कौस्तुभ केळकर – नगरवाला kaukenagarwala@gmail.com

जिगरी मतर सदाभाऊ यान्ला,

bjp rajput voters in up
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
mohan bhagwat remark on ram mandir
‘नीट राज्यकारभार केला नाही तर राजालाही पायउतार व्हावं लागतं’, मोहन भागवतांचा इशारा कुणाकडे?
vasant dada patil marathi news, vishal patil
सांगलीत दादा घराण्याच्या अस्तित्वाचा लढा

दादासाहेब गावकरचा दंडवत.

तुम्चा रिप्लाय गावला. आमच्या पत्रानं तुम्हास्नी आनंद न्हाई झाला, पर खूप बरं वाटलं, हे ऐकून आमास्नी मात्र किलूभर आनंद झाला. आपला लेटर लिवायचा शिलशिला सुरू झाला की राव!

काय आप्पा आन् ते थोबाडपुस्तक, न्हाईतर ई-मेल.. कुटं बी रिप्लाय देतु आम्ही. पर ही अक्षरं बेजान असत्यात. शाईच्या प्येनानं पोष्टकार्डावर लिवलेलं परत्येक अक्षर जित्तं वाटतंया बगा. प्रीमाचा, नात्याचा ओलावा जपणारी ती शाई कदीच सुक्कड होत न्हाई. दुष्काळापाई भले रान सुकलं आसंल, पर ह्यो तुमचं लब्यु लब्यु आमचा दिल गार्डन गार्डन करून जातु राव.

तुमी हमीभावाईषयी बोल्लात की आमी शेंटीमेंटल होतु. वाईच आठीवलं म्हून सांगतुया. आपलं कादर खान गेलं. त्यान्चं अ‍ॅक्टिंग, डायलाग आमास्नी लई आवडायचं. ‘मजदूर को मजदूरी उस्का पसीना सुखने से पेहले मिलनी चाहिये..’ तसंच व्हाया हवं. पिकाची कापणी हुईस्तोवर पकं मिळायला हवं. जगण्याची हमी देईल, आमच्या बायकापोरान्ला खुशीचं हासू देईल तो खरा हमीभाव. आमी तेवढंच मागतुया. पर यंदा बी कांदा रडवून ऱ्हायलाय राव. पिका न्हाई भाव, आन् देवा मला पाव.. देव बी रुसलाय जनू.

ऱ्हायलं..

फाटं चारला रानात जातुया. पिकास्नी पानी द्यायला. ह्यो आमच्यासारकं ‘पीक हावर्स’ तुमच्याकडं बी हाईत म्हना की! शेवटी गावाकडं असू द्यात, न्हाईतर ममईला- कष्टाचं पानी शिंपल्याबिगर पशाचं पीक येतंय का कंदी?

तुमच्या ममईच्या फ्याशनवाल्या बाया पाठी उघडय़ा टाकणाऱ्या झंपरला ती मण्यांची झुंबरं लावतात बगा. काय म्हणायचं त्येला? बरूबर.. लटकन्! आपल्या समद्यांची जिंदगी त्या लटकन् टाइप झालीया. तुमी तिकडं लोकलला लटकताया, आमी हिकडं वढापला. हात वर करून सुखाची दांडी शोधायची. गावली तर ठीक, नाईतर एक दिस खाली पडून जीव जानार. तोवर ह्यो रोजचं मरन, ह्योच जगनं.

ट्रॅफिक ज्याम आमच्याकडं न्हाई. ट्रॅफिकसाठी पलं रस्तं हवं की वं. त्येच नाहीत आमच्याकडे. नुस्ताच धुराळा आणि फुफाटा. ‘मेरे देश की मिट्टी..’ याच मिट्टीचा मेकअप बसतुया चेहऱ्यावर आपुआप. मिट्टीचा मेकअप आन् हाडांचा ब्रेकअप. कुनीतरी आपल्या शिवारातून जानारी गाडीवाट बंद करतुया. हान त्येचायला. धा-बारा डोकी फुटत्यात.

