नीलेश अडसूळ nilesh.adsul@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ‘आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टीही धारावीची सहसा ओळख. या विक्राळ धारावीत करोनाने हैदोस घातला आणि ती पुन्हा चर्चेत आली. मात्र, धारावीचं अंतरंग समजून घेण्याचा प्रयत्न कधीही कुणी केला नाही. ते समजून घेण्याचा प्रयत्न..

करोनाचा ‘धारावी पॅटर्न’ असं काहीतरी सातत्यानं माध्यमांतून ऐकू येतंय. याच पॅटर्नमुळे धारावीतील रुग्णवाढीचा वेग अचानक मंदावला म्हणे. या घटनेचं श्रेय प्रत्येकाने आपापल्या परीनं वाटून घेतलं. कुणी पालिकेची वाहवा केली, कुणी इथल्या तपासणी शिबिरांची, तर कुणी पोलीस प्रशासनाची. हा पॅटर्न कसा राबवण्यात आला हेदेखील चवीनं दाखवण्यात आलं. कदाचित तसं असेलही. पण इथले हजारो परप्रांतीय मजूर गावी गेल्याने वस्त्या बऱ्याचशा रिकाम्या झाल्या आहेत. काही मूळच्या रहिवाशांनीही भीतीपोटी आपलं गाव गाठलं. अर्थात परवानगीची कुणीही वाट पाहिली नाही. शक्य तितके पैसे देऊन लोकांनी रातोरात आपली सुटका करून घेतली. किमान लाख- दीड लाख लोक तरी सहज कमी झाले असतील. कदाचित याचाही हा प्रभाव असावा. कारणं काहीही असोत, रुग्णसंख्येत घट झाली, हे महत्त्वाचं..

धारावीमध्ये काय घडतंय हे प्रसारमाध्यमं आपापल्या परीनं दाखवत आहेत. आता तेच वास्तव आहे असं साधारणत: सगळ्यांनीच स्वीकारलंय. कारण धारावीत शिरून त्या माहितीची सत्यासत्यता पडताळण्याची ही योग्य वेळ नाही. पण करोनामुळे का होईना, धारावीचं नाव पुन्हा लोकांच्या चर्चेत आलं, हे विशेष.

घराघरांतल्या टीव्हीत धारावी दिसते तेव्हा इथल्या लोकांना ती का दिसते आहे, यापेक्षा ती दिसतेय याचाच अधिक आनंद होतो. कारण कित्येक वर्ष आपल्याकडे कुणाचं लक्षच गेलं नाही.. आणि ज्यांचं गेलं त्यांनी ‘आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी’ म्हणूनच तिच्याकडे पाहिलं, ही खंत सदैव आहे इथल्यांच्या मनात. उच्चभ्रू मरिन लाइन्सची स्वप्नं कधीच पडत नाहीत इथल्या कष्टकऱ्यांना. कारण घामेजलेल्या त्यांच्या अंगाला आल्हाददायक वाटतो गल्लीबोळातनं अडखळत येणारा संध्यासमयीचा वारा.

आज हा वारा वेगवान झालाय, कारण यंत्रासारखी धावणारी धारावी स्थिरावलीय करोनाकाठी. इथले उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने वातावरणात स्तब्धता आलीय खरी, पण जनजीवन मात्र आजही धावतेच आहे.. करोनाकाळातही. सुरुवातीला शेजारीच असलेल्या शाहू नगरमध्ये जेव्हा पहिला करोनारुग्ण सापडला तेव्हा धारावी भेदरून गेली होती. पण आता १९०० च्या पार आकडा गेल्याने अंगवळणी पडलंय सारं. शेजारच्या घरात करोनाचा रुग्ण आहे किंवा करोनाने कुणी दगावलंय, हे ऐकून वाटणारा धक्काही आता शमलाय. एकेका चाळीत डझनभर रुग्ण झालेत.

करोनाच्या दृष्टीने हा ‘अतिसंवेदनशील’ भाग असला तरी इथली सकाळ आजही तितकीच असते गजबजलेली. अंगाला अंग खेटेल अशा गर्दीने भरलेला बाजार.. पाण्यासाठी धावपळ करणाऱ्या बायका.. चाळींमध्ये सुरू असलेली धुणीभांडी.. सार्वजनिक शौचालयाबाहेरच्या रांगा.. विडीकाडी चघळत उभे असलेले चाळकरी.. शौचालयांची दुरवस्था.. सगळं चित्र आजही तसंच आहे.

