साधनशुचिता = प्रधान मास्तर

प्रधान मास्तर खरं तर प्राध्यापक असतानाही त्यांची ओळख ‘मास्तर’ अशीच लोकशाही समाजवादी चळवळीत राहिली आहे.

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, नीतिवान राजकारणी, ‘साधना’ साप्ताहिकाचे माजी संपादक प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे पुन:स्मरण..

बाबा आढाव

प्रधान मास्तर खरं तर प्राध्यापक असतानाही त्यांची ओळख ‘मास्तर’ अशीच लोकशाही समाजवादी चळवळीत राहिली आहे. ते हाडाचे शिक्षक होते. आपल्याकडे शिक्षकाला त्याकाळी ‘मास्तर’ म्हटलं जायचं. प्रधान मास्तर भाई (भाई वैद्य) आणि मी- आमच्यापेक्षा वयाने मोठे होते. १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी तुरुंगवास भोगला होता. त्यांचा आणि आमचा सहवास राष्ट्र सेवादलामुळे आला. मास्तर सदाशिव पेठेमध्ये राहत असत. त्यांच्या घरापासून सरळ गेल्यावर बॅ. गाडगीळ स्ट्रीटवर अहिताग्नी राजवाडे यांचा वाडा होता. त्याच्या शेजारीच राष्ट्र सेवादलाची कचेरी होती. आमचे दोन पुढारी नानासाहेब गोरे आणि एस. एम. जोशी हे दोघेही सदाशिव पेठेत राहत असत. गंमत अशी की त्याकाळी आमच्या ठरलेल्या जोडय़ा होत्या. नानासाहेब गोरे आणि एस. एम. जोशी ही एक जोडी, प्रधान मास्तर आणि लालजी कुलकर्णी दुसरी, मी आणि भाई वैद्य अशी तिसरी जोडी. एस. एम. जोशी हे संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष होते, तर नानासाहेब गोरे हे प्रजा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष होते. हे दोघेही राष्ट्रीय पक्षांचे अध्यक्ष होते. प्रधान मास्तर राष्ट्र सेवादलाचे बौद्धिक प्रमुख होते. ते मुळात इंग्रजीचे प्राध्यापक. फग्र्युसन महाविद्यालयामध्ये ते शिकवीत असत. नानासाहेब गोरे आणि एसेम जोशी कुठे काही बोलले, काही महत्त्वाची विधाने त्यांनी केली की मास्तर त्याचे विश्लेषण करून आम्हाला सांगत असत. एसेम जोशी राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष होते. ही तरुणांची संघटना होती. नानासाहेब गोरे मराठीतील नामवंत साहित्यिक होते. मात्र, त्यांचा बाज राजकीय पुढाऱ्याचा होता. प्रधानांच्या सुरुवातीच्या काळात मी शाळकरी होतो. प्रधानांचा दोघांशीही संबंध होता. डॉ. देवदत्त दाभोलकर, गोविंदराव तळवलकर, माधवराव गडकरी, गोवर्धन पारीख, प्रा. अ. भि. शहा, प्रा. अ. के. भागवत यांच्याशी त्यांची वैचारिक देवाणघेवाण होत असे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय सदाशिव पेठेत असल्याने मास्तरांचा परिषदेशीही संबंध होता.

स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास आमच्या पिढीला कोणी शिकवला असेल, तर तो प्रधान मास्तरांनी. महात्मा गांधी यांना महाराष्ट्रात मानणाऱ्या व्यक्तींपैकी आचार्य जावडेकर, आचार्य भागवत ही समाजवादी मंडळी होती. अ. के. भागवत यांच्यासमवेत प्रधान मास्तरांनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या कार्यावरील ग्रंथाचे लेखन केले होते. प्रधान कधी कथालेखक झाले नाहीत. ‘साठा उत्तरांची कहाणी’मधून त्यांनी जीवनाचा पट मांडला आहे. हिंदुत्ववादी आणि ब्राह्मणी वातावरणात वावरूनही ही माणसे लोकशाही समाजवादी चळवळीचे काम करीत होती. ‘साधना’च्या जडणघडणीमध्ये प्रधानांचा वाटा मोलाचा आहे. ‘साधना’साठी स्थावर मिळकत मिळवण्यापासून ते संपादकपदापर्यंत अंगावर पडतील ती कामे त्यांनी केली. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वत:चे घरही साधना ट्रस्टला दिले.

