– डॉ. श्रुती जोशी

रात्री साधारण दोनच्या आसपास माझी झोपमोड झाली ती रूममेटच्या झोपेतल्या बडबडीनं- ‘‘वो पेशंट का सँपल लेना है, उसका ओ.टी. है कल, पर अबतक ब्लड अरेंज नही हुआ.’’ इत्यादी…

decline of the y chromosome human males likely to disappear from earth
निमित्त : पुरुष नामशेष होणार आहेत!
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Iru The Remarkable Life of Irawati Karve
‘इरू’ समजून घेण्यासाठी…
parents children self reliant chaturang article
सांदीत सापडलेले : काळजी
chaturang article on Fear
इतिश्री : अशुभाची भीती
achieving life goals steps to be successful in life
सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता
obscene messages and calls chaturang article loksatta
‘भय’ भूती : भयाचा तप्त ज्वालामुखी
mobile data, Internet, Urban Areas mobile data,
खालमानेतले अनलिमिटेड

तब्बल तिनेक दिवसांनी रूमवर थकून, कदाचित संपूर्ण दिवस चहा-बिस्किटावर काढून आलेल्या तिला उठवावं की झोपू द्यावं तेच मला कळेना. मी मात्र तुलनेनं कमी व्यग्र विभागात असल्यानं मनोमन देवाचे आभार मानले की, आपल्या नशिबात किमान सात तास झोप आहे. तीही नशीबवान अशासाठी की, तीन दिवसांनंतर का असेना, पण ती रूमवर येते. नाहीतर बाकीचे आमचे सर्जरी-ऑर्थो-मेडिसिनचे मित्र-मैत्रिणी म्हणजे तिन्ही-त्रिकाळ वॉर्डमधेच संसार थाटून बसलेले!

सकाळी लवकर उठून वॉर्डातील कामं करून, ९ ते साधारण २.३० पर्यंत जवळपास २५० ते ३०० पेशंटची ‘ओपीडी’ आवरली. कसेबसे चार घास घशाखाली ढकलून मी दोनेक बादल्या पाणी भरून ठेवायला हॉस्टेलवर आले. कारण दुपारी ज्यावेळी जवळपास कुणीच हॉस्टेलवर नसतं अशा एक ते तीनच्या ब्रह्ममुहूर्तावर संपूर्ण गर्ल्स हॉस्टेलमधल्या ‘एकमेव चालू बाथरूम’च्या नळाला पाणी येणं हे ठरलेलं! त्यावर काही बोललं तर ‘ये सब सरकारी है मॅडम, इतने फीस मे इतनाईच मिलता, कमसे कम पानी तो आ रहा ना’ असे काही समजुतीचे शब्द ऐकून मी देवाचे आभार मानले की, मला किमान अंघोळीसाठी तरी वेळ मिळाला.

हेही वाचा – लोभस माणूस

‘ओपीडी’मधून अ‍ॅडमिट झालेल्या रोजच्या पेशंटचे रक्त नमुने घेणे, स्वत: तपासणीसाठी प्रयोगशाळेत नेणे, नव्या पेशंटची ‘केस हिस्ट्री’ घेणे, रिपोर्टची अगदी नीटनेटकी फाइल बनवणे, आधीपासून अ‍ॅडमिट असलेल्या पेशंटच्या कोणत्या तपासण्या झाल्या, कोणत्या राहिल्या, रिपोर्टमधे काय खाली-वर आहे, रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या शंकांचं समाधान अशी कामं करण्यात कधी सायंकाळचे ७ वाजून गेले ते कळलंच नाही! आमचा आणि मेडिसिन विभागाचा वॉर्ड एकच असल्यामुळे मी माझ्या मेडिसिनच्या मित्राला ‘चल चहा प्यायला जाऊन येऊ’ची ऑफर दिली. त्वचारोगाचे आमचे १०-१२ अ‍ॅडमिट पेशंट सांभाळणाऱ्या माझ्याहून कधी कोण ‘ऑफ’ होतंय असे पन्नासएक पेशंट एकहाती सांभाळणाऱ्या त्या मित्राचा चहावर निश्चितच अधिक हक्क होता. माझ्या चहाविनंतीवर त्याचं उत्तर- ‘माझ्या वरिष्ठांना कळलं ना की मी वॉर्ड सोडून दहा मिनिटांसाठी बाहेर गेलोय, तर उद्या मला राऊंडच्या वेळी फैलावरच घेतील.’

