scorecardresearch

Premium

महानायक आणि आपण

१९११ ते १९२३ या बारा वर्षांच्या कालखंडात सावरकरांनी एकूण आठ वेळा दयेचे अर्ज पाठविले.

महानायक आणि आपण

दत्तप्रसाद दाभोळकर dabholkard155@gmail.com

महानायकांचे मोठेपण एखाद्या तपशिलापायी कमी करायचे का? माफीनामा दिला म्हणून स्वा. सावरकर लहान ठरत नाहीत, तसे फाळणीपायी कुणावर दोषारोप का करावे?

varsha usgaonkar talk about her marrige
“मला रजिस्टर लग्न करायचं होतं पण…”; वर्षा उसगांवकरांनी पहिल्यांदाच सांगितला त्यांच्या लग्नाचा किस्सा; म्हणाल्या माझ्या “आई-वडिलांनी…”
Sanjay Raut Post Moris Photo
“अभिषेकचा बळी घेणारा मोरिस चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर, आता फडणवीसांनी…”, संजय राऊत यांची मागणी
Habib Nazar Nikaah Video Viral
ना उम्र की सीमा हो…! १०३ वर्षांच्या वृद्धाने ४९ वर्षीय फिरोजशी केला निकाह, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Rahu Shukra Yuti After 12 Years Golden Pot Of Money Can Be Brought By Lakshmi For These Rashi Astrology Today In Marathi
१२ वर्षांनी महायुतीत येणार दोन बलाढ्य ग्रह! सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार?

अंधारात चाचपडत, धडपडत, ठेचकाळत, अपार यातना भोगत आणि या यातना केवळ स्वत:लाच नव्हे, तर आपल्या कुटुंबाला आणि परिवारालाही भोगाव्या लागतील; हे अगदी स्पष्टपणे दिसत असताना आजन्म अशी वाटचाल करणारे चार महानायक आपणासमोर आहेत. स्वामी विवेकानंद, भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी.

स्वामी विवेकानंदांबद्दल भारतभर सर्वत्र प्रचंड आदराची आणि अभिमानाची भावना आहे आणि विवेकानंदांचा गौरव करायचा म्हणजे गांधी, सावरकर यांच्यापैकी कुणालाही अपमानित करणे गरजेचे आहे, असे कुणीही समजत नाही! आंबेडकरांबद्दल भारतभर जवळजवळ सर्वत्र आदराची भावना आहे. मात्र, आंबेडकरांचे काही अनुयायी गांधी आणि काही प्रमाणात सावरकरांनासुद्धा अवमानित करणे गरजेचे समजतात. मात्र, गांधी आणि सावरकर ही अगदी वेगळी प्रकरणे आहेत. गांधी आणि सावरकर यांच्यापैकी एकाचे अनुयायी असाल तर दुसऱ्याला अपमानित करणे किंवा खिल्ली उडवणे ही जणू पूर्वअट आहे! हे करताना ही भक्त मंडळी एक गोष्ट विसरतात. हे दोघेही आपल्यापेक्षा अनंतपटीने कर्तृत्ववान आहेत. या देशाचे नवनिर्माण व्हावे म्हणून या दोघांनीही अपरंपार यातना भोगल्यात. सर्वोच्च त्याग केलेत. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचा सन्मान करून, त्यांचे विचार समजावून घेऊन ते आपणाला का पटत नाहीत, एवढेच सांगण्याचा अधिकार आपल्याला आहे.

हे सर्व आज सांगण्याचे कारण म्हणजे, दोन महनीय व्यक्तींनी सावरकर आणि गांधी यांच्याबद्दल दोन विधाने केलीत. त्या विधानांमुळे गांधी आणि सावरकर या दोघांवरही अन्याय होतो का? या दोन महानायकांच्या मनात असलेल्या परस्परविरोधी मार्गाची आणि रचनांची आपण सरमिसळ करत आहोत का? यावर चर्चा होणे गरजेचे आहे.