प्रधानांच्या घरी आमचा कायम वावर असे. मग आमच्यात दुरावा कोणता होता? तर- एस. एम. जोशी आणि डॉ. राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संयुक्त समाजवादी पक्षात होतो आणि प्रधान हे प्रजा समाजवादी पक्षाचे होते. अच्युतराव पटवर्धन, शिरूभाऊ लिमये, हरिभाऊ लिमये, आचार्य केळकर, सदाशिवराव बागाईतकर यांनी लोहियांचे नेतृत्व स्वीकारले होते. मुंबईत जॉर्ज फर्नाडिस होते तसे पुण्यात कोणीच नव्हते. एकाच शहरात समाजवादी पक्षाचे हे दुभंगलेले स्वरूप कसे समजून घ्यायचे हा प्रश्न मला पडत असे. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याऐवजी पुण्यात नागरी संघटना स्थापन झाली. या संघटनेमार्फत मी आणि भाई दोघेही १९६२ मध्ये नगरसेवक झालो.

हाडाचे शिक्षक आणि व्यासंगी असल्याने प्रधान मास्तरांचा बौद्धिक वर्तुळामध्ये वावर होता. मास्तरांच्या पत्नी मालविका या आयुर्वेदाच्या डॉक्टर होत्या. त्या माहेरच्या गावात आदिवासींमध्ये आरोग्यसेवेचे काम करीत असत. घरातच त्यांचा दवाखाना होता. मास्तरांच्या आई दिसायला काहीशा करडय़ा स्वभावाच्या वाटायच्या, पण प्रत्यक्षात त्या तशा नव्हत्या. मास्तरांचे वडील प्रेमळ होते. ताराचंद रुग्णालयातून बसने घरी परतणाऱ्या मालविकाबाई पावसात भिजतील म्हणून ते सेवासदन चौकात त्यांच्यासाठी छत्री घेऊन थांबत. मास्तर कायस्थ प्रभू. त्यांच्या घरी उसळ करण्यासाठी आई पाटय़ावर भिजवलेले कडवे वाल सोलत बसलेल्या असत. आमच्याकडे त्याला ‘बिरडय़ाची उसळ’ असे म्हटले जाते. त्या प्रधानांना ‘पंडित’ म्हणायच्या.

पदवीधर मतदारसंघातून मास्तर तीन वेळा आमदार झाले. त्यांचे संघटनात्मक काम वामन ऊर्फ लालजी कुलकर्णी बघायचे. राष्ट्र सेवादलाच्या चळवळीतून तयार झालेला मध्यमवर्गीय मतदार त्यांना निवडून देत असे. अनिता भोसले ही बार्शी येथील कार्यकर्ता रोहिदास कांबळे याची मुलगी. लहानपणी केलेल्या लग्नानंतर तिचे हाल झाले. मग तिला मी आणि पन्नालाल सुराणा यांनी सेवासदनमध्ये आणून ठेवले. प्रधान मास्तरांनी तिला आपली मुलगी मानले होते. आता ती उरळीकांचन येथे शिक्षिका आहे. अशी कितीतरी माणसे मास्तरांनी जोडली होती. सर्वाना एकत्र आणणारे मास्तरांचे घर होते. एरवी मास्तर कधी पक्षीय नव्हते, पण निवडणुकीच्या काळात ते पक्षाचे असायचे. त्याला त्यांचा नाइलाज असायचा.

