मधुरा वाईरकर madhura.wairkar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंडनमधल्या हाईड पार्क इथे १ मे १८५१ रोजी ‘द ग्रेट एग्झिबिशन’ या अतिभव्य प्रदर्शनाचं उद्घाटन झालं होतं. काच आणि लोखंडाचं उत्तम काम असलेल्या ‘क्रिस्टल पॅलेस’ या इमारतीत जगभरातल्या कलावस्तू बघायला मिळाल्या होत्या. तब्बल १६ किलोमीटरच्या परिसरात पसरलेलं हे प्रदर्शन. त्यातलं सर्वात मोठं दालन भारतीय कलावस्तूंचं. त्यात ‘कोहिनूर’ हिरा आणि इतर रत्नं तर होतीच, पण चक्क एक पेंढा भरलेला हत्तीही होता. त्यावरची राजेशाही अंबारी आणि त्यात बसण्यासाठी हस्तिदंती हौदा यांसह.. उत्तमोत्तम भारतीय वस्त्रं, हस्तकला, जहाजांची प्रारूपं, चांदीचा पलंग, चटया, मातीकामाची भांडी.. असं किती काय काय त्या प्रदर्शनात होतं! पूर्वी कधीही पाहायला न मिळालेल्या या कलावस्तू पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत- अशा नुसत्या प्रसंगाची मनात कल्पना करून पाहा! राणी व्हिक्टोरियाचे पती राजकुमार अल्बर्ट यांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना.. की ब्रिटिश वसाहतींमधलं कला आणि व्यवसाय यासंदर्भातलं जे जे काही चांगलं आहे, ते प्रदर्शन स्वरूपात बाकीच्या जगासमोर ठेवायचं. तिथेच अशा जागतिक प्रदर्शनांची आणि संग्रहालयांची सुरुवात झाली. हे वर उल्लेखिलेलं प्रदर्शन जवळपास सहा महिने चाललं आणि त्याच्या तिकीट विक्रीतून थोडा नफाही झाला- ज्यातून पुढे लंडनमधल्या इतर काही सांस्कृतिक संस्थांची स्थापना करण्यात आली. यातली एक संस्था म्हणजे ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’! 

भारतातल्या वसाहतवाद्यांसाठी हा काळ मोठा रंजक ठरला होता. या देशाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ते देशभर प्रवास करत होते, अधिकाधिक माहिती गोळा करत होते. पुरातन स्थळांबाबतची गुपितं उलगडण्यासाठी मोहिमा राबवत होते. ऐतिहासिक वारसास्थळांची रेखाटनं, पेंटिंग्ज काढली जात होती. ठिकठिकाणी असलेली वनस्पती आणि प्राणीसंपत्ती, स्थानिक लोक, त्यांची वस्त्रप्रावरणं, त्या भागातली पिकं .. थोडक्यात, सगळ्याचीच माहिती नोंदवण्याचं काम सुरू झालं होतं. ज्ञान ही शक्ती आहे असं म्हटलं जात असलं तरी गोळा केलेली माहिती, उत्खननातल्या वस्तू, देणगीदाखल मिळालेल्या वस्तू हे सर्व सांभाळून ठेवण्यासाठी जागा आवश्यक होती. मग इथे संग्रहालय हवं, हा विचार पुढे आला. कोलकात्यात प्रथम ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ इथे ‘इंडोलॉजी’अंतर्गत (याला ‘भारतशास्त्र’ असं म्हणावं का?) अशा वस्तूंचा संग्रह करण्यात आला. पण तिथे जागा कमी पडू लागल्यामुळे ‘इंडियन म्युझियम ऑफ कलकत्ता’ची (आता कोलकाता) स्थापना झाली.