पहिले विधान केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आहे. ‘सावरकरांनी गांधीजींच्या सांगण्यावरून माफीनामा दिला.’ असे ते विधान आहे. आजवर अनेक जण सावरकरांनी माफीनामे दिलेच नाहीत असे म्हणत असत ते चुकीचे आहे, हे राजनाथ सिंह यांनी सांगितलंय! त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधी सांगत असत व सावरकर ऐकत असत, असा सावरकरांवर अन्याय करणारा एक भयावह संदेश त्यातून जातो. याबाबत नक्की वस्तुस्थिती लक्षात घ्यावयास हवी. १९११ ते १९२३ या बारा वर्षांच्या कालखंडात सावरकरांनी एकूण आठ वेळा दयेचे अर्ज पाठविले. त्यातील महत्त्वाचा अर्ज १९१३ च्या नोव्हेंबर महिन्यातील आहे. या दयेच्या अर्जामधील भाषेत आर्जव आहे. पूर्ण नम्रता आहे. दिलगिरी आहे. पूर्वी चूक केली, आता योग्य मार्गावर येईन, याचे आश्वासन आहे. हे केवळ माफीनामे नाहीत; दया करा, अशा याचना आहेत.

या कालखंडात सावरकरांनी केवळ दयेचे अर्ज पाठविलेले नाहीत, तर तुरुंगातील प्रशासनाशी पूर्ण सहकार्य केलंय. तुरुंगातील हिंदू व मुसलमान क्रांतिकारकांना मरणयातना भोगाव्या लागत. त्यामुळे एक-दोन महिन्यात दोन-तीन तरी हिंदू वा मुसलमान क्रांतिकारक आत्महत्या करत. कधी कधी सहनशीलतेचा अंत होई आणि क्रांतिकारक प्रत्युत्तर देत. काम रोखणे, उपोषण असे हे मार्ग असत. एकदा या तुरुंगातील अत्याचारांची आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या आमरण उपोषणाची बातमी बंगालमध्ये पोचली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी तुरुंगात होत असलेल्या अमानुष अत्याचाराबाबत विधानसभेत प्रश्न विचारला. सरकारने उत्तर दिले, ‘तुरुंगात आलबेल आहे. तुरुंगातील काही आततायी कैदी तुरुंगातील मैत्रीपूर्ण वातावरण बिघडवताहेत!’ – दोन महत्त्वाचे कैदी सावरकर आणि बारींद्र घोष या सत्याग्रहात सामील झालेले नाहीत. सावरकरांच्या बरोबर बारींद्र घोष यांनीही दयेचा अर्ज पाठविलेला आहे आणि तुरुंगातील शासनाशी पूर्ण सहकार्य केल्यामुळे सावरकरांना बक्षिसे मिळालेली आहेत. त्यांना जेलमध्ये प्रथम कारकुनाचे काम मिळालेय. त्यानंतर तेल डेपोमध्ये आणि नंतर तर सुपरवायझर म्हणून त्यांना बढती मिळाली आहे! (हे उल्लेख द. न. गोखले यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य’ या पुस्तकात आहेतच.)

सावरकरांचे दयेचे अर्ज आणि हे असे वागणे यामुळे सावरकरांची अवहेलना करणाऱ्या मंडळींनी दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी, एवढे दयेजे अर्ज पाठवूनही सरकारने सावरकरांना का सोडले नाही? तुरुंगातील सर्वेसर्वा रेनिगाल्ड क्रेडॉक यांनी गव्हर्नर जनरल यांना पाठविलेली नोंद अशी आहे, ‘सावरकरांच्या बाबतीत त्यांना कोणतेही स्वातंत्र्य देणे अशक्य आहे. सावरकर हे किती मोठे आहेत, हे आपल्या कायम लक्षात हवे. ते केवळ एक क्रांतिकारक नाहीत. भारतातील आणि जगभर पसरलेल्या क्रांतिकारकांचे संघटक, सर्वोच्च नेते आणि महत्त्वाचे प्रेरणास्थान आहेत. भारतातील आणि युरोपमधील क्रांतिकारकांचे गट आजही त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करत असतील. अंदमानच्या तुरुंगातून त्यांना दुसऱ्या एखाद्या तुरुंगात पाठवले तरी त्यांची सुटका नक्की आहे. त्यांचे अनुयायी एखादी बोट भाडय़ाने घेऊन वाटेत समुद्रातून किंवा त्या दुसऱ्या बेटावरून त्यांना नक्की पळवून नेतील!’

