भासमान विश्वातला वास्तवदर्शी कलावंत

इरफानचा सिनेमा प्रेक्षकांचं पलायनवादी मनोरंजन करणारा नव्हता.

इरफान खान

अमोल उदगीरकर – amoludgirkar@gmail.com

इरफानचा सिनेमा प्रेक्षकांचं पलायनवादी मनोरंजन करणारा नव्हता. त्याचा सिनेमा प्रेक्षकांचा हात पकडून आयुष्यातील अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये फिरवून आणायचा. वस्तुस्थितीकडे पाठ करून बसलेल्या प्रेक्षकाला एक करकचून चिमटा काढायचा आणि सांगायचा की, ‘बाबा रे, हे जग फार क्रूर आणि स्वार्थी आहे.’ तो जसा सिनेमांतून ‘व्यक्त’ झाला, तसाच वास्तवातही व्यक्त होई. आपल्या या सच्चेपणाची किंमतही त्याने विनातक्रार मोजली.

एखादा माणूस जातो म्हणजे नेमकं काय होतं? त्याच्यासोबत काही आठवणी, काही जीवघेणे अपमान, काही त्या माणसाच्या हातालाच असणाऱ्या चवी, काही निखळ आनंदाचे क्षण, तर भरपूर दु:खाचे क्षण, काही अतरंगी कला जगातून कायमच्या नाहीशा होतात. इरफान खान जगातून निघून गेला म्हणजे नेमकं काय झालं? एक सहज अभिनयाची कला, एक नियतीशी झडलेला मोठा संघर्ष, निष्पापपणा ल्यालेलं निर्मळ हसू जगातून कायमचं नाहीस झालं. पण आपल्या अभिनयातून त्याने लाखो लोकांच्या आयुष्याला केलेला स्पर्श मात्र वर्षांनुवर्षे मागे रेंगाळत राहील. इरफानच्याच ‘द नेमसेक’ सिनेमात एक फार सुंदर प्रसंग आहे. अशीमावर (तब्बू) अशोक गांगुलीच्या (इरफान) मृत्यूची बातमी आकस्मिकपणे आदळते तेव्हा ती फोनवर असते. ती बातमी कानावर पडल्यावर तिला काय करावं ते सुचतच नाही. ती तशीच अनवाणी पळत पळत रस्त्यावर येते. थंडगार रस्त्यावर तशीच आभाळाकडे बघत बसते. तिच्या आयुष्यातला आभाळाचा एक तुकडा कायमचा तुटला आहे. काल इरफानच्या मृत्यूनंतर लाखो देशी आणि विदेशी चित्रपटरसिकांची परिस्थिती अशीमासारखीच होती. आपल्या दु:खाचं नेमकं काय करावं, हेच त्यांना कळत नव्हतं. इरफानच्या धर्मामुळे, त्याने घेतलेल्या काही कठोर धार्मिक भूमिकांमुळे त्याच्याविरुद्ध उठणारे काही किरकिरे आवाज वगळले तर सर्वत्र प्रचंड दु:खाचं वातावरण होतं. बुंदेलखंड म्हणू नका, चेन्नई म्हणू नका, शिलाँग म्हणू नका, की परभणीसारखं निमशहर म्हणू नका; कुठलंही पीआर कॅम्पेन न राबवता, कुठल्याही आयटी सेलच्या पाठिंब्याशिवाय इरफानच्या मृत्यूबद्दलचा ट्रेंड समाजमाध्यमांवर वणव्यासारखा पसरला. इरफानला तरी भारतीयांचं आपल्यावर एवढं प्रेम आहे याची कल्पना होती का? किंवा इरफानचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता तर आपल्यालाही इरफानच्या असण्याची किंमत कळली असती का, असा प्रश्न पडतो. आपल्यावर लोक एवढं प्रेम करतात, हे इरफानला कसं तरी, कुठून तरी कळायला पाहिजे होतं.

