या कीर्ती कॉलेजमधून केलं होतं म्हणून आधी त्यांच्याकडे गेलो. पण ते वर्कआऊट नाही झालं. एफ. वाय. बी. एस्सी.पर्यंत चर्नी रोडच्या भवन्स कॉलेजमध्ये शिकलो होतो, म्हणून मग तिथून एकांकिका करायचं ठरवलं. पण तिथे जाताना वाटेत ‘भरत-भेट’ झाली आणि जाधवांच्या भरतने मला परेलच्या एम. डी. कॉलेजसाठी पटवलं. एम. डी. कॉलेजतर्फे एकांकिका करायचं पक्कं झालं. भरत, अंकुश या मंडळींनी आधी माझ्याबरोबर ‘प्लॅन्चेट’ एकांकिकेचा एक प्रयोग केला होता. त्यामुळे ते परिचयाचेच होते. तरी माझ्या सवयीनुसार मी ऑडिशन ठेवली. खूप मुलं आली. एकांकिकेसाठी खूप मुलं येणं हे एम. डी.मध्ये तेव्हापासून चालू आहे. सगळेच चांगले होते. म्हणून मग सर्वासाठी नाटय़-कार्यशाळा घेतली. आंधळा, मुका, बहिरा या कॅरेक्टर्सना घेऊन बरीच इम्प्रोव्हायजेशन्स केली. त्यातून भरत जाधव, अंकुश चौधरी, विकास कदम आणि दीपा परब असे फायनल कास्टिंग झाले. बाकीची सारी टीम उत्साहाने बॅकस्टेजसाठी उभी राहिली. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. तालमी सुरू झाल्या. रोज नवनवीन गोष्टी निघत होत्या. वेळेचं भान नव्हतं. सगळेच ‘ऑल द बेस्ट’मय झालेलो. ते तिघेही फक्त तालमीतच नाही, तर इतर वेळीदेखील कॅरेक्टरमध्येच राहायचे. कोणी काही बोलले तरी ‘बहिरा’ विकास लक्षच द्यायचा नाही. ‘मुका’ भरत अ‍ॅक्शननेच कॅन्टीनमध्ये माझ्यासाठी समोसे मागवायचा. अंकुश डोळे बंद करून रस्ता क्रॉस करायचा. आणि कॉलेजच्या मुली जीव मुठीत घेऊन त्याच्याकडे पाहत बसायच्या. हे सगळं करताना एक वेगळंच थ्रिल होतं.. झिंग होती. कित्येकांना तो बावळटपणा वाटायचा; पण आम्ही ते जाणीवपूर्वक करत होतो. एकांकिका पूर्ण बसवून झाल्यावर मी एकांकिकेचं नाव सुचवलं-‘अपूर्णाकाकडून पूर्णाकाकडे’! त्यानंतर आठ दिवस कुणीही माझ्याशी बोलत नव्हते. मग भरतने सुचवलेलं नाव फायनल झालं- ‘ऑल द बेस्ट’!
आयएनटीमध्ये एकांकिकेचा पहिला प्रयोग झाला. हसत हसत आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो. तोपर्यंत एकांकिकेची एवढी हवा झाली होती, की फायनलला मधल्या गँगवेमध्येही बसायला जागा नव्हती. दोन्ही बाजूला प्रेक्षक तुडुंब गर्दी करून उभे होते. अपेक्षेप्रमाणे फायनलचा प्रयोगही जबरदस्त झाला. वाक्या-वाक्याला टाळ्या येत होत्या.
बक्षीस समारंभ सुरू झाला. सवरेत्कृष्ट अभिनेता प्रथम- अंकुश चौधरी. सवरेत्कृष्ट अभिनेता द्वितीय- विकास कदम. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता- भरत जाधव. सवरेत्कृष्ट दिग्दर्शक- देवेंद्र पेम. आणि सवरेत्कृष्ट एकांकिका तृतीय पारितोषिक- ‘ऑल द बेस्ट’!!
सन्नाटा.. शुकशुकाट..