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय (पूर्वीचं ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, बॉम्बे’) हे मुंबई शहरातलं सर्वात जुनं आणि भारतातलं तिसऱ्या क्रमांकाचं जुनं वस्तूसंग्रहालय. १८५१च्या त्या ‘द ग्रेट एग्झिबिशन’नंतर तसं पुढचं प्रदर्शन १८५५ मध्ये पॅरिसला झालं.. त्याला ‘एक्स्पोझिशन उनिव्हर्सेले’ म्हटलं गेलं. मुंबई प्रांतातून या संग्रहालयात मांडण्यासाठी पाठवल्या गेलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती हेच या प्रदर्शनाचं आकर्षण ठरलं. सुरुवातीला हे प्रदर्शन तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी भरवण्यात आल्यानंतर काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले, काही गडबडीही झाल्या आणि अखेर या संग्रहालयाला स्वत:ची इमारत प्राप्त होऊन १८७२ मध्ये लोकांसाठी या संग्रहालयाचे दरवाजे खुले झाले.

‘इंडियन म्युझियम’सारख्या सुरुवातीच्या वस्तुसंग्रहालयांची आखणी इंग्लंडमधलं ‘ब्रिटिश म्युझियम’ डोळ्यासमोर ठेवून झाली होती. संपूर्ण युरोपमध्ये ‘ब्रिटिश म्युझियम’सारखी प्रतिस्पर्धी संग्रहालयं उभी राहू लागली होती. याचाच अर्थ जेव्हा परदेशात संग्रहालय संस्कृती जेव्हा स्थिरावली होती, तेव्हा आपल्या देशात त्याची नुकतीच कुठे बीजं पडायला सुरुवात झाली होती. संग्रहालयात कोणती दालनं, कोणत्या वस्तू असाव्यात यावर विचार अद्याप सुरू होता. भारतातल्या सुरुवातीच्या वस्तुसंग्रहालयांना ‘अजबघर’ म्हटलं जात असे. कोलकात्यातल्या ‘इंडियन म्युझियम’ला ‘जादू घर’ असं नाव प्राप्त झालं होतं.

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयातल्या सुरुवातीच्या वस्तूंमध्ये उत्खननात मिळालेले ऐतिहासिक आणि भूगर्भशास्त्रीय अवशेष होते. तसंच कला, व्यवसाय, वांशिकशास्त्र (एथनॉलॉजी) आणि पौराणिक विषयांशी संबंधित वस्तूंचाही त्यात समावेश होता. प्राण्यांची शिंगं, हस्तिदंत (त्याकाळी त्यावर बंदी नव्हती.), लाकूड, धातू, कागदाचा लगदा यांपासून बनवलेल्या वस्तू, लाकडाची सजावटीची भांडी, नकाशे, त्रिमिती प्रारूपं (डायोरामा), मातीची प्रारूपं हे सर्व आजही या संग्रहालयात पाहायला मिळतं. संग्रहालयाचे एक सुरुवातीचे क्युरेटर अर्नेस्ट फर्न्‍स यांनी संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये व्यक्त केल्यानुसार, मातीची प्रारूपं पाहण्यासाठी लोकांची मोठीच गर्दी होत असे आणि त्याचा प्रदर्शनाच्या आखणीवरही परिणाम झाला. लोकांना ज्या वस्तू जास्त आवडत होत्या, त्या संग्रहालयात अधिक प्रमाणात ठेवल्या जाऊ लागल्या. ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’च्या स्थापनेनंतर डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयातल्या संग्रहावर त्याचा परिणाम दिसून आला आणि काही बदल करण्यात आले. एका बाजूस संग्रहालयाच्या गॅलरीत प्रागैतिहासिक आणि ‘नॅचरल हिस्टरी’संबंधित वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. (अजूनही या वस्तू तिथे आहेत.) परंतु नंतर संग्रहालयातला संग्रह पुरातत्त्वशास्त्र आणि ‘नॅचरल हिस्टरी’पासून दूर गेला. (एकेकाळी अगदी पेंढा भरलेले प्राणीही संग्रहालयात होते.) परंतु या दोन्ही संग्रहालयांच्या मांडणीत त्यांची स्वत:ची अशी छाप आहे आणि हे संग्रह एकमेकांना पूरक वाटतात.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about victoria and albert museum in london great exhibition zws
First published on: 22-05-2022 at 01:09 IST