डॉ. विजया देव vijayadeo@yahoo.com

कालिदासाचं ‘मेघदूत’ माहीत नाही असा काव्यरसिक दुर्मीळच! मेघदूतात कालिदासाने मेघाकरवी आपल्या प्रियेला संदेश पाठवताना त्याला जो दीर्घ प्रवास घडवला आहे, त्यात त्याने अनेक प्रदेश पालथे घातले आहेत. या प्रवासमार्गात त्याला अकरा नद्या लागतात. निसर्गावर मानवी भावभावनांचं आरोपण करत मेघ आणि नद्या यांच्यातील नात्याचं रसाळ, हृद्य, उत्कट अन् चित्रमय वर्णन कालिदासाने ‘मेघदूत’मध्ये केलं आहे. त्याविषयी..

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु
heat Caution warning of health department in the background of heat stroke mumbai
तापत्या राजकीय वातावरणात उष्माघाताचा फटका; उष्मघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सावधतेचा इशारा!

जीवनदायिनी म्हणून नद्यांना भारतीयांच्या मनात आदराचं, आपुलकीचं स्थान आहे. त्याशिवाय या नद्यांना आपल्या भावजीवनामध्ये फार वेगळं, महत्त्वाचं स्थान आहे. त्यांना आपण माता मानतो आणि कायम स्त्रीरूपात पाहतो. नद्यांची उगमस्थानं, नदीतीर, प्रवाह यांचा अवखळ, खळखळता किंवा संयत, गंभीर प्रवास आपल्याला भूल पाडतो. तिच्या काठावरचं जीवन, तिच्यावरून वाहणारा वारा, तिच्यातले नानाविध जलचर यांच्याबद्दल एक आत्मीयता आपणा सर्वानाच असते. मग मेघाला ती असली तर त्यात नवल ते काय? मेघ आणि नदी यांचे ऋ णानुबंध तर सृष्टीच्या आरंभापासूनचे. जेव्हा असे पावसाळी मेघ आकाशात येतात, तेव्हा नदी आणि मेघ दोघांनाही आठ महिन्यांचा विरह झालेला असतो. मेघ नदीवर ओठंगतात तेव्हा नदी आणि मेघ यांच्या भेटीचा हा सोहळा कसा होत असेल?

‘मेघदूता’त यक्ष मेघाला रामगिरीपासून कैलास पर्वतापर्यंतचा आणि पुढे अलकानगरीचा मार्ग  सांगत आहे. त्यात निरनिराळे भूप्रदेश, पर्वत, नगरं यांच्याबरोबरच वरून मेघाला दिसणाऱ्या नद्यांचं वर्णनही पूर्वमेघात यक्ष करतो. कालिदासानं केलेलं हे भूप्रदेशाचं वर्णन अचूक, यथातथ्य आहे. कालिदासाच्या या भौगोलिक आणि निसर्गज्ञानाची किती तारीफ करावी! आणि त्याहून विशेष म्हणजे त्यानं प्रत्येक नदीला वेगवेगळं व्यक्तिमत्त्व बहाल केलेलं आहे. हा फक्त कल्पनाविलास नव्हे, तर त्या तशा आहेत म्हणून! मेघ आणि नदी यांच्यातल्या नात्याला कालिदासाने स्वायत्त आकृतिबंध दिला आहे. निसर्गाच्याच या दोन रूपांमध्ये गहिरं नातं आहे. कालिदासानं ते यक्षाच्या तोंडून अजरामर केलं आहे. मेघाच्या मार्गात त्याला अकरा नद्या लागणार आहेत : १. रेवा, २. वेत्रवती, ३. वननदी, ४. निर्विध्या, ५. सिंधू, ६. शिप्रा, ७. गंधवती, ८. गम्भीरा, ९. चर्मण्वती, १०. सरस्वती, ११. गंगा.

