‘मुडकं कुंपण’ ही रवींद्र पांढरे यांची लघु कादंबरी. समाजातील दांभिकतेवर भाष्य करण्यासाठी लेखकाने स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, आहे रे-नाही रे या लिंग, वर्ग आधारित द्वंद्वांचा कथानकात परिणामकारकपणे वापर केला आहे. ग्रामीण जीवनाचे दर्शन हे रवींद्र पांढरे यांच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य आहे. या कादंबरीचे कथानकही ग्रामीण पार्श्वभूमीवरच घडते.
रंभी हे या कादंबरीच्या केंद्रस्थानी असणारे पात्र. ती लहानपणापासून गव्हारातली गुरे राखण्याचे काम करणारी आई-बापाची एकुलती एक लेक. दिसायला उठावदार, सुंदर. पाटलाच्या तरुण मुलासोबत तिचे विवाहपूर्व संबंध येतात. गावात याची वाच्यता होते. वहिवाटीनुसार सधन पाटलाच्या मुलाचे थाटामाटात लग्न लागते. त्याला दहा घरच्या पोरी सांगून येतात. मुलाने लग्नाआधी काहीही केले तरी त्याला सर्व माफ! मुलीने लग्नाआधी कोणासोबत संबंध ठेवले असतील व त्या संबंधांबद्दल समाजाला आधीच माहीत असेल तर मात्र त्या मुलीचे लग्न जमवणे फारच मुश्कील होऊन बसते. त्यात रंभी गरिबा घरची. धनंजय या मेंदट, बुळ्या शेतमजुरीचे काम करणाऱ्या पुरुषाशी तिचे लग्न होते.
लग्न हेच स्त्रीच्या जीवनाचे सार्थक मानणारी आपली समाज मानसिकता. त्याचा पगडा असणारी रंभीची आई पुरुषाशिवाय बाईच्या आयुष्याचा निभाव लागत नाही या भीतीपोटी आपल्या मुलीच्या लग्नासाठी धडपडत असते. आई-बापाच्या पश्चात आपल्या मुलीला एकटेपणाचा संघर्ष करावा लागेल हे या अडाणी आईला मान्य नसते. मेंदट, भिन्नमती, आडवी- जड कामे करणारा धनंजय तिला जावई म्हणून मान्य असतो. आपलेच नाणे खोटे समजून ती रंभीच्या लग्नाचा सरलाकडून आलेला प्रस्ताव मान्य करते. इथून पुढचा रंभीचा प्रवास खडतर आहे. जावेपासून वेगळा संसार करण्याची, गावात एकट्यानेच राहण्याची वेळ तिच्यावर येते. नवरा असूनही नसल्यासारखा अशा स्त्रीच्या मानसिक, भावनिक अस्वस्थतेचे चित्रण पांढरे यांनी बारकाव्यांनं केले आहे. कादंबरीतील वटपौर्णिमेच्या उपवासाचा प्रसंग- त्यावेळची रंभीच्या मनातील उलाढाल वाचण्यासारखी आहे.
असहाय, अशिक्षित, गरीब स्त्री म्हणून रंभीला भोगाव्या लागणाऱ्या घुसमटीचे दर्शन पांढरे यांनी अचूक केले आहे. समाजात अशा एकट्या स्त्रीला उपद्रव देणारी माणसे जशी आहेत तशीच साखरामाय, पुंजाबा बाबा यांसारखी सहृदयी माणसेही त्यांच्या परीने साहाय्य करण्यासाठी प्रसंगी सरसावतात तेव्हा या व्यवस्थेतील उणिवा दाखवतानाच पांढरे एखादा आशेचा किरणही पेरून जातात.
कादंबरीतील पात्रे शेती संस्कृतीतील तिफण येठणे, पेरणी करणे, आखाजीच्या सणाला शेणखत विकून पैसा कमावणे, गुरे राखणे इत्यादी कामे करतात. पात्रांचे संवाद खानदेशी बोलीभाषेत होतात. यामुळे अस्सल ग्रामीण पार्श्वभूमीवर रवींद्र पांढरे यांना तोडक्या मोडक्या संसारासाठी राब राब राबून कष्ट करणाऱ्या रंभीची ही व्यथा परिणामकारकपणे उभी करता आली आहे.
‘मुडकं कुंपण’- रवींद्र पांढरे, रोहन प्रकाशन, पाने १०६, किंमत १६० रु.
sujatarane31may@gmail.com