धारावी दिवसा जितकी धगधगती असते तितकीच रात्रीही. म्हणून मुद्दामच ही वेळ ठरवली. सूर्य साधारण पिवळ्या बंगल्याकडे (धारावीतलं महत्त्वाचं ठिकाण!) म्हणजेच पश्चिमेकडे झुकला होता. जवळच असलेल्या कोळीवाडय़ाचे रस्ते स्थानिकांनी बंद केल्याने ६० फुटी रोडला वळसा घालूनच धारावीत जावं लागतं. माहीम स्थानकाजवळून आलेला एक स्कायवॉक थेट धारावीत येतो. ६० फुटी रोडनजीक. धारावी कोळीवाडय़ात शिरण्याचा हा दुसरा मार्ग. इथं प्रामुख्यानं मुस्लीम समाजाची वस्ती. तिथं पोहोचेपर्यंत बऱ्यापैकी अंधार झाला होता. स्कायवॉकखाली तीसएक लहान मुलांचं क्रिकेट, बॅडमिंटन, पकडापकडी असे नाना खेळ चाललेले. त्यातली अर्धीअधिक पोरं मास्कविनाच खेळत होती. स्थानिक रहिवाशांचीही तुंबळ गर्दी. भाजीवाल्यांसोबत ड्रेसवाले, चप्पलवाले, मिठाईवाले नाना तऱ्हेचे ‘वाले’ ठेले लावून बसलेले. पुढे मेअर कंपाउंड रोडला मोठा घोळका दिसला. आधी वाटलं, कुणीतरी चक्कर वगैरे येऊन पडलं असावं. सध्या कुणीही चक्कर येऊन पडलं तर लोक करोनाच्या संशयाने जवळ जाणार नाहीत, पण इथल्या माणसांमध्ये माणुसकी इतकी ठासून भरलीय की अर्धेअधिक रुग्ण हे शेजाऱ्यापाजाऱ्यांनीच रुग्णालयात दाखल केले आहेत. मीही त्या गर्दीत डोकावण्याचा प्रयत्न केला तर आत भलामोठा चड्डी-बनियानचा ढीग आणि ते घेण्यासाठी उडालेली ही झुंबड. ती स्वाभाविकच होती. कारण दोन जोड कपडय़ांवर राहणाऱ्या इथल्या लोकांकडे अंतर्वस्त्रांचा साठा असणं ही अपेक्षाही चुकीचीच. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात अंतर्वस्त्रांच चणचण भासलेले सगळे जण त्या ढिगाऱ्यावर तुटून पडले होते.

इथेच हाजी र्फजद अली चाळ आहे. मुस्लीम आणि तमिळींची इथं मोठी वस्ती. आजही इथं हिंदू-मुस्लीम ऐक्य अबाधित आहे. एकीकडे सगळी मुंबई ‘स्ट्रीट फूड’साठी आसुसलेली असताना इथं मात्र गाडय़ांवर उकडलेली अंडी, अंडा मसाला, चणा मसाला यांचा फर्मास बेत भूक चाळवतो. गेल्या आठ-पंधरा दिवसांत या गाडय़ा लागत असल्याची माहिती एकानं दिली. इथले लोक तसे खाण्यापिण्याचे शौकीन. त्यामुळे टाळेबंदीतही कोंबडीवाले आणि मटणवाले जोशात आहेत. ‘करोनाचं संकट आहे म्हणून काय झालं? खाण्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. खाऊ तर राहू!’ असा इथल्या प्रत्येकाचा सूर असल्यानं बुधवार, शुक्रवार, रविवार कोंबडीवाल्या चाचाशी- ‘पाय क्यूं नहीं दिया?’, ‘मेरी मुर्गी का पेटा किधर है?’, ‘कलेजी का क्या..?’ यावरून लोक अगदी चवीने भांडताना दिसतात.

