lr02ओडिशातील जगन्नाथपुरीची रथयात्रा १८ जुल रोजी होत आहे. यंदाच्या यात्रेचे वैशिष्टय़ म्हणजे १९ वर्षांनी मंदिरातील श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन या देवतांच्या काष्ठमूर्तीचा ‘नव-कलेवर’ विधी! विज्ञान-तंत्रज्ञानाच्या या युगातही हा सोहळा मोठय़ा श्रद्धेने पार पडतो. चित्तचमत्कारिक अशा या सोहोळ्याची रंजक कहाणी..
सालाबादप्रमाणे होणारी जगन्नाथाची रथयात्रा यावर्षीही १८ जुल रोजी होत आहे. पण यंदाच्या यात्रेला विशेष महत्त्व आहे. कारण यावर्षी मंदिरातील चार मूर्तीचा- श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांचा ‘नव-कलेवर’ विधी होत आहे.. म्हणजे जुन्या मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्तीची स्थापना होत आहे. १९ वर्षांनी या मूर्ती बदलल्या जात आहेत. अर्थात ‘नव-कलेवर’ म्हणजे काय, जगन्नाथाच्या नव-कलेवराला इतके महत्त्व का, असा प्रश्न कुणालाही पडले. त्याचीच ही गोष्ट..
िहदू पंचांगानुसार ज्या वर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्या वर्षी जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या नवीन काष्ठमूर्ती तयार करून त्यांची शास्त्रोक्त विधीवत प्रतिष्ठापना करणे म्हणजेच ‘नव-कलेवर’! या मूर्ती लाकडाच्या असल्याने वास्तविक दर १२ वर्षांनी त्या बदलणे आवश्यक असते. परंतु रथयात्रा आषाढ महिन्यात होत असल्याने जेव्हा अधिक आषाढ महिना येतो तेव्हाच नवीन मूर्ती घडवून जुन्या मूर्ती बदलतात. त्याशिवाय ‘इंद्र निळमणी’ पुराणानुसार श्रीकृष्णाच्या पायाला अधिक आषाढ अमावास्येलाच बाण लागून ते वैकुंठाला गेले होते. म्हणून तो दिवस जगन्नाथपुरीला वैकुंठगमन उत्सव.. नव- कलेवर उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.
हा उत्सव नेमका केव्हापासून सुरू झाला याबाबत अचूक माहिती कोठेही उपलब्ध नाही. ओडिसावर राज्य केलेल्या राजांच्या शिलालेखांत वा ताम्रलेखांत कोठेही याबाबतचा उल्लेख आढळत नाही. तसेच महत्त्वाचे ग्रंथ- जसे की अच्युतानंद यांनी लिहिलेली ‘शून्य संहिता’ व कन्हेई खुंटीयालिखित ‘महाभाव प्रकाश’ यांतही ‘नव कलेवर’बाबत माहिती नाही. काही जाणकारांच्या मते, िहदू राजांच्या पतनानंतर व काही विशिष्ट कारणवश मूर्ती बदलण्याची आवश्यकता भासली. मुसलमानी राजवटीत बंगालचा नबाब करानीचा सेनापती काळापहाडने ओडिसावर स्वारी केली. भुवनेश्वरची अनेक मंदिरे पाडून तो जगन्नाथपुरीकडे वळला. तेव्हा श्रीजगन्नाथाच्या भक्तांनी सगळ्या मूर्तीना देवळातून हलवले. पण त्याआधी भक्तांनी त्यामधील ‘ब्रह्म’ काढून ते मृदुंगात लपवून कुजंगगडावर लपवून ठेवले होते. काळापहाडने मूर्ती हाताला लागल्यावर त्या जाळून टाकल्या. या घटनेनंतर २० वर्षांनी कुजंगगडाच्या राजांनी नव्या मूर्ती घडवून, त्यात ‘ब्रह्म’ची स्थापना करून त्यांची पुरीच्या मंदिरात स्थापना केली. त्यानंतरच्या मुसलमानी राजवटींत अनेकदा जगन्नाथ मंदिराबाहेर गेले आणि ‘नव-कलेवर’ होऊन परत आले. औरंगजेबाच्या काळात तर मंदिर आणि जगन्नाथ दोघांचेही खूप हाल झाले. त्यानंतर १७३३ साली जगन्नाथ ‘नव कलेवर’ होऊन देवळात परत आले.