त्या दिवशी रवींद्र नाटय़मंदिरमध्ये सर्वानी ‘पिन- ड्रॉप सायलन्स’चा आवाज ऐकला. रिझल्टच्या दिवशी आमचा निकाल लागला होता. रडारड.. फ्रस्ट्रेशन.. प्रेक्षकही नाराज झाले. कोणालाच निकाल पटला नव्हता. सर्व वर्तमानपत्रांतून ‘ऑल द बेस्ट’बद्दलच लिहून आलं. त्या दिवशी आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं नाही; पण एक वेगळंच बक्षीस आमच्या नशिबात लिहून ठेवलेलं होतं. महेश मांजरेकर सर आणि चंद्रकांत कुलकर्णी सर यांनी निर्माते मोहन वाघ यांना एकांकिकेबद्दल सांगितलं. वाघकाकांनी एकांकिका पाहिली आणि लगेच मला त्याचे दोन अंकी व्यावसायिक नाटक करण्याची ऑफर दिली. अनेक दिग्गजांनी सांगितलं, ‘हे दोन अंकी नाटक होणार नाही. शक्य नाही. पालीची मगर होणार.’ ते माझ्यावरच्या प्रेमापोटीच सांगत होते. पण आंधळा, मुका, बहिरा या पात्रांनी मला एवढं झपाटलं होतं, की मला पूर्ण विश्वास होता की मी ते करू शकेन. आंधळा, मुका, बहिरा यांच्याबाबत काय काय होऊ  शकेल त्या अनेक गोष्टी लिहून काढल्या. लव्हस्टोरी करायची आणि चारच पात्रांचं नाटक करायचं, हे पक्कं होतं. हा फॉर्म स्पर्धेच्या प्रेक्षकांना आवडला होता. एकांकिकेत पाणी न घालता त्यापुढचं कथानक वाढवलं. त्यानुसार नवीन प्रसंग लिहून काढले. लव्हस्टोरीत एखाद्याला मुलगी मिळाली तर इतर दोघे नाराज होतील म्हणून कोणालाही मुलगी मिळू द्यायची नाही, हा शेवट पक्का केला. अखेर नाटक लिहून पूर्ण झालं.
कास्टिंगमध्ये भरत, अंकुश कायम राहिले. पण दीपा आणि विकास व्यावसायिक नाटकासाठी लहान वाटतील म्हणून त्यांच्या जागी तुफान एनर्जीचा संजय नार्वेकर आणि गोड अभिनेत्री संपदा जोगळेकर आले. आणि सुरू झाला.. पुन्हा तोच जोश.. तीच जिद्द.. तशाच भन्नाट तालमी! जे जे सुचेल ते सर्व करून बघत होतो. चांगलं ते घेऊन पुढे जात होतो. अक्षरश: मंतरलेले दिवस होते ते. ३५ मिनिटांच्या एकांकिकेचं अडीच तासांचं नाटक झालं. एकांकिकेत पाणी न घालता केल्यामुळे पालीची मगर न होता डायनासोर झाला होता. फक्त तो घाबरवणारा नाही, तर हसवणारा होता. वाघकाकांनी नाटकाला व्यावसायिक दृष्टीनं नाव सुचवलं- ‘म्हणून मी तुला कुठे नेत नाही’! त्यानंतर तब्बल पंधरा दिवस वाघकाकांच्या घरी आम्ही कोणीच गेलो नाही. शेवटी ‘ऑल द बेस्ट’ हेच नाव कायम ठेवलं गेलं.
