१९५६ मध्ये लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय काँग्रेस समितीने टिळकांचे चरित्र लिहिण्याची स्पर्धा जाहीर केली होती. त्या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे पारितोषिक तीन पुस्तकांना विभागून देण्यात आले. त्यातील दोन पुस्तके (त्र्यं. वि. पर्वते आणि शि. ल. करंदीकर यांची) मराठी होती आणि तिसरे इंग्रजी पुस्तक होते-‘लोकमान्य टिळक’! प्रा. अ. के. भागवत आणि प्रा. ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले! त्यावेळचे उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी त्यास प्रस्तावना लिहिली होती. हे पुस्तक जयको पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले होते. नंतर त्याच्या अनेक आवृत्त्या आल्या. मात्र त्याची मराठी आवृत्ती प्रथमच येत असून, टिळकांच्या १०१ व्या पुण्यतिथीदिनी आज (१ ऑगस्ट २०२१ रोजी) प्रकाशित होत आहे. साधना प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद केला आहे अवधूत डोंगरे यांनी. त्यातील समारोपाच्या प्रकरणातील हा संपादित अंश..      

स्वराज्याचा आशय समजावून सांगताना टिळकांनी लोकशाही रूपाची पाठराखण केली आणि पुढील चार घटकांचा आग्रह धरला : (१) केंद्रीय सत्ता, (२) संघराज्यांना संपूर्ण स्वायत्तता, (३) भाषिक प्रांतरचना, आणि (४) प्रांताध्यक्षाची लोकांकडून निवड. स्वराज्याविषयी केलेल्या सर्वच भाषणांमध्ये टिळकांनी येऊ घातलेल्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले होते आणि लोकांसमोर स्वतंत्र भारताचं चित्रही रेखाटलं होतं. यामध्ये ते विविध शक्तींना आशावादी मुलामा चढवत नव्हते, तर जागतिक परिस्थितीच्या संदर्भात ते भारतातील राजकीय शक्तींचं मूल्यमापन करत होते आणि अनन्यसाधारण राजकीय दूरदृष्टीने त्यांना आगामी घडामोडींचा सुगावा लागला होता. लोकांनी आपली नियत भूमिका स्वराज्य चळवळीमध्येच पार पाडावी असं ते कायम बजावून सांगत असत. आणि काँग्रेसने समोर येणारी प्रत्येक संधी वापरून लोकांना योग्य दिशा द्यावी अशी त्यांची इच्छा होती. १९१४ सालानंतर टिळक लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले. सार्वजनिक जीवनातील त्यांचं त्यावेळचं स्थान ‘भारताचा अनभिषिक्त राजा’चं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शहरांसोबतच गावांमधील हजारो लोक टिळकांना भेटण्यासाठी आणि त्यांचे स्फूर्तिदायक शब्द ऐकण्यासाठी येत. त्यांना मानपत्रं व निधी देत असत. टिळक लोकांना कर्मयोग शिकवायचे आणि आपल्या काळाने समोर उभं केलेलं आव्हान स्वीकारावं, असं आवाहनही करायचे.

भारताच्या राजकीय जीवनामध्ये नवीन उमेद रुजवताना टिळकांना इंग्लंडमधील राजकीय प्रचाराचं महत्त्वही कळलं होतं. इंग्लंडमध्ये गेलेल्या होमरूल लीगच्या एका प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व त्यांनी केलं. चिरोल खटल्यासंदर्भातही ते इंग्लंडला गेले. भारताच्या राजकीय चळवळीची सत्यस्थिती जगाला कळायला हवी अशी टिळकांची तीव्र इच्छा होती. (गांधींनी याला ‘एक प्रकारचा सत्याग्रह’ असं संबोधलं.) यामुळे त्यांनी चिरोलविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. या खटल्यात टिळकांचा पराभव झाला. भौतिक पातळीवर हे मोठंच नुकसान होतं. पण चिरोल यांनी त्यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये टिळकांविरोधातील सर्व गंभीर आरोप बहुतांशाने वगळले. म्हणजे टिळक राजद्रोही आहेत हा आधीचा आरोप खोटा होता हे अप्रत्यक्षरीत्या कबूल केलं. त्यामुळे टिळकांनी घेतलेली नैतिक भूमिका योग्य असल्याचं सिद्ध झालं.

इंग्लंडमध्ये असताना टिळकांनी भारतीय स्वराज्याचा प्रश्न तिथल्या लोकांपर्यंत नेऊन भारताच्या राजकीय मागण्यांबाबत ब्रिटिश लोकमत जागृत करण्यासाठी सर्वतोपरी कष्ट केले. त्यांच्या खास दूरदृष्टीने त्यांनी लेबर पक्षाशी जवळचा संपर्क प्रस्थापित केला आणि इंग्लंडमधील ‘नाही रे’ वर्गाच्या प्रतिनिधींशी भारताची एकजूट व्यक्त केली. भारताच्या स्वराज्याची बाजू अद्भुतरीतीने मांडणारी ‘स्वयं-निर्णय’ ही प्रसिद्ध पुस्तिकाही त्यांनी इंग्लंडमध्ये असताना प्रकाशित केली आणि ब्रिटिश लोकांमध्ये या पुस्तिकेच्या हजारो प्रती वितरित केल्या. या पुस्तिकेची एक प्रत त्यांनी पॅरिसमध्ये भरलेल्या शांतता परिषदेकडेही पाठवली, यावरून जागतिक शक्तींच्या महत्त्वपूर्ण स्थानाबद्दलची त्यांची जागरूकता दिसून येते. इंग्लंडमध्ये त्यांनी अनेक भाषणंही दिली. ते अनेक महत्त्वाच्या लोकांना भेटले आणि काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी संयुक्त संसदीय समितीसमोर साक्ष दिली.