ज्या वॉर्डात ज्युनियर डॉक्टर चोवीस तास राबतो तिथेच सर्व पेशंट आणि नातेवाईकांसमोर अश्लाघ्य भाषेत लायकी काढली जाते. ‘‘माझा बॉस मला सलग तीन दिवस काम करायला लावायचा, आम्हीही केलंच ना…’’ किंवा ‘‘आम्ही तर तशीच बिना ग्लोव्हजनी कामं केलीत, पाच-सहा दिवस विनाअंघोळीचे राहिलो,’’ हे ऐकायला लागे. मीही हे सहन केलं मग तूही कर, याच विचाराने पछाडलेले अनेक वरिष्ठ… ‘टॉक्सिक वर्कप्लेस कल्चर’ रूढ करणं हा निवासी डॉक्टरांच्या आयुष्याचा भाग मला ना कधी समजला, ना आवडला, ना पटला…

इतर वॉर्डातल्या ज्या रुग्णांना मूळ आजाराव्यतिरिक्त किंवा त्यासंबंधित अशा ज्या काही तक्रारी असतात, त्या ‘आंतर विभागीय रेफरल’ म्हणजे इतर विभागाचे डॉक्टर येऊन त्या-त्या वॉर्डात जाऊन ‘कॉल्स’ म्हणून बघत असतात… तेव्हा संध्याकाळचे वॉर्ड राऊंड आटोपून कळकट्टं, पानाच्या पिचकाऱ्यांनी, रुग्णांच्या उलट्यांनी, डागांनी रंगलेल्या त्या कॉरिडॉरमधून वाट काढत मीही आपली माझे ‘कॉल्स’ करत फिरू लागले… कोणी वॉर्डाच्या टेबलावर फाइल्स भरता-भरता तसाच कागदाच्या थप्पीवर डोकं ठेवून झोपलेला… गळ्यात स्टेथोस्कोप, एका खिशात इंजेक्शन – रिपोर्ट, तर दुसऱ्या खिशात टूथब्रश-पेस्ट असणारा कोणी सलग ७२ तास ड्युटी करून निस्तेज डोळ्यांनी फिरताना, ‘सामनेसे हटो, सामनेसे हटो’ म्हणत ‘ओटी’ किंवा वॉर्डातल्या ‘क्रिटिकल’ पेशंटना भराभर अतिदक्षता विभागात हलवणारा… क्षणभराची उसंतही न मिळणारा… डबा खायला सुदैवाने सवड मिळालीच तर वॉर्डाच्या साईडरूममधून ‘अमुक तमुक पेशंटला उलटी झाली’, ‘त्याला संडास नाही झाली’, ‘याला अगदीच पातळ झाली’, ‘पेशंटला अचानक प्रसुतीवेदना सुरू झाल्या’, ‘याला कसंतरीच होतंय’ या सिस्टरच्या कथनांवर उघडलेला डबा न खाता बंद करून तसाच धावून जाणारा… निवासी डॉक्टरांच्या धकाधकीच्या आयुष्याचे साक्षीदारच असतात हे कळकट्ट कॉरिडॉर, रुग्णांनी भरून वाहणारे वॉर्डस् आणि दवाखान्याची प्रत्येक भिंत…
शेवटचा ‘कॉल’ संपवता संपवता एक बडबड्या, प्रेमळ सिस्टर भेटल्या. ‘‘क्या मॅडम, आज लगता आपको खाना नसीब नही… ये लो मेरा डब्बा खाओ तुम.’’ आमचं आणि वॉर्डातल्या तमाम सिस्टर-ब्रदर यांचं कडू-गोड नातं असतं. आपलं गॉसिपसत्र पुढे नेत त्या सांगू लागल्या, ‘‘पता है कल क्या हुआ? यही कुछ अ‍ॅक्सिडेंट का केस होंगा, अपने कॅज्युल्टी मे ये पचास हट्टेकट्टे मवाली घुसे, जो दिखा एप्रन मे उसे पकडके मारने लगे… मै तो डरइच गयी! अब एप्रन पहननाइच बंद !!’’

‘‘ये अब रोजका हो गया है सिस्टर. जब तक कोई डॉक्टर दंगे मे मरेगा नही, तब तक कोई कुछ नही करेगा.’’ नकळतपणे माझ्या तोंडून बाहेर पडलेल्या या सत्य परस्थितीवर नंतर मीच विचार करू लागले.