भारतीय प्रेक्षकांचं प्रेम हे पलायनवादी सिनेमांत ‘लार्जर दॅन लाइफ’ भूमिका करणाऱ्या नायकांसाठी आणि महानायकांसाठी राखीव आहे असा एक समज होता. इरफानच्या मृत्यूने हा समज मोडून काढला. भारतीय प्रेक्षक पडद्यावरच्या नायकात स्वत:ला बघणारा. पडद्यावरचा नायक भ्रष्टाचारी नेत्याची धुलाई करतो आणि शिफॉनच्या साडीतल्या नायिकेसोबत पावसात भिजतो तेव्हा त्या नायकाच्या जागी आपल्याला कल्पून स्वत:लाच गोड गुदगुल्या करणारा. चित्रपटगृहातल्या त्या सुंदर अंधारात स्वत:च्या स्वप्नांचं विरेचन करणारा.

पण काही अपवाद वगळता इरफानचा सिनेमा कसा होता? तो प्रेक्षकांचं पलायनवादी मनोरंजन करणारा नव्हता. इरफानचा सिनेमा प्रेक्षकांचा हात पकडून आयुष्यातील अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये फिरवून आणायचा. एका काळोख्या जगाची अस्वस्थ करणारी सफर घडवून आणायचा. वस्तुस्थितीकडे पाठ करून बसलेल्या प्रेक्षकाला एक करकचून चिमटा काढायचा आणि सांगायचा की, ‘बाबा रे, हे जग तू स्वत:चीच फसवणूक करून समजतोयेस तसं हंकी-डोरी नाहीये. हे फार क्रूर आणि स्वार्थी जग आहे.’

‘मॅट्रिक्स’ या सिनेमात तो मॉर्फियस भासमान जगात अडकलेल्या नायकाला दोन गोळ्या ऑफर करतो. त्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी नायकाला निवडायची आहे. लाल रंगाची गोळी घेतली तर नायकाला खरंखुरं वास्तव जग- जे अतिशय क्रूर आहे- ते बघायला मिळणार आहे. निळ्या रंगाची गोळी घेतली तर नायकाला पुन्हा भासमान, खोटय़ा; पण कमी कटकटीच्या जगात जगायला मिळणार असतं. पलायनवादी सिनेमा ही जर निळी गोळी असेल, तर इरफानचा सिनेमा हा काळोख्या, अस्वस्थ जगाची सफर घडवणारी लाल गोळी होती. इरफानच्या सिनेमांनी तिकीट खिडकीवर क्वचित अपवाद वगळता फारसा गल्ला कधीच जमवला नाही. इरफानच्या सिनेमांचा ‘कल्ट’ वाढत गेला तो ‘पायरेटेड’ सिनेमातून आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्ममधून!

इरफानने जवळपास प्रत्येक भूमिकेत सर्वस्व ओतलं असलं तरी त्याच्या काही खास भूमिका प्रेक्षकांना आणि समीक्षकांना जास्त पसंद होत्या. २००३ ला प्रदर्शित झालेला ‘हासील’ हा तिगमांशू धुलिया या दिग्दर्शकाचा काहीसा दुर्लक्षित सिनेमा. हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातला फार महत्त्वाचा टप्पा आहे. उत्तर प्रदेशातल्या हिंसक विद्यार्थी चळवळीच्या धर्तीवर फुलणारी एक प्रेमकथा सुंदरपणे दाखवणारा हा सिनेमा महत्त्वाचा यासाठी, की नंतर हिंदी सिनेमाच्या कथानकांमध्ये जो उत्तर भारत ‘देशीयतावाद’ (जो आनंद राय आणि अनुराग कश्यपच्या सिनेमांत पुन्हा पुन्हा दिसतो.) रुजला आणि फळला, त्याची बीजं ‘हासील’मध्ये आहेत. त्या सिनेमातली ‘रणविजय सिंग’ ही विद्यार्थी राजकारणाची ढाल करून स्वत:चा स्वार्थ पूर्ण करणाऱ्या नेत्याची भूमिका ही इरफानची फार अप्रतिम भूमिका आहे.