जंटलमन न्हाईत आमच्या हिथं. पर मान्सं नक्की हाईती. बोलताना घडी घडी शिव्यांचा पाऊस पडतुया. शिव्यांबिगर आमच्या भासंला गोडवा न्हाई. सुभान्या आनि त्याचा चुलतभाव शिर्पा- दोगं बी हुभं होतं मेंबरपदासाठी. ते बेणं पडलं आन् त्यानं शिवारातनं जानारी गाडीवाट बंद करून टाकली वो. पन् सुभान्याच्या म्हातारीचं जास्त झालं तवा त्याच्या चुलत्यानं रातोरात रस्ता रिकामा क्येला आन् सौताच्या गाडीतून म्हातारीला तालुक्याला हाश्पीटलात न्येली. मानूसपणाचा रस्ता आजून शाबूत हाय हिथं.

त्ये वपु आमचं बी फेवरीट. त्यांच्या एक ष्टोरीतला मानूस भांडण्याचे क्लाशेस काढतुया. तसंच झालंया. आजच्याला आपुन राग काढन्याचं चान्सेश शोधतु बगा. यंदा पीकपानी कमी. चोऱ्यामाऱ्या वाढल्याती. मागच्या ईतवारी आमच्या रघ्याचं जावई आणि त्याचं दोस्त आलं हुतं. गाडी चुकली म्हून रातचीला उगवलं. गावची पोरं गस्त घालून आधीच कावलेली. चोर समजून समद्यान्नी हात साफ करून घ्येतला. मॉब शायकॉलॉजी लई बेक्कार की वं.

तुमी रिपब्लिक डेच्या शुभेच्चा दिल्यात. लई झ्याक वाटलं. शिनेमात दाखीवतात तसं आमी बी फ्लॅशबॅकमंदी गेल्तो. चार खोल्यांची साळा आन् साट-सत्तर पोरं. साळंत जानं खरंच परवडायचं न्हाई. रानात काम करनारं हात कमी व्हायचं. मास्तरलोकं आमच्यासाटी जीवाचं रान करायची. पर रिपब्लिक डेला समदी पोरं हाजीर. समद्यांच्याच फाटक्या चड्डय़ा आन् उघडे सदरे. गरिबीची फ्याशन करताना लाज न्हाई वाटली कंदी. तिरंग्याकडं मान वर करून बगताना लई भारी वाटायचं. आप्पा कुळकर्णी नावाचं फ्रीडम फायटर हुते गावात. त्येच आमचं चीफ गेष्ट. विंग्रजांबरूबर ते कसं लडलं, कुटं कुटं लपून ऱ्हायलं, अश्या ष्टोरी सांगायचं ते. झेंडा फडकल्यानंतर पेढं आन् खिचडी मिळायची. त्या खिचडी-पेढय़ासाटी समदी यायची. तरी बी आप्पा कुळकर्णीचं ष्टोरी ऐकलं की छाती टम्म फुगायची.

आता साळा मस फुगलीया. पर रिपब्लिक डे मंजी हालीडे वाटतुया समद्यास्नी. नाविलाज म्हून मास्तर लोक येताती. निम्मी पोरं गायब. आमी मात्तुर दरसाली जातु साळंत झ्येंडावंदनाला.

आमचं येक आर्मीवालं दोस्त हाये. सर्जेराव नावाचं. कारगीलमंदी लडायला गेलेलं. मेडल बी मिळवलं तवा. तेन्ला बोलीवलं हुतं चीफ गेष्ट म्हून. त्येनं कारगीलच्या ष्टोरी सांगिटल्या. आख्खा गाव लोटला हुता. वीस-पंचवीस पोरं ‘आमी आर्मीत जानार..’ म्हन्त्यात. सर्जेराव गाइड करनार हाईत त्येन्ला. रिपब्लिक डे लई मेम्यरेबल झाला बगा.