हे रस्त्यावरचं चित्र असलं तरी इथल्या चाळींमध्ये मात्र बहुसंख्य लोक अन्नाची याचना करताना दिसतात. जिथं जाऊ, तिथं प्रत्येक ठिकाणी हाच प्रकार. ‘साहेब.. अहो, घरात खाण्यापिण्याचे वांदे हायेत. नगरसेवक लक्ष देत नाही. त्याने फक्त त्यांच्याच लोकांना सामान वाटलं. तुमच्याकडून काही झाल्ं तर बघा की..’

एक बाई म्हणाली, ‘सुरुवातीला पाच किलो गहू, किलोभर डाळ आणि चार-पाच किलो तांदूळ देऊन गेले. आता दोन-अडीच महिने झाले.. एवढय़ानं भागतंय का? घरकाम करणाऱ्या बाया आम्ही. बंदी घातलीया आम्हाला.’ इथल्या बऱ्याच चाळींमध्ये फिरल्यावर कळलं की काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रतिनिधींपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीनंही लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलंय. गंमत म्हणजे धारावीच्या आमदार व शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांचे फोटो असलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या आणि जीवनावश्यक वस्तूंसोबत प्रकाश आंबेडकरांचे फोटो असलेली करड बऱ्याच घरांतून दिसली.

इथल्या सत्तर टक्के स्त्रिया गृहिणी आहेत. त्यातल्या बहुतांश साक्षर नाहीत. ज्या आहेत, त्याही घरातच असतात. इथं घरकाम करणाऱ्या, हेल्थ ब्युरोमध्ये जाणाऱ्या, आया, नर्स, मदतनीस अशा स्त्रियांची संख्या मोठी आहे. दुर्दैवानं ‘रांधा-वाढा’ वृत्ती इथल्या प्रत्येक बाईत रुजलेली असल्यानं ‘चक्की फ्रेश आटा’ इथं कधीच तग धरू शकला नाही. आजही इथल्या पिठाच्या गिरण्या आणि मसाल्याचे डंख अहोरात्र खणखणत आहेत. महिला तासन् तास रांग लावून, मिरच्या घेऊन, वाळवणं करून मसाला कुटायला जातात. ढोरवाडय़ात मसाला पारंपरिक पद्धतीनं कुटला जातो. रात्री साडेनऊ वाजताही २० ते २५ महिला मसाला कुटण्यासाठी ‘वेटिंग’वर होत्या. चेहऱ्यावर फक्त हात किंवा साडीचा पदर. तोही कुणी आपल्याकडे पाहतंय हे लक्षात येताच वर जाई. अन्यथा नाक-तोंड उघडंच. बायकांच्या घोळक्यात गप्पा सुरू होत्या.. ‘इकतचा मसाला खाल्ला तर घरातली माणसं कालवणाला तोंड लावणार नाहीत. त्यापेक्षा आपणच कष्ट उपसलेले बरे. आणि तसंही इकतच्या मसाल्याला चव असती कुठं?’

शेजारीच एका ओटय़ावर चार-पाच बायका कानडीत काहीतरी कुजबुजत होत्या. माकडवाल्यांची ही वस्ती. गर्दीने भरलेल्या या गल्लीत काही पुरुष नेमके त्याच ओटय़ावर येऊन थांबायचे. दर पाच मिनिटांनी वेगळा पुरुष. तिथे सुरू असलेल्या व्यवहारात फारसे शब्द नव्हते. केवळ नजरानजर, काहीशी नकारार्थी चिडचिड आणि समाधान. व्यवहार पक्का झाला की त्यातली पन्नाशीतली एक बाई चाळीतल्या आपल्या घरात जाई आणि देशी दारूची एक बाटली साडीच्या पदराआड लपवून आणी आणि कुणीही पाहणार नाही अशा सावधपणे आलेल्या पुरुषाला सोपवी. तर दुसरीकडे तिच्याच जवळ तीसएक वर्षांची एक बाई कमी पैशांची फुग्याची दारू विकत होती. बराच वेळ हा व्यवहार चालला होता. दारूची दुकानं खुली नसल्यानं प्रतिसाद उत्तम असावा. दारूच काय, गुटखा, तंबाखू, शिखर, विमल, मशेरी यांचाही कधी इथं तुटवडा जाणवला नाही. आजही नाक्यानाक्यावर पिशव्यांमध्ये लपवून त्यांची सर्रास विक्री होते. कष्टकऱ्यांचा श्रमपरिहाराचा हा भाग असल्यानं त्यात आश्चर्य नव्हतं.

