डॉ. शुभदा कुलकर्णी

shubh.sangeet@gmail.com

‘कस्तुरीमृग’ हे वसंत कानेटकरांचं काहीसं अपरिचित नाटक.. मराठी रंगभूमीवरील पहिल्या स्त्री-नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या आयुष्यावर सैलसरपणे बेतलेलं. यातील नायिकेच्या आयुष्यात आलेल्या चार वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या पुरुषांच्या भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी समर्थपणे निभावल्या. त्याविषयी..

डॉ. श्रीराम लागू यांचं अलीकडेच निधन झालं. त्यांच्या बहुतेक नाटकांबद्दल आणि भूमिकांबद्दल विविध माध्यमांमध्ये छापून आलं. परंतु त्यांतून असं जाणवलं की, काही नाटकांचा आणि भूमिकांचा उल्लेख राहून गेलेला आहे. डॉ. लागूंच्या खास लक्षात राहिलेल्या नाटकांपैकी एक म्हणजे ‘कस्तुरीमृग’! वसंत कानेटकरांच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक. त्याची प्रकर्षांनं आठवण येण्याची दोन कारणं आहेत. या नाटकाच्या नायिका होत्या- अंजनी. या नायिकेचा अभ्यासलेला चरित्रात्मक तपशील पाहता विदुषी हिराबाई पेडणेकर यांच्या आयुष्यावर हे नाटक लिहिलेलं असावं असं मानण्यास बराच वाव आहे. त्या हयात असताना आणि आताही त्यांच्या गायनकलेबद्दल, लेखनकौशल्याबद्दल तसं फार बोललं, लिहिलं गेलेलं नाही. त्या गायिका, लेखिका, कवयित्री आणि उत्तम संगीतकारही होत्या याचीही माहिती फारशी कुणाला नाही. मग त्यांच्याबद्दल विश्लेषणात्मक, गौरवपर लिखाण होणं ही तर दूरचीच गोष्ट! त्या भावीण समाजात जन्मल्या होत्या, हे त्याचं तत्कालीन कारण. त्या तशा दुर्लक्षितच कलाकार. इंग्रजीमध्ये ज्याला ‘अनसंग आर्टस्टि’ म्हणतात तशा! त्यांच्याबाबतीत हा शब्दप्रयोग अधिकच चपखल वाटतो. अशा तऱ्हेच्या देवदासी, गणिका समाजातील अनेक कलावंत स्त्रियांच्या बाबतीत हीच परिस्थिती होती त्याकाळी. हिराबाई पेडणेकरांवर अगदी अलीकडे शिल्पा सुर्वे लिखित चरित्र आणि विजयकुमार नाईक यांचं ‘पालशेतची विहीर’ हे नाटक ही दोनच पुस्तकं आली आहेत. त्याआधीचं अगदी दुर्मीळ म्हणावं असं पुस्तक म्हणजे म. ल. वऱ्हाडपांडे यांचं ‘कोल्हटकर आणि हिराबाई’! हे पुस्तक परिश्रमपूर्वक केलेल्या संशोधनावर आधारित असल्याने बऱ्यापैकी अस्सल आहे. हिराबाई पेडणेकरांच्या चरित्रात शिरण्याचा मोह आवरून या नाटकाकडे आणि डॉ. लागूंच्या त्यातल्या अभिनयाकडे वळू.

हे नाटक पाहिलं त्याला आता किमान चाळीसेक वर्ष उलटून गेली आहेत. आणि नाटक वाचून १५ वर्ष! तरी त्या विषयाचा (हिराबाई पेडणेकर आणि तत्कालीन सामाजिकता), या नाटकाचा, विशेषत: डॉ. लागूंच्या अभिनयाचा ठसा मनावर अजूनही जसाच्या तसा आहे. नायिकेच्या आयुष्यात आलेल्या चारही पुरुषांच्या व्यक्तिरेखा श्रीराम लागूंनी कमालीच्या ताकदीनं साकारल्या होत्या, तर नायिकेची भूमिका केली होती रोहिणी हट्टंगडी यांनी. या चारही व्यक्तिरेखा एकंदर ‘पुरुषा’चं रूप म्हणून येतात. हा दिग्दर्शकीय कौशल्याचा भाग की नाटककाराच्या मूळ भूमिकेचा भाग- याची कल्पना नाही. मोहन गोखले यांनी याखेरीजचं तिसरं, महत्त्वाचं पात्र साकारलं होतं. ते होतं कलावंतिणीच्या घरातल्या साजिंद्याचं. ज्याला त्या घरात विशेष असं स्थानही नाही की काही अधिकारही नाहीत. पण तो नायिकेचा सच्चा हितचिंतक. तसा अबोल, शांत. तरीही त्यांना वेळोवेळी अत्यंत मार्मिक बोलणारा! या पात्राची योजना आणि हेतू अगदी सूचक आणि अर्थपूर्ण. याशिवाय नायिकेची मावशी, यजमान आणणारे भट अशी अन्य पात्रंही आहेत. इथं जागेअभावी अधिकचे तपशील विस्तारानं देता येत नाहीत. आणि या मूळ नाटकाची प्रतही आता उपलब्ध नाही, हे आणखी एक कारण!