टीव्ही च्यानेलच्या डीबेटा आमी कंदी बगतच न्हाई. दूरदर्शनवरचं ‘आमची माती, आमची माणसं’ आमास्नी लई आवडायचं. पर हिथं आपलं मानूस कुणीच न्हाई. अन् माती? समदे मातीच खाऊन ऱ्हायलेत. १९४७ मंदी आपल्या देसाला स्वातंत्र्य मिळालं. रेडीमेडची किम्मत न्हाई आमास्नी. स्वराज्य आणि स्वातंत्र्य. आमी सोईनुसार अर्थ लावतु. स्वराज्य म्हंजी सौताचं राज्य. त्ये कायबी करून मिळवायचंच. गल्लीगल्लीत आशी संस्थानं हाईती.आन् े स्वराज्य चालविन्याची, टिकविन्याची भारी देशी शिष्टीम हाय. कायबी, कुटंबी, कितीबी खाऊन ढेकर देनारी. पैशानं काय बी ईकत घेता येतुया, हे मूल्यशिक्षान देनारी. मी आन् माझं येवढंच बगनारी. जरा कुनी शिष्टीमभाईर जाऊन चांगभलं केलं की त्यो संपलाच. तुमी राजकारनी आसा नाईतर कॉमन म्यान; येकंदा तुमी ही शिष्टीम फॉलो क्येली की मंग काई तरास न्हाई. तुमास्नी समदं स्वातंत्र्य भेटंल. तुमी जी लंबी लिष्ट लिवलीय त्ये सगळं भेटंल. तुमी संतमहात्मा आसंल तर नशिबाचं भोग म्हून गप ऱ्हावा. तुमास्नी ईचार करन्याचं, ईचारन्याचं स्वातंत्र्य न्हाई.

सदाभौ, आमास्नी स्वराज्य नगं, सुराज्य हवं. डिशीप्लीन्ड डेमोक्रशी हवी. बाकी सगळं स्वातंत्र्य घेवा की वो, पर नियम मोडन्याचं स्वातंत्र्य बिल्कूल नगं. कायद्याचा धाक वाटाया हवा. मानूस नियमानुसार वागाया लागला की आपुआप दुसऱ्याचा ईचार करतु. मग सरकार कुनाचं बी येवो, त्ये सुराज्य आसंल. मी- माझा म्हनायला हवंच. पर कसं? मी या देसाचा अन् देस माझा. पटतंया ना सदाभौ?

बाकी तुमचं म्हननं बरूबर हाय. येक ईन्व्हिजिबल गन आमाली बी दिसतीया. सदानकदा आमच्यावर वॉच ठय़ेवनारी. आमी कुणासंगट बोलावं, कुठं जावं, घरीदारी कसं वागावं.. समदं या गनगनीच्या तालावर ठरतंया. आगदी आमच्या शोशल मीडियावर सुद्दीक त्ये डोळं रोखूण राहतंया. तुमचा ‘गनतंत्री’ ईनोद म्हनूनच रिअलमंदी आवडला बगा.

शेगावचं गजाननम्हाराज आमचं परमदैवत. आमचं म्हाराज काय म्हनायचं? ‘गण गणात बोते.’ मंजी परत्येक मान्सामदी द्य्ोव बगा.

मानूस द्य्ोवासारखा वागाया लागंल तवाच देस गणतंत्र हुनार नक्की. कुनावर कशाचीच सक्ती कराया नगं. पर देशप्रेमाची आसक्ती हवी की नगं?

जाता जाता आठीवलं.. त्या झुक्यानं टेन ईयर्स च्यालींज दिलाय. सदाभौ, आमी तुमाला च्यालींज देतु. धा वर्सानंतर आपल्या देसाचा चेहरा कसा आसंल? सांगा बगू.

वाईच लौकर रिप्लाय धाडा.

तुमचा जिवाभावाचा दोस्त,

दादासाहेब गावकर