अंतर्नाद : ब्राह्म संगीत आणि प्रार्थना संगीत

वाढत्या ख्रिस्तीकरणाला आळा घालण्यासाठी देवेंद्रनाथ ठाकूर यांनी ‘तत्त्वबोधिनी सभा’ (१८३९) स्थापली.

डॉ. चैतन्य कुंटे keshavchaitanya@gmail.com

भारतातील ब्रिटिश सत्ताकाल धार्मिक मन्वंतरकालही आहे. एकीकडे तर्कविसंगत वाटाव्यात अशा रुढी, कर्मकांडे व जातिव्यवस्था यामुळे विरूप बनलेला धर्म आणि दुसरीकडे ख्रिस्ती धर्माचा वाढता प्रभाव, धर्मातरे हे १९व्या शतकातील नवशिक्षित वर्गाला खुपत होते. या पार्श्वभूमीवर भारताच्या विविध प्रांतांत धर्माचे नव्या दृष्टिकोनातून परिशीलन करत ‘धार्मिक पुनरुत्थान’ सुरू झाले. या पुनरुत्थानातून सुरू झालेले नवे संप्रदाय प्रामुख्याने कर्मकांडाला, जातिव्यवस्थेला डावलून समाजसुधारणेच्या दिशेने पावले टाकत होते.

ब्राह्म सभा, मानवधर्म सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, थिऑसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन अशा संस्थांनी नव्या तात्त्विक पायावर धर्मविचारांची पुनर्माडणी केली. बहुदेवता, कर्मकांडे नाकारून ब्राह्म समाजाने एकाच, सर्वव्यापी निराकार परब्रह्माची उपासना अंगीकारली. ‘कल्पित देवापेक्षा प्रत्यक्षातील मानवाची सेवा हीच ईशोपासना’ असा या चळवळीचा मंत्र होता. ब्राह्म समाज ही केवळ धार्मिक चळवळ नव्हती, तर आधुनिक बंगालच्या एकंदर घडणीवर सखोल परिणाम करणारी मानवतावादी व राष्ट्रवादी चळवळ होती ती.

जगभरातील विविध धर्माचा आढावा घेता लक्षात येते की, मूर्तिपूजा न करता निर्गुणाची उपासना करणाऱ्या सर्वच धर्मात एखादा ग्रंथ पूज्य असतो. ज्यूंचा तोरा, ख्रिश्चनांचे बायबल, इस्लामचे कुराण, शिखांचा गुरुग्रंथसाहिब हे याची साक्ष देतात. या धर्मग्रंथांतील कवनांचे गायन हे उपासनेचे महत्त्वपूर्ण अंग ठरते. उपासना विधीत या गीतांचा समावेश करून या धर्मानी आपापले उपासना संगीत तयार केले. आधुनिक भारतातील ब्राह्म समाज, प्रार्थना समाज या निराकाराची उपासना करणाऱ्या संप्रदायांत म्हणूनच उपासना गीतांचे संग्रह-ग्रंथ आणि गीतगायन वैशिष्टय़पूर्ण ठरले.

आधुनिक बंगालमधील महत्त्वपूर्ण धर्मसंगीत विधा म्हणजे ‘ब्राह्म संगीत’ (वंग उच्चार ‘ब्राह्मो शोंगीत’)! राजा राममोहन राय (१७७२-१८३३) या आद्य समाजधुरीणाने २० ऑगस्ट १८२८ रोजी ‘ब्राह्म धर्म’ची स्थापना केली. २३ जानेवारी १८३० रोजी ‘ब्राह्म धर्मा’च्या पहिल्या प्रार्थनाघराचे उद्घाटन झाले, नियमित उपासना सभा होऊ लागल्या. या एकेश्वरी उपासनेवर एका बाजूला उपनिषदांतील तत्त्वज्ञानाचा, तर दुसरीकडे ख्रिस्ती चर्चमधील मूर्तिरहित, शिस्तबद्ध  उपासनेचाही प्रभाव होता. राममोहनांनी उपासना गीते रचली. ‘ब्राह्म संगीत’ हा त्यांचा पद्यसंग्रह ‘आद्यगीता’ ठरला आणि ‘ब्राह्म संगीता’ची सुरुवात झाली. उपासना सभांत काली मिर्झा आणि विष्णु चक्रवर्ती उपासना गीते गात. काली मिर्झा हे बंगालमधील प्रख्यात टप्पागायक, रचनाकार. विष्णु चक्रवर्ती हे मोठे ध्रुपदिये. त्यामुळे आरंभापासूनच ब्राह्म संगीतात ध्रुपदाचे गांभीर्य आणि बंगाली टप्प्याचे तरल वळण आले. पुढे यदु भट्ट, राधिकाप्रसाद गोस्वामी, श्यामसुंदर मित्र, रामगती बंद्योपाध्याय असे उत्तम ध्रुपदिये, ख्यालिये ब्राह्म संगीत गात असत.