तर अशा या नायिकाप्रधान नाटकातला पुरुष हा तसा खलनायकी चेहरा घेऊनच येतो. तरीही हा खलनायकी चेहरा आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वानंदेखील डॉ. लागू उत्तमरीत्या साकारत असत. या चार व्यक्तिमत्त्वांमधून समस्त समाजपुरुषाचं एकोणिसाव्या शतकातलं दुटप्पी वागणं- लेखक वसंत कानेटकर, दिग्दर्शक डॉ. लागू, वेश/रंगभूषाकार आणि अभिनेते लागू यांनी कमालीच्या ताकदीनं साकारलं होतं. कानेटकरांच्या नाटकातले चुरचुरीत संवाद, किंचितसा मेलोड्रामा यात आहे. या चार पुरुष पात्रांत किंचितसं व्यंग असणारा आणि त्याबद्दल पुरेसा न्यूनगंड व खंत असलेल्या नाटककाराचं एक पात्र आहे. दुसरा पुरुष आहे लब्धप्रतिष्ठित साहित्यिक. तिसरा- एक अत्यंत देखणा नट. आणि चौथा- एक कोरडा, तरीही सहृदय, पण अतिव्यवहारी, नायिकेला शेवटपर्यंत सांभाळणारा, पण बाहेर गाणं न करण्याची अट घालणारा.. थोडक्यात- मालकी हक्क प्रस्थापित करणारा असा. त्याला स्वत:चं- पत्नी, मुलंबाळं असं कुटुंब आहे. तरीही असं एक हरहुन्नरी, बुद्धिमान, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेलं अंगवस्त्र बाळगावंसं वाटणारा कोकणातला संपन्न ब्राह्मण. (मनापासून क्षमा मागूनच हा शब्दप्रयोग वापरते आहे. कारण त्या काळात तो याच अर्थाने प्रचलित होता.) नाटकातल्या या चारही व्यक्तिरेखा डॉ. लागूच करत. एकच व्यक्ती या चार भूमिका करते म्हणून नव्हे, तर एका भूमिकेचा वास दुसरीला जराही लागू न देता सबंध नाटकभर डॉ. लागू वावरले याचं कौतुक वाटतं. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. डॉ. लागूंच्या निधनानंतर त्यांचं वारेमाप कौतुक करण्याचा उद्देशही इथे नाही.

नाटकातली पहिली भूमिका असे बुद्धिमान, पण शारीरिक व्यंग असणाऱ्या सुप्रसिद्ध नाटककाराची. निसर्गत: अतिशय देखणं आणि राजिबडं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या लागूंनी ही व्यंग असलेली भूमिका कोणताही अतिरेक न करता, फारसे अंगविक्षेप न करता त्यांच्या अभिनयाच्या तत्त्वांनुसार अतिशय स्वाभाविकतेनं साकारली. त्यातला पुरुषाचा लंपटपणा, स्वत:च्या व्यंगाचा न्यूनगंड आणि त्याचवेळी नायिकेच्या बुद्धिमत्तेची यथार्थ समज या भावभावनांमधली गुंतागुंत केवळ संवादांतून व्यक्त करणं अजिबातच सोपं नव्हतं. त्यासाठी लागूंनी देहबोलीचा आणि आवाजातील चढउताराचा केलेला वापर अभिनेत्यांनी आणि अभिवाचकांनी आदर्श पाठ म्हणून अभ्यासावा असाच होता.

दुसरी भूमिका होती एका लब्धप्रतिष्ठित, नावाजलेल्या साहित्यिकाची. त्यांची उभं राहण्याची, बोलण्याची ढब यातून डॉ. लागू ती व्यक्तिरेखा संपूर्णत: दृश्यमान करत असत. नायिकेबद्दल वाटणारं आकर्षण तर आहेच आणि तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक, अभिमान, समजही या साहित्यिकाला आहे. मात्र, त्याचा जाहीर स्वीकार, कबुली, किमान मत्रीची कबुली देण्यासही तो कचरतो. त्याची सामाजिक प्रतिष्ठा, कौटुंबिक परिस्थिती (तो विवाहित असून त्याला मुलंबाळं असणं!) या सगळ्याआड येत असते.