इथल्या बहुतांश चाळी, इमारती, गल्ल्या, एसआरएतल्या गृहसंस्था आजमितीला ‘सील’ आहेत. पण सील म्हणजे नेमकं काय, हे इथं कुणालाच कळलेलं  नाही. पालिकेनं लावलेले फलक फक्त नावापुरते लटकत आहेत. ज्यांना विलगीकरणाचे शिक्के  मारले होते ते तासाभरातच पुसले गेले. त्यामुळे लोकांचा वावर खुलाच आहे. एसआरएत मिळालेल्या २०० चौरस फुटांच्या एका घरात ८ ते १० माणसांचा वावर. त्यात इमारतीची रचनाच अशी की घरात बसण्यापेक्षा बाहेर पडणंच लोक पसंत करतात. काही लोकांमध्ये बेपर्वाईही आहेच. ती नाकारता येणार नाही.

पिवळा बंगला ते पीएमजीपी वसाहतीच्या दरम्यान तर वेगळीच गंमत पाहायला मिळाली. घराघरातले लोक चक्क रस्त्याच्या दुभाजकावर येऊन रेंगाळताना दिसले. तीनशे-चारशे जण तरी सहज असावेत. हा शीव- वांद्रे लिंक रोड. सध्या इथली वाहनांची वर्दळ थंडावल्यानं लोकांनी मोकळा श्वास घेण्यासाठी थेट दुभाजकावर बसण्याचा पर्याय स्वीकारला आहे. काहीजण आडवेही झाले होते. या परिसरातील झोपडपट्टय़ा इतक्या दाट आहेत, की फूटभराचीच गल्ली. १० बाय १०, १० बाय ५ च्या खोल्या. वर अनधिकृतपणे बांधलेले दोन-तीन माळे. त्यामुळे इथल्या चाळींमध्ये व्हेंटिलेशनसाठी जागाच नाही. त्यात वाढत्या उष्म्याच्या कहरात जीव सुखावण्यासाठी लोक रिकाम्या रस्त्यांचा आधार घेत आहेत.

धारावी टी जंक्शन ते बीकेसीपर्यंत चालणारी तृतीयपंथीयांची देहविक्री टाळेबंदीने ठप्प झालीय. झाडाझुडपांत लपून चालणारा हा मायाबाजार थंडावलाय. पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहणारे तृतीयपंथी आताशा कुठं दिसत नाहीत. त्यातले बरेचसे धारावीतच राहतात. गेल्या अडीच महिन्यांत त्यांच्या पोटावर आलेली संक्रांत देहविक्रीपेक्षाही खोल जखम देणारी असावी.

इथला ९० फूट रोड बराच प्रसिद्ध. दिवसरात्र हा रस्ता वर्दळीने भरलेला असल्याने टॅक्सीवाले इथं यायला कायम रडत असतात. या रस्त्यावर एक ७० वर्षीय म्हातारे गृहस्थ कमरेला लुंगी खोचून, एका हातात पाण्याने भरलेली बादली, दुसऱ्या हातात कोळशाची शेगडी आणि त्यावर तापत ठेवलेला जर्मनचा टोप ठेवून फिरताना दिसले. येणाऱ्या-जाणाऱ्यांना आणि खुल्या असलेल्या दुकानदारांना ते चहा देत होते. टाळेबंदीतही ते बिनधास्त फिरत होते. चौकशी केल्यावर म्हणाले, ‘या रस्त्यावर रात्री हजारएक माणसं सहज फिरत असतात. प्रत्येक जण चहा घेतोच असं नाही, पण मी मात्र प्रत्येक दुकानाजवळ जाऊन उभा राहतो. तेवढेच दोन-चार रुपये खर्चायला. आम्हाला सांभाळणारं कुणी नाही. मी आणि बायको. त्यामुळे पोटासाठी फिरावं लागतं.’