त्यानंतर ओडिसावर मराठय़ांचे राज्य होते. विशेष नमुद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्या कारकीर्दीत जगन्नाथपुरी आणि मंदिरातही शांती प्रस्थापित झाली. पुरीच्या देवळासमोरील अरुण स्तंभाची स्थापना मराठय़ांच्या राजवटीत झाली. कोणार्कच्या सूर्यमंदिरातील भग्न अवशेष जगन्नाथपुरीला आणून त्यांनी जगन्नाथाच्या देवळातील भोग मंडपाचे आवर, स्नान मंडप, मंदिराभोवतालची भिंत तसेच अनेक देवळे बांधली. सोन्याची लक्ष्मी घडवून या देवळात तिची स्थापना केली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी येण्याअगोदर व या कंपनीच्या काळातही ‘नव-कलेवर’ झाल्याच्या नोंदी आहेत. गेल्या १०० वर्षांत १९३१, १९५०, १९६९, १९७७ आणि १९९६ साली ‘नव कलेवर’ झाले. या वर्षी या शतकातील हे पहिले ‘नव- कलेवर’ होत आहे.
नव-कलेवराचे दोन प्रकार आहेत : १) जुन्या मूर्ती बदलून त्या जागी नव्या मूर्तीची स्थापना करणे. २) श्री अंग फीटा- म्हणजे मूर्तीवर असणारा लेप फक्त बदलणे. यात ‘ब्रह्म’ला हात लावत नाहीत.
नव-कलेवर विधी पाच टप्प्यांत पूर्ण होतो. १) दारू (झाडाचा ओंडका) शोधणे. त्याची पूजा करून तो कापणे आणि जगन्नाथपुरीला मूर्ती घडविण्यासाठी तो पोहोचवणे. २) मूर्ती घडविणे. ३) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि ‘ब्रह्म’ बदलणे. ४) जुन्या मूर्तीचे विसर्जन. ५) नवीन मूर्तीची देवळात स्थापना.
नव-कलेवराची तयारी चत्र महिन्यापासून सुरू होते. चत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका चांगल्या दिवशी शुभ मुहूर्त बघतात. त्या मुहूर्तावर धर्मशास्त्रानुसार सर्व विधी करून श्रीजगन्नाथाची आज्ञा घेऊन दैतापती छत्रचामरे घेऊन बडदांड (ज्या रस्त्यावरून जगन्नाथाचा रथ ओढला जातो तो रस्ता) वरून दारूयात्रेला (तिन्ही देव व सुदर्शनासाठी लागणाऱ्या झाडाच्या ओंडक्याच्या शोधासाठी केलेले प्रस्थान) निघतात. यालाच ‘वनजाग विधी’ असेही म्हणतात. तेथून ते पुरी राजाच्या राजवाडय़ावर जातात. राजा तिथे विश्वावसूवर (भिल्लांचा नायक) कामाची सर्व जबाबदारी सोपवतो. मग त्याच्या देखरेखीखाली काकटपूर मंगळादेवीच्या दर्शनासाठी दैतापती निघतात. तिथे ते प्राची नदीच्या किनारी सिद्धमठात राहतात. देवीची पूजाअर्चा करून तिचा कौल मिळायची वाट बघतात. मुख्य दैतापतीला स्वप्नादेश मिळतो. ओंडके (दारू) कुठे कुठे मिळतील, हे मुख्य दैतापतीला स्वप्नात येते. त्यानुसार चार गटांत विभागणी होऊन दैतापतींचे चार गट चार ओंडक्यांसाठी त्या- त्या ठिकाणी रवाना होतात. नव कलेवरासाठी जो ओंडका वापरला जातो त्याला ‘दारू’ म्हणतात. हा ओंडका कडुिलबाच्या झाडाचा असतो. ओडिसात या झाडाला ‘महािनब’ असे म्हणतात. देवीच्या स्वप्नादेशानुसार या झाडांच्या शोधार्थ दैतापतींचे चार गट निघतात.
