सागर नाईक
‘रणजी ट्रॉफी’चं नामकरण ज्यांच्या नावे झालं आहे अशा स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानिक रणजीतसिंहजी या क्रिकेटपटूचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मवर्ष कालच (१० सप्टेंबर रोजी) सुरू झालं. त्यानिमित्त त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीचा आणि त्यांना सामोऱ्या जाव्या लागलेल्या आव्हानांचा परामर्श..
‘‘भारतीय जंगलांमधल्या एखाद्या वेलीसारखं लवचीक आणि मजबूत मनगट, उसळी मारणाऱ्या चेंडूचं प्रत्येक वळण आणि फिरकी हेरणारे गडद डोळे अशा रूपातील रणजीतसिंहजी यांनी क्रिकेटचा खेळ आत्मसात करून त्याचं रूपांतर पूर्वेकडील कृतिशीलतेच्या कवितेमध्ये केलं आहे..’’ प्रसिद्ध इंग्रजी कवी आणि पत्रकार एडविन अरनॉल्ड यांनी हे उद्गार रणजीतसिंहजी (१० सप्टेंबर १८७२ – २ एप्रिल १९३३) यांच्या क्रिकेट खेळण्याला उद्देशून काढले होते. नवानगर संस्थानाचे जामसाहेब कुमार रणजीतसिंहजी यांच्या खेळामुळे इंग्रजी पत्रकार, कवी, चित्रकार आणि एकूणच इंग्रजी सार्वजनिक अवकाशाला पहिल्यांदाच एका भारतीयाची दखल घ्यावी लागली. प्रथमच एखाद्या भारतीयाने ब्रिटिश साम्राज्याच्या कल्पनाशक्तीला गवसणी घातली होती. क्रिकेटपटू म्हणून रणजीतसिंहजींच्या खेळाचा गौरव ब्रिटनने केला खरा, परंतु क्रिकेट या अस्सल इंग्रजी खेळात एका भारतीयाने- म्हणजे गौरेतर वर्णाच्या माणसाने नैपुण्य मिळवले म्हणून त्यात एक वांशिक अस्वस्थतासुद्धा होतीच. म्हणूनच रणजीतसिंहजी यांच्या खेळाकडे नेहमीच वांशिक चौकटीतून पाहिले गेले. रणजीतसिंहजी, क्रिकेट, ब्रिटिश साम्राज्य आणि वंशवाद या सर्वाचे आंतरसंबंध बघितले तर आपल्याला ब्रिटिश साम्राज्याचं ‘युगमानस’ लक्षात येतं.