शीवमधून एक पूल थेट धारावीच्या धोबीघाटात उतरतो. तिथे तीन मोठय़ा गल्ल्या लागतात. ट्रान्झिस्ट नंबर दोन ही गल्ली बाजाराची. शेजारीच धारावी पोलीस ठाणे. रात्रीच्या वेळी आजही हा परिसर नेहमीसारखाच फुललेला असतो. सहज म्हणून गल्लीत शिरलो तर नाना पदार्थाच्या वासांनी नाक फुललं. इडली, डोसा, मेदुवडा, पाणीपुरी, चायनीज भेळ, अंडाडोसा.. धारावीतला अंडाडोसा खाण्यासाठी अनेक लोक दुरून दुरून येतात. याच गल्लीच्या कोपऱ्यावर एक आप्पेवाली अक्का दिसली. इथे अक्का आणि अण्णा हे शब्द प्रत्येकासाठी वापरले जातात. दोन बाय तीनच्या टेबलावर २० रुपयांना आठ आप्पे विकणारी ती अक्का जराशी वेगळी वाटली. चौकशी केल्यावर ती म्हणाली, ‘चार-पाच दिवस झाले धंदा सुरू करून. नवरा इडली विकायला जायचा. पण सध्या तेही बंद आहे. शिलकीतले पैसे संपत आलेत. त्यामुळे जिवावर उदार होऊन धंदा लावावा लागला. धंदा करतानाही नजर सारखी पोलिसांवर असते. परवा अचानक पोलीस येताना दिसले नि घाबरून पळ काढायच्या नादात टेबल उलटा झाला. सगळं सामान खाली पडलं. जेवढं कमावलं नाही त्यापेक्षा जास्त गमावून बसले.’ मुंबईभरात डोक्यावर मोठा टोप डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या हजारो इडली विक्रेत्यांचा पोटापाण्याचा प्रश्न त्या अक्कानं कळकळीनं मांडला.

तिथंच कोपऱ्यात जवळपास वयाची ऐंशी गाठत आलेली एक तमिळ म्हातारी गजरे विणत बसली होती. मोगऱ्याची फुलं मीही दोन महिन्यांनी पाहत होतो. ‘सकाळी दादरला जाऊन फुलं आणली. तिथेही पोलीस आणि इथेही पोलीस. मार पडायच्या भीतीने मी लपूनछपून धंदा करते. आता हात चालत नाही. पण नाही कमावलं तर खायचं काय?,’ असा सवाल तिने केला. तिच्याच आजूबाजूला क्लिपवाले, करगोटेवाले, बेन्टेक्सचे दागिने विकणारे, चाप, फणी, काजळ ते नाना वस्तू घेऊन बसलेले अनेक विक्रेते होते. प्रत्येकाला करोनापेक्षाही उद्याच्या भुकेची चिंता अधिक सतावत होती.

राज्यातच नाही, तर जगभरात मातीच्या वस्तू पोहोचवणारा धारावी कुंभारवाडा मात्र सध्या रवंथ करीत बसलेल्या गुराप्रमाणे पहुडलेला आहे. गेले दोन महिने कुंभाराचा आवाज आणि व्यवसाय दोन्ही बंद असल्यानं तयार माल रस्त्यावर धूळ खात पडला आहे. तसा हा समाज पुरेसा धनिक असल्यानं तोटा सहन करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. पण नुकसानीचं दु:खही आहेच. इतर वेळी घरकाम, कुंभारकाम आणि व्यवसाय अशा तिहेरी जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या इथल्या स्त्रिया सध्या कामाचा व्याप कमी असल्याने घराच्या अंगणात निवांत गप्पागोष्टी करत बसलेल्या दिसतात.