हे झाड कसे असावे याचे काही नियम ठरलेले आहेत : झाडाच्या आसपास एखादा आश्रम वा देऊळ असावे. जवळ स्मशान असावे. झाडाच्या आसपास नदी अथवा मोठा जलाशय असावा. झाडाच्या बुंध्याशी नागाचे वारुळ असावे. वारुळात नागाची वस्ती असावी. झाडाच्या फांद्या जमिनीपासून १२ फूट उंचीवर असाव्यात.. म्हणजेच जमिनीपासून झाडाचा बुंधा १२ फूट एकसंध असावा. फांद्यांनी जवळच्या दुसऱ्या कोणत्याही झाडाला स्पर्श केलेला नसावा. झाडावर पक्ष्यांचे एकही घरटे नसावे. दुसऱ्या कोणत्याही वेली झाडावर वाढत नसाव्यात. आणि नवल करण्यासारखी अट म्हणजे- झाडावर शंख, चक्र, गदा, पद्म यापकी एखादे चिन्ह असणे आवश्यक. अशा लक्षणांनी युक्त असे झाड स्वप्नादेशानुसार त्या ठिकाणी सापडले, की झाड उतरवण्याअगोदर त्याच्या आसपासची जागा स्वच्छ करून तिथे होम करण्यासाठी जागा निवडतात. छोटय़ा छोटय़ा राहुटय़ा उभारून त्यात दैतापती राहतात. प्रथम पाच प्रकारची धान्ये पेरतात. मग मुख्य पुरोहित (विद्यापती) व विश्वकर्मा पाताळ नृसिंहाच्या मंत्राने नृसिंहाची उपासना करून होमात आहुती देतात. झाडावर असणाऱ्या देवतांना झाड सोडून जाण्याची विनंती करतात. जगन्नाथाची आज्ञामाळ घेऊन दैतापती व ब्राह्मण वाद्यांच्या गजरात झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालून ती माळ झाडाला बांधतात. एकदा झाडाला माळ बांधली, की झाड उतरवेपर्यंत सगळे उपवास करतात. सोन्याची व चांदीची अशा दोन छोटय़ा कुऱ्हाडी तयार करतात. त्या दोन व लोखंडाची एक अशा तीन कुऱ्हाडींची पूजा होते. होम झाला की विधिवत प्रथम विद्यापती सोन्याची, विश्वावसू चांदीची व विश्वकर्मा लोखंडाची कुऱ्हाड झाडाला लावतात. त्यानंतर झाड पाडणारे कामाला लागतात. मापाप्रमाणे बुंधा घेऊन झाडाचा उरलेला भाग तिथेच खड्डा खणून पुरून टाकतात. याला ‘पाताळी’ असे म्हणतात. हे सारे आटोपल्यावर सगळे उपास सोडतात.
lr03मग त्या- त्या ठिकाणाहून ओंडके पुरीच्या देवळात नेतात. त्यासाठी लाकडाचीच चारचाकी गाडी तयार केली जाते. चाकांसाठी वडाचे लाकूड वापरतात. मुख्य दांडा चिंचेच्या झाडाचा असतो. ओंडका लाल कापडात गुंडाळून गाडीवर ठेवतात व ही गाडी वेताच्या अथवा काथ्याच्या दोराने माणसे ओढत नेतात. चारही ओंडके जगन्नाथपुरीला उत्तरेच्या दारातून (याला ‘वैकुंठद्वार’ म्हणतात.) कोयली वैकुंठमध्ये आणून ठेवतात. तिथे चार खोल्यांमध्ये हे चार ओंडके ठेवून त्यांची पूजा होते.