राममोहनांच्या मृत्यूनंतर देवेंद्रनाथ ठाकूर यांनी सभेची सूत्रे हाती घेतली. वाढत्या ख्रिस्तीकरणाला आळा घालण्यासाठी देवेंद्रनाथ ठाकूर यांनी ‘तत्त्वबोधिनी सभा’ (१८३९) स्थापली. राममोहनप्रणीत धर्माचा अनुसार करत देवेंद्रनाथ ठाकूर यांनी २० अनुयायांसह २१ डिसेंबर १८४३ रोजी ‘ब्राह्म समाजा’ची स्थापना केली. १८५७ साली केशवचंद्र सेन समाजात दाखल झाले. केशवचंद्रांच्या ‘संगतसभा’ उपक्रमाने प्रार्थना गायनास अधिकच चालना मिळाली. वैष्णव आचार्य विजयकृष्ण गोस्वामी यांच्या प्रभावाने केशवचंद्रांनी करताल, खोल यांच्या साथीने होणारे वैष्णव पद्धतीचे संकीर्तन ब्राह्म समाजात आणले. केशवचंद्रांच्या बदलत्या धोरणांमुळे १८६६ साली ब्राह्म समाजाचे दोन भाग बनले- ‘आदि ब्राह्म समाजा’त देवेंद्रनाथांनी ब्राह्म संगीताचे ध्रुपद वळण चालू ठेवले, तर नवब्राह्म समाजात वैष्णव कीर्तन संगीताचे वळण अधिक ठळक झाले.

त्रलोक्यनाथ संन्याल, मनमोहन चक्रवर्ती, सतीशचंद्र चक्रवर्ती, कालीनारायण गुप्त, शिवनाथ शास्त्री, आनंदप्रसाद चट्टोपाध्याय, हरलाल राय, द्विजेंद्रलाल राय, कंगाल हरिनाथ, सुंदरीमोहन दास, किशोरीलाल राय, प्रसन्न मुजुमदार इ. अनेकांच्या पदांची ब्राह्म संगीतात भर पडली. ‘अतुलप्रसादी गीती’चे रचयिते अतुलप्रसाद सेन आणि रजनीकांत सेन या श्यामासंगीतातील महत्त्वाच्या रचनाकारांची गीतेही ब्राह्म संगीतात समाविष्ट झाली. या सर्वाची प्रार्थनागीते आजही वंगीय ब्राह्मसमाजी मोठय़ा भक्तिभावाने गातात. ब्राह्म समाजाच्या अयोध्यानाथ पकराशींची ‘मोनो चालो निजो निकेतोने’ ही प्रार्थना फार भावपूर्ण आहे. या गीताला एक विशेष संदर्भ आहे. पुढे ‘स्वामी विवेकानंद’ बनलेला नरेंद्रनाथ दत्त हा युवक रामकृष्ण परमहंस यांना जेव्हा प्रथम १८८१ साली भेटला, तेव्हा त्याने हे गीत आळवले होते!

महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर आणि ज्योतीरीन्द्र, द्विजेंद्रनाथ, सत्येंद्रनाथ अशा ठाकूर परिवारातील अन्य सदस्यांनीही ब्राह्म संगीताची पदे रचली. विशेषत: वार्षिक ‘ब्राह्मोत्सवा’त गायच्या बव्हंशी प्रार्थना त्यांनी रचल्या. भारतीय संगीताचे मोठे आश्रयदाते असलेल्या ठाकूर परिवारावर ब्रिटिश शिक्षणामुळे पाश्चात्त्य संगीताचाही प्रभाव होता. जोरासांकोमधील ठाकूरबाडीमध्ये संगीतकारांची, विशेषत: बंगालमधील ध्रुपदाच्या विष्णुपूर घराण्याच्या कलाकारांची चहलपहल असे. यामुळेच ध्रुपद, ख्याल, बंगाली टप्पा या गीतप्रकारांच्या वळणाच्या, तसेच वैष्णव संकीर्तन, श्यामासंगीत, बाउलगान, भटियाली यांच्याही धुना असलेल्या ब्राह्मगीतांत चर्चगीतांच्या धुनांचा प्रवाहही अलगद मिसळला. ब्रिटिशकालीन कोलकात्याच्या आसमंतात गुंजणाऱ्या सर्वच संगीतप्रकारांचे स्वरसंचित घेऊन ब्राह्मसमाजी उपासना गीतांची नवी घडण झाली. ब्राह्म समाजाच्या अध्वर्युवर तत्कालीन ब्रिटिश शिक्षण, व्हिक्टोरियन संवेदना आणि चर्चसंगीताचाही प्रभाव असल्याने हे स्वाभाविकच होते. म्हणूनच या प्रार्थना जरी ध्रुपद वळणाच्या, रागाधारित असल्या तरी त्यात एक आंतरिक अस्तर जाणवते ख्रिश्चन चर्चमधील सामूहिक प्रार्थनांचे!

१९११ साली रवींद्रनाथ ठाकूर यांनी आदिब्राह्म समाजाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या रूपाने ब्राह्म समाजाला नवसंजीवनी मिळाली. बालवयात ब्राह्म समाजाच्या तात्त्विक बैठकीचा व  ब्राह्म संगीताचाही खोलवर परिणाम झाल्याने रवींद्रनाथांनी याच धाटणीची अनेक प्रार्थनागीते रचली. द्विजेंद्रनाथ व ज्योितद्रनाथ ठाकूर यांनी ब्राह्म संगीताची स्वरलेखन पद्धती तयार केली होती, तिचाही प्रभाव पुढे रवींद्रनाथांच्या ‘गीतवितान’वर झाला. रवींद्रनाथांनी ब्राह्म संगीताची पदे रचताना स्वतंत्र रचना केल्याच; शिवाय अनेकविध प्रांतीय भाषांतील भक्तिपदांचे फार सुरेख रूपांतरही केले. ‘रवींद्र संगीत’ या गीतविधेच्या माध्यमातून आजही रवींद्रनाथांच्या ब्राह्म संगीतरचना मोठय़ा श्रद्धेने गायल्या जातात. 

आता बंगालातून महाराष्ट्रात येऊ आणि ‘प्रार्थना संगीत’ जाणून घेऊ. ब्राह्म समाजाच्या वैचारिक पृष्ठभूमीवर दादोबा पांडुरंग यांनी ‘परमहंस सभा’ (१८४८) स्थापली. ब्राह्म समाजाच्या केशवचंद्र सेनांनी १८६४ साली मुंबई, पुणे येथे व्याख्याने दिली. त्याने प्रभावित होऊन ३१ मार्च १८६७ रोजी आत्माराम पांडुरंगांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. रामकृष्ण गोपाळ भांडारकरांच्या प्रेरणेने चिंतामण सखाराम चिटणीस व सहकाऱ्यांनी पुण्यातील प्रार्थना समाजाची स्थापना १८७० साली केली. प्रार्थना समाजाला न्यायमूर्ती महादेव गोिवद रानडे, बाळ मंगेश वागळे, मामा परमानंद, वा. बा. नवरंगे, स. पां. पंडित, नारायण चंदावरकर, वामन आबाजी मोडक, विठ्ठल रामजी िशदे असे सहकारी मिळाले. अल्पावधीतच महाराष्ट्रात प्रार्थना समाजाचे कार्य वाढू लागले. विसाव्या शतकाच्या मध्यात मुंबईत प्रामुख्याने गणेश लक्ष्मण चंदावरकर व पुण्यात प्राचार्य वि. के. जोग यांनी प्रार्थना समाजाला नेतृत्व दिले, तर उत्तरार्धात मुंबईत गोपाळराव मालनकर, रा. द. कामत आणि पुण्यात बाबूराव जगताप, का. य. भांडारकर, शरच्चंद्र जोग, उज्ज्वला देसाई, विजय घोटगे, अभय शर्मा यांनी पुणे प्रार्थना समाजाचे कार्य चालू ठेवले.

