बाबांचे चुलते गोपिनाथ तळवलकर (नाना) यांनी बाबांवर लहानपणापासून उत्तम वाचनाचे संस्कार केले. नानांचे मित्र श्री. म. माटे, आचार्य अत्रे, क्षीरसागर, माधव ज्युलियन वगरे बाबांच्या लिखाणावर आणि वाचनावर खूश असायचे. पुस्तकांची अफाट आवड असल्यामुळे जमेल तेव्हा पुस्तके विकत घेण्याचे बाबांचे ब्रीद होते. नंतर सुस्थिती आल्यावर त्यांच्या पुस्तकांच्या संग्रहाची स्थिती ‘वाढता वाढता वाढे’ अशी राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबांमुळे आम्हाला उत्तमोत्तम पुस्तके लहानपणापासून घरीच वाचायला मिळाली. यात मराठी, बंगाली, संस्कृत, इंग्लिश यांबरोबरच इंग्लिशमध्ये भाषांतरित रशियन, फ्रेंच, जर्मन तथा ग्रीक, लॅटिन अशी अनेक भाषांतील विविध विषयांवरील उत्तमोत्तम पुस्तके होती. आणखीही बरीच माहिती ते सहज बोलता बोलता सांगत. अनेक मराठी कविता, उतारे, तसेच शेक्सपिअर, कीट्स, वर्डस्वर्थ वगरेंच्या अनेक ओळी त्यांना पाठ होत्या. बाबांशी बोलताना काही योग्य वाक्ये योग्य ठिकाणी उद्धृत केली की ते खूश होत. अगदी तरुणपणीच डोंबिवलीला वाचनालयात त्यांची आईशी ओळख होऊन प्रेमविवाह झाला. तिलाही अनेक कविता पाठ होत्या. बाबांचे सर्व लिखाण व पुस्तके ती आवडीने वाचायची आणि सर्व लेख कापून ठेवायची. बाबाही तिला आणि आम्हाला आपण कोणते पुस्तक लिहिणार आहोत, काय सूत्र आहे, हे सांगायचे. इंग्लंडहून परतल्यावर आम्ही दोघी प्रूफे तपासायला लागलो.

अनेक साहित्यिक, कलावंत नेहमी घरी यायचे. त्यांच्या काव्यशास्त्रविनोदाची मफल आनंददायी तशीच उद्बोधक असायची. पु. भा. भावेकाका, गदिमाकाका, पु. ल. काका, कुसुमाग्रज, विद्याधर गोखलेकाका हे सर्वजण बाबांबरोबर साहित्य, नवनवीन पुस्तके आणि घडामोडींची चर्चा करीत. काणेकरकाका, ग. प्र. प्रधानकाका, वि. म. दांडेकरकाका, हमीद दलवाईकाकाही यायचे. एस. एम. जोशीकाका मधून मधून बाबांच्या कार्यालयात येऊन त्यांना विविध माहिती सांगण्याचा आग्रह करीत. त्यांच्या आत्मचरित्राचे संपादन बाबांनीच केले. पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, अमीरखाँ, बडे गुलाम अली, सितारादेवी, तसेच छोटा गंधर्व, सुधीर फडके, भालचंद्र पेंढारकर, शंकर व काशिनाथ घाणेकर, निळू फुले अशा अनेकांच्या कार्यक्रमांना आम्हाला अगत्याने बोलावणे असायचे. शरद तळवलकर हे बाबांचे काका होते. दूरदर्शनवर फार वर्षांपूर्वी ‘प्रतिभा आणि प्रतिमा’मध्ये बाबांवर कार्यक्रम झाला तेव्हा लक्ष्मणशास्त्रीकाका, गोवर्धन पारीखकाका, अ. भि. शहाकाका, यशवंतराव चव्हाण, नानी पालखीवाला, सिरवाई, अशोकभाई देसाई वगरे गौरवपर बोलले होते. न्यायमूर्ती, वकील, पोलीस अधिकारी, उद्योजक, राजकारणी यांचीही ऊठबस असायची.

बाबांच्या वाचनाचे विषय अनेकविध होते. इतिहास, ललित आणि वैचारिक साहित्य, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, तत्त्वज्ञान, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, संगीत, कला, इत्यादी. मराठीपुरतेच त्यांचे वर्तुळ नव्हते. मित्रपरिवार खूप मोठा होता. देशात तसेच इंग्लंडमध्येही. निखिल चक्रवर्ती, शामलाल, गिरीलाल, आर. के. लक्ष्मण, इंदरकुमार गुजराल आणि अनेक जण त्यांच्या मित्रपरिवारात होते. राजीव गांधींबद्दल त्यांना आपुलकी वाटायची. दिल्लीप्रमाणे येथे अमेरिकेतही अटलबिहारी वाजपेयी व नरसिंह राव यांची भेट झाली होती, तर मनमोहन सिंगांशी काही वेळा फोनवरून चर्चा.