३१ डिसेंबर १९९३ रोजी शिवाजी मंदिरात नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आणि सुरू झालं एक नवं पर्व! आंधळा-मुका-बहिऱ्याचं हे नाटक प्रेक्षकांना वेड लावून गेलं. प्रेक्षकांनी नाटकाला डोक्यावर घेतलं. सकाळी सहा वाजल्यापासून तिकिटासाठी रांगा लागू लागल्या. दोन तासांतच नाटक हाऊसफुल्ल व्हायचं. दर महिन्याला पन्नास-पन्नास प्रयोग होऊ  लागले तेव्हा वाघकाकांनी दुसरी टीम करायचं ठरवलं. श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे आणि प्रज्ञा जावळे यांना घेऊन मी पुन्हा हे नाटक बसवलं. तरीही प्रयोगांची डिमांड वाढतच गेली. म्हणून संतोष मयेकर, जितेंद्र जोशी, महेश कोकाटे आणि दीपा परब ही तिसरी टीम आली. एकाच दिवशी, एकाच वेळी तीन टीम्स नाटकाचे प्रयोग करत. म्हणजे एखाद्या दिवशी दुपारी ४ वाजता शिवाजी मंदिरला पहिल्या टीमचा प्रयोग होई, त्याच दिवशी दुपारी ४ वाजता गडकरीला दुसऱ्या टीमचा प्रयोग चालू असे, आणि त्याच दिवशी दुपारी ४ वाजता दीनानाथला तिसऱ्या टीमचा प्रयोग होत असे. इतर भाषांमध्येही नाटकाचे प्रयोग सुरू झाले. गुजराती, हिंदी, सिंधी, कन्नड, तुळू, इंग्लिश, मालवणी.. डिसेंबर ९६ या एकाच महिन्यात सर्व भाषांतले मिळून ‘ऑल द बेस्ट’चे चक्क १०८ प्रयोग झाले होते. प्रत्येक भाषेत नाटक सुपरहिट झालं. प्रत्येक भाषेत नाटकाने जास्तीत जास्त प्रयोगांचा रेकॉर्ड केला. मराठीचे वर्षांला पाचशेच्या वर प्रयोग होऊ  लागले. दोन हजार प्रयोगांनंतर वाघकाकांनी चित्रपट अभिनेते देव आनंद यांच्या हस्ते सर्वाना ट्रॉफी दिल्या. आजवर सर्व भाषांत मिळून या नाटकाचे साडेनऊ हजार प्रयोग झाले आहेत. त्यापैकी मराठीत झालेले प्रयोग आहेत ४३००! सातही भाषांमध्ये नाटक मीच दिग्दर्शित केलं. मधल्या काळात तीन मुलींना घेऊन ‘ऑल द बेस्ट अल्टिमेट’ हे नाटकसुद्धा मी केलं. ज्यात माधवी जुवेकर, आदिती सारंगरधर, क्षिती जोग आणि जयंत जठार होते. असे एकावर एक विक्रम करत ‘ऑल द बेस्ट’ची वाघदौड आजही सुरूच आहे. येत्या सप्टेंबर २०१५ मध्ये कोलकाता येथे ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचा बंगाली भाषेतला पहिला प्रयोग होणार आहे.
लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी अनेक बक्षिसं ‘ऑल द बेस्ट’ला मिळाली. पण सर्वात मोठं आणि मोलाचं बक्षीस मला वाटतं ते म्हणजे महाराष्ट्राचं हास्यदैवत असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी माझ्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप! एनसीपीएमध्ये पु. ल. आणि सुनीताबाई प्रयोगाला आले होते. प्रयोगानंतर मी त्यांच्या पाया पडलो तेव्हा पु. ल. म्हणाले, ‘‘विनोदनिर्मितीची भन्नाट कल्पना सुचलीय तुला. छान आहे नाटक. मला नाही सुचलं बाबा असलं काही.’’ पु. लं.चे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आजपर्यंत घेतलेल्या सगळ्या मेहनतीचं चीज झालं होतं. आम्ही अभिमानाने त्यांना सांगितलं, दर महिन्याला आम्ही पन्नासच्या वर प्रयोग करतो. तेव्हा त्यांच्या खास शैलीत पु . लं. म्हणाले, ‘‘हो. अगदी वाघ मागे लागल्यासारखे प्रयोग करताय!’’ मग काही दिवसांनी पु. लं.नी वाघकाकांना एक पत्र पाठवलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं-
प्रिय मोहन,
तुझे नाटक आम्हा दोघांनाही अतिशय आवडले. या नाटकात मला काम करायला आवडले असते.