कालिदासानं काही नद्यांच्या बाबतीत नदी-मेघ यांच्यातलं नातं मीलनोत्सुक पती-पत्नी, प्रियकर- प्रेयसी असं दाखवलं आहे. आठ महिन्यांच्या विरहानंतर मेघातून नदीला मिळणारं जलदान, त्या वर्षांवासाठी नदीनं उत्सुक असणं हे नैसर्गिक घटिताशी सुसंगतही आहे. पण हे फक्त काही निवडक नद्यांच्या बाबतीतच आहे. प्रत्येक नदीचं स्थान भारतीय जनमानसात वेगळं आहे. गंगा, रेवा, सरस्वती यांच्याबाबतीत आपल्या मनात असलेली पावनत्वाची भावना कालिदास जाणून आहे. तिथे मेघ आणि नदी यांचं नातं एका वेगळ्या, पवित्र, गंभीर स्तरावर जातं. या नात्यांमधली विविधता आता पाहू.

वेत्रवती (बेतवा), निर्विध्या, सिंधु आणि गम्भीरा या नद्यांशी असलेलं मेघाचं नातं हे प्रियकर-प्रेयसी या रूपातलं आहे. त्यात मीलनाची ओढ, विरहव्याकुळता, शृंगार या भावना आहेत. वेत्रवतीच्या- बेतवा नदीच्या- काठावर विदिशा नगरी आहे. यक्ष म्हणतो, ‘चंचल लहरींची वेत्रवती तुला भेटेल. या मुग्धेचा रुसवा लटका असेल. तिचं मधुर जल तू प्राशन कर. तुझ्या गडगडाटानं तिच्या प्रवाहावर जे तरंग उठतील ते भ्रूभंग करणाऱ्या प्रेमिकेच्या चेहऱ्यासारखे दिसतील. त्याक्षणी तुला तिच्या चुंबनाचं फळ प्राप्त होईल.

पुढे निर्विध्या ही प्रणयोत्सुक आहे. आपल्या कटितटावरून घसरलेलं वस्त्र (म्हणजे उन्हाळ्यानं आटलेला प्रवाह) तिनं वेतसांनी कसंबसं सावरून धरलं आहे. तिच्यावर उसळणाऱ्या लाटांनी कलरव करणाऱ्या आणि उडणाऱ्या पक्ष्यांची जणू मेखलाच तिनं घातली आहे. तुझ्या (मेघाच्या) विरहानं ती कृश झाली आहे. तिच्या नागमोडी वळणांनी तिच्या नाभीचं दर्शन होत आहे. या सूचक शृंगारलीलांचा अव्हेर करून, हे भाग्यवंत मेघा, तू कसा बरं पुढे जाऊ शकशील?’असं यक्ष म्हणतो.

पुढे तो म्हणतो, ‘त्यानंतर भेटेल तुला सिंधू. ती तर तुझ्या विरहानं कृश झालेली आहे. तिचा क्षीण प्रवाह एकवेणीसारखा दिसत आहे. ती निस्तेज, पांढुरकी झालेली आहे (कारण काठावरची शुष्क, म्लान र्पण तिच्यात पडली आहेत.) तृषार्त अशा तिला तू जलदान कर. (पतीपासून दुरावलेल्या स्त्रिया त्या काळात एकवेणी राहत आणि सौंदर्यप्रसाधन करत नसत, हा संदर्भ इथे आहे.) ती एकवेणी आहे, हे मेघा, तुझं सौभाग्य आहे.’

‘गम्भीरा ही तर उदात्त नायिका. ती प्रौढ आहे, प्रवीण आहे. तिचं नील सलिलवसन तटरूपी नितंबांवरून घसरलेलं आहे, आणि वानीरशाखांनी ते कसंबसं धरून ठेवलं आहे. तिच्या प्रवाहातले सुळकन् फिरणारे शफर मासे हे जणू तिचे नेत्रकटाक्ष आहेत. तिच्या स्वच्छ, निर्मळ प्रवाहात तू छायारूपानं शिरशील. तिचा तू उपभोग घे.’ कोणता बरं रसिक अशी संधी हातची जाऊ देईल?