शहरी जीवनाचे गुंतागुंतीचे ताणेबाणे गुंफणाऱ्या ‘लाइफ इन अ मेट्रो’मधला अघळपघळ आणि स्त्रियांसमोर कसं वागायचं याचा पाचपोच नसणारा मॉन्टी हा आयुष्यात खचलेल्या श्रुती घोषला (कोंकणा सेन- शर्मा) एका निसरडय़ा क्षणी महानगरांबद्दलच फार महत्त्वाचं तत्त्वज्ञान सांगून जातो- ‘ये शहर हमको जितना देता है, उससे कुछ ज्यादा कही हमसे कुछ ले लेता है.’

‘हैदर’चं कथानक काश्मीरमध्ये नेऊन विशालनं वेगळाच मास्टरस्ट्रोक खेळला आहे. या सिनेमात विशालनं काश्मीरचा सिनेमाच्या सेटसारखा वापर केल्याचं दिसतं. ‘हॅम्लेट’मध्ये डेन्मार्कचे ‘१३३ील्ल २३ं३ी ऋ ऊील्लें१‘’चे उल्लेख आहेत. भारतीय परिप्रेक्ष्यात काश्मीरशिवाय अजून कुठलं राज्य याच्याशी साधम्र्य साधणारं नसेल. या सिनेमातला इरफानचा रुहदार झाडावरच्या मुंजाप्रमाणे झपाटून टाकणारा आहे. ‘पानसिंग तोमर’मधला व्यवस्थेच्या निबरपणाविरुद्ध दाद मागण्यासाठी खेळाडूपासून डाकू बनलेला आणि ‘बीहड में तो बागी होते है, डकैत मिलते है पार्लमेंट में..’ म्हणणाऱ्या पानसिंगच्या भूमिकेत इरफानशिवाय अजून कुणाचीही कल्पना करता येणार नाही. ‘मकबूल’, ‘पिकू’, ‘बिल्लू ’, ‘मदारी’ या सिनेमांमध्ये अभिनेता इरफानने जे काम करून ठेवलंय त्याला तोड नाही.

आपल्याकडे हॉलीवूडच्या सिनेमात एक-दोन सीनपुरत्या दुय्यम, फुटकळ भूमिका करून स्वत:ला हॉलीवूडचे अभिनेते म्हणवून घेणाऱ्यांची मधे मांदियाळी उसळली होती. पण फारशी बडबड न करता आपल्याच धुंदीत काम करणारा इरफान इथेही वेगळा ठरला. ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’, ‘अ मायटी हार्ट’, ‘द वॉरियर ’, ‘इन्फर्नो’ आणि कित्येक हॉलीवूड चित्रपटांमध्ये इरफानने मोठय़ा लांबीच्या आणि महत्त्वाच्या भूमिका केल्या. महत्त्वाचं म्हणजे इतकं मोठं काम करूनही त्याने स्वत:ची टिमकी कधी वाजवली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप सोडलेला इरफानसारखा दुसरा कुठला नट नाही.

या लेखाच्या निमित्ताने इरफानच्या एका गोष्टीबद्दल लिहायला हवं, जी त्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग तर होती; पण त्याबद्दल फारसं बोललं गेलं नाही. ती गोष्ट म्हणजे इरफानचे डोळे. आपल्याकडे नायिकांच्या आणि एकूणच स्त्रियांच्या डोळ्यांबद्दल भरपूर कविता आणि इतर साहित्यनिर्मिती झालेली आहे. ‘मृगनयनी’ वगैरे विशेषणं निर्माण करण्यात आली आहेत. या सगळ्यात पुरुषांच्या डोळ्यांबद्दल कुणी कौतुकाने लिहिल्याचं फारसं आठवत नाही. फार तर क्रोध ओकणारे किंवा ‘इंटेन्स डोळे’ असे काही मोजके शब्दप्रयोग करून पुरुषांच्या डोळ्यांची बोळवण करण्यात येते. पण पुरुषांच्या डोळ्यांवर काही काव्यनिर्मिती करायचीच असेल तर इरफानचे  काहीसे अनैसर्गिकपणे मोठे आणि खाली लटकलेल्या पिशव्या असणारे डोळे हे आदर्श प्रेरणा ठरावेत. इरफान एका मुलाखतीत म्हणाला होता, की अगोदर त्याचे डोळे असे नव्हते. बहुतेक संघर्ष जिरवण्याच्या असुरक्षित काळाची आणि रात्र रात्र जागवण्याची किंमत असेल ती. दीर्घकाळ चाललेला संघर्ष माणसातला जीवनरस शोषून घेतो. इरफानचे डोळे लौकिकार्थाने सुंदर नसतील, पण त्या डोळ्यांत एक अनोखी चमक होती. रिअ‍ॅक्शन शॉट्समध्ये संवाद नसतानाही इरफान संवाद असलेल्या अभिनेत्यांपेक्षा निव्वळ त्याच्या डोळ्यांनी खूप काही बोलून जायचा.