टिळक भारतात परतले तेव्हा त्यांना खिलाफत चळवळ आणि रौलट कायद्याविरोधातील सत्याग्रह या रूपांमध्ये नवीन शक्ती उदयाला आल्याचं जाणवलं. प्रगतिशील नेता म्हणून त्यांनी या शक्तींचं स्वागत केलं आणि राजकीय क्षितिजावर गांधी नावाचा तारा उदयाला येतो आहे हेही त्यांच्या लक्षात आलं. ‘मॉन्ट-फर्ड’ (मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड) सुधारणांचा मसुदा प्रकाशित झाला तेव्हा टिळकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. आता काँग्रेसला या प्रस्तावित सुधारणांबद्दल स्वत:ची भूमिका ठरवावी लागणार होती. या सुधारणा नाकाराव्यात, असं चित्तरंजन दास म्हणाले; तर स्वराज्यप्राप्तीच्या दृष्टीने या सुधारणांची अंमलबजावणी करावी, असं गांधीजी म्हणाले. आणि टिळकांनी व्यावहारिक मुत्सद्दय़ाच्या भूमिकेतून सुवर्णमध्य सुचवला. अखेरीस चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या तडजोडीच्या सूत्राद्वारे टिळकांचा प्रस्ताव स्वीकारला गेला. टिळक इंग्लंडला होते तेव्हा त्यांना आयरिश ‘सिन फीन’ संघटनेच्या डावपेचांनी प्रभावित केलं. ही संघटना निवडणुकीला उमेदवार उभे करायची, पण उमेदवार जिंकून आल्यावरदेखील ते संसदेत जायला नकार देत आणि स्वत:चं सरकार उभारायचा प्रयत्न करत. यातील काही मार्ग भारतीय परिस्थितीला सुसंगत ठरतील अशा रीतीने अनुसरायची टिळकांची इच्छा होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतियोगी सहकारितेचं तत्त्व मांडलं. त्यांना या सुधारणा अंमलात आणल्या जाव्यात आणि काँग्रेसचं ब्रीद व शिस्त स्वीकारणाऱ्या प्रतिनिधींना कायदेमंडळांमध्ये पाठवावं असं वाटत होतं. सरकारने सहकार्यास नकार दिला तर थेट कृती करावी-  म्हणजे बहिष्कार, नि:शस्त्र प्रतिकार, इत्यादी वापरावं- असं टिळकांच्या मनात होतं. काँग्रेसने नंतरच्या काळात हे धोरण अनुसरल्याचं पुढील घडामोडींवरून सिद्ध झालं. स्वराज्य पक्ष कायदेमंडळात कार्यरत होता, पण सरकारशी संघर्ष अनिवार्य झाल्यावर काँग्रेसने सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

लोकमान्य टिळक सत्याग्रहाकडे साधन म्हणून पाहत होते आणि कालांतराने महात्मा गांधींच्या दृष्टिकोनातून सत्याग्रहाचा जीवनविषयक तत्त्वज्ञान म्हणून विकास झाला.

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यात मतभिन्नता असली तरी पंजाबमधील दंग्यांवेळी लोकांनी केलेल्या अतिरेकी कृत्यांचा निषेध करणारा ठराव गांधींनी अमृतसर अधिवेशनावेळी मांडला तेव्हा टिळकांनी त्यांच्या दृष्टिकोनाला संमती दर्शवली होती. गांधींनी कालांतराने स्वीकारलेलं धोरण व कार्यक्रम यावर टिळकांनी कसा प्रतिसाद दिला याची चर्चा करणं म्हणजे ‘जर-तर’चा निष्क्रिय खेळ होऊन बसेल. गांधींनंतरच्या व मार्क्‍सवादानंतरच्या काळातील कसोटय़ा टिळकांच्या राजकीय संकल्पनांना व कार्यक्रमांना लावणंही अन्याय्य ठरेल. भारतातील राजकीय चळवळ बाल्यावस्थेत होती तेव्हा टिळकांनी राजकीय जीवनाचा खडतर प्रवास सुरू केला. त्यांनी ही चळवळ बळकट केली. तिला प्रचंड चालना दिली आणि ब्रिटिश सरकारला जबाबदार राज्यपद्धतीवरील भारताचा दावा किमान तत्त्वत: तरी मान्य करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण केली. आयुष्यभर त्यांनी स्वत:च्या देशाचा सन्मान टिकवून ठेवला. मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली तेव्हा ते नक्कीच समाधानाने असं म्हणाले असतील की, ‘चला, दिवसभराचं काम उरकलं, आता झोपायला हवं.’