मूर्ती घडविणे : ज्येष्ठ पौर्णिमेला देवांना स्नान घालून त्यांची पूजा, नवेद्य वगरे झाल्यावर देव कोणासही दर्शन देत नाहीत. यालाच ‘अणसर’ असे म्हणतात. देव अणसरात गेले की नवीन दारूंना स्नान घालून दारूशाळेत आणतात. इथेच विश्वकर्मा त्यापासून चार नव्या मूर्ती बंद दाराच्या आत घडवतात. त्या घडवताना होणारे आवाज कोणाच्याही कानावर पडू नयेत म्हणून बाहेर अखंड वाद्यांचा गजर चालू असतो. ज्येष्ठ अमावास्येच्या रात्री नवीन मूर्तीना रथात बसवून जगन्नाथाच्या देवळाला प्रदक्षिणा घालतात. दैतापतींखेरीज ही रथयात्रा इतर कोणीही बघत नाहीत.
‘ब्रह्म’ बदलणे : त्याच अमावास्येच्या रात्री पूर्ण अंधारात जुन्या मूर्तीच्या आत असलेला अलौकिक पदार्थ (यालाच ‘ब्रह्म’ म्हणतात.) पती महापात्र (मुख्य पुजारी) दारे बंद करून, डोळ्यांना पट्टी बांधून, हातालाही कापड गुंडाळून ‘ब्रह्म’ बाहेर काढतात व नव्या मूर्तीमध्ये त्याची स्थापना करतात. ‘ब्रह्म’संदर्भात आख्यायिका मात्र अनेक आहेत. कोणी म्हणतात, ‘ब्रह्म’ म्हणजे बुद्धदेवांचा दात आहे. कोणी त्यात जिवंत शाळिग्राम आहेत असे मानतात, तर काहींच्या मते, ‘ब्रह्म’ म्हणजे कृष्णाच्या शरीराचा जो ओंडका झाला होता, त्या ओंडक्याचाच एक छोटा भाग आहे. ‘ब्रह्म’ म्हणजे काय, तर नव्या मूर्ती तयार करताना तिच्या बेंबीच्या जागी एक दार असलेला छोटा कप्पा तयार करतात. जुन्या मूर्तीमध्ये असलेले ‘ब्रह्म’ (ते काय असते, हे कोणालाही माहिती नाही. कारण ‘ब्रह्म’ बदलणाऱ्या पुजाऱ्याचे डोळे बंद असतातच; शिवाय हातालादेखील कापड बांधले असल्याने स्पर्शज्ञानही होत नाही.) काढून नवीन मूर्तीत त्याची स्थापना करतात. याला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असे म्हणतात.