– तुझा भाई.

‘ऑल द बेस्ट’चे चार हजार प्रयोग झाल्यावर वाघकाका सर्वाना सोडून गेले. नाटय़सृष्टीची मोठीच हानी झाली. आम्ही अगदी पोरके झालो. ‘ऑल द बेस्ट’चे प्रयोग तेव्हा पहिल्यांदाच थांबले. वाघकाकांचं अतोनात प्रेम असलेलं हे नाटक बंद पडू न देण्याचा निर्णय मी घेतला. ते स्वत:च नव्याने प्रोडय़ुस करायचं ठरवलं. त्या तयारीत असतानाच महेश मांजरेकर सर पुन्हा एकदा मदतीला धावून आले. त्यांनी नाटक प्रोडय़ुस केलं आणि जुनंच ‘ऑल द बेस्ट’ म्युझिकल- डान्सिकल स्वरूपात रंगमंचावर आलं. प्रथमच स्टार कलाकारांचं कास्टिंग झालं.. मयूरेश पेम, आदिनाथ कोठारे, वैभव तत्त्ववादी आणि मनवा नाईक. त्याचेही धो-धो प्रयोग झाले.
या टीम्सच्या कलाकारांव्यतिरिक्त राजेश देशपांडे, केदार शिंदे, अंगद म्हसकर, विजय पटवर्धन, राजेश कोलन, संतोष पवार, वसंत आंजर्लेकर, समीर पाटील, मंदार चांदवडकर, सौरभ पारखे, दिनेश कोयंडे, मंजुषा दातार, सुहास परांजपे, लतिका सावंत, नंदिनी वैद्य, विवेक गोरे, राहुल गोरे, सनी मुणगेकर यांनी मराठीत, तर हिंदी ‘ऑल द बेस्ट’मध्ये कीकू शारडा, ब्रिजेश हिरजी, ट्विंकल खन्ना (मिसेस अक्षयकुमार), जयंती भाटिया, मानसी जोशी, क्रांती रेडकर यांनी काम केलं आहे. गुजराती ‘ऑल द बेस्ट’मध्ये शर्मन जोशी, विकास कदम यांनी, तर इंग्लिश ‘ऑल द बेस्ट’मध्ये अतुल काळे, सतीश राजवाडे, सुनील बर्वे अशा आजच्या अनेक स्टार कलाकारांनी काम केलं आहे. कित्येकांच्या करिअरची सुरुवात ‘ऑल द बेस्ट’पासून झाली आहे. या साऱ्यांना आज भेटतो, त्यांच्याबद्दल ऐकतो, तेव्हा खूप आनंद होतो.
चांगले तसेच वाईट अनुभवही अनेक आले. नाटक सुपरहिट झाल्यावर इतर भाषांमधील अनेक निर्मात्यांनी मला पैशासाठी रडवलं. हिंदी सिनेमावाल्यांनी तर नाटकातून जे जे मिळेल ते उचललं.. अर्थात माझी परवानगी न घेता! पण चांगल्या अनुभवांतून मिळालेला आनंद आणि समाधान खूप मोठं होतं- ज्यामुळे कटु अनुभवांतून मिळालेल्या दु:खावर मी सतत मात करू शकलो.
