बैठा आणि प्रतिस्पर्ध्याला नमवण्यासाठी फक्त विचारांना चालना देणारा बुद्धिबळ हा खेळ. या खेळाची कसरत करताना हे बुद्धिबळपटू इतर क्षेत्रांतही मोठी कामगिरी करतात असे दिसून आले आहे. कुणी शेअरबाजारात कुणी विधिक्षेत्रात, कुणी गणितात तर कुणी गुंतवणूकशास्त्रात आपल्या बुद्धीच्या बळाची कामगिरी दाखविली आहे. जवळचेच उदाहरण म्हणजे यजुवेंद्र चहल हा विनोद करण्यात कसबी क्रिकेटपटू आधी बुद्धिबळातील नामांकित खेळाडू होता, हे माहिती आहे काय?

बुद्धिबळातील खेळाडू फार एकांगी असतात आणि त्यांना बुद्धिबळ सोडलं तर बाकी काहीही करता येत नाही, असा अपसमज अकारण पसरलेला असतो. ‘शतरंज के खिलाडी’सारखे चित्रपट त्याला बळकटीही देतात. परंतु अनेक असे बुद्धिबळपटू आहेत, ज्यांनी अन्य क्षेत्रातही आपली प्रज्ञा सिद्ध केली आहे. आज आपण अशा प्रज्ञावंतांची दखल घेऊ या.

Loksatta kutuhal Artificial intelligence and chess
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बुद्धिबळ
Article about avoid exam result stress
ताणाची उलघड: निकालाचा तणाव टाळण्यासाठी…
world chess championship marathi news, world chess championship latest marathi news
विश्लेषण: बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीचे यजमानपद भारताला मिळणार की नाही? हा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात का सापडला?
Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली
generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
With 200 runs per day in IPL is it time to rethink the pitch impact player rule
‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका

विश्वनाथन आनंद

भारताचा मानबिंदू असलेला विश्वनाथन आनंद हा केवळ पाच वेळा जागतिक अजिंक्यपद विजेता नाही, तर तो अत्यंत बुद्धिमान व्यक्ती आहे. त्याचा बुद्ध्यांक (IQ ) १८० ते १९० आहे. दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात त्यानं पाऊल टाकलं असतं तरी तो तितकाच यशस्वी झाला असता, असं माझंच नव्हे तर अनेक जाणकारांचं मत आहे. त्याचा भारतीय शेअरबाजाराचा अभ्यास दांडगा आहे आणि अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर त्यानं अनेक यशस्वी गुंतवणुकी केल्या आहेत. सोव्हिएत संघराज्याच्या पाडावानंतर अनेक रशियन ग्रॅण्डमास्टर्सनी अमेरिकेत आश्रय घेतला आणि ते अनेक कंपन्यांचे गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करत आहेत. काही ग्रॅण्डमास्टर्स तर ऑनलाइन पोकर खेळून आपली उपजीविका करत आहेत. बुद्धिबळामुळे त्यांना जलद आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवयच लागलेली असते. त्यामुळे ते खेळाडू अर्थव्यवस्था किंवा तत्सम क्षेत्रात यशस्वी न झाले तरच नवल. आता आपण बघू बुद्धिबळात यशस्वी झालेले प्रज्ञावंत खेळाडू अन्य क्षेत्रांत कसे चमकले आहेत ते!

इम्यानुएल लास्कर (गणितज्ञ)

सर्वात जास्त काळ (तब्बल २७ वर्षे) जगज्जेता राहिलेले इम्यानुएल लास्कर हे गणितज्ञ होते आणि विश्वविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे मित्र होते. डॉक्टर लास्कर यांच्या नावानं गणितातील एक संज्ञाही प्रसिद्ध (अर्थात गणितज्ञांमध्ये) आहे. गणितामध्ये डॉक्टरेट मिळवलेल्या लास्कर यांच्या चरित्राला साक्षात आईन्स्टाईन यांनी प्रस्तावना लिहिली आहे. यावरूनच वाचकांना कळेल की लास्कर हे किती महान शास्त्रज्ञ होते.

हेही वाचा – आदले । आत्ताचे : लैंगिकतेचे कलात्मक समाजभान..

बुद्धिबळ आणि गणित यांचा परस्परसंबंध गणनेशी (Calculation) असल्यामुळे अनेक विख्यात गणितज्ञ बुद्धिबळ खेळाडू आपणास माहिती आहेत. माजी जगज्जेते डॉ. मॅक्स येवे, डॉ. जोनाथन मेस्टल असोत किंवा अनेक वेळा जागतिक कूटप्रश्न स्पर्धेचे विजेते डॉ. जॉन नन असोत, हे सर्व निव्वळ महान गणितज्ञच नव्हते, तर बुद्धिबळात उत्तम दर्जाची कामगिरी केलेले खेळाडू आहेत.