या सगळ्यामधून समोर येणाऱ्या व्यक्तिमत्त्वामध्ये तीव्र मानवी गुणवैशिष्टय़ं असल्याचं दिसतं. देशाची मुक्ती हे या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनाचं ध्येय होतं आणि या ध्येयासाठी त्याने स्वत:चं जीवन समर्पित केलं. टिळकांची अंत:प्रेरणा व जडणघडण वेदान्ती परंपरेमधील होती, आणि ते अस्सल लोकशाहीवादी होते. ते लोकशाहीकडे केवळ एक राज्यपद्धती म्हणून पाहत नव्हते, तर इतरांविषयीची व्यक्तीची मनोवृत्ती निश्चित करणारी श्रद्धा म्हणून पाहत होते. लोकशाहीमध्ये पाश्चात्त्यांचं अनुकरण आहे असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांनी लोकशाही विचाराचा आधार हिंदू तत्त्वज्ञानात शोधला. प्रत्येक आत्मा ईश्वरासमोर समान आहे, असं उपनिषदांमध्ये सांगितलेलं नाही का? त्यामुळे लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांच्याभोवती थोरवीचं वलय निर्माण झालं, तरीही ते साधे, स्नेहशील व उत्कटपणे मानवीय राहिले. त्यांचं बारूप कठोर असलं तरी ते अनेकदा उत्स्फूर्तपणे खेळकर विनोद करत असत. प्रबळ इच्छाशक्ती व चैतन्यशीलता असलेल्या टिळकांनी एखादा विचार निश्चित केला की ते कोणत्याही विरोधाला जुमानत नसत आणि निर्दयी टीकाही करत. पण या सगळ्यात त्यांना स्वत:साठी काही नको होतं, त्यांची कळकळ फक्त विशिष्ट ध्येयासाठीची होती. राजकीय कार्यात व्यग्र असतानाही ते भारतीय संस्कृतीच्या प्रवाहातसुद्धा खोल बुडी मारून येत असत. राजकीय परिस्थितीमुळे राष्ट्रीय चळवळीवर आलेल्या मर्यादा ओलांडण्याची खटपट ते करत होते, याचे दाखले विविध प्रसंगांमधून मिळतात. भारतीय प्रतिभाशक्तीचा सर्वोत्कृष्ट आविष्कार ज्या रवींद्रनाथ ठाकुरांच्या रूपात झाला, त्यांना काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करावी असं टिळकांनी सुचवलं होतं- हा मर्यादा ओलांडण्याचाच प्रयत्न होता. राजकीय आदर्शाऐवजी संस्कृती हा भारतीय जीवनाचा मुख्य प्रवाह होईल, त्या काळाचा अंदाज त्यांनी आधीच बांधला होता.

श्री. अ. के. भागवत आणि श्री. ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेलं लोकमान्य टिळकांचं चरित्र या विषयावर इंग्रजीत उपलब्ध असलेल्या वाङ्मयात मोलाची भर घालणारं आहे.

टिळकांच्या बहुआयामी जीवनामध्ये त्यांनी दिलेलं राजकीय योगदान सर्वाधिक ठळकपणे समोर येतं. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असा चैतन्यशील संदेश त्यांनी आपल्याला दिला. त्यांची सत्त्वशीलता, नैतिक निग्रह आणि ताठ कणा राखण्याचं व भारताच्या स्वातंत्र्यासाठी दु:ख सोसण्याचं त्यांच्या अंगी असलेलं धाडस यांची यथामूल दखल या ग्रंथात घेतली आहे. टिळकांच्या देशभक्तीमध्ये राजकीय, नैतिक व धार्मिक प्रवाहांचा संगम झाला होता.

टिळक राजकीय नेते होतेच, पण त्याचसोबत ते थोर अभ्यासक आणि पत्रकारदेखील होते. त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका एकाच वेळी प्राचीन वाङ्मय आणि आधुनिक विज्ञान यांना कवेत घेण्याइतका व्यापक होता. त्यांनी हाती घेतलेला प्रत्येक विषय उजळून टाकला.

या देशातील प्राचीन आदर्श आधुनिक जीवनामध्येही वैध व प्रस्तुत ठरतील अशी टिळकांची श्रद्धा होती. त्यांचा ‘गीतारहस्य’ हा महद्ग्रंथ याची साक्ष देतो. आज अत्यंत उग्र पातळीवर क्रियाशीलता आलेली असतानाही मोठय़ा प्रमाणात असुरक्षितता व दिशाहीन भरकटलेपणसुद्धा दिसतं. अशा वेळी टिळक आपल्याला आंतरिक शिस्त आणि माणसांविषयीची सहानुभूती यांची गरज समजावून सांगतात.

या पुस्तकातून वाचकांना टिळकांच्या बुद्धिमत्तेची वैश्विकता आणि ‘मानवी परिवारा’वरील मूलभूत श्रद्धा यांचा उलगडा होईल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् (१९५७)