डॉ. नीलांबरी मंदार कुलकर्णी neelambari.kulkarni@yahoo.com

‘सॉलिटेअर’ हा अनंत सामंत यांचा नवा कथासंग्रह. याआधी सामंत यांच्या साहित्यातून पांढरपेशी अनुभवांपलीकडच्या थरारक जगाचे दर्शन घडले आहे. हा कथासंग्रहही त्याला अपवाद नाही. यातील कथांमधून समुद्रातल्या जहाजांवरचे विश्व (चेञ, मरे डीप), अतिशीत बर्फाळ प्रदेशात पोस्टिंग झालेल्या भारतीय सैन्यातील जवानांचे विश्व (शत्रू), मुंबईतील अंडरवर्ल्ड (सॉलिटेअर), वैज्ञानिक सत्यामुळे घडणारे अघटित (एडिट) असे  वैविध्यपूर्ण अनुभवविश्व उलगडले जाते. भोवतालच्या परिस्थितीमुळे एकटी पडलेली, वेगवेगळ्या कारणांमुळे समूहापासून वेगळी झालेली एकाकी व्यक्ती आणि तिची अस्तित्वासाठीची झुंज हे आशयसूत्र या  कथांमध्ये व्यक्त झाले आहे. ‘शत्रू’ कथेतला सैनिक किंवा ‘मरे डीप’  कथेतला आमोरी जहाजाचा चीफ ऑफिसर दत्तात्रेय सोमण यांचा संघर्ष निसर्गाच्या विराट प्राकृतिक रूपाशी झालेला आहे. ही दोन्ही पात्रे  विचित्र घटनांमुळे सहकाऱ्यांपासून दुरावून निसर्गाच्या शक्तीपुढे एकाकी झाली आहेत. सीमेवर तैनात सैनिकांना शत्रूसैन्य किंवा घुसखोरांशी संघर्ष करावा लागतो. ‘शत्रू’ कथेची सुरुवात अशाच संघर्षांच्या घटनेने होते. पण पुढे कथेच्या शेवटी दिसतं की अस्तित्वाचा प्रश्न घेऊन निसर्ग उभा ठाकतो तेव्हा त्यापुढे माणसामाणसांतील संघर्ष विरघळून जातो. ‘मरे डीप’ कथेतल्या दत्तात्रेय सोमणचा संघर्ष सुरुवातीला निसर्गाशी असतो, तसाच स्वत:च्या मनाशीही असतो. पण तोही शेवटी निसर्गाला शरण जातो. विधिलिखितावर सारे सोडून देतो.

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

‘एडिट’ या कथेतले जग सामान्य मध्यमवर्गीय घरातील आहे. पण या कथेला वैज्ञानिक चमत्कृतीमुळे अद्भुताचा स्पर्श झाला आहे. या कथेतील बबन वेलदोडे हे पात्र काहीसे ‘बिलो नॉर्मल’ असते. त्यामुळे तो समाजाकडून ‘बिच्चारा’ ठरवला गेलेला एक उपेक्षित जीव असतो. कुटुंबीयांपासून अलग, एकाकी पडलेला. पण या कथेतला निवेदक म्हणतो, ‘फालतू आणि ग्रेट, कॉमन आणि अनकॉमन, नॉर्मल आणि अ‍ॅबनॉर्मल यांत असा कितीसा फरक असतो! एका सुताचा.’ बबन हे एका सुताचे अंतर पार करून एकदम झेप घेतो व काळाच्या सापेक्षतेचा लाभ घेऊन आपले आयुष्य कसे ‘एडिट’ करतो याची ही कथा वाचकांना चक्रावून टाकेल अशीच आहे. 

‘चेञ’ या कथेतील चेञ या जहाजावरील सुताराची झुंजदेखील विधिलिखिताशी आहे. या कथेतही चमत्कृती आहे, पण ती प्राचीन,

गूढ अशा दैवी चमत्काराच्या अरबी श्रद्धेतून निर्माण झाली आहे. ‘एडिट’ आणि ‘चेञ’ या दोन्ही कथांतील थरारकतेला फँटसीचा, गूढतेचा स्पर्श झालेला  आहे.