सावरकरांच्या माफीनाम्यांचे प्रकरण हे असे आहे! शत्रूच्या तुरुंगात यातना भोगत आजन्म खितपत पडण्यापेक्षा ‘कोणत्याही मार्गाने’ बाहेर जाऊन शत्रूला पुन्हा त्रास देऊन त्याला कायमचा संपवायचा अशी ही रणनीती आहे. आता ही रणनीती म्हणून बरोबर की चूक हे त्या विचारधारेने ठरवायचं. ही विचारधारा न मानणाऱ्यांनी यावर काही शेरेबाजी करणे हा औचित्यभंग आहे! आता प्रश्न उरतो तो एवढाच, की तुरुंगातून बाहेर पडल्यावर सावरकरांनी नक्की काय केले?

किंवा खरे तर आपला दुसरा प्रश्न येथे सुरू होतो. या देशाची फाळणी गांधींनी केली आणि सावरकरांनी ती टाळली असती असे खरेच काही आहे का? आपल्यासमोरचा हा गोंधळ अधिक भेदक आहे. आपली, आपल्या या अखंड राष्ट्राबद्दलची कल्पना काय आहे? वेदनादायक असली तरी खरी गोष्ट अशी आहे की, ‘इंग्रजांनी आपले प्रशासकीय कौशल्य आणि सैनिकी सामर्थ्य यांच्या जोरावर जो भूभाग एकत्र ठेवला, तो आमचा अखंड भारत.’ अशी आपली पक्की खात्री आहे. भाषा, संस्कृती, धर्म या गोष्टींत नेपाळ हा भारताच्या फार जवळचा. बिहार किंवा उत्तर भारताचा भाग वाटावा असा! ब्रिटिशांनी तो जिंकून भारतात ठेवला असता तर तो आमचाच भाग आहे, असे आम्ही म्हटले असते. आणि त्यांनी वेगळे व्हायचे म्हटले असते तर त्याचाही काश्मीरसारखा गुंता झाला असता. आज मात्र भारतातले धर्मप्रेमी कडवे राष्ट्रभक्तसुद्धा नेपाळ भारतात सामील करा असे म्हणत नाहीत; आणि नेपाळमध्ये तर कुणीच अगदी मघेशीसुद्धा असे काही म्हणत नाहीत. आता आपण अफगाणिस्तान लक्षात घेऊ या. महाभारतकाळात गांधार आमचा म्हणजे उत्तर हिंदुस्थानचा होता आणि नंतर अफगाणिस्तान हा मुगल साम्राज्याचा भाग होता. १८५४ मध्ये अफगाणिस्तान भारतात सामील करण्यासाठी इंग्रजांनी मोठी लढाई केली होती. त्यात इंग्रजांचा दारूण पराभव झाला. इंग्रजांचा पराभव करता येतो हे लक्षात आल्याने मग भारतातील हिंदू-मुसलमान सैनिकांनी १८५७ चा उठाव केला. ते असो. म्हणजे आमच्या अखंड भारतात अफगाणिस्तान असणार होता! प्रत्यक्षात मात्र फाळणीनंतरही पाकिस्तानने अफगाणिस्तान आमचा आहे, असे म्हटलेले नाही आणि अफगाणिस्तानात तर कुणीच आम्ही पाकिस्तानचा भाग आहोत, असे म्हणणार नाहीत. आज ज्या नागा प्रदेशात सर्वाधिक भारतीय सैनिक शहीद झालेत, तो १९३७ मध्ये इंग्रजांनी भारताचा भाग बनवलाय आणि भारताचा भाग असलेला ब्रह्मदेश १९३७ मध्ये भारतापासून वेगळा केलाय; आणि हा असा वेगळा करू नका म्हणून रंगूनमध्ये मतदान झालेय! आजवर ब्रह्मदेश अखंड भारताचा भाग असता तर रोहिंग्याचे पुनर्वसन कुठे आणि कसे करावयाचे यावर आपण चर्चा करणार होतो!

आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी, या विशाल भूभागावर इंग्रज येण्यापूर्वी फार कमी वेळा, फार कमी काळ, कमी भूभागावर एकछत्री अंमल होता किंवा या भूभागात राष्ट्र नव्हते. राष्ट्र ही संकल्पनाही नव्हती. आपापसांत भांडणारी, फुटणारी, आपापल्या सीमा बदलणारी छोटी छोटी राज्ये होती. या छोटय़ा-मोठय़ा राज्यांत कायद्याचे राज्य म्हटले तर होते, म्हटले तर नव्हते. कायदे असले तरी रूढी, परंपरा आणि कळलेल्या आणि खरे तर न कळलेल्या धर्मग्रंथांवर आधारित होते. अगदी रामराज्यातसुद्धा फक्त ज्ञानी होतो म्हणून शंबुकाचा वध होत होता. १३ ऑक्टोबर १७०७ रोजी खेडच्या जवळ ताराराणींच्या फौजा आणि शाहू महाराजांच्या फौजा यांच्यात घनघोर लढाई झालेली आहे आणि १३ एप्रिल १७३१ रोजी कऱ्हाडजवळ तह होऊन त्यांनी आपापल्या राज्यांच्या सीमा नक्की ठरवल्यात. म्हणजे राष्ट्र नव्हते. राष्ट्र ही संकल्पनाही नव्हती. मात्र, एका अनामिक अबोध पातळीवर आपापल्या जाती, पंथ, धर्म प्राणपणाने सांभाळत असतानाही ही माणसे एकमेकांत गुंतलेली होती.

वर मी जी मांडणी केली आहे तो इंग्रजांनी सांगितलेला खोटा इतिहास आहे, असे सांगणारा एक परिवार सुमारे शंभर वर्षे या देशात कार्यरत आहे. त्यांच्या मते, या विशाल भूभागावर एक अखंडित, सुसंघटित, एक घटनात्मक, परम वैभवशाली हिंदू राष्ट्र अनेक काळ अस्तित्वात होते. ही सुवर्णभूमी होती. येथे रामराज्य होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील आजच्या रचना खुज्या वाटाव्यात अशा रचना येथे अस्तित्वात होत्या. पडेल तो त्याग करून, वाटेल ती किंमत मोजून ते एककेंद्रित हिंदू राष्ट्र त्यांना या विशाल भूभागावर पुन्हा निर्माण करायचेय. आम्ही सांगतोय तो इतिहास आणि आम्हाला करावयाची आहे ती रचना.. ज्यांना चुकीची आणि भयावह वाटते ते सारे इंग्रजाळलेले किंवा ‘स्युडो सेक्युलॅरिस्ट’ आहेत!

मात्र हे सांगताना हा परिवार एक गोष्ट विसरतो. ज्या स्वामी विवेकानंदांचा युगपुरुष म्हणून हा परिवार पुन:पुन्हा गौरव करतो; त्या विवेकानंदांनी नेमका हाच इतिहास सांगितलाय. त्यांनी सांगितलंय, ‘या भूभागात हिंदू, मुसलमान ख्रिश्चन राजवटीत बहुजन समाज कायम भरडला आणि चिरडला गेलाय. मात्र, आज इंग्रजी राजवटीमुळे भारतात विविध मानववंशाचे एक राष्ट्र तयार होत आहे. युरोपात मानववंशाची जशी विविधता आहे, तशीच ती भारतातदेखील आहे. मला कधी कधी असे वाटते, ‘आपण ज्याला लोकशाही पद्धतीचे विचार म्हणतो, तेच स्वीकारले जाऊन भारतात समानता व एकवाक्यता निर्माण होईल. माझा असा विश्वास आहे, की मूठभर लोकांचे विशेषाधिकार संपतील. कायदे बनविण्याचा धर्माचा अधिकार काढून घेतला जाईल.’