सॅम्युएल रेशेव्हस्की (लेखापाल)

वयाच्या आठव्या वर्षांपासून अनेकांशी बुद्धिबळ खेळून प्रसिद्ध झालेले ग्रँडमास्टर सॅम्युएल रेशेव्हस्की हे विख्यात लेखापाल होते. त्यांच्या या व्यवसायाविषयी जास्त माहिती कोणालाही नव्हती, पण त्यांच्या मृत्यूनंतर ‘न्यू यॉर्क टाइम्स’नं त्यांच्याबद्दल लिहिलं की, रेशेव्हस्की हे गुंतवणूक आणि विमा यातील विश्लेषक होते. याचा अनेकांना धक्का बसला, कारण ही क्षेत्रं प्रसिद्धीच्या झोतामध्ये नसतात.

भारताचा माजी अंध बुद्धिबळ विजेता दर्पण इनानी हा सनदी लेखापाल (chartered accountant) आहे, तर जागतिक ज्युनिअर अंधांचा उपविजेता आर्यन जोशी हा आयआयएम, इंदोर येथे शिकत आहे.

मिखाईल बोटिवनीक (संगणकतज्ज्ञ)

अनेक वेळा जगज्जेते राहिलेले बोटिवनीक हे विद्युत अभियांत्रिक (Electrical Engineer) होतेच, पण त्यांनी संगणकाला बुद्धिबळ खेळायला शिकवणारा प्रोग्रॅम १९६६ साली तयार केला होता. त्यांना आपण बुद्धिबळातील संगणकाचे जन्मदाते म्हणायला काहीही हरकत नाही. बुद्धिबळ क्षेत्रात त्यांनी कोणाचा हेवा करावा असं काहीही नव्हतं इतकं मोठं यश त्यांना अनेक वेळा विश्वविजेतेपद जिंकून मिळालं होतं, पण इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून त्यांना स्लोवेनियाचे ग्रँडमास्टर डॉ. मिलान विदमार यांचा आदर वाटत असे. ‘‘या क्षेत्रात विदमार यांना तोड नाही,’’ असं बोटिवनीक यांचं मत होतं.

रूबेन फाईन (मानसशास्त्रज्ञ)

आपल्या डॉक्टरेटसाठी बुद्धिबळाच्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धावर लाथ मारणारे डॉ. फाईन यांना सगळे जगज्जेते खूप मान देत असत. आतापर्यंत सर्वात उच्च दर्जाच्या मानल्या गेलेल्या AVRO या १९३८ सालच्या स्पर्धेचं संयुक्त विजेते असलेले रूबेन फाईन यांनी १९४८ सालच्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेचं आमंत्रण नाकारलं. त्यांनी १९५० सालीही बुद्धिबळाच्या कॅन्डिडेट्समध्ये भाग घेतला नाही.

मानसशास्त्र हे अतिशय कठीण शास्त्र आहे आणि ७० वर्षांपूर्वी तर त्याला फारसं महत्त्व नव्हतं; पण या महान ग्रँडमास्टरनं त्याच्या अभ्यासासाठी आपलं बुद्धिबळातील भविष्य पणाला लावलं. रूबेन फाईननं अनेक ग्रॅण्डमास्टर्सना त्यांच्या निकालामध्ये मदत होईल असे सल्ले दिले होते. सोबतच्या छायाचित्रात स्मिस्लोव, येवे, बोटिवनीक आणि ताल हे सर्व जगज्जेते किती कान देऊन त्याचं बोलणं ऐकत आहेत ते बघा.

वूल्फगँग उंझीकर (न्यायाधीश)

जर्मन ग्रँडमास्टर उंझीकर स्वत:ला हौशी खेळाडू म्हणवून घेत असे; पण त्याचा उच्च दर्जाचा खेळ बघून माजी जगज्जेता अनातोली कार्पोव त्याला हौशी खेळाडूंचा जगज्जेता म्हणत असे. त्याच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या लेखात माजी आव्हानवीर नायजेल शॉर्ट यानं त्याच्या बुद्धिबळ कौशल्याची आणि प्रेमाची स्तुती केली आहे. कारण न्यायाधीश म्हणून उंझीकर यांना खूप काम पडत असे. तरीही बुद्धिबळ खेळण्याची एकही संधी ते सोडत नसत. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचा वाढदिवस त्यांनी आपले मित्र अनातोली कार्पोव, बोरिस स्पास्की आणि व्हिक्टर कोर्चनॉय यांच्याबरोबर सहा डावांची स्पर्धा खेळून साजरा केला होता.

भारतातही ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांचे ज्येष्ठ बंधू अभय ठिपसे हे उत्तम खेळाडू आहेत आणि ते उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते.