मूर्तिपूजा, अवतार, ईश्वरी आदेश इ. संकल्पना नाकारून त्यातून उद्भवणाऱ्या कर्मकांडाला छेद देत, निराकार, सगुण तत्त्वास समजून घेत, समता, बंधुता, मानवतेची पाठराखण करत समाजोपयोगी कार्य करायचे अशी प्रार्थना समाजाची भूमिका आहे. प्रार्थना समाजींनी एकत्र येऊन प्रवचन आणि भजन गायनावर भर दिला. त्यामुळे इथेही संगीत हे अनिवार्य अंग बनले. ‘प्रार्थना संगीत’ (मूळ प्रसिद्धी १९१२) हा आठशेहून अधिक रचनांचा संग्रह आहे. त्यात उपनिषदांतील काही श्लोकांसह भांडारकर, सीताराम जव्हेरे, वा. आ. मोडक, रा. वि. माडगावकर, जयकृष्ण उपाध्ये, बा. र. जाधव, मो. प्र. खरे, ना. वि. तेंडुलकर, कान्होबा कीर्तिकर, भिकोबा चव्हाण, भा. द. पाळंदे, स. पा. केळकर, बापुमिया, नारायण धुळेकर, ना. वा. टिळक, भा. रा. तांबे, महात्मा फुले, विठ्ठल रामजी िशदे, विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांची पदे आहेत. प्रार्थना समाजाने संतांच्या उपदेशाला शिरोधार्य मानल्याने संतपदांचा समावेशही प्रार्थना संगीतात झाला. शिवाय ब्राह्म संगीतातील काही निवडक रचनाही इथे गायल्या जातात. अर्थातच संस्कृत, मराठी, हिंदी, बंगाली व इंग्लिश भाषांचा समावेश प्रार्थना संगीतात आहे. 

१००-१२५ वर्षांपूर्वीच्या या गीतांना त्या काळाच्या सुरावटींचा स्निग्ध गंध आहे. बरीचशी कवने पारंपरिक वृत्तांच्या चालींत, कीर्तनी चालींत आहेत, तर काहींत नाटय़संगीताचे वळणही जाणवते. काही गीतांना उस्ताद अब्दुल करीम खां यांनी स्वरबद्ध केल्याचे सांगितले जाते. भांडारकरांचा उस्ताद अब्दुल करीम खांसाहेबांशी घनिष्ठ संबंध होता व ते काही काळ गायन शिकलेही होते. त्यामुळे खांसाहेबांनी या पदांना चाली देणे हे स्वाभाविकच आहे. या चालींत भूप, कल्याण, केदार, बिहाग, भीमपलास, तिलक कामोद, मालकंस, दरबारी कानडा, विभास, भटियार, आसावरी, मांझखमाज, खमाज, आसामांड, काफी, पिलू, कािलगडा, भैरवी इ. रागांचा वापर झाला. विशेष म्हणजे काही गीतांत भूपबिलावल, कुकुभबिलावल, गौडबिलावल, छायाबिहाग अशा रागांच्या छटाही जाणवतात! नेहमीच्या भजनी, धुमाळी, दादरा यांसह त्रिताल, झपताल, रूपक, चाचर, इ. तालांचीही योजना आहे.

समूहस्वरात प्रतिसादी पद्धतीने गायन हे दोन्ही समाजांतील संगीताचे वैशिष्टय़. पूर्वी सामूहिक गायनाला साथसंगतीची वाद्येही असत. प्रार्थना समाजात तर हार्मोनियमवादक नेमला जाई. आता मात्र उपासनेच्या वेळी उपदेशक प्राय: विनाताल किंवा केवळ टाळ वाजवत एकटा गातो. भजनाचे विशेष कार्यक्रम असतात तेव्हा मात्र तबला, पखवाज, हार्मोनियम, व्हायोलिन आणि टाळ अशा वाद्यांची साथ असते. ब्राह्म समाज आणि प्रार्थना समाजाच्या विविध शाखांचे वार्षिक संमेलन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या काळात होते. या वार्षिकोत्सवांत दोन्ही समाजांच्या संगीताची प्रस्तुती आवर्जून होते.