विवेकानंदांच्या मनात असलेली धर्म, पंथ, जात, भाषा यांच्या पलीकडे जाणारी, शांततामय मार्ग आणि लोकशाही यांवर पूर्ण विश्वास असलेली एक संघटना गांधीजींनी उभी केली होती. स्वातंत्र्य मिळाले तर शांततामय मार्गाने, लोकशाही पद्धतीने हा विशाल भूभाग किंवा देश ही संघटना सांभाळेल, हा विश्वास गांधींनी इंग्रजांच्या आणि प्रामुख्याने रुझवेल्ट आणि अमेरिकन जनमानसात निर्माण केला होता. मात्र याच्यापलीकडे जाऊन इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळविण्याची क्षमता या संघटनेत होती का? १९४२चा स्वातंत्र्य लढा आणि आपले स्वातंत्र्य याचा आपापसांत थोडाफार तरी काही संबंध आहे का? १९४२चा लढा संपल्यावर चर्चिल यांनी रुझवेल्ट यांना पत्र पाठवून कळवलं, ‘या ४२ सालच्या लढय़ामुळे गांधीजींचा भारतीय जनमानसावरील प्रभाव किती वरवरचा आहे, हे तुम्हाला समजले असेल. या कालखंडात आपल्या सैन्यात सामील होण्यासाठी दररोज हिंदू-मुसलमान तरुण लांब रांगा लावत होते. शेतकरी शेतात होते, न्यायालये सुरू होती. कारखाने बंद पडले नव्हते. बहुसंख्य शाळा-कॉलेजेस सुरू होती. मात्र या आंदोलनात काही प्रमाणात हिंसा झाली. गांधींनी त्याचा विरोध केलेला नाही. म्हणजे गांधीजींची अहिंसा ही वरवरची आहे, हे तुमच्या लक्षात आले असेल!’

थोडे मागे जाऊन ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य का दिले? आपण ते मिळविले की त्यांनी ते दिले, याचा विचार करावयास हवा. १९३० मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांचे स्कॉटलंड यार्डचे गुप्तहेर भारतातून हिंडवले होते. त्यांनी अहवाल दिला होता. ‘२०५० पर्यंत ही वसाहत सोडावी लागणार नाही. गांधीजींच्या आंदोलनामुळे  नगण्य, किरकोळ क्रांतिकारी घटना घडतील. याहून अधिक काही या देशात होणार नाही.’ सर सॅम्युअल होअरे हे इंग्लंडचे सर्व वसाहतींचे सचिव होते. त्यांनी दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या थोडे आधी इंग्लंडच्या लोकसभेत सांगितले होते, ‘भारताला स्वातंत्र्य हाताळण्यासाठी सक्षम व्हायला अजून खूप वेळ आहे.’ त्यानंतर हिटलरने ते सर्वसंहारक युद्ध सुरू केले. १९४० मध्ये सर सॅम्युअल होअरे यांचा अहमदाबाद येथे सत्कार झाला. सरदार पटेल अध्यक्ष होते. होअरे यांच्या लोकसभेतील भाषणाचा आधार घेऊन त्यांनी सांगितले, ‘आता सगळे संदर्भ बदललेले आहेत. तुम्ही आज एका निर्णायक युद्धात गुंतलेले आहात, हे युद्ध हरलात, तर तुम्ही सारे काही गमावून बसलेले असाल आणि तुम्हाला विजय मिळाला तरी तो निष्फळ असेल. एक नवी जागतिक रचना आता साकार होणार आहे. कोणताही देश आता दुसऱ्या देशाला पारतंत्र्यात ठेवू शकणार नाही. भारताचे काय घेऊन बसलाय, सगळ्याच वसाहती तुम्हाला आता सोडाव्या लागतील.’