‘‘ऑल द बेस्ट’मध्ये असं काय आहे, की ज्यामुळे लोकांना नाटक इतकं आवडलं?’ हा प्रश्न अनेकांनी मला अनेक वेळा विचारला आहे. त्याचा कॉन्सेप्ट.. की आंधळा, मुका, बहिरा ही पात्रं, की त्यातले धम्माल विनोदी प्रसंग, की कलाकारांची सळसळती ऊर्जा? मला वाटतं, हे सर्व तर आहेच; पण त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे तो नाटकाचा फॉर्म- जो प्रेक्षकांना जास्त भावला. आवडला. शेकडो वर्षांपूर्वीपासून- अगदी पहिल्या नाटकाच्या जन्मापासून पात्रांच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादातून पुढे जाणारं नाटक पाहण्याची आपल्याला सवय होती. ‘ऑल द बेस्ट’ने पहिल्यांदा प्रेक्षकांच्या या सवयीला खो दिला. हे पहिलेच असे नाटक आहे- जे संवादातून सरळ पुढे न जाता अडकत अडकत.. थांबत थांबत.. गोंधळ घालत पुढे जाते. मुका आंधळ्याला सांगतो ते त्याला कळत नाही. आंधळा बहिऱ्याला सांगतो ते त्याला ऐकू येत नाही. मुका बहिऱ्याला सांगतो ते त्याला कळतं, पण एखादा नेमका शब्द तो समजायला चुकतो आणि गोंधळ घालतो- या फॉर्मने प्रेक्षकांवर जादू केली. म्हणूनच या नाटकाला काळाचं आणि भाषेचं बंधन राहिलं नाही. अकरा विविध भाषांतले प्रेक्षक गेली २२ वर्षे या नाटकाचा आस्वाद घेत आहेत.. नाटकावर प्रेम करत आहेत.
आज २२ वर्षांनंतर याच फॉर्ममधील आंधळा, मुका, बहिरा या पात्रांचं स्वतंत्र, नवं, पहिल्या ‘ऑल द बेस्ट’पेक्षा पूर्णपणे वेगळं नाटक मला सुचलं- ‘ऑल द बेस्ट- २’! मी आणि माझा मित्र अमेय दहीबावकर- आम्ही दोघांनी नाटकाची निर्मिती करून ‘अनामय’ संस्थेतर्फे ते रंगभूमीवर आणलं आहे. आंधळा, मुका, बहिरा ही पात्रं प्रेमात पेटून उठली तेव्हा ‘ऑल द बेस्ट’ झालं. तशीच ही पात्रं वेगळ्या गोष्टीसाठी पेटून उठली तर वेगळीच गंमत होईल असं वाटलं म्हणून ‘ऑल द बेस्ट- २’ लिहिलं. ज्यात आंधळा विजय हा नट आहे. मुका दिलीप लेखक आहे. आणि बहिरा चंदू दिग्दर्शक आहे. रूपा या मुलीवर प्रेम करणाऱ्या तिघांनाही नाटकाची ट्रॉफी आणि रूपा या दोघांनाही जिंकायचं आहे. तिघे एकत्र येऊन अडकत अडकत.. थांबत थांबत.. गोंधळ घालत नाटकातलं नाटक कसं करतात, हेच आहे ‘ऑल द बेस्ट- २’! हेही नाटक प्रेक्षक व समीक्षकांना खूप आवडते आहे. मयूरेश पेम, अभिजीत पवार, सनी मुणगेकर आणि खुशबू तावडे या टीमवर प्रेक्षक बेहद्द खूश आहेत. इतरही अनेक पात्रं यात आहेत. अचाट एनर्जीच्या या हास्यस्फोटक प्रयोगाला पुन्हा एकदा हशा, टाळ्या, शिट्टय़ांनी थिएटर दुमदुमू लागलं आहे. सुरू झाला आहे विनोदाचा नवीन झंझावात.. विनोदी वादळ.. ‘ऑल द बेस्ट- २’!
देवेंद्र पेम -devenpem@yahoo.co.in

ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Dev Anand Birth Anniversary
Dev Anand : ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया!’ चॉकलेट हिरो देव आनंद यांना आठवताना!
Birth centenary of harmonium player Govindrao Patwardhan
स्वरसखा
salman khan sangeeta bijlani marriage broke
जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?
shinde shiv sena activist throwing currency notes in anand ashram video viral on social media
आनंद दिघे यांच्या आश्रमात नोटांची उधळण; समाजमध्यमांवर चित्रफीत प्रसारित,ठाकरे गटाची शिंदे गटावर टीका
Dilip Halyal, comedian Dilip Halyal,
ज्येष्ठ हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचे निधन
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव