‘लेकुरे उदंड झाली’, ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ आणि ‘नटसम्राट’ ही वसंत कानेटकर आणि तात्यासाहेब शिरवाडकर या दोन नाशिककर लेखकांची नाटकं. किंवा ‘सभ्य गृहस्थ हो’, ‘दुर्गी’, ‘संध्याछाया’, ‘बॅरीस्टर’ ही जयवंत दळवींची, गिरीश कर्नाडांचं ‘हयवदन’, सुरेश खरेंचं ‘मंतरलेली चैत्रवेल’, रत्नाकर मतकरी यांच्या काही गाजलेल्या कलाकृती, गोपालकृष्ण भोबे यांचं ‘धन्य ते गायनी कळा’ अशी अनेक गाजलेली आणि उत्तमोत्तम नाटकं, दामुबाब केंकरे, विजया मेहता, मास्टर दत्ताराम, माधव वाटवे, शांता जोग वगैरे असे एकापेक्षा एक कमालीचे गुणवान रंगकर्मी… अशा सगळ्यांत समान काय, या प्रश्नाची दोन उत्तरे असतील. पहिलं म्हणजे, या सगळ्या कलाकृती ‘द गोवा हिंदु असोसिएशन’ संस्थेच्या आणि दुसरं- यापेक्षा महत्त्वाचा समान घटक म्हणजे- रामकृष्ण नायक.

त्यांचा माझा परिचय झाला तेव्हा ते ‘गोवा हिंदु’चे नक्की कोण होते ते माहीत नव्हतं. पण खूप काही होते हे माहीत होतं. पण त्यानंतर पुढची जवळपास ३०-३५ वर्षे रामकृष्ण नायक मनातल्या मोठेपणाच्या जिन्यात एकेक पायरी वर चढत होते. इतके की, गेल्या वर्षी-२०२४ साली-जेव्हा ते गेले तेव्हा समाजातल्या चांगलेपणाचा, सात्त्विकतेचा, सद्भावनेचा एक मोठा भाग त्यांच्याबरोबर निघून गेला, असं वाटून गेलं.

खरं तर पत्रकारितेच्या व्यवसायात मोठ्या माणसांच्या निधनाच्या बातम्यांबाबत एक प्रकारचा कोडगेपणा येतो. फार कमी माणसांचं जाणं आतनं हलवून टाकतं. रामकृष्ण नायकांचं जाणं तसं होतं. ते गेल्यावर लक्षात आलं… वाटलं होतं त्यापेक्षा अधिकच वाईट वाटतंय ते! वयाच्या अंतराची वजाबाकी करून काही माणसं जवळची झाली त्यातले ते एक. ना काही नातं होतं त्यांच्याशी, ना मी कोणी रंगकर्मी वगैरे होतो. पण हेच रामकृष्ण नायकांचं वैशिष्ट्य. एकाच वेळी अनेकांना बांधून ठेवणारी माया लावू शकणाऱ्या स्नेहाळतेचा अखंड झरा त्यांच्या मनात कायम जिवंत होता. बाकीबाबांची कविता म्हणते त्याप्रमाणे ‘‘मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो…’’ असं होऊ शकतं याचा असा खराखुरा जिवंत पुरावा म्हणजे रामकृष्ण नायक.

परिचय अर्थातच गोव्यात गोविंदराव तळवलकरांच्या गोतावळ्यामुळे. त्यांच्या त्या वर्तुळात फक्त दोन जण असे होते ज्यांचा मायेचा अधिकार गोविंदरावांना मान्य होता. एक वसंतराव जोशी आणि दुसरे रामकृष्ण नायक. वसंतरावांचा हा अधिकार गोविंदरावांची यथेच्छ फिरकी घेण्यातनं दिसायचा. तर रामकृष्ण नायकांचं हे वजन त्यांच्या प्रेमादरातनं व्यक्त व्हायचं. गोविंदरावांवरच्या एका ‘स्नेहचित्रा’त (‘व्यक्त-अव्यक्त’, ३ ऑगस्ट) नायकांनी एका बैठकीत गोविंदरावांच्या गालाचा कसा मुका घेतला… त्याची कथा लिहिली. आता हे दोघेही नाहीत. पण ते दोघेही हयात असताना ‘ललित’च्या दिवाळी अंकातही (वर्ष (बहुधा) १९९९) एका लेखाच्या निमित्तानं हा किस्सा लिहिलेला. आणि त्या दोघांकडनंही त्यावर प्रतिक्रिया आलेली. त्या ९२-९३ सालच्या बैठकीपासनं तर रामकृष्ण नायक अधिकच जवळचे झाले. असंख्य वेळा भेटी झाल्या. त्यातल्या एका भेटीत तर समोर साक्षात तात्यासाहेब शिरवाडकर. यातल्या प्रत्येक भेटीत रामकृष्ण नायक आदल्या भेटीपेक्षा अधिक मोठे आहेत, हे जाणवत जायचं. साहजिकच त्यांच्याविषयीचं प्रेम, आदर तोही त्या प्रमाणात वाढत जायचा.

रामकृष्णबाब गोव्याचे. अखंड आरस्पानी गोंयकार. त्यांचे वडील केशव नायक. त्यांचा परिचय ‘गोव्याचे महर्षी धोंडो केशव कर्वे’ असा करून दिला जायचा, यातच काय ते आलं. वडिलांचं आणि नंतर रामकृष्ण यांचंही आयुष्य लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यात गेलं. गोव्यातली पहिली कन्याशाळा केशव नायक यांनी स्वत:च्या पैशातनं काढली. ‘व्ह.फा.’च्या परीक्षेची (व्हर्नाक्युलर फायनल, म्हणजे आताची साधारण सातवी यत्ता) त्या वेळी गोव्यात नव्हती. तर केशव नायक वडीलकीच्या नजरेनं आणि धाकातनं या मुलींना कारवारला त्यासाठी घेऊन जायचे. एकदा घरी रामकृष्ण नायक आले होते तेव्हाच्या गप्पांत त्याचा हा वारसा कळल्यावर त्यांना म्हटलं, ‘‘लिहायला पाहिजे हे सगळं… मी लिहितो.’’ तर म्हणाले, ‘‘मुळीच नाही.’’ (रामकृष्ण नायकांच्या मराठीत ‘मुळीच’, ‘पुष्कळ’,‘तुम्म्हाला’ असे शब्द मुबलक.) असं म्हणून त्यांनी एक किस्सा सांगितला.

केशव नायकांवर एकदा ‘किर्लोस्कर’च्या ‘स्त्री’ मासिकात लेख प्रकाशित होणार होता. त्याचा सुगावा त्यांना लागला. गोव्यातले लक्ष्मणराव सरदेसाई (मलबारांवरच्या लेखात (३१ ऑगस्ट) त्यांचा उल्लेख आहे.) तो लिहिणार होते. तर केशव नायकांनी जंग जंग पछाडलं आणि तो लेख छापून येणार नाही याची व्यवस्था केली.

अस्सल सुवर्णमयी कलाविश्वात राहूनही रामकृष्ण नायकांचं कुठे काही छापून आलं नाही… याचं कारण हे आहे. कल्पनाही येणार नाही इतकी कमालीची सकस, गुणवान नाटकं त्यांच्या काळात आली… मराठी रंगभूमीच्या ऐश्वर्यसंपन्न काळाचे ते एक उद्गाते… पण कधीही पडद्यासमोर आले नाहीत. आपल्या नाटककारांविषयी बोलताना रामकृष्ण नायकांतली सहृदयता ओसंडून व्हायची. दळवी, कानेटकर, मतकरी… अनेक. रामकृष्ण नायक सगळ्या श्रेयाचं माप त्यांच्या पदरात सहज घालायचे. असं करताना ओटीतले चार दाणे प्रसादासारखे स्वत:साठी ठेवण्याची प्रथा आहे. रामकृष्ण नायक तेवढंही कधी स्वत:साठी राखायचे नाहीत. ‘‘किती मोठ्ठे लेखक हो हे…’’ ते म्हणायचे. आणि या सगळ्यांच्या पार वर म्हणजे शिरवाडकर. ‘‘माझे ते मानसपिता…’’ रामकृष्ण नि:संकोचपणे म्हणायचे.

खर तर मी जेव्हा पहिल्यांदा रामकृष्ण नायकांना भेटलो तेव्हा तो ‘गोवा हिंदु’चा कुख्यात बस अपघात होऊन १०-१२ वर्षे तरी होऊन गेली होती. पण त्याचा विषय निघाला तर रामकृष्ण नायकांच्या डोळ्यातनं पाणी. शांता जोग, जयराम हर्डिकर वगैरे मंडळी आपल्या संस्थेच्या बसला झालेल्या अपघातात गेली… या दु:खाची रामकृष्ण नायकांना झालेली जखम अजूनही ओलीच होती. नंतर एका अशाच बैठकीत वसंतरावांकडून कळलं. या अपघातामुळे विदग्ध झालेले रामकृष्ण नायक त्या वेळी तडक नाशकात गेले आणि तात्यासाहेबांच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडले. आपल्यामुळे हा अपघात झाला, आपण या कलाकारांच्या जाण्यास जबाबदार आहोत, ही भावना त्यांच्या मनातून जाता जात नव्हती. कुसुमाग्रजांच्या शब्दांनी, त्यांच्या मायेच्या फुंकरीनं रामकृष्णांचं दु:ख कमी झालं असावं. पण तिच्या आठवणीनं त्यांच्या मनातल्या भरलेल्या जखमेवर एक लाल रेघ बराच काळ उमटत होती. मी ती पाहिलेली.

श्रीराम लागू अभिनेत्यांना (चांगल्या अर्थानं अर्थातच) ‘लमाण’ म्हणतात. लेखकाचा ऐवज उत्तमपणे ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा फक्त हा त्याचा अर्थ. रामकृष्ण नायक अभिनेते नव्हते. पण या लेखक, कलाकारांना सांभाळणं, त्यांचं कोडकौतुक करणं ही आपली जबाबदारी आहे, असं का कोणास ठाऊक पण त्यांना सारखं वाटायचं. ते लागू म्हणत त्या अर्थानं स्वत:ला ‘लमाण’ मानायचे या सगळ्यांचे. ‘इदं न मम’चा इतका निगर्वी आविष्कार शोधूनही सापडणार नाही. वास्तविक ते स्वातंत्र्यसैनिक होते.

गोवा मुक्ती लढ्यात पीटर अल्वारिस यांच्यासारख्याच्या खांद्याला खांदा लावून ते लढले. पण स्वातंत्र्यसैनिक म्हणून एक कपर्दिकही घेतली नाही त्यांनी सरकारकडून. एकदा मी गोव्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांची संख्या दिवसागणिक कमी होण्याऐवजी वाढतीच कशी आहे, अशी बातमी दिली. नंतर भेटल्यावर रामकृष्ण नायक म्हणाले: ‘‘असते हो गरज कोणाकोणाला!’’ म्हणजे त्या बाबतीतही कधी स्वत:कडे मोठेपणा घ्यायचा प्रयत्नही त्यांचा नव्हता कधी. लोकांना त्याग मिरवायला इतका आवडतो…! रामकृष्ण नायकांनी तोही कधी मिरवला नाही. कोणा कलाकाराच्या नको त्या उद्याोगाची कधी वदंता आली आणि रामकृष्ण नायकांना त्याबाबत छेडलं तर त्याचा/ तिचा अभिनय किती सकस आहे वगैरे म्हणत विषय बदलायचे. तीच प्रतिक्रिया. व्यवसायाने ते ‘सीए’ होते. पण संख्येपेक्षा शब्दांतच रमले ते आयुष्यभर.

अशीच आणखीही एक आठवण आहे. ती सांगतानाही त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. दळवींच्या ‘स्पर्श’च्या निमित्तानं ते त्यांच्याबरोबर शिवाजीराव पटवर्धनांच्या कुष्ठरोग्यांसाठीच्या केंद्रात जाऊन राहिले. पण तीन दिवसांनंतर त्यांना ते झेपेना… कुष्ठरोग्यांशी शेकहँड्स, त्यांच्या हातचं जेवण वगैरे. पण ही अशी भावना आपल्या मनात आली याचीच रामकृष्ण नायकांना खंत. कमीपणा वाटला त्यांना स्वत:चाच. ढसढसा रडले ते त्या वेळी. पण या भावनेवरही त्यांनी मात केली आणि तिथला मुक्काम हलवला नाही. कौतुक वाटतं ते स्वत:मधला कमीपणा, स्वत:चं वैगुण्य हे असं प्रामाणिकपणे मांडण्याच्या त्यांच्या धैर्याचं. ‘‘आनंदवनात जाऊन राहायचं होतं मला… आयुष्याच्या उत्तरार्धात. पण कळलं ते जमणारं नाही आपल्याला…’’ असं जाहीर सांगण्याइतके प्रामाणिक होते ते. इतरांबाबत ठीक. पण स्वत:बाबत असं प्रामाणिक असणं तसं अवघडच. रामकृष्ण नायक ते ओझं सहज वागवत.

आपण इतरांचं देणं लागतो… ही पराकोटीची भावना त्यांच्या ठायी कायम असायची. कितीही त्यांना म्हटलं की असं काही नसतं… लिहीत असतो तेवढ्यापुरताच तो लेखक, एरवी तो आपल्यासारखाच वगैरे… तर ते त्यांना अजिबात पटायचं नाही. माणसं चांगलीच असतात यावर त्यांचा कमालीचा विश्वास. लेखकांचं, कलाकाराचं कौतुक ते इतकं मनापासनं करायचे की, माझ्यासारख्या पत्रकारितेत निबर होत चाललेल्यालाही त्यांच्यातली ती निरागसता अचंबित करायची. वाटायचं काही काही जागा, माणसं… यांच्यासमोर आपल्यालाही असं निरागस होता आलं पाहिजे. अलीकडे एकदा मडगावात माझं व्याख्यान होतं. जाताना सकाळच्या रेल्वेनं गेलो. बायकोही असणार होती बरोबर. तर रामकृष्ण नायक स्टेशनवर घ्यायला. मी त्यांच्यावर रागावणार याची त्यांना खात्री होती. डब्यातनं उतरल्या उतरल्या त्यांचं पहिलं वाक्य : ‘‘तुम्म्हाला घ्यायला आलेलो नाही. सूनबाईसाठी आलोय.’’

तात्यासाहेबांचा शब्द हा त्यांच्यासाठी अंतिम आदेश असायचा. एकदा मला घरनं बायकोचा फोन आला. रामकृष्ण नायक शोधतायत… त्यांच्याकडे तुझा ऑफिसचा नंबर नाही. त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन कर. (मोबाइलोदयाच्या कित्येक वर्षे आधीची ही गोष्ट) मी केला. नायकांनीच घेतला. ‘‘तुम्म्ही कुठे आहात?’’. मी ऑफिसमध्ये होतो. ते सांगितल्यावर त्यांनी वेगळाच प्रश्न विचारला. ‘‘गाडी आणलीये का की मोटारसायकलनेच आलाय?’’ त्या दिवशी मी गाडी घेऊन आलो होतो पणजीत. नायकांनी विचारलं… ‘‘जरा याल….अडचण आहे.’’ मी गेलो. मीरामार-दोनापावलाच्या रस्त्यावर कांपालच्या पलीकडे एका बंगल्यात ते होते. आत गेलो तर उडालोच. समोर तात्यासाहेब बसलेले. मी बघत राहिलो. रामकृष्ण नायक आतून आले म्हणाले… ‘‘वसंतराव येणार होते… त्यांना उशीर होणार आहे. तात्यासाहेबांना मीरामारला जायचंय… अडचण आहे… कोणाला सांगायचं प्रश्न पडला.’’ (वसंतरावांकडे गाड्यांचा ताफा होता. प्रभाकर आंगले आणि सीताकांत लाड चांगलेच वयस्कर. स्वत: ड्राइव्ह करणं बंद झालेलं. आणि बंगल्यात दोघेच. रामकृष्ण नायक आणि तात्यासाहेब.) मी जरा लाजलोच.

कारण त्या वेळी माझ्याकडे ‘मारुती ओम्नी’ होती. एसी वगैरे काही तिला असायचा प्रश्नच नव्हता. तेव्हा एसी गाड्या तशा कमीच. मी माझी ‘अडचण’ सांगितली. रामकृष्ण नायकांनी तात्यासाहेबांकडे पाहिलं. ते एव्हाना आरामखुर्चीतनं उठलेले… खांद्यावर शाल घेतलेली. ‘चला’. खरं सांगायचं तर मला दडपण आलं… आपल्या गाडीतून साक्षात कुसुमाग्रजांना घेऊन जायचं म्हणजे फारच. अंतर एकदोन किलोमीटरही नसेल. पाण्यानं गच्च भरलेलं काचेचं भांडं आपण ज्या अलगदपणे, अगदी सावधपणे नेऊ तशी काळजी घेत मी तेव्हा गाडी चालवली. मीरामारला पोचलो. ते दोघे उतरले. मी गाडी लावून त्यांच्याकडे गेलो. दोघेही नि:शब्द.