त्यानंतर काय झाले हे समजावून घ्यावयाचे असेल, तर ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज् पार्टिशन’ (फाळणीचा अज्ञात इतिहास) हे नरेंद्रसिंग सरिला यांचे पुस्तक पूर्णपणे वाचावयास हवे. गोपनीयतेच्या कालमर्यादेतून मोकळ्या झालेली फाळणीच्या काळातील अनेक गोपनीय गोष्टी सांगत हे पुस्तक उभे आहे. हिटलरने चर्चिल यांना जेरीला आणले होते. त्या वेळी रुझवेल्ट चर्चिल यांच्यावर फार मोठा दबाव आणून भारताला लगेच स्वातंत्र्य द्या म्हणून सांगत होते. ते तसे द्यावयास लागू नये म्हणून चर्चिल चाणक्यनीतीचा अफलातून उपयोग करत होते. मात्र, ज्या वेळी स्वातंत्र्य देणे ही अपरिहार्य गरज बनली, त्या वेळी ते आपल्याला उपयोगी पडेल, असे कसे द्यावायचे हा निर्णय झाला. काय होता हा निर्णय? ३ जून १९४७ रोजी इंग्रजांनी दिल्लीत फाळणीची घोषणा केली. त्यानंतर एका आठवडय़ाने इंग्लंडमधील मजूर पक्षाचे वार्षिक अधिवेशन इंग्लंडमध्ये मार्गारेट येथे झाले. इंग्लंडचे परराष्ट्र सचिव अर्नेस्ट बेव्हिन यांनी तेथे सांगितले, ‘भारताची फाळणी आपल्या दृष्टीने फार गरजेची आहे आणि मुसलमानांच्या गळी ती उतरवावयास आम्ही यशस्वी झालोय! ही फाळणी आपल्यासाठी अनेक कारणांमुळे आवश्यक आहे. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे, रशिया आणि प्रामुख्याने आखाती देश यांच्यावर नजर ठेवून त्यांना आपल्या धाकात ठेवण्यासाठी लाहोर, बलुचिस्तान, कराची येथे आपले लष्करी तळ ठेवणे गरजेचे आहे. अखंड भारत ते आपल्याला देण्याची शक्यता नाही. मात्र, भारताच्या मानाने कमकुवत असलेल्या पाकिस्तानची ती गरज असेल.’

ब्रिटिशांसमोर फाळणी करताना दोन अडचणी आहेत. रुझवेल्ट यांना फाळणी होऊ नये, असे वाटतेय. महत्त्वाचे म्हणजे फाळणी गरजेची आहे, हे मुसलमानांना कसे पटवून द्यायचे? पंजाब आणि बंगाल प्रांताचे मुख्यमंत्री असलेले सिकंदर हयात खान आणि फजल उल हक फाळणीला विरोध करत उभे होते! फाळणी त्यांच्या दृष्टीने अजिबात फायद्याची नव्हती. हिंदुस्थानात ते २५ टक्के होते. लोकसभेत नेहमीच त्यांचा एकसंध मोठा गट राहणार होता. सैन्यात ते ३५ टक्के होते. त्यातून ज्या प्रांतात मुसलमान बहुसंख्य होते त्या प्रांतात तर स्वातंत्र्यानंतर त्यांचीच सत्ता राहणार होती. आणि महत्त्वाचे म्हणजे मुसलमान जनमानस ज्यात पूर्णपणे गुंतून पडले होते अशा वास्तू- लाल किल्ला, आग्रा फोर्ट, ताजमहाल, इमामवाडा, निजामउद्दीन दर्गा, फत्तेपुर सिक्री, अजमेर शरीफ त्यांच्या पाकिस्तानात येणार नव्हते. इंग्रजांनी जीनांना हाताशी धरून फाळणी मुसलमानांच्या गळ्यात कशी मारली हे मुळातच वाचावयास हवे.

पण तरीही काही जणांचा प्रश्न असतो काँग्रेसने फाळणी का नाकारली नाही? ब्रिटिश जाणार, आता आपण स्वतंत्र व्हावे. आपले स्वतंत्र राष्ट्र असावे म्हणून अनेक गट कार्यरत होते. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील संस्थानिक स्वत:चा गट करून ही मागणी करत होते. त्या विभागातील त्यांची लोकप्रियता अफाट होती. आमच्या विभागात सार्वमत घेऊन निर्णय घ्या, असे ते सांगत होते. खलिस्तान आणि द्रविडीस्तान कधीही भडकतील असे निखारे होते- ते राहू देत- सुऱ्हावर्दी आणि शरतचंद्र बोस एकत्रितपणे अखंड बांगला राष्ट्राची मागणी करत उभे होते! काँग्रेसने फाळणी नाकारली असती तरी अगदी सहजपणे अमलात आणता येतील असे अनेक व्यावहारिक पर्याय इंग्रजांसमोर होते. गांधी मनापासून अखंड भारतात गुंतलेले होते. ‘आधी माझ्या देहाचे आणि मग देशाचे दोन तुकडे होतील,’ हे त्यांचे विधान आपणाला माहीत आहे. मात्र, ही फाळणी नाकारली तर सहजपणे या देशाच्या अनेक फाळण्या करून इंग्रज जाऊ शकतील, हे समोरचे वास्तव्य होते.