मेघाच्या मार्गात आणखीही दोन नद्या आहेत. त्या म्हणजे वननदी आणि गंधवती. वननदी ही विंध्य पर्वतरांगांमधली नदी असावी असं एक मत आहे. यक्षानं इथं मेघाला वननदीच्या तीरावर जलसिंचन करायला सांगितलं आहे, कारण हिच्या तीरावर पुष्पोद्यानं आहेत. आणि त्या ताटव्यांमध्ये फूलमाळिणी फुलं खुडायला दुपारच्या वेळी आलेल्या आहेत. त्यांना थंडावा, विसावा मिळावा म्हणून तू हलकी जलवृष्टी कर आणि सावली धर, असं यक्ष सांगतो. गंधवती ही उज्जयिनीजवळची छोटी नदी. इथे चण्डिश्वराचं मंदिर आहे. त्याचं दर्शन तू घे, असं यक्ष त्याला सांगतो. जलक्रीडा करणाऱ्या युवतींच्या प्रसाधनांनी आणि कमळपरागांनी या नदीवरचा वारा सुगंधित झालेला आहे.

या दोन नद्यांच्या बाबतीत शंृगार-मीलनाचा भाव दिसत नाही. याआधीच्या नद्या आणि मेघ यांचे शृंगारिक, प्रणयी भाव रेखाटणारा कालिदास अन्य काही नद्यांबाबत मात्र अत्यंत संयमी आहे. तिथे कधी आदर आहे, कधी भक्ती. त्या नद्या म्हणजे रेवा, शिप्रा, चर्मण्वती, सरस्वती आणि गंगा.

रेवा ही मेघाच्या प्रवासातली पहिली नदी. रेवा म्हणजेच नर्मदा. यक्ष सांगतो, ‘अमरकंटकावरून पुढे गेल्यावर नर्मदा दिसेल. तिथे तू तिचे जलप्राशन कर. म्हणजे तुला गुरुत्व येईल, वारा तुझी अवहेलना करणार नाही.’ यामागे कालिदासाची एक वेगळी दृष्टी आहे. मेघ रामगिरी पर्वताचा निरोप घेऊन निघालेला आहे. जानकीच्या स्नानामुळे तिथले झरे ‘पुण्योदक’ झालेले आहेत. आणि मेघ यक्षाच्या प्रिय पत्नीला प्रेमसंदेश देणार आहे. त्यामुळे तिथे नदीविषयीच्या वासनांचा लवलेशही मेघाच्या मनात उमटणार नाही याचीच जणू कालिदास खबरदारी घेतो. विंध्याचा उतार नर्मदेच्या असंख्य शुभ्र प्रवाहांनी सुशोभित झालेला आहे. विंध्य म्हणजे जणू विभूतीने सुशोभित केलेला हत्तीच. इथे तू नदीचं पाणी पिऊन भरदार हो, असं यक्ष म्हणतो. कालिदासाचं सुभाषित इथे येतं- ‘रिक्त: सर्वो भवति हि लघु: पूर्णता गौरवाय॥’

मग शिप्रा. कालिदासाच्या प्रिय अशा उज्जयिनीमधली. याच नगरीत बारा ज्योतिर्लिगांपैकी एक आणि कालिदासाचं परमदैवत शिव याचं महाकाल मंदिर आहे. इथून वाहणारी शिप्रा. कमलपुष्पांनी सुगंधित झालेला शिप्रेवरचा वारा इथल्या ललनांची सुरतग्लानी दूर करतो, एवढेच म्हटलेले आहे.

त्यानंतर चर्मण्वती (चंबळ). चर्मण्वतीच्या अवतरणाला रन्तिदेवाचं तपोबल हे कारण आहे. या नदीबाबत कामुक प्रेमचेष्टा कशा बरं शक्य आहेत? या रन्तिदेवाच्या कीर्तीचं गुणगान यक्ष करतो आणि सांगतो, ‘तू इथे नतमस्तक हो. इथलं पाणी पी.’ यापुढचं वर्णन तर अतिशय बहारदार आहे. यक्ष म्हणतो, ‘हे कृष्णसावळ्या मेघा, तू या कृश वाटणाऱ्या प्रवाहावर झुकशील तेव्हा उंचावरून आकाशमार्गानं जाणाऱ्या देवदेवतांना असा भास होईल की जणू खाली मोत्यांच्या एकपदरी माळेत मधोमध गुंफलेला नीलमणीच पाहत आहोत की काय! किती नयनरम्य दृश्य आणि कल्पना!