प्रार्थना समाजात स्वत: भांडारकर कीर्तन-प्रवचन करत. डॉ. भांडारकरांनी पहिले हरीकीर्तन १८७८ मधील वार्षिकोत्सवात केले. भांडारकरांनी आयुष्याच्या अखेपर्यंत कीर्तने केली, त्यासाठी आख्याने आणि पदे रचली. वामनराव मोडक हेही कीर्तन करत. रागदारी संगीत उत्तम जाणणारे रामभाऊ माडगावकर प्रार्थना संगीत गात. त्यांनी अनेक पदे स्वरबद्ध केली. विठ्ठल रामजींच्या भगिनी जनाक्का िशदे या काही काळ प्रार्थना गायन शिकवण्याचे वर्ग घेत. प्रभाकरपंत भांडारकर, कृष्णाबाई जव्हेरी, वसुंधराबाई चंदावरकर, प्राचार्य वि. के. जोग, वासुदेव श्रीपाद खाडिलकर, वसुंधरा शर्मा यांनी प्रार्थना संगीताची परंपरा चालू ठेवली. मुंबईच्या प्रार्थना समाजात वासुदेव श्रीपाद खाडिलकर यांनी पदांना चाली दिल्या, शिकवल्या आणि ते संगीत सूत्रधार होते. त्यांचा वारसा व्यंकटेश पै यांनी चालवला. गेली काही दशके मुंबईत मििलद व मालविका नगरकर यांनी प्रवचन आणि अपर्णा ओक यांनी प्रार्थना संगीताची ज्योत तेवत ठेवली आहे. अपर्णाताईंनी बालकाश्रमात प्रार्थना संगीत निष्ठेने शिकवले. पुण्यात डॉ. दिलीप आणि डॉ. सुषमा जोग या दाम्पत्याने प्रार्थना संगीताचा वसा जपलाय. जोग दाम्पत्य प्रार्थना संगीत उत्तम गाते व स्वरबद्ध करतेच; शिवाय कुमुदिनी काटदरे, हेमा गुर्जर, चंद्रकांत नाईक अशा गायकांनाही त्यांनी प्रार्थना संगीताशी जोडले. अमला शेखर, उमा घोटगे, अनुराधा िशदे, नमिता मुजुमदार यांच्या ‘नृत्योपासना’तून पुणे प्रार्थना समाजाने अभिजात नृत्यशैलीचा आयामही उपासनेला दिला.

लेखाच्या अखेरीस जाता जाता एक वेधक बाब : हार्मोनियम आणि ब्राह्म संगीत यांचा अंर्तसबंध आहे असे म्हटले तर अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावतील! पण खरेच, भारतीय संगीतात आता अढळपद मिळवलेल्या हार्मोनियम या वाद्याशी ब्राह्म संगीताचा विलक्षण संबंध आहे. झाले असे की, १८७५ साली द्वारकानाथ घोष यांनी वाद्यविक्रीसाठी सुप्रसिद्ध अशा ‘द्वारकिन अँड सन्स’ची स्थापना कोलकात्यात केली. तेव्हा हार्मोनियम म्हणजे पायपेटी होती. आतासारखी हातपेटी नव्हती. चर्चमध्ये ऑर्गन वाजवला जायचा, तर ख्रिस्ती घरांत प्रार्थनेसाठी पायपेटी वापरत. ब्रिटिश अमदानीत हे वाद्य भारतात आले आणि एतद्देशीयांनीही ते स्वीकारले. मात्र खुर्चीत बसून, दोन्ही पायांनी पेडल मारत हातांनी स्वरपट्टय़ा दाबून वाजवण्याचे हे ‘उच्च’वाद्य भारतीयांना गाण्याबजावण्याच्या बैठय़ा रचनेत उपरे वाटत होते. मग पायपेटीच्या भात्यांच्या रचनेत बदल करून द्वारकानाथांनी तिचे रूपांतर हातपेटीत केले. हार्मोनियम उच्चासनावरून उतरून बैठा झाला आणि हा-हा म्हणता भारतीय संगीतात हरळीसारखा पसरला!

द्वारकानाथ ब्राह्म समाजी होते आणि चर्चमधील ऑर्गनशी समांतर म्हणून हार्मोनियमचा वापर त्यांनी ब्राह्म संगीतात सुरू केला. ब्राह्म संगीताबरोबर वाजू लागल्याने वंग भद्रलोकांत या वाद्याला मानाचे, आस्थेचे स्थान मिळाले. या वाद्याबद्दलची आधीची विरोधी भूमिका बदलली आणि वंगीय संगीतकारांचे पान हार्मोनियमशिवाय हलेना.

तर वाचकहो, परक्या समजल्या जाणाऱ्या या ‘भारतीय’ वाद्याशी एका धर्मसंगीत परंपरेचे असे नाळनाते आहे!

 (लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल येथे संगीताचे अध्यापक आहेत.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Antarnaad brahma sangeet and divine devotional music zws

Next Story
लेखकाचा कट्टा : नेटके लिहिण्याचे बीज पेरताना…
ताज्या बातम्या