‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता या शहरा-शहराला आग लावीत चला…’ नामदेव ढसाळांच्या या क्रांतिकारी विचारधारेचे मूर्तिमंत, ज्वलंत प्रतीक म्हणजे सामान्य माणसाच्या हक्कासाठी आक्रमकपणे लढणारी दलित पँथर! १९७२ ते १९७७ या काळात महाराष्ट्रात सामाजिक क्रांती घडवून आणणाऱ्या या संघटनेत श्रेयवादातून संघर्षाची ठिणगी पडली आणि संघटनेलाच नव्हे, तर दलित चळवळीला त्याची झळ पोहोचली. राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली ही संघटना फुटीनंतर बरखास्त झाली; पण पुण्यात या ‘पँथर’ची डरकाळी पुढील काही वर्षे कायम होती. त्या काळात पुण्यातील दलित पँथरने केलेल्या चळवळीचा धगधगता इतिहास आणि आठवणींचा पट माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड यांनी ‘दलित पँथरचा झंझावात’ या पुस्तकातून मांडला आहे.
नामदेव ढसाळ हे अॅड. जयदेव गायकवाड यांचे सख्खे मावसभाऊ. दलित पँथरची स्थापना, उत्कर्षाचा काळ आणि उतरती कळा या सर्वच कालखंडामध्ये गायकवाड हे ढसाळ यांना साथ देत राहिले. अल्पावधीत सर्वदूर ख्याती पसरलेल्या या संघटनेचे संस्थापक कोण, यावरून ढसाळ आणि राजा ढाले यांच्यातील वादानंतर पँथर बरखास्त झाली. ढाले यांनी ‘मास मूव्हमेंट’ची चळवळ सुरू केली. मात्र, पुण्यात पँथर तग धरून होती किंबहुना पँथरचा झंझावात कायम होता. त्यामध्ये सरकारी नोकरी सांभाळून प्रारंभीच्या काळात पडद्यामागून सूत्र हलविण्याची भूमिका बजावणारे अॅड. जयदेव गायकवाड हे बिनीचे शिलेदार होते. त्या काळातील आठवणींचा आणि पँथरच्या धडाडीच्या कामाचा धांडोळा या पुस्तकाच्या माध्यमातून अॅड. गायकवाड यांनी घेतला आहे.
मुंबईत १९७२ मध्ये आंबेडकरी चळवळीतील जहाल तरुणांची ‘दलित पँथर’ स्थापन झाल्यानंतर विशेषत: आंबेडकरी वसाहती आणि झोपडपट्ट्यांमधून दलित पँथरची चळवळ फोफावली. नामदेव ढसाळ, राजा ढाले, भाई संगारे, अविनाश महातेकर यांच्याभोवती आंबेडकरी तरुणांची गर्दी करीत होते. अल्पावधीतच पँथरचे संघटन उभे राहिले होते. दलित साहित्यिक बाबुराव बागूल, दया पवार, अर्जुन डांगळे, प्रल्हाद चेंदवणकर आदी पँथरच्या चळवळीमागे होते. राजा ढाले यांनी ‘स्वातंत्र्यानंतरच्या २५ वर्षांत भारतीय स्वातंत्र्याने दलितांना काय दिले?’ या लेखानंतर उठलेले वैचारिक वादळ, वरळीतील दंगल या घटनांनी पँथरला झळाळी लाभली. मात्र, नामदेव ढसाळ यांनी पँथरचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर ढाले आणि ढसाळ यांच्यात वैचारिक मतभेद झाले. ढाले यांनी जाहीरनाम्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ढसाळ यांनी ‘इतिहासाची चक्रे उलटी फिरवू नका!’ अशी पुस्तिका लिहून ढाले यांच्या भूमिकेचा प्रतिवाद केला. दोघांमध्ये कलगीतुरा सुरू झाला आणि दलित पँथरमध्ये फूट पडली. या दोन नेत्यांची समजूत घालण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. नागपूर येथे २३ आणि २४ ऑक्टोबर १९७४ रोजी पँथरचे अधिवेशन घेण्यात आले. त्यामध्ये नामदेव ढसाळ यांना पक्षातून काढून टाकले. ७ मार्च १९७७ रोजी राजा ढाले यांनी त्याच्या नेतृत्वाखालील पँथर बरखास्त केली आणि यापुढे ‘मास मूव्हमेंट’ची चळवळ करण्याचे जाहीर केले.
ढसाळ यांना काढून टाकल्याच्या ठरावाचा निषेध करण्यासाठी पुणे पँथरची सभा झाली आणि तेथून पुणे पँथरच्या पुढील काही वर्षांचा धगधगत्या इतिहासाचा धांडोळा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील आसखेड या गावातील महार वतनाची जमीन लाटण्याचे प्रकरण, भूगाव येथील दलित तरुणीवरील बलात्काराची घटना, महार वतनाच्या जमिनी परत मिळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेली भूमिहीन शेतमजूर परिषद आणि त्यातून या लढ्याला आलेले यश, पुणे शहरातील झोपडपट्ट्यांचे प्रश्न हाती घेऊन केलेली आंदोलने, १९७७ मध्ये पुण्यात गरवारे महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेले अखिल भारतीय साहित्य संमेलन उधळणे या प्रकरणांतून ढसाळ यांच्या नेतृत्वाखाली अॅड. जयदेव गायकवाड आणि त्यांच्या तत्कालीन पँथरच्या सवंगड्यांनी पुण्यात पँथरची डरकाळी कायम कशी ठेवली, याचे सविस्तर विवेचन या पुस्तकातून येते. त्यातून तत्कालीन सामाजिक प्रश्नांची आणि त्यासाठी आवाज उठविणाऱ्या पुणे पँथरचा इतिहास उभा राहतो.
पँथर वाढत असतानाच मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा उभा राहिला आणि त्यामध्ये पँथरने कशी भूमिका बजावली, याचा धावता आलेख या पुस्तकातून घेण्यात आला आहे. मुंबईत विधान भवनावर पँथरचा मोर्चा आणि विधिमंडळाच्या सभागृहात पँथरच्या कार्यकर्त्यांनी मारलेल्या उड्या, वंशभेदाविरुद्ध बायकॉट-कूकविरुद्ध निषेध करण्यासाठी पुण्यातील नेहरू स्टेडिअममधील दक्षिण आफ्रिका-भारत सामन्यावेळी मैदानात जाऊन केलेले आंदोलन आणि त्यासाठी गुप्तपणे केलेले नियोजन, आंदोलनांना येणारे यश, होणारा त्रास याचा लेखाजोखा या पुस्तकातून अॅड. जयदेव गायकवाड मांडतात. सरकारी कर्मचारी असतानाही नोकरीची तमा न बाळगता आंदोलनात सहभागी होताना झालेला मानसिक त्रासही प्रामाणिकपणे वर्णन करतात.
या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात कुटुंबातील एक सदस्य म्हणून नामदेव ढसाळ कसे होते, हे सांगतानाच ढसाळ यांच्याविषयीच्या स्मृतींना गायकवाड यांनी उजाळा दिला आहे. सख्खा मावसभाऊ आणि जहाल नेता या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचे पैलू दाखविताना गायकवाड यांना भाऊ म्हणून ते अधिक जवळचे वाटत राहतात.
पुणे पँथरची स्थापना ही २७ नोव्हेंबर १९७२ मध्ये पुण्यातील कॅम्प भागातील भीमपुरा येथे झाली. पुणे ही पँथरची रणभूमी होती. त्या काळात साथ देणारे विजय जाधव, एल. डी. भोसले, अनिल कांबळे, सदा भोसले, मधुकर पानसरे, पोपट आल्हाट, बाळ आल्हाट, ठ. रा. पाडळे, राज साळवे, चंद्रकांत रणदिवे, चंद्रकांत चव्हाण, पांडुरंग जगताप, बजरंग धिवार, नवनाथ कांबळे यांसारख्या पँथरची माहिती देऊन गायकवाड यांनी साथीदारांच्या कार्याची आठवण कायम ठेवली आहे.
दलित पँथरच्या ५० वर्षांच्या वाटचालीनिमित्ताने गायकवाड यांनी काही निष्कर्ष या पुस्तकातून नोंदविले आहेत. पँथरच्या वाटचालीतील जमेच्या बाजू आणि उणिवा याचे तटस्थपणे विश्लेषण त्यांनी केले आहे. दलित पँथरची आजही आवश्यकता असल्याची ठाम भूमिका ते मांडतात. मात्र, ही संघटना राजकारणापासून अलिप्त असावी, असे त्यांचे मत आहे. गायकवाड यांनी एका सामाजिक चळवळीचा पुस्तकरूपाने मांडलेला हा लेखाजोखा नव्या दमाच्या कार्यकर्त्यांसाठी एक दस्तऐवज आहे.
‘दलित पँथरचा झंझावात’ – जयदेव गायकवाड, हर्मिस प्रकाशन, पाने- १८३, किंमत- २०० रुपये.