अन्य क्षेत्रातील महान कामगिरी

बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर्समध्ये जगज्जेता वॅसिली स्मिस्लोव हे उत्तम गायक होते; पण ग्रँडमास्टर मार्क तैमानोव्ह यांच्या संगीत कारकिर्दीची बरोबरी कोणालाही करता येणार नाही. पियानोवर तैमानोव्ह यांचं प्रभुत्व होतं आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी रसिक तिकीट काढून गर्दी करत असत. जर्मनीचे ग्रँडमास्टर डॉ. रॉबर्ट हुबनर हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा विषय होता- पापिरॉलॉजी! याचा अर्थ आहे प्राचीन कागदपत्रांचा अभ्यास. पेपाल या आंतरराष्ट्रीय देयकाच्या ऑनलाइन व्यासपीठाचा जन्मदाता पीटर थील यानं शालेय जीवनात अनेक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्या. सोव्हिएत संघराज्यात बुद्धिबळ इतकं लोकप्रिय होतं की, त्यांचे अनेक सेनानी उच्च दर्जाचे बुद्धिबळ खेळत असत.

भारतीय बुद्धिबळपटू

अनेक भारतीय बुद्धिबळपटूंनी आपापले अभ्यास, व्यवसाय सांभाळून बुद्धिबळात उत्तम कामगिरी केलेली आहे. यजुवेंद्र चहल या विख्यात क्रिकेट खेळाडूनं जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. जेव्हा यजुवेंद्रनं बुद्धिबळाला रामराम ठोकला तेव्हा त्याचं आंतरराष्ट्रीय रेटिंग होतं १९५६ इतकं. डॉ. रेंटला नागेंद्र यांनी जिओ फिजिक्स या विषयात डॉक्टरेट मिळवली आणि नंतर १९८२च्या लुझर्न ऑलिम्पियाडमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर जर्मनीमध्ये स्थायिक असताना त्यांनी जर्मन अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवडीचा मान मिळवला; पण त्यांना आंतरराष्ट्रीय मास्टरची पदवी मिळवता आली नाही, कारण त्यासाठी त्यांना आपलं शास्त्रज्ञ म्हणून काम सोडावं लागलं असतं.

भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर आणि डॉक्टरेट असा दुहेरी सन्मान मिळवण्याचा एकमेव मान जातो पुणेकर चंद्रशेखर गोखले यांच्याकडे. ते सध्या एअर इंडियाच्या सॅन फ्रान्सिस्को विमानतळाचे व्यवस्थापक आहेत आणि चेन्नई ऑलिम्पियाडमध्ये खेळाडूंच्या विमानप्रवासाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आयोजकांनी त्यांच्यावर सोपवली होती. चेसबेस इंडियाचे सर्वेसर्वा सागर शाह हे एकमेव लेखा परीक्षक आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आहेत.

हेही वाचा – पुनर्वसनाच्या कळा

IIT आणि IIM या प्रतिष्ठेच्या शिक्षण संस्थांमध्ये शिकून उच्च पदावर पोहोचलेले अनेक खेळाडू आहेत; पण यात पहिला मान जातो तो माजी राष्ट्रीय ‘ब’ स्पर्धेचे विजेते अविनाश आवटे यांच्याकडे. मुंबई IIT मधून बाहेर पडल्यावर त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेत उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली होती.

डॉ. जॉन नन

या प्रख्यात गणितज्ञाविषयी आपण ओझरता उल्लेख वर बघितला आहेच; पण त्यांच्याविषयी आणि त्यांच्या ज्ञानाविषयी अनेक आदरपूर्वक उल्लेख बघायला मिळतात. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी रूढीप्रिय ऑक्सफर्ड विश्वविद्यालयानं त्यांचं गणितातील प्रभुत्व बघून आपल्या विश्वविद्यालयात प्रवेश दिला. सुमारे ४५० वर्षांनंतर इतक्या लहान वयात या सन्मानाची ही पहिलीच घटना होती. कार्डिनल वोलसी यांना १५२० साली हा सन्मान मिळाला होता. काही वर्षांनी डॉक्टरेट मिळवल्यावर त्याच विश्वविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिलं; पण लवकरच त्यांनी सर्वस्वी बुद्धिबळाला वाहून घेतलं. दुबई ऑलिम्पियाडमधील सुवर्णपदक विजेते नन हे ३० बुद्धिबळविषयक पुस्तकांचे लेखक आहेत. चेसबेस या जगातील सर्वात मोठ्या बुद्धिबळ कंपनीच्या संपादक मंडळावर ते आहेतच. गेल्याच वर्षी नन यांनी ६५ वर्षांवरील खेळाडूंचं जगज्जेतेपद मिळवलं.

जॉन नन यांच्याविषयी मॅग्नस कार्लसन या महान खेळाडूची मल्लिनाथी ऐका. जॉन नन इतक्या महान बुद्धिमत्तेनंतर जगज्जेते का बनले नाहीत यावर मॅग्नस म्हणतो, ‘‘त्यांची अतिप्रखर बुद्धिमत्ता याला जबाबदार आहे. उच्च दर्जाची समज आणि सतत ज्ञानाची तहान डॉ. नन यांना बुद्धिबळापासून विचलित करते.’’ हे वाचल्यावर आपण सगळे जगज्जेते का झालो नाही याचं कारण तुम्हाला कळलं असेलच. प्रखर बुद्धिमत्ता असल्यामुळेच! नाही का?

gokhale.chess@gmail.com