प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

व्यंगचित्र हे दृश्य माध्यम आहे. त्यामुळे व्यंगचित्रकाराला जे भाष्य करायचं असतं ते शक्यतो रेषांच्या माध्यमातून आणि जरूर असेल तर भाषेच्या सामर्थ्यांचा वापर करून ते प्रभावी करण्याकडे त्याचा प्रयत्न असतो. रेषा आणि भाषेच्या मिश्रणाचा हा खेळ मोठा मजेदार असतो. चित्र किंवा रेषा अधिकाधिक आकर्षक कशा करता येतील, किंवा चित्र वेगळ्याच पद्धतीने कसे सादर करता येईल याचा विचार करत असतानाच त्याच्या डोक्यात काही वेळेला विविध प्रतिमांची एकमेकांवर आवर्तनं सुरू होतात! एखादी ठिणगी पडावी अशी प्रतिमा, कल्पना किंवा दृश्यं त्याच्यासमोर येतात. एरवी साध्या वाटणाऱ्या अशा प्रतिमांतून काही थोडाफार बदल केल्यामुळे ही चित्रं भलतेच आकार निर्माण करतात आणि मग चमत्कृतीतून सत्य सांगणाऱ्या त्या व्यंगचित्राला रसिक भरभरून दाद देतात.

मनात येणाऱ्या किंवा घोंघावणाऱ्या या प्रतिमा कसल्याही असू शकतात. एखाद्या पक्षाचा किंवा देशाचा झेंडा, राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह, एखाद्या प्रॉडक्टचा लोगो, एखाद्या संस्थेचं बोधचिन्ह, नोटा, नकाशे, राष्ट्रीय पक्षी किंवा प्राण्यांचे आकार, एखादी खास डिझाइन असलेली सुप्रसिद्ध इमारत, वगैरे वगैरे. अक्षरश: कशातूनही आश्चर्य वाटाव्या अशा कल्पना या प्रतिमांचा वापर करून व्यंगचित्रकार साकार करतात.

इस्रायल हा अतिशय छोटा देश. आजूबाजूला सगळे अरब देश. मुस्लीम आणि ज्यू हे धार्मिक रंग या देशांतील संघर्षांचं एक मुख्य कारण आहेच. अशा सदैव अडचणीत सापडलेल्या या राष्ट्राने अनेक छोटय़ा-मोठय़ा लढाया सतत केलेल्या आहेत. अत्यंत झुंजार असे अनेक नेते या राष्ट्रात झाले. त्यापैकीच एक म्हणजे कणखर आणि खंबीर व्यक्तिमत्त्वाच्या गोल्डा मायर. ‘पोलादी स्त्री’ असं त्यांचं वर्णन केलं जायचं. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अत्यंत सक्षमपणे इस्रायलला परकीय आक्रमणांपासून सुरक्षित ठेवलं. यासाठी लागणारी आवश्यक ती आक्रमक संरक्षणसिद्धताही त्यांनी केली. हे सारं व्यंगचित्रकार टीम अर्थात लुईस मिटलबर्ग या फ्रेंच व्यंगचित्रकाराने रेखाटलं आहे. अरबांच्या गराडय़ात बंदूकधारी गोल्डा मायर आणि इस्रायलचं राष्ट्रचिन्ह चांदणी यांचा वापर करून अत्यंत प्रभावी भाष्य वाचकांसमोर त्यांनी रेखाटलं आहे.

दुसऱ्या महायुद्धात हजारो व्यंगचित्रं काढली गेली. त्यावेळीही विविध प्रतिमांचा वापर करून आपलं भाष्य प्रभावी करण्याकडे व्यंगचित्रकारांचा कल होता. त्या काळात अनेक व्यंगचित्रकार हे आर्ट स्कूलमध्ये जाऊन चित्रकलेचं शिक्षण घेतलेले होते. त्यामुळे चित्रकलेच्या अंगानंही प्रतिमांचा वापर विविध प्रकारांत त्यांनी केला आहे. हिटलरच्या राजवटीचं चिन्ह स्वस्तिक होतं. त्यामुळे या स्वस्तिकचा वापर शेकडो व्यंगचित्रांमधून वेगवेगळ्या प्रकाराने झालेला दिसतो. त्यापैकीच सोबतचं हे एक.. १९३९ सालातलं. महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर नाझी जर्मनीने हळूहळू मध्य युरोपवर ताबा मिळवला. भयानक अत्याचारांना सामोरं जाणं एवढंच या भागातील जनतेच्या नशिबात होतं. लचके तोडण्यासाठी गिधाडे हळूहळू घिरटय़ा घालत आहेत असं भाष्य केलंय बर्नार्ड पारट्रीज या व्यंगचित्रकाराने.

अमेरिकन सैन्यात पुरुषांच्या बरोबरीने महिला सैनिकांनाही प्रत्यक्ष लढाईच्या ठिकाणी जाण्याची परवानगी देण्याचा कायदा पारित झाल्यावर स्कॉट या व्यंगचित्रकाराने ‘शिकागो ट्रिब्यून’मध्ये काढलेलं हे सोबतचं व्यंगचित्रही त्याने वापरलेल्या प्रतिमेमुळे प्रभावी ठरलं.

राजकीय व्यंगचित्रं काढताना अशा अनेक प्रकारच्या प्रतिमांचा आणि प्रतीकांचा वापर मी मुक्तहस्ताने केला. खूप पूर्वी भाजपच्या हातातून गुजरात राज्य गेलं. त्यावेळी अडवाणींच्या हातात असलेल्या भाजपच्या मोठय़ा कमळातून दोन पाकळ्या बाजूला पडताना दाखवल्या होत्या. यासाठी गुजरात राज्याचा नकाशा चिकटवून तो पाकळ्यांप्रमाणे दाखवला होता. रिझव्‍‌र्ह बँकेच्या संदर्भातलं गाजलेलं व्यंगचित्रही याचं उदाहरण आहे. त्यात बँकेच्या लोगोचा वापर केला आणि वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूची सांगड गव्हर्नरच्या राजीनाम्याच्या बातमीशी घातली.

१९९८ साली आपण अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली होती. आता भारताची ओळख अध्यात्माऐवजी अणुबॉम्बधारी देश अशी होणार हे प्रतीकातून दाखवलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय पक्षांची चिन्हं आणि त्यांचे नेते यांच्यात काही साम्य आहे का, याचा विचार करताना ते खरोखरीच एकमेकांत गुंतलेले आहेत असं जाणवलं. हे मायावती (हत्ती) आणि उद्धव ठाकरे (धनुष्यबाण) यांच्या चित्रांमधून लक्षात येईल. समाजातील अनेक चाली, रूढी, समजुती, परंपरा, चिन्हं, प्रतीकं यांचं वेळोवेळी ‘लेखापरीक्षण’ करणं हे विचारवंतांचं, समाजशास्त्रज्ञांचं आणि प्रतिभावंत कलावंतांचं कामच असतं. अशा अनेक प्रतिमा, प्रतीकं, चिन्हं यांची प्रसंगी मोडतोड करून त्या अनुषंगाने स्वत:च्या प्रतिभेनं जगभरातले व्यंगचित्रकार भाष्य करत असतात.