‘सॉलिटेअर’ ही शीर्षककथा मुंबईतील अंडरवर्ल्डच्या विश्वाचे दर्शन घडवते. त्यांचे आयुष्य, गँगवॉर्स, एन्काउंटर्स, नियोजन, आपापसातील दोस्ती/ दुष्मनी, त्यांचे नातेसंबंध इत्यादीविषयी सामान्य माणसाला असणारे कुतूहल ही कथा काही प्रमाणात शमवते. चित्रपटसृष्टीतील एका बडय़ा असामीच्या खुनाच्या धक्कादायक घटनेनंतर एका फ्लॅटमध्ये अडकलेल्या चार गँगस्टर्सची ही कथा वाचकाला चांगलीच गुंगवून ठेवते. या कथेची रचना बुद्धिबळाच्या खेळासारखी आहे. कटकारस्थाने व शह-काटशह यामुळे कथेतील रहस्य शेवटपर्यंत तोलून धरले जाते. रहस्य उलगडले तरी कथेचा शेवट मात्र निश्चित घटनेने होत नाही, तर भविष्यात घडणाऱ्या घटनांच्या अनेक शक्यता  सुचविणारा खुला शेवट आहे.

धक्कादायक घटनेने थेट सुरुवात आणि खुला शेवट हे या संग्रहातील कथांच्या रचनेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. धक्कादायक घटना आणि त्यानंतर मग त्या घटनेमागची घटनासाखळी फ्लॅशबॅक तंत्राने सांगितली जाते. त्यामुळे कुतूहल निर्माण होते. या कथांचा निवेदक सर्व काही जाणणारा तृतीयपुरुषी निवेदक असला तरी घटनांचे निवेदन करताना तो काही तपशील दडवतो, तर काही तपशिलांतून छोटय़ा छोटय़ा रहस्यांची पेरणी करत जातो. उदाहरणार्थ, ‘सॉलिटेअर’ कथेच्या सुरुवातीला जीबी हे पात्र एरवी क्वचितच बसमधून प्रवास करत असल्याविषयी निवेदकाची टिप्पणी किंवा ‘एडिट’ कथेच्या सुरुवातीला पोलीस तपासात बबन वेलदोडेची डायरी सापडल्याचा उल्लेख यामुळे कथानकातील वाचकाची उत्कंठा शेवटपर्यंत राखली जाते. तृतीयपुरुषी निवेदकाचा वापर अशा रीतीने रहस्यमय कथानकाचा लोकप्रिय आकृतिबंध घडविण्यासाठी केला जातो. ‘शत्रू’, ‘एडिट’, ‘सॉलिटेअर’ या तिन्ही कथांचे खुले शेवट मानवी जीवनातील अनिश्चितता सुचवितात. पण तरीही कथांच्या शेवटी येणारी कलाटणी ही अंदाज बांधता येण्याजोगी आहे, कारण विधिलिखित या घटकाला या कथांमधील घटनामालिकेत खूप मोठे स्थान आहे. घटनाप्रधानता, अद्भुतरम्यता यांना रचनेत महत्त्वाचे स्थान मिळाले की मग पात्रांना काही कथात्म कार्य राहत नाही, किंवा मग एकदम प्रचंड मूलभूत बदल होतो. जसं- बबन वेलदोडे ‘बिलो नॉर्मल’वरून एकदम सुपरमॅनच होतो.

या कथांचे अनुभवविश्व जसे अपरिचित आहे तशीच त्यांची भाषाशैलीही.   खिळवून ठेवणारा घटनाप्रधान रचनाबंध आणि जीवनमरणाची लढाई खेळणाऱ्या एकाकी माणसांच्या या अद्भुत कथा वाचकांना नक्कीच गुंगवून ठेवतील.

‘सॉलिटेअर’- अनंत सामंत, मॅजेस्टिक प्रकाशन, पाने- २१२, किंमत- २५० रुपये.