‘‘सगळं छान आहे, मी जेवले वेळेत…’’ अशी घरच्यांना सवयीची थाप मारून मी रूमवर आले; मात्र माझ्या तोंडून नकळत बाहेर पडलेल्या सत्य परिस्थितीचा विचार पाठ सोडायला तयार नव्हता. मनात विचार आला की, निवासी डॉक्टर ‘माणूस’ आहे की बिनशर्त गृहीत धरलेला प्राणी? खरं तर ‘निवासी डॉक्टर’ हा असा समूह आहे, ज्यांना अथक परिश्रमामुळे हॉस्पिटल बाहेरचं जग क्वचितच पाहायला मिळतं. त्याचा दिवस कधी सुरू होतो आणि केव्हा संपतो हे त्यांनाही माहीत नसतं. रुग्णांखेरीज त्यांना कसलीच पर्वा नसते. रुग्णसेवा हेच त्यांचं ब्रीदवाक्य असतं. त्याला येनकेनप्रकारे वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागते, कारण पदवी मिळू देणं- न देणं, ऑपरेशन करायला मिळणं किंवा न मिळणं, कामाचे तास किती, हे सगळं सगळं वरिष्ठांच्या हाती असतं. त्यांनी बिना ग्लोव्ह्जच्या हातांनी न जाणे कित्येक एड्सच्या लोकांचे ‘सँपल’ काढलेले असतील, युरीन बॅगा हाताळलेल्या असतील, चेहऱ्यावर उडालेले रक्ताचे डाग त्याच हाताने पुसलेले असतील, असंख्य जीव वाचवलेले असतील, माळेतून मोती निखळावा तसा माणसातील प्राण निसटून अनंतात विलीन झालेल्या कित्येक दु:खद क्षणांचा तो साक्षीदार असेल… संतप्त जमाव सहजपणे आपल्याला मारून जाऊ शकतो हे माहीत असूनही तो ‘होऊ देत व्हायचंय ते’ म्हणत धीराने सामोरा गेला असेल… त्यालासुद्धा रागाने तिडीक आली असेल, पण त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ न देणं, गेलेल्या जिवाच्या दु:खाची झळ येणाऱ्या पेशंटपर्यंत पोहोचू न देणं… इतका तो स्थितप्रज्ञ झालेला असतो! दिवसभर काम करून आलेल्या ड्रायव्हरला आपण आपली गाडी हायवेवर चालविण्यास देऊ शकतो का? नाही ना! पण सलग ३६ तास काम करून शिणलेल्या त्याच्या मेंदूवर एखाद्याच्या जीवन-मरणाविषयी निर्णय घेण्याची जबाबदारी असते. तो देव नाही, तो माणूस आहे. पण त्याला चूक करण्याची मुभा नसते. निवासी डॉक्टर म्हणून तो सरकारी यंत्रणेचा फक्त एक भाग असतो, तो प्रशासनाचं प्रतिनिधित्व करत नाही. पण तरीही सरकारी वैद्याकीय व्यवस्थापनेतल्या प्रत्येक त्रुटीबद्दल समाजाच्या रोषाला तोंड देणारा तो पहिला असतो.

तुमच्यावर कितीही हल्ले होवोत, पण त्याचा निषेध न करता तुमचा ‘डॉक्टरी पेशा’ सांभाळायलाच हवा, तुम्ही नि:स्वार्थी वृत्ती ठेवायलाच हवी अशी सर्वच डॉक्टरांकडून सर्वसमान्यांची अपेक्षा असते. आणि हे सत्य डॉक्टरांना पचवावंच लागतं.

हेही वाचा – ‘नास्तिक्या’ची परंपरा…

दिवसाकाठी सात तास झोप आणि वेळेवर जेवण मिळतं म्हणून आपण देवाचे आभार मानावेत, तर या मूलभूत मानवी गरजा आपल्याच सहकारी ज्युनिअर डॉक्टर्ससाठी ‘चैनीची परिभाषा’ असाव्यात… अन् तरीही त्यांनी स्वार्थ परमार्थाचा तराजू स्वार्थाकडे झुकू न देता काबाडकष्ट करत दिवसामागून दिवस काढावेत… माझ्या मनात राग, दु:ख, तिरस्कार, हतबलता असे काळजीमिश्रित विचार येऊन गेले.

मी इमर्जन्सी वॉर्डमधून आलेल्या प्रत्येक पेशंटसाठी हॉस्टेल ते आपत्कालीन विभाग अशा चकरा मारत होते. शेवटी कधी डोळा लागला ते मलाही कळलं नाही… इतक्यात माझ्या मैत्रिणीचा फोन आला ‘‘इन्स्टा देख जलदी!!’’ आमच्या डॉक्टरांच्या समाजमाध्यमांवरच्या पेजवर कोलकात्यातील आर जी कर कॉलेजची घटना दिसली. फोन हातातून सुटून खाली पडला, डोकं सुन्नं झालं… माझी सलग तीन दिवस रूमवर न येता वॉर्डात झोपणारी रूममेट, माझे अनेक मित्रमैत्रिणी यांच्यासाठी ‘तू कशी आहेस?’ ची जागा आता ‘तू आहेस ना?’ या प्रश्नाने घेतली होती… कायमची…

sjwrites05@gmail.com