क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. त्यामुळे क्रिकेट हा खास इंग्रजी खेळ मानला जायचा. क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी सचोटी, एकाग्रता, धैर्य, स्वत:वरचे नियंत्रण आणि चपळाई यांसारखे गुण हे गौरवर्णीयांची अंगभूत वैशिष्टय़े आहेत, आणि इतर वंशांच्या लोकांमध्ये असे अंगभूत गुण नसल्याने ते क्रिकेट खेळण्यास अपात्र ठरतात अशी धारणा क्रिकेटच्या बाबतीत ब्रिटिशांच्या मनात घट्टपणे रुजली होती. ब्रिटिशांच्या लेखी तथाकथित वांशिक शुद्धतेचे व श्रेष्ठतेचे प्रतीक आणि व्हिक्टोरियन मूल्यांचा आविष्कार म्हणून क्रिकेटला इंग्रजी संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. अशा काळात १८९३ च्या दरम्यान क्रिकेटच्या क्षितिजावर रणजीतसिंहजींचा उदय झाला आणि त्यांच्या अभूतपूर्व खेळाने एकूणच इंग्रजी जनमानस ढवळून काढले.
रणजीतसिंहजींचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये झाले. तिथे कावसजी देसाई नावाच्या प्रशिक्षकांनी रणजीतसिंहजींना क्रिकेटचे प्राथमिक धडे दिले. पुढील शिक्षणासाठी त्यांची रवानगी इंग्लंडला करण्यात आली. तिथे त्यांनी क्रिकेटमध्ये विशेष चमक दाखवली. त्यामुळे त्यांचा केम्ब्रिजच्या डोमेस्टिक क्रिकेट संघासाठी विचार होणे जवळपास अपरिहार्यच होते. परंतु कर्णधार एफ. एस. जॅक्सन (जे नंतर बंगालचे गव्हर्नर झाले.) यांनी रणजीतसिंहजींना संघात घ्यायला नकार दिला. पूर्वेकडील लोकांच्या क्रिकेट खेळण्याबद्दल जॅक्सन यांना खात्री वाटत नव्हती. परंतु केम्ब्रिज जर्नलमध्ये रणजीतसिंहजींच्या खेळातील कौशल्याविषयी संपादकीय लेख छापून येण्याइतपत त्यांची लोकप्रियता तेव्हा वाढलेली होती. शेवटी, रणजीतसिंहजींना वगळणे घोडचूक होती, अशी कबुली जॅक्सन यांना द्यावी लागली. ऑस्ट्रेलियाशी होणाऱ्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघात रणजीतसिंहजींचा समावेश व्हावा की नाही यावरही अनेक वाद झाले. तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लॉर्ड हॅरीस यांनी रणजीतसिंहजींच्या निवडीवर तीव्र आक्षेप घेतला होता. हॅरीस हे ‘सामाजिक डार्विनवादा’चा विचार मानणारे होते. (‘जगायला लायक असेल तो जगेल’ हे उत्क्रांतीचं तत्त्व सामाजिक घडामोडींना लावणारी ही विचारसरणी होती. वंशाने श्रेष्ठ असणारे लोक समाजात यशस्वी होतात व फक्त त्यांच्या अंगभूत गुणांमुळेच यश मिळवत असतात असा आता चुकीचा सिद्ध झालेला गर्भितार्थ त्यात होता.) स्वाभाविकपणेच त्यांच्या मते, श्रेष्ठ वंश वगळता इतर लोक क्रिकेट खेळण्यास अपात्र होते. असं असलं तरी रणजीतसिंहजींची लोकप्रियता शिखरावर होती आणि ब्रिटिश चाहत्यांच्या रेटय़ामुळे शेवटी त्यांची संघात निवड झाली. परंतु त्यासंदर्भात वादविवादाच्या अनेक फैरी झडल्या. ऑस्ट्रेलियन संघाला आपल्यासमवेत खेळायला अडचण नसेल तरच आपण खेळू असं रणजीतसिंहजींचं याबाबतीत म्हणणं होतं. ऑस्ट्रेलियन संघाने त्यांच्या निवडीला होकार दिल्यामुळे त्यांचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झाले.

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
gaganyan astronauts
गगनयान मोहिमेसाठी इस्रोने निवड केलेले चार अंतराळवीर कोण आहेत? ही निवड नेमकी कशी करण्यात आली?

इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना पदार्पणाच्या सामन्यातच त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५४ धावांची ऐतिहासिक कामगिरी केली. नंतर त्यांनी डोमेस्टिक आणि कौन्टी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले. ससेक्स संघासाठी खेळताना यॉर्कशायरविरुद्ध एकाच दिवसात दोन शतकं झळकावण्याचा आगळावेगळा विक्रमसुद्धा त्यांच्या नावावर नोंदवला गेला. प्रत्येक वर्षी त्या मोसमातल्या सर्वाधिक धावा रणजीतसिंहजी यांच्याच असायच्या. असे अनेक विक्रम त्यांनी केले. चाहत्यांनी त्यांना ‘स्मिथ’, ‘ब्लॅक प्रिन्स’, ‘रॅमस्गेट जिमी’, ‘रम, जिन अॅण्ड व्हिस्की’, ‘रणजी’ अशी अनेक नावं लाडाने दिली. त्यापैकी ‘रणजी’ हे नाव अधिक लोकप्रिय झालं. आधुनिक क्रिकेटचे जनक मानले जाणारे डॉ. डब्ल्यू. जी. ग्रेस यांच्यासोबत त्यांची तुलना होऊ लागली. इंग्लंडमध्ये रणजी आता एक अभूतपूर्व क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाऊ लागले होते. त्यांनी ‘लेग ग्लान्स’ या अतिशय अभिनव शॉटचा आविष्कार केला. त्यांचं ‘रिस्टवर्क’ (मनगटाचा कुशल वापर) आणि ‘लेट कट’ शॉट खेळण्याचं कसब या गोष्टी बॅटिंगच्या तंत्रामध्ये विशेष योगदान देणाऱ्या ठरल्या. ‘विस्डेन’ने १८९६ च्या सर्वोत्कृष्ट पाच खेळाडूंमध्ये रणजींचा समावेश केला. परंतु हे करताना त्यांच्या योगदानाला मान्यता न देता ‘रणजी हे ‘युनिक’ खेळाडू आहेत; मात्र इंग्लंडमध्ये ते अनुकरणीय नाहीत,’ अशा शब्दांत त्यांची संभावना केली गेली. रणजींनी ‘खेळाच्या तंत्राबाबतीत जे आविष्कार केले ते आमच्यासाठी रहस्य ठरले आहे. रणजींचे क्रिकेट म्हणजे ‘काळी जादू’ आहे. ते हातचलाखी करणारे, जादूटोणा करणारे, जादूगार आहेत अशी अनेक विशेषणे त्यांच्या बॅटिंगसाठी वापरली गेली. गौरेतर खेळाडू म्हणून त्यांच्या एकूणच खेळाला ‘वेगळे’ मानले गेले.