एकीकडे नाटकाची नायिका ही कलावंत परंपरेतून आलेली आहे. अतिशय चतुरस्र बुद्धिमत्ता असलेल्या या नायिकेला कर्तबगार, हुशार, रसिक पुरुषांच्या बौद्धिक सहवासाची ओढ आहे. आणि त्यायोगे अर्थातच प्रतिष्ठेची आणि सन्मानाचीही! नायिकेला आपल्या बुद्धिमत्तेचा आणि माणूस म्हणून व्यक्तित्त्वाचाही सन्मान हवा असतो. ही अपेक्षा अर्थातच गैर नाही. हिराबाई पेडणेकरांनी स्वत: लिहिलेलं आणि संगीत दिलेलं नाटक पाहायला त्यांना त्याकाळच्या प्रथेनुसार- ‘कुलीन स्त्री’ आणि ‘वेश्या’अशा वर्गवारीनुसार- वेश्यांसाठी राखीव असलेल्या जागेवर बसावं लागलं. त्यावेळी कुलीन स्त्रियांसाठी आणि वेश्यांसाठी  तिकिटांचे दरही वेगवेगळे होते. हिराबाईंना वेश्यांसाठी असलेल्या वेगळ्या जागेवर बसावं लागणं किती वेदनादायक असू शकतं, हे आपण जाणू शकतो. (हे नाटकात आलेलं नसावं.)

डॉ. लागूंची तिसरी भूमिका होती- देखणं, रुबाबदार व्यक्तिमत्त्व लाभलेल्या एका गायक नटाची. ज्या क्षणी आणि ज्या रूपात, ज्या ढंगानं ते या भूमिकेत रंगमंचावर येत, त्याचं शब्दांत वर्णन करणं जवळजवळ अशक्यच. मला तो अनुभव घेता आला आणि अजूनही तो स्मृतीत साठवला गेलाय, हे माझं परमभाग्यच! नायिकेचं पुरुष म्हणून खरं प्रेम होतं ते या गायक नटावर. आणि त्यांचंसुद्धा नायिकेवर प्रेम होतं. परंतु त्यांचं अकाली निधन होणं हा नायिकेवर झालेला मोठाच आघात होता.

डॉक्टरांची चौथी भूमिका होती एका प्रामाणिक आश्रयदात्याची. ‘वर्षांला चोळीबांगडी करेन आणि तुम्हाला नीट ठेवेन,’ असं वचन देऊन ते पाळणाऱ्या; पण स्वामित्व हक्क गाजवणाऱ्या पुरुषाची! हा होता लग्न न करता त्यांना आश्रित म्हणून ठेवणारा पुरुष. ‘बाहेर गायचं नाही’ अशी अट घालणारा.. म्हणजे एका अर्थानं त्यांचं (हिराबाईंचं) कार्यकर्तृत्व संपवणाराच. अन्यथा आपल्याला हिराबाईंचं गायन ध्वनिमुद्रित स्वरूपात तरी ऐकता आलं असतं! असो. या पात्राला चांगला, कमावता, मुख्य म्हणजे दिलेला शब्द पाळणारा, सहृदयी पुरुष म्हणून व्यक्तिमत्त्व आहे. परंतु रसिक, कलावंत म्हणून तो नायिकेच्या प्रियकराच्या संकल्पनेत बसणारा नाही. तरीही त्याची अट नायिका शेवटपर्यंत प्रामाणिकपणे, कसोशीनं पाळते. या पुरुषाच्या व्यक्तिरेखेचे बारकावे, ताणेबाणे अधिकच भिन्न आहेत. तेही डॉ. लागू समर्थपणे साकारत असत. त्याचा सच्चेपणा, स्वामित्वाची भावना, उपकारकत्रेपण हे सगळं दाखवणं आव्हानात्मक होतं. डॉ. लागूंनी ते आवाजाच्या क्षमतेतून, संवादफेकीच्या वेगळेपणातून, उच्चारण भेदातून, देहबोलीतून यथोचित साकारलं होतं.

डॉ. लागू एकदा कुमार गंधर्वाना म्हणाले होते, ‘तू तुझ्या बंदिशींमधून जे साधतोस, ते मी नाटकातल्या माझ्या संवादांतून साकारेन.’ (कुमार गायकीचे जाणकार, चाहते, गायक, सच्चे साधक आणि बंदिशींच्या अभ्यासकांना यातील मर्म कळेल.) त्यावर कुमार उत्तरले, ‘महत्त्वाकांक्षी आहेस यार तू!’ पण डॉ. लागूंनी हे बऱ्याच प्रमाणात साध्य करून दाखवलं. त्यांच्या अनेक नाटकं तसंच चित्रपटांतील भूमिकांमधून.. आणि अर्थातच ‘कस्तुरीमृग’मधूनही!