सत्तांतराच्या काळात सावरकर काय करत होते? १९३७ मध्ये सावरकरांवरील सर्व निर्बंध उठले आणि त्यांची पूर्ण मुक्तता झाली. ती अशी मुक्तता करू नये, असे क्रॅडॉकप्रमाणे सांगणारे अनेक इंग्रज अधिकारी होते. गृहखात्याचे अधिकारी जे. ए. शिलीही यांनी त्यावेळी जे मत नोंदवलंय ते महत्त्वाचे आहे. त्यांनी म्हटलंय, ‘सावरकर सरकारबरोबर सहकार्य करण्यास तयार आहेत, एवढय़ाच कारणासाठी त्यांची सुटका करावयाचा विचार असेल तर तो बरोबर नाही. मात्र, सावरकरांची सुटका अन्य काही कारणासाठी करावी, असे सरकारला वाटत असेल तर तो प्रश्न वेगळा.’

एकमात्र खरे, सावरकर पूर्णपणे बदलले होते. ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ या आपल्या ग्रंथात शायर बनून वृद्ध बहादूरशहा जफर यांच्यावर स्तुतिसुमने उधळणारे आणि हिंदू-मुसलमान समन्वय या देशात झालाय तो आपण टिकवलाच पाहिजे म्हणून सांगणाऱ्या सावरकरांनी रत्नागिरीच्या तुरुंगात ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ सरकारची नजर चुकवून लिहिला होता. या ग्रंथात अप्रत्यक्षपणे आपले प्रमुख शत्रू इंग्रज नव्हेत तर मुसलमान आहेत, असे सांगितले होते. त्यांची ही भूमिका गुरू गोळवलकरांच्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. त्याच वेळी गुरू गोळवलकर यांनी आपल्या ‘विचारधन’ या पुस्तकात लिहिले, ‘१८५७ चे स्वातंत्र्य युद्ध फसले. कारण ज्या वेळी स्वातंत्र्यसैनिकांनी बहादूरशहा याला बादशहा म्हणून घोषित केले, त्यामुळे हिंदू सैनिक या युद्धातून बाहेर पडले. कारण मोगल बादशहापेक्षा इंग्रज चांगले, हे त्यांना माहीत होते.’

तुरुंगातून बाहेर पडल्यावर अहमदाबाद येथील हिंदू महासभेच्या वार्षिक अधिवेशनात सावरकरांनी सांगितले, ‘हिंदुस्थान हे एक राष्ट्र बनले आहे, असे समजण्याची चूक आपण करता कामा नये. या भूभागात हिंदू आणि मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत, हे आपण मान्य केले पाहिजे.’ त्यांचा हा मुसलमान द्वेष नंतर वाढत गेला. ‘शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून परत केली, हे वंदनीय नाही. अनुकरणीयही नाही. ती तरणीबांड पोर शत्रूला देऊन त्यांची वीण वाढविण्यापेक्षा आपल्या एखाद्या शिपायाला ती देऊन आपण आपली वीण वाढवायला हवी होती.’ असे त्यांचे विधान होते आणि या अशा विधानांच्या बरोबरच सावरकरांनी इंग्रजांना आवडेल अशी गांधीजींची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याची मोहीम सुरू केली. त्यांनी भाषणामधून गांधींवर खालच्या पातळीची टीका केली आणि ‘गांधी गोंधळ’ या आपल्या पुस्तकात गांधींचा उल्लेख गांधाळ, मोहात्मा आणि देशद्रोही अशी विशेषणे लावून केला.