‘रणजींची बॅटिंग ‘ट्रिकी’ आणि ‘रिस्टी’ (मनगटांवर अधिक भर असलेली) आहे. ती विशेषत: पूर्वेकडील आहे. पाश्चिमात्य इंग्रजी बॅटिंग ही त्याउलट मस्क्युलर- म्हणजे स्नायूंच्या वापरावर भर देणारी आहे (क्रिकेट हा खेळ पुरुषत्वासोबत अभिन्नपणे जोडलेला होता.),’ असं त्यांच्या बॅटिंगचं वर्णन केलं जात असे. टेड वेनराईट या यॉर्कशायर संघाच्या बॉलरने एकदा म्हटले होते की, ‘रणजी आपल्या आयुष्यात कधीही ‘ख्रिश्चन स्ट्रोक’ खेळले नाहीत.’ प्रसिद्ध इंग्रजी लेखक नेव्हिल कार्ड्स यांनी वेनराईटच्या विधानाशी सहमती दर्शवत त्यांच्या लिखाणाला अधोरेखित केलं होतं. अशा प्रकारे वारंवार रणजींचे वेगळेपण ‘पौर्वात्य आणि पाश्चिमात्य’ अशा द्वैतात अधोरेखित केले गेले. त्यांचं पूर्वेकडील असणं, गौरवर्णेतर असणं अशा गोष्टींना जास्त महत्त्व दिलं गेलं. लेस्ली वार्ड (जे ‘स्पाय’ म्हणून ओळखले जायचे.) हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार नेहमीच त्यांच्या चित्रं आणि कार्टून्समधून रणजींचे काळे असणे अधोरेखित करायचे, हे याचंच निदर्शक आहे.

ससेक्सचे सी. बी. फ्राय आणि रणजी या जोडीने अनेक ऐतिहासिक खेळी केल्या. त्यांच्या भागीदारीबद्दल लिहिताना नेव्हिल कार्ड्स म्हणतात, ‘‘फ्राय हा एकोणिसाव्या शतकातला बुद्धिप्रामाण्यवाद मानणारा आणि नैतिक भव्यतेचे प्रदर्शन करणाऱ्या तत्त्वांनुसार संयम व त्याग यांचे पालन करीत बॅटिंग करत होता. दुसऱ्या बाजूला रणजी मात्र जादूटोणा करणाऱ्याच्या काठीप्रमाणे बॅट फिरवत होता. फ्राय पाश्चात्त्य होता, तर रणजी पौर्वात्य होता. फ्राय आणि रणजीतसिंह यांचा खेळ विलक्षण भिन्न शैली आणि वांशिक प्रतिनिधित्वांचे अपूर्व दर्शन घडवणारा होता.’’