एके ठिकाणी तात्यासाहेब म्हणाले… ‘‘मी बसतो.’’ मग त्यांना तिथे सोडून आम्ही दोघेच फिरून आलो. अर्ध्या तासभरानं परत. सुरुवातीला तसंच मौन. मग तात्यासाहेब संध्याकाळी दाटणाऱ्या भावना… यावर काही बोलत राहिले. आम्ही परतलो तर वसंतराव आलेले. वसंतरावांकडून मग नेहमीच थट्टामस्करी. तात्यासाहेबांचं फक्त हसणं. निघताना मी रामकृष्ण नायकांना विचारलं, ‘‘‘किती दिवस आहेत?’’ मला माझ्याकडच्या त्यांच्या कवितासंग्रहांवर स्वाक्षरी घ्यायची होती त्यांची. नायकांनी सांगून दिलेल्या वेळेवर दुसऱ्या दिवशी पुन्हा आलो. ‘विशाखा’, ‘मुक्तायन’… सगळे संग्रह घेऊन गेलो. तात्यासाहेबांनी स्वाक्षरी केली. लिहिलं… आशीर्वाद. माझी अवस्था ‘आंधळा मागतो एक डोळा…’ अशी.

तात्यासाहेबांना ‘स्नेहमंदिर’ पाहायचं होतं. त्यासाठी ते आले होते. स्नेहमंदिर ही तात्यासाहेबांनी रामकृष्ण नायक यांच्या मनात रुतवलेली स्वप्नकथा. ती प्रत्यक्षात येत होती. फोंड्याजवळ जे काही आकाराला येत होतं त्याला वृद्धाश्रम म्हणणं हा अपमान. तात्यासाहेब, पुलं अशा अनेकांचा क्रियाशील स्नेह या स्नेहमंदिराला लाभला. यांच्यापैकी कोणीही गोव्यात आलं की एक फेरी व्हायचीच तिकडे. या स्नेहमंदिराची उभारणी हा आता रामकृष्ण नायकांचा ध्यास बनला. त्यांच्याबरोबर इतक्या वेळा मीदेखील तिकडे गेलो. रामकृष्ण नायक तितक्याच उत्साहानं सगळं सांगायचे. वेळोवेळी ‘स्नेहमंदिर’च्या बातम्या दिल्या. लेख लिहिले. ते वाचून रामकृष्ण नायक खूश व्हायचे. आनंद वाटायचा. एकदाच फक्त त्या आनंदानं दगा दिला.

रामकृष्ण नायक स्वत:च खुद्द तिथे ‘दाखल’ झाले तेव्हा. वय खूप झालेलं. मागे एकदा त्यांच्या घरी गेलो होतो. ते रिकामं, भकास, जुनं आणि जुनाट घर अंगावर आलं. कोळीष्टकं जिकडे तिकडे. ते पाहून गलबलून आलेलं. नंतर नंतर रामकृष्ण नायकांचंही सुटलं असणार ते घर. एकटेच होते ते आयुष्यभर. शेवटी तेच स्नेहमंदिरात दाखल झाले. ‘गोवा हिंदु’ही मागे पडलं. ते मागे पडणं तितकं काही सुखद नव्हतं.

पण रामकृष्ण नायकांचं मन तिथनं उडालेलं. त्याला कारणही होतं तसं. असो. तर ‘स्नेहमंदिरात’ भेटले तेव्हा जाणवलं तिथल्या इतर असहाय्य, अनाथ वृद्धांत रामकृष्ण नायकही आपलं सगळं अस्तित्व विसरून विरघळून गेलेले. जणू ते जगले ते जग कुठलं वेगळंच होतं. त्या जगातले लेखक, कवी, कलाकार… या जगात नव्हते. रामकृष्ण नायकांच्या या जगात त्यांना भेटायला गेलो. वाकून नमस्कार करून उभं राहतो तर रामकृष्ण नायकांनी आपले थरथरते हात माझ्या, बायकोच्या चेहऱ्यावरनं फिरवले. बायकोनं हुंदका लपवण्याचा चुकार प्रयत्नही केला नाही. माझा अयशस्वी ठरला.
काही महिन्यांनी त्याच ‘स्नेहमंदिरा’त रामकृष्ण नायक गेले.

मंदिर उभारणारा त्याच मंदिरात विलीन झाल्याची उदाहरणं फार नाही पाहायला मिळत.

girish.kuber@expressindia.com | @girishkuber