‘महाराष्ट्र आरोग्य मंडळ’ या मी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रधान मास्तर मार्गदर्शक होते. पुढे मी राजीनामा दिल्यानंतर प्रधान आणि लालजी कुलकर्णी संस्थेचे काम बघत असत. आणीबाणीच्या काळात प्रधान, भाई, मी, शिरूभाऊ कारागृहात होतो. शेवटच्या काळात अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनामध्येही आम्ही जीव ओतून काम केले. त्याला संघटित स्वरूप प्राप्त व्हावे, त्यात शिस्त यावी, विश्वस्त निधी तयार व्हावा, त्यातले कार्यकर्ते स्वच्छ चारित्र्याचे, समजदार व्हावेत, त्यांची शिबिरे आणि बौद्धिके घेतली जावीत यासाठी त्यास शैक्षणिक स्वरूप येऊन कार्यकर्ता निर्मितीचे केंद्र राळेगणसिद्धी बनावे यासाठी आम्ही प्रयत्न केला. त्यामध्ये प्रधानही होते. आम्ही विश्वस्त निधी उभा करण्याचा प्रयत्न केला, त्यात गोविंदभाई श्रॉफ, प्रधान, पुष्पाताई भावे, सनदी अधिकारीपदाचा राजीनामा दिलेले अविनाश धर्माधिकारी यांच्यासमवेत मी सचिव होतो. त्यासाठी आमचा महाराष्ट्रव्यापी दौरा झाला. त्यात प्रत्येक सभेत पहिले वक्ते प्रधानच असायचे. या चळवळीमध्ये तीन-चार वर्षे आम्ही काम केले. नंतर मी परदेशात गेलो आणि अण्णांनी ती बरखास्त करून टाकली.

‘साधनशुचिता’ या शब्दाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रधान मास्तर! नानासाहेब गोरे त्यास ‘हरळीचे मूळ’ म्हणायचे. समाजवादी कार्यकर्त्यांला हरळीच्या मुळासारखे आत जावे लागेल असे गोरे म्हणत असत; तसे प्रधानांचे होते. वाणी, लेखणी, करणी अशा त्रिवेणी संगम असलेले प्रधान म्हणजे समाजवादी शीलाचा आदर्श कार्यकर्ता होता. आदर्श लोकशाही समाजवादी शीलाचे नागरिक घडविणारी शाळा म्हणजे राष्ट्र सेवादल! प्रधान त्याचे खऱ्या अर्थाने ‘प्रधान’ होते. म्हणूनच विधान परिषदेच्या आमदारकीचा अनुभव असलेले प्रधान भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनांच्या सभांमध्ये अधिकारवाणीने बोलत असत. संसदीय राजकारणात ते फारसे रमले नाहीत. पक्षाने सांगितल्यानंतर ते थांबले. त्यांची जागा पुढे पन्नालाल सुराणा यांच्याकडे गेली; पण त्यांना यश आले नाही.

प्रधान यांच्या जीवनात पारदर्शकता होती. ज्या ज्या पदावर त्यांनी काम केले त्यामध्ये त्यांनी शंभर टक्के योगदान दिले. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी जो महाराष्ट्रव्यापी दौरा केला त्यावेळी मी त्यांच्यासमवेत होतो. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर राज्याची औद्योगिक प्रगती झाली. धरणे बांधली गेली. त्यासाठी जमिनी दिलेल्या नागरिकांचे पुनर्वसनाचे प्रश्न मात्र कायम राहिले. महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन परिषदेचे प्रश्न प्रधानांनी विधान परिषदेत मांडले. समाजवादी  साथी बॅ. नाथ पै हे तेव्हा खासदार होते. प्रधानांना मात्र आपण राष्ट्रीय पातळीवर जावे अशी महत्त्वाकांक्षा असल्याचे कधी दिसले नाही. ते साहित्यिक व संपादक होते. लोकशाही समाजवादी विचार सांस्कृतिक अंगाने मांडण्यावर त्यांचा भर होता. कोणतीही घटना समजावून देताना त्याचे संदर्भ देणारे प्रधान हे भाष्यकार- ‘थिंक टँक’ होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर समाजवाद्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले. राष्ट्र सेवादल आणि ‘साधना’ यासाठी प्रधानांनी जीवतोड मेहनत घेतली. आज स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे होत असताना तेव्हा पंचविशीच्या असलेल्या प्रधानांनी स्वातंत्र्याकरता कारावास भोगला आहे. यंदा त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तेव्हा त्यांच्या कार्याची योग्य प्रकारे दखल घेतली गेली पाहिजे. अंधारात दीप लावावा तसे प्रधानांचे जीवन होते. प्रधान हे स्वातंत्र्य चळवळीचे प्रत्यक्ष अंग होते, त्याचबरोबर साक्षेपी साक्षीदारही होते, त्याचे भाष्यकार होते. त्यांचा हा वेगळा पैलू यानिमित्ताने समाजासमोर यावा असे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला वाटते.

शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी

lokrang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Integrity baba adhav gp pradhan ssh

ताज्या बातम्या