तर.. बॅटिंगच्या कौशल्यात फ्रायपेक्षा सरस असणाऱ्या रणजींचे वर्णन ‘जादूटोणा करणारा’ असे केले गेले. आणि फ्राय हे सर्व प्रकारच्या गौरवर्णीय मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात असे म्हटले गेले. मानवी क्षमता वंशावर आधारित असतात अशी धारणा ब्रिटिशांच्या वैश्विक दृष्टिकोनात प्रभावी होती असं यावरून दिसतं. तत्कालीन मानववंशशास्त्रात ‘फ्रेनोलॉजी’ (म्हणजे डोक्याच्या कवटीच्या आकारावरून माणसाचा स्वभाव आणि क्षमता ठरवण्याचे शास्त्र) हा वांशिक छद्मविज्ञानाचा प्रकार होता. अशा एका फ्रेनोलॉजिस्टने रणजी यांची भेट घेऊन त्यांच्या कवटीचे मोजमाप करण्याचा प्रयत्नही केला होता.
रणजींनी प्रत्यक्ष खेळपट्टीवर अनेक विक्रम केले. त्यासोबतच ‘द ज्युबली बुक ऑफ क्रिकेट’ हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तकही लिहिलं. क्रिकेटचा इतिहास, इंग्रजी संस्कृतीशी असलेले या खेळाचे नाते आणि क्रिकेट प्रशिक्षणासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे. क्रिकेटमधील अनेक बारीकसारीक गोष्टी यात नोंदविलेल्या आहेत. असं असलं तरीही त्यांनी स्वत: ज्या नवीन गोष्टींचा आविष्कार केला होता त्या त्यांना या पुस्तकात नोंदवता आल्या नाहीत. तशा प्रकारे क्रिकेट खेळण्याचा सल्लाही ते देत नाहीत. नैसर्गिकदृष्टय़ा जमत असेल तरच तसं खेळावं अशी सूचना त्यांनी केली आहे. रणजींच्या बॅटिंगचे वांशिक मूल्यमापन आणि वेगळेपण सातत्याने दाखवले गेल्यामुळे त्यांना त्यांच्या पुस्तकात स्वत:च्या विलक्षण कामगिरीबद्दल, त्यामागील समर्थ तंत्राबद्दल मोकळेपणाने बोलता आलं नसावं.

रणजींच्या निधनानंतर वर्षभराने १९३४ मध्ये त्यांचा यथोचित सन्मान म्हणून ‘रणजी ट्रॉफी’ची सुरुवात करण्यात आली. भारतीय खेळाडूंचा क्रिकेटमधील सहभाग वाढू लागला. पुढे ब्रिटिश वसाहती स्वतंत्र होत गेल्यावर क्रिकेटवरचा इंग्रजी प्रभाव कमी होत गेला आणि क्रिकेट हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा खेळ बनला. त्यावरील वांशिक प्रभाव कमी झाला. आशिया खंडातील अनेक खेळाडूंनी क्रिकेटला भरीव योगदान दिले आणि त्यांचा स्वीकारही होऊ लागला. उदाहरणार्थ, तिलकरत्ने दिलशान यांचा ‘स्कूप शॉट’ हा ‘दिल स्कूप’ म्हणून ओळखला जातो. सचिनचा ‘अपर कट’सारखा शॉट, लसिथ मिलगाचा ‘राउंड आर्म यॉर्कर’, सकलैन मुश्ताकचा ‘दुसरा’ चेंडू अशा गोष्टींनी क्रिकेटला अधिक व्यापक बनवले. क्रिकेटशी जोडलेले वांशिक क्षमतेचे मूल्य आज कालबा झाले असले तरी रणजींच्या एकूणच कारकीर्दीवर हे सावट पसरले होते, हा इतिहास त्यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्ताने लक्षात ठेवायला हवा. क्रिकेटमधील वांशिक क्षमतेच्या भ्रांतमूल्याला पहिला धक्का देत रणजींनी क्रिकेटला नवं योगदान दिलं. ब्रिटिश साम्राज्याचे खास मूल्य मानला गेलेला हा खेळ आता सर्वसामान्यांचा झाला आहे. क्रिकेटच्या या जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासातील पहिला मैलाचा दगड निश्चितपणे रणजींचा होता.
sagaranaik4511@gmail.com