असा मेघाचा प्रवास ब्रह्मवर्तातून कुरुक्षेत्रात होतो आहे. इथे आहे सरस्वती नदी. यक्ष मेघाला सांगतो, ‘तू इथे तिचं पाणी पिऊन घे. कारण ते असं तसं नाही. खुद्द बलरामानं मदिरात्याग करून, युद्धविन्मुख होऊन इथे येऊन ते प्राशन केलंय. हे पाणी पिऊन बघ काय चमत्कार होतो. तू फक्त वरकरणी काळा राहशील आणि अंतर्यामी होशील स्फटिकशुभ्र.’ सरस्वतीची थोरवी वर्णन करताना या श्लोकात कालिदासानं केवढा कथाभाग सांगितलेला आहे : बलरामाची ‘हाला’ म्हणजे ‘मदिरा’सक्ती, रेवती या पत्नीवरचे त्याचे प्रेम, बंधुप्रीतीस्तव युद्धत्याग, लावण्यवती रेवतीचे नयन ज्यात प्रतिबिंबित झाले आहेत अशा मदिरेचा त्याग.. एवढं करून तो सरस्वतीकाठी आलेला आहे.

सरस्वतीच्या निर्मल संस्कारांनंतर इथून पुढे मेघाच्या बाबतीत कालिदासाने एकही कामुक प्रसंग रंगवलेला नाही. ही शुक्लांबरा कवीची आराध्यदैवत. तेव्हा या तीर्थावर मेघानं येणं हे एक प्रकारे मेघाच्या अंत:शुद्धीचं द्योतक आहे. म्हणून ‘अंत:शुद्धस्त्वमपि भविता वर्णमात्रेण कृष्ण:।’ असं कालिदास म्हणतो. इथे कालिदासाने बलरामालाही एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. बलरामाबद्दल त्याला वाटणारी आत्मीयता यात स्पष्ट दिसते.

पुढे मेघ कनखलला गंगेजवळ येतो. कनखल पर्वत कसा, तर सगरपुत्रांच्या उद्धारासाठी स्वर्गसोपान झालेला. जहनुची कन्या- जान्हवी- इथं हिमालयातून शंकराच्या जटांमधून अवतीर्ण होते. आणि इथे एक मजेशीर वर्णन येतं की, गंगेला पाहून गौरीच्या भ्रुकुटी उंचावलेल्या आहेत- ती रुष्ट झाल्यामुळे. ते पाहून गंगा आपल्या धवल फेसाच्या रूपाने जणू हसते आहे. गंगेचा प्रवाह- भागीरथीचा प्रवाह- निर्मळ, स्फटिकशुभ्र आहे. यक्ष म्हणतो, ‘मेघा, तू हे पाणी पिण्यासाठी ऐरावतासारखा खाली पुढे झुक. तुझा मागचा वरचा भाग आकाशातच राहील. तुझी अशी कृष्णछाया गंगेच्या शुभ्र प्रवाहावर पडेल. आणि असा संभ्रम निर्माण होईल की, गंगा-यमुना संगम इथे कुठे झाला- प्रयाग सोडून?’

कालिदासाचं श्रद्धास्थान असलेला शिव, गंगा आणि पार्वती यांचा संगम इथे झालेला दिसतो.

एका छोटय़ाशा- उण्यापुऱ्या १२० श्लोकांच्या- काव्यरचनेमध्ये मेघाच्या मिषाने कालिदासाने आपल्याला अकरा नद्यांची स्थानं, वेगळेपणा, पौराणिक संदर्भ, संस्कृतीची वाटचाल आणि विकास यांचं दर्शन घडवलेलं आहे. तेही अत्यंत सुललित अशा श्लोकांमधून, नादमय, चित्रमय शब्दांमधून. या प्रत्ययकारी वर्णनाबद्दल आपण कालिदासाचे ऋ णी आहोत.

काही अपरिहार्य कारणामुळे सुभाष अवचट यांचे ‘रफ स्केचेस्’ हे सदर यावेळी प्रसिद्ध होऊ शकले नाही.