ते असो! इंग्रजांनी फाळणी करून या देशाला स्वातंत्र्य दिले. त्या वेळी इंग्रजांनी काय करावे हे सावरकर, हिंदू महासभा, संघ यांना साधे विचारलेसुद्धा नाही! इंग्रजांच्या दृष्टीने हे एवढे नगण्य होते. पण तरीही प्रश्न उरतोच. गांधीजींचा मार्ग स्वीकारून भागानगरचा सत्याग्रह करणाऱ्या सावरकरांनी आणि हिंदू महासभेने फाळणीला विरोध म्हणून देशव्यापी सत्याग्रह का केला नाही? आणि स्वत:वर बंदी आल्यावर देशव्यापी सत्याग्रह करणाऱ्या संघाने फाळणीला विरोध म्हणून सत्याग्रह का केला नाही? देशाच्या फाळणीपेक्षा स्वत:चे अस्तित्व संघाला महत्त्वाचे वाटत होते का?

हे केवळ येथेच थांबत नाही. संस्थाने विलीन करून नेहरू आणि पटेल देश एकसंध करत होते आणि आम्ही स्वतंत्र राहणार म्हणणाऱ्या संस्थानिकांना सावरकर पाठिंबा देत होते. त्रावणकोर कोचीतल्या महाराजांनी रुझवेल्टला पत्र लिहून कळवलं, ‘थोरियम हे उद्याचे अणुइंधन आहे आणि जगातील थोरियमचे सर्वात समृद्ध साठे माझ्या राज्यात आहेत. अमेरिका आणि माझे राज्य यात फक्त समुद्र आहे. तुम्ही जर चर्चिल यांना सांगून मला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिलात, तर आपणाला हव्या त्या स्वरूपाचा थोरियम पुरवण्याचा करार करेन.’ त्यानंतर आपल्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहावयाचे आहे, असे त्रावणकोर कोचीतल्या महाराजांनी जाहीर केलंय.’ आणि वीर सावरकरांनी त्यांना पाठिंबा दिलाय!’ (मदन  पाटील यांच्या ‘अकथित सावरकर’ या पुस्तकात हा तपशील सापडेल.)

याहूनही विलक्षण अशी गोष्ट आहे. बलराज मधोक काश्मीरचे. काश्मीर प्रजा परिषद, संघ आणि नंतर जनसंघ यातील फार महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. त्यांनी सांगितलंय, ‘काश्मीर स्वतंत्र हिंदू राष्ट्र म्हणून अस्तित्वात असावे, अशी आम्हा सर्वाची इच्छा होती.’ सावरकर आणि गुरू गोळवलकर महाराजांकडे जाऊन राहिलेले आहेत.

अखिल जम्मू आणि काश्मीर महासभेच्या कार्यकारणीने काश्मीर भारतात विलीन न होता स्वतंत्र राजेशाही हिंदू राष्ट्र निर्माण करावे, अशी भूमिका फेब्रुवारी १९४७ मध्ये घेतली होती. भारताच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी काश्मीर प्रजा परिषद, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी भारताचा तिरंगा न फडकविता राजा हरीसिंग यांचा झेंडा फडकवला होता. बॅनरवर लिहिले होते, ‘स्वतंत्र, सार्वभौम जम्मू काश्मीर, लडाख, बलिस्तान राष्ट्र’- महाराजांनी नेपाळी फौज ठेवून हिंदू राष्ट्र निर्माण करावे, असे त्यांचे सांगणे होते.  महाराजांच्या डोक्यात अशी हवा गेल्याने निम्मा काश्मीर टोळीवाल्यांच्या हातात गेल्यावर अगदी हतबल होऊन नाइलाजाने महाराजांनी सामीलनाम्यावर हस्ताक्षर केले. त्यामुळे काश्मीर प्रश्न निर्माण झाला, असे काही आहे हे इतिहासकारांनी पुरेसे तपासलेले नाही.

मात्र फाळणी कुणाला हवी होती, यावरून महानायकांचे मोजमाप करणे चुकीचे ठरेल, एवढे पुरावे ज्ञात इतिहासात आहेत. महानायकांबद्दल टोकाच्या भूमिकाच घ्यायच्या असतील तर मात्र इतिहासही हात टेकेल!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about mercy pleas of veer savarkar savarkar mercy petitions zws

First published on: 24-10-2021 at 01:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×