माझ्या निमशहरी- ग्रामीण सीमारेषेवर घुटमळणाऱ्या गावात इरफान मला आणि माझ्या मित्रांना कळला तो ‘चंद्रकांता’ या नव्वदच्या दशकात गाजलेल्या मालिकेतल्या त्याच्या भूमिकेमुळे. इरफानने केलेलं पात्र आम्हाला बेहद्द आवडायचं. पण कुठल्याही कलाजाणिवा नसणाऱ्या त्या वयात नाव माहीत नसणाऱ्या इरफानला आम्ही ‘बेडकाच्या डोळ्यांचा हीरो’ म्हणून ओळखत होतो. नंतर गावाबाहेर पडल्यावर लक्षात आलं की अनेक उत्तर भारतीय मित्रसुद्धा इरफानला ‘मेंढक जैसी आंखेवाला’ म्हणून ओळखायचे. हा योगायोग बघून तेव्हा मौज वाटलेली. पण या मोठय़ा डोळ्यांमध्ये काहीतरी चुंबकीय आकर्षण होतं. ‘मकबूल’मध्ये आयुष्याच्या काही शेवटच्या क्षणांमध्ये निम्मी मकबूलला आवेगानं विचारते, ‘हमारा इश्क तो पाक था ना मियाँ? पाक था ना हमारा इश्क? बोलो ना.’ तेव्हा इरफानचे डोळे जे काही बोलतात, ते सरळ अभिनयाच्या टेक्स्टबुकमध्ये जाणारं आहे. नसिरुद्दीन शाह म्हणतात की, शरीर हे अभिनेत्याचं अस्त्र असतं. असं असेल तर इरफानचे डोळे हे अश्वत्थाम्याच्या भात्यातले अमोघ बाणच जणू.