इथे बऱ्याच वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंग होत असल्यानं स्वस्ताई अमाप आहे. आज मजुरांअभावी कारखाने बंद झालेत, पण बाजारपेठ मात्र खुली आहे. कपडे, चपला, हलवायांची दुकानं र्अध शटर खुलं करून व्यवहार सुरू होता. त्यामुळे रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये, नाक्यावर लोकांचा वावर इतर वेळी असतो तसाच आहे. मास्क वगैरे इथल्या लोकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे कपडय़ाने, रुमालाने, ओढणीने होईल तेवढंच संरक्षण. अनेकांनी आपले मास्क घरातच शिवले आहेत. प्रत्येक रस्त्यावर उभं राहून अंदाज घेतला असता मिनिटभरात १०-१२ चारचाकी, तीसएक दुचाकी आणि शे-दोनशे लोक इथं सहज वावरताना दिसले. सुरुवातीला पोलिसांनी प्रकरण पुरतं ताणून धरलं होतं, पण त्यांच्याच जिवावर बेतू लागल्यानं त्यांनीही माघार घेतलेली. गेले काही दिवस सीआरएसएफचे जवान इथं गस्त घालताहेत. पण कामराज शाळेमागे असलेल्या झोपडपट्टीबाहेर रात्री लोक निवांत बसले होते. बायाबापडे, उंडगे.. सगळेच. गस्तीत असलेल्या आठ-दहा जवानांनी लाठीचा धाक दाखवत त्यांना घरी पिटाळण्याचा प्रयत्न केला. तितक्यात एका खिडकीतून एक छोटा दगड येऊन एका जवानाला लागला. दगड फारसा मोठा नसल्याने इजा झाली नाही. पण संतापलेल्या जवानांनी मग दिसेल त्याला बेछूट लाठय़ा हाणल्या. इथे मोकाट फिरणाऱ्यांना भीती नाही अशातला भाग नाही, पण त्यांचं असं जगणंच इतकं अपरिहार्य आहे, की चार भिंतींत राहिले तर ते गुदमरून मरतील. अशाने मरणाच्या भीतीपेक्षा जगण्यासाठी बाहेर पडणं त्यांना जास्त बरं वाटतं.

इथल्या व्यवस्थेबाबत मोठा जागर सुरू असला तरी आजही कितीतरी चाळी अशा आहेत, जिथे करोनाचे रुग्ण आढळूनदेखील चाळींचं निर्जंतुकीकरण केलेलं नाही. रुग्णांना वेळेत खाटा मिळत नाहीत. पालिकेचे स्वच्छता कामगार वरवर हात मारून जातात. कितीतरी चाळींची तपासणी बाकी आहे. बाधित रुग्णांचे कुटुंबीय आणि चाळकरी एकाच सार्वजनिक शौचालयात जात असल्यानं प्रसाराची भीती टळलेली नाही. एकीकडे करोनाचं संकट, तर दुसरीकडे पावसाचं. नाले, गटारांच्या साफसफाईला अद्याप वेग आलेला नाही. पहिल्या पावसातच अनेक ठिकाणी चिखल साचला. इथल्या लोकसंख्येपेक्षा घुशींची आणि झुरळांची संख्या दुप्पट असल्याने पावसाळ्यात अनेकदा ते घरातच मुक्कामाला येतात. जगभरातील नद्या टाळेबंदीच्या काळात स्वच्छ झाल्या असल्या तरी धारावीभोवती घमघमणारा शाहूनगर नाल्याचा आणि मिठी नदीचा उग्र वास मात्र अजूनही तितकाच तीव्र आहे.

कमावणारा एक आणि खाणारी दहा तोंडं अशी इथली अवस्था. शिक्षण अजून रांगतंच आहे. त्याला गती मिळालेली नाही. त्यामुळे काही अपवाद वगळता तरुणवर्गही फारसा कमावता नाही. परिणामी इथून बाहेर पडण्याचं धाडस तो करू शकत नाही. जिथे जगतायत तिथे पुरेसा श्वासही घेता येत नाही. एक माणूस मुश्किलीने जाईल असे बोळ. फूटभराच्या गल्ल्यांमध्ये असलेली गटारं. दाराला चिकटलेली दारं. एकमेकांमध्ये शिरलेले माळे. या सगळ्यामध्ये ‘सामाजिक अंतर’ हा शब्द केवळ फुकाचाच. घरातले पुरुष कामानिमित्त बाहेर असतात. बायका काम आवरून तासन् तास उंबऱ्यात बसून असतात. पोरांना भटकायला गल्ल्या पुरत नाहीत. भरदुपारी उन्हाने तापलेले पत्रे जेव्हा अंगावर ऊब फेकत असतात तेव्हा आपसूकच पावलं उंबऱ्याबाहेर पडतात.

असं जरी सगळं असलं तरी इथल्या लोकांची काहीही तक्रार नाही. तेही शिकलेत आता करोनासोबत जगायला. आहे त्यात समाधान मानणाऱ्या इथल्या लोकांनी अडगळीचं जगणंही समृद्ध मानून स्वीकारलंय जणू.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about dharavi slum coronavirus in dharavi business in dharavi after coronavirus zws
First published on: 14-06-2020 at 01:09 IST