जुन्या मूर्तीचे विसर्जन : जुन्या मूर्तीना समाधीच्या जागी आणतात आणि त्यांना समाधी देतात. त्यांच्याबरोबर जुन्या रथाचे घोडे, सारथी व इतर मूर्तीनादेखील समाधी देतात. जुन्या मूर्तीना समाधी दिल्यावर दैतापती शोकपालन करतात. मुक्ती मंडपात सगळी शौचकम्रे करून मरकड तलावात आंघोळ करतात. १३ दिवस मंदिरात ब्राह्मण भोजन चालू असते. हे सर्व का, तर दैतापती जगन्नाथाला आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती मानतात. इथे एक प्रश्न सतत मनात उभा राहतो, की हे दैतापती म्हणजे कोण? त्याबद्दल थोडीशी माहिती अशी की, पुरीचा राजा इंद्रद्युमन हा कृष्णभक्त होता. श्रीकृष्णाच्या शरीराचा जो ओंडका होऊन वाहत आला होता, त्याची पूजा भिल्लांचा राजा विश्वावसू करीत असे. त्या ओंडक्याच्या शोधात राजाने ब्राह्मणांना वेगवेगळ्या दिशांना पाठविले. त्यात विद्यापती नावाचा ब्राह्मण भिल्लांच्या ठिकाणी पोहोचला. ओंडका मिळवण्यासाठी त्याने भिल्लांशी जवळीक करून विश्वावसूच्या मुलीशी- ललिताशी लग्न केले. त्या दोघांची संतती आणि त्यांचे वंशज म्हणजेच हे दैतापती. यावरून एक विचार सहजच मनात येतो की, श्रीकृष्णाने जगन्नाथाच्या रूपात येण्याअगोदरच ब्राह्मण, शूद्र, जातपात, उच्च-नीच हे भेदभाव संपुष्टात आणण्यासाठीच जणू ब्राह्मण विद्यापतीचा विवाह भिल्ल विश्वावसूची मुलगी ललिताबरोबर लावून सर्वधर्मसमताभावाची मुहूर्तमेढ रोवली असावी. मंदिरात श्रीजगन्नाथाची सगळी कामे ब्राह्मणांबरोबर हे दैतापती करतात. आनंद बाजारात तर जगन्नाथाचा प्रसाद ब्राह्मण असो वा हरिजन- दोघेही एकाच ठिकाणी बसून ग्रहण करतात.
नवीन मूर्तीची स्थापना : अधिक आषाढाच्या कृष्णपक्षात नव्या मूर्तीना लेप देणे, नवी वस्त्रे तयार करून नेसवणे, त्यांना अलंकृत करणे ही कामे करतात. नीज आषाढ प्रतिपदेला देवांना चक्षुदान केले जाते. या दिवशीच्या दर्शनाला ‘नवयौवन दर्शन’ असे म्हणतात. द्वितीयेला जगन्नाथ रथयात्रेसाठी बळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्यासमवेत प्रस्थान ठेवतात.
ज्येष्ठ अमावास्येला नवनिर्मित मूर्तीना १०८ पाण्याच्या घागरी आणून आंघोळ घालतात. जुन्या मूर्तीमधील ‘ब्रह्म’ काढून ते नव्या मूर्तीमध्ये घालून त्यांची प्राणप्रतिष्ठा करतात आणि जुन्या मूर्तीना २७ फूट मातीखाली समाधी देतात. याचाच अर्थ देवांचेही कलेवर बदलले तरी आत्मा तोच असतो. इथे गीतेच्या पुढील श्लोकाचा प्रत्यय येतो..
‘वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृयति नरोपराणि
तथा शरीराणि विहाय, जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही’
या वर्षी नव-कलेवर विधीसाठी रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात् चत्र शुद्ध दशमीला (रविवार, २९ मार्च रोजी) जगन्नाथाची आज्ञामाळ घेऊन साठापेक्षाही अधिक दैतापती, विश्वावसू, विद्यापती आणि इतर ब्राह्मण निघाले. काकटपूर मंगळादेवीच्या देवळात ते २ एप्रिलला जाऊन पोहोचले. १० एप्रिलला त्यांना स्वप्नादेश मिळाला आणि त्यानुसार चार दारूंच्या शोधासाठी ते चार गटांत त्या- त्या ठिकाणी गेले. सगळ्यात आधी सुदर्शनाचा दारू खुर्दा जिल्ह्य़ातील गडकंडूणिया या गावात मिळाला. या झाडावर शंख, चक्र, गदा, पद्म ही चारही चिन्हे होती. हे झाड ८० वर्षे जुने होते. त्याच्या बुंध्याचा व्यास ६.६ फूट होता. फांद्या जमिनीपासून १२ फुटांवर सुरू झाल्या होत्या. उरलेले तिन्ही दारू जगतसिंगपूर जिल्ह्य़ात वेगवेगळ्या ठिकाणी मिळाले. बळभद्राचा दारू झंकड गावच्या सारळा पीठाजवळ मिळाला. त्यावर शंख, चक्र, गदा याबरोबरच नांगराचे चिन्हदेखील होते. हे झाड १३० वर्षे जुने होते. व्यास होता ७.६ फूट. हे झाड पाडायला सुरुवात केली तेव्हा चंदनाचा खूप सुवास येत होता. देवी सुभद्राचा दारू अडंग गावातील निळकंठेश्वर देवळाजवळ मिळाला. त्यावरदेखील चारही चिन्हे होती आणि जवळच्या वारुळात नागाची वस्ती होती. हे झाड १२० वर्षे जुने होते आणि त्याचा व्यास सात फूट होता. श्रीजगन्नाथाचा दारू खरीपडीया गावात मिळाला. त्यावर शंख, चक्र, गदा, पद्म याबरोबरच हत्तीची सोंड व घोडय़ाचे तोंड अशी आणखी दोन चिन्हेदेखील होती. हे झाड १५० वर्षे जुने होते. आणि त्याचा व्यास आठ फूट होता. झाडाच्या फांद्या १५ फुटावर सुरू झाल्या होत्या.
विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे १९९९ साली ओडिसात जे महावादळ झाले, त्यात जगतसिंगपूर जिल्हा केंद्रस्थानी होता. इथे अतोनात मनुष्यहानी व वित्तहानी झाली होती. अशा भयंकर वादळातदेखील ही तिन्ही झाडे सुखरूप राहिली. या वादळात त्यांच्या आसपासचे अनेक मोठमोठे वृक्ष मात्र उन्मळून पडले होते.
या वर्षी ‘ब्रह्म’ बदलण्याची वेळ १५ जूनच्या अमावास्येला पहाटे ४.१५ वाजताची जाहीर झाली होती. नियमानुसार चार दैतापतींनी जाऊन चार मूर्तीचे ‘ब्रह्म’ बदलणे आवश्यक होते. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील अनेकांनी- म्हणजे जवळजवळ २८ जणांनी हट्टाने त्यांच्याबरोबर त्या दालनात प्रवेश केला. आत काय घडले, ते जगन्नाथालाच ठाऊक! पण त्यानंतर त्या ‘ब्रह्म’चे फोटो मोबाइलवर झळकले. ते फोटो खरे की खोटे, माहीत नाही. प्रत्यक्ष ‘ब्रह्म’ १६ जूनला सकाळी १०.३० वाजता बदलले गेले. पण या घटनेने ओडिसातील संतप्त भाविकांनी तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनांनी तीन वेळा ‘ओडिसा बंद’चे आयोजन केले. बार असोसिएशनच्या वकिलांनीही एक दिवसाचा बंद पाळला.
येत्या शनिवारी, १८ जुल रोजी जगन्नाथपुरीतील तिन्ही देव जनसामान्यांना दर्शन देण्यासाठी देवळाबाहेर पडून रथयात्रेकरता रथारूढ होतील.
सध्या आपण २१ व्या शतकात वावरतो आहोत. विज्ञान आणि संगणकाचे हे युग आहे. त्यामुळे या युगात देवीचा स्वप्नादेश, डोळे बांधून देवांचा आत्मा बदलणे वगरे गोष्टी अंधश्रद्धा म्हणून गणल्या जातील. परंतु तरीही या गोष्टी आजही श्रद्धापूर्वक होत आहेत. पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार देवीच्या स्वप्नादेशाप्रमाणे त्या- त्या ठिकाणी झाडे सापडतात. त्यासंदर्भातील अटीही पूर्ण होतात. त्या कडुिलबाच्या झाडांचे ओंडके लाकडी गाडय़ांवर माणसांकरवीच वाहून पुरीला मूर्ती घडविण्यासाठी आणले जातात. त्यांतून मूर्ती घडवून त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. या सगळ्यामागील मानवी श्रद्धेचा या युगात अन्वय तरी कसा लावायचा?
राधा जोगळेकर – joglekarradha@rediffmail.com