इरफान हा सध्या फारसा लोकाश्रय नसणाऱ्या आणि कालबा होत असलेल्या ‘आयडिया ऑफ इंडिया’च्या शेवटच्या प्रतीकांपैकी एक आहे. खरं तर या स्थानावर शाहरुख खान या दुसऱ्या अभिनेत्याचा दावाही आहे असं मानलं जातं. त्यांचं अल्पसंख्य असून, बहुसंख्य हिंदू असणाऱ्या देशात प्रचंड लोकप्रियता आणि लौकिक यश मिळवणं, हा महत्त्वाचा निकष असला तरी तो काही एकमेव निकष नाही. अर्थात यश, प्रसिद्धी, यशाचे आर्थिक निकष यांत  शाहरुख इरफानपेक्षा शेकडो योजने पुढे आहे. पण भौतिक निकष सोडले तरी दोघांच्यात इतर अनेक साम्यं आहेत. दोघेही फिल्म इंडस्ट्रीमधले खरेखुरे बहिस्थ. दोघांच्याही अभिनेता म्हणून जडणघडणीत मोठा वाटा दिल्लीचा आहे. अभिनयाचे धडे दोघांनीही रंगमंचावर गिरवले. दोघांच्या बायका हिंदू असल्या तरी धर्मातर नावाचा प्रकार दोन्ही बाजूंनी घडला नाही.  इरफानने तर ‘लग्नाला काही प्रॉब्लेम असेल तर मी हिंदू धर्म स्वीकारू का?’ अशी विचारणा होणाऱ्या सासूकडे केली होती. अर्थात तशी काही नौबत आली नाही, हा भाग अलाहिदा. दोघांनीही त्यांच्या मुलांवर कुठलाही धर्म न लादता त्यांना त्यांचा धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. पण मग दोघांमधलं साम्य इथंच संपून भेदांचा प्रांत सुरू होतो. मुस्लीम धर्मातल्या अनेक गैर प्रथांवर इरफानने अनेक वेळा मतप्रदर्शन केलं आहे. एका चॅनलीय चर्चेत इरफान आणि एका मौलवीमध्ये ईदला बकऱ्यांची कुर्बानी द्यावी की नाही, यावरून झालेली खडाजंगी सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. जेव्हा लौकिकार्थाने जास्त यशस्वी असणारे शाहरुख, सलमान आणि आमिर हे खान अवघड प्रश्नांवर मूग गिळून गप बसत असताना हिरीरीने व्यक्त होणारा इरफान त्यांच्यात ठळकपणे वेगळा असल्याचं जाणवतं. ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मान झाल्यावर इरफानने आपल्या नावातलं ‘खान’ काढून टाकण्याचा निर्णय घेतला. भारतासारख्या अजस्त्र देशात माणूस एकाच वेळेस अनेक अस्मिता घेऊन वावरतो. ती अस्मिता जातीची असते, धर्माची असते, वर्गीय असते, भाषिक असते, आणि अजूनही अनेक पदर आहेत तिला. अशा अस्मितांचा बुजबुजाट असलेल्या देशात एखाद्या लोकप्रिय अभिनेत्याने आपलं आडनाव त्यागण्याची कृती ही खूप मोठी आहे. आडनाव सोडण्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर होतं की, ‘माझी इच्छा आहे की मला माझ्या कामावरून ओळखलं जावं, आडनावावरून नाही.’ कृतिशीलता या निकषावर इरफान हा शाहरुखपेक्षा ‘आयडिया ऑफ इंडिया’चं जास्त योग्य प्रतिनिधित्व करतो. आपल्याकडच्या सद्य: ध्रुवीकरणाच्या वातावरणात कुठल्याही घटनेवर- अगदी मृत्यूवरही- राजकीय विचारसरणीच्या टोकाच्या प्रतिक्रिया येतात. गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूवर आनंदोत्सव व्यक्त करणारे करंटे आणि कुठल्याही विचारसरणीच्या नेत्याच्या मृत्यूचा जल्लोष करणारे नामुराद इथं ढीगाने आहेत. इरफानच्या मृत्यूनंतरही असे बेसूर चिरके सूर निघालेच. त्याच्या धर्मविरोधी विचारसरणीमुळे त्याला श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे काही मुस्लीम आणि त्याने सोडलेल्या आडनावावरूनच ‘चला, अजून एक आतंकवादी पृथ्वीतलावरून गेला..’ असा सूर लावणारे काही धन्यवाद लोक निघालेच. पण असले कुजके शेंगदाणे वगळता सर्व जाती-धर्माचे, सर्व राज्यांमधले सर्वभाषिक लोक  इरफानच्या मृत्यूमुळे शोकमग्न झाले होते. लोकांना दु:ख अनावर झालं होतं. लोक समाजमाध्यमांवर भरभरून व्यक्त होत होते. त्या अर्थाने इरफानच्या मृत्यूच्या काळ्याशार ढगाला असलेली ही रूपेरी कडा. सगळंच काही संपलेलं नाही अशी आशा दाखवणारी. शेवटी ‘आयडिया ऑफ इंडिया’ म्हणजे तरी नेमकं काय असतं? हेच की!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Irfan khan dd70

Next Story
अनामिक बहर हा… :कधीं कधीं न बोलणार…
ताज्या बातम्या