आम्ही ह्य़ुस्टनला असताना टाइम्सचे माजी संपादक शामलाल यांची दृष्टी अधू झाली तेव्हा, काही चांगले वाचलेस तर मला सांगत जा, अशी विनंती त्यांनी बाबांना केली. बाबा त्यांच्याशी फोनवर बोलत, वाचलेल्या पुस्तकांबद्दल ई-मेलने लिहीत. केवळ वृत्तपत्रीय लिखाण न करता बाबांनी एवढा व्याप सांभाळून ‘सत्तांतर’, ‘नवरोजी ते नेहरू’सारखी इतिहासावरील पुस्तके, तसेच वैचारिक लिखाण व रसास्वादात्मक समीक्षा लिहिली याचे त्यांना कौतुक होते. अनेक सामाजिक तथा राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ‘टाइम्स ऑफ इंडिया’त कधी कोणी केले नाही, बाबांनी केले. असे सर्वागीण लिहिणारा दुसरा चांगला इतिहासकार, संपादक, लेखक नाही, बाबा एकमेव आहेत, असे शामलाल यांचे मत होते. इंदरकुमार गुजराल यांचेही असेच मत होते. त्यांनाही बाबांनी पुस्तकांबद्दल ई-मेलने लिहिलेले फार आवडायचे. दोन वर्षांपूर्वी ‘Gopal Krishna Gokhale : Gandhi’s Political Guru’ हे बाबांनी इंग्रजीत लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध झाले. आधुनिक भारताचा इतिहास समजावून घ्यायचा असेल तर या ग्रंथाचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे असे जाणकारांचे मत आहे.

‘या निशा सर्व भूतानाम् तस्यां जागíत संयमी॥’ हे सूत्र धरून बाबांनी लोकजागृती केली. व्ही. पी. सिंग व अण्णा हजारे यांच्यावर सर्व लोक भारावून गेले होते तेव्हा बाबांनीच त्यांच्या भोंदूगिरीला वाचा फोडली. टीका करण्यातही त्यांची भाषा नेहमी परखड, पण संयमी होती. त्यांनी लोकांच्या विवेकशक्तीस आवाहन केले.

बाबांनी अनेकांना अनेक प्रकारे मदत केली. त्याची वाच्यता कधी केली नाही. काही लोक मात्र त्याचा गरफायदा घेत. खोटेनाटे उठवणे, चिखलफेक करणे यापलीकडे अशांची मजल नाही. ‘बुद्धीने व ज्ञानाने हे लोक इतके खुजे आहेत, की मान वर करूनही तुमची उंची त्यांना दिसत नाही. तुमचा मत्सर करणे, तुम्हाला श्रेय न देणे, लेख प्रसिद्ध न करणे, नाव येऊ न देणे आणि कळपाने विरुद्ध कारस्थाने करणे, एवढेच दिवे त्यांना लावता येतात,’ असे सर्जेरावकाका घोरपडे बाबांना नेहमी म्हणायचे.

‘उत्कट भव्य तेचि घ्यावे

मिळमळीत अवघेचि टाकावे

निस्पृहपणे विख्यात व्हावे

भूमंडळी’

– हा समर्थाचा उपदेश वंद्य मानून बाबांनी अशा लोकांना उत्तरे देण्यात वेळ फुकट घालवला नाही. एकदा सभेत एका श्रोत्याने याबद्दल विचारले असता ‘दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो’ असे उत्तर बाबांनी दिले होते. काही टीकास्पद लोक बाबांची परत मदत मागायलाही यायचे आणि क्षमाशील बाबा त्यांना मदतही करायचे. काही आप्तेष्ट, मित्र व इतर लोक आपल्यावर खोटे आरोप व टीका करत असल्याचे ऐकल्यावर बर्नार्ड शॉने भाष्य केले की, ‘मी या लोकांवर काहीतरी उपकार केले असणार.’ शॉचे हे वाक्य आम्हाला बाबांनी केव्हाच सांगितले होते. हा अनुभव बाबांना नेहमीच येत होता.

काव्य आणि संगीताची त्यांना फार आवड होती. भारतीय संगीताप्रमाणे पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतही आमच्याकडे केव्हापासून आहे. आबासाहेब कुलकर्णी यांची पत्नी बाबांची लांबची मावशी होती. तिने सांगितले की, गोरापान, गुटगुटीत आणि सुंदर असा हा बालक सर्वाना खूप आवडायचा. पोवाडा छान गायचा. सोळाव्या वर्षांपासून नोकरी करून बाबांनी शिक्षण घेतले व भावांच्या शिक्षणासही हातभार लावला. सकाळी खूप लवकर उठून ते जायचे व उशिरापर्यंत काम करायचे. शाळेत असताना पुस्तके घ्यायला पसे नव्हते तेव्हा त्यांच्या मित्रांची पुस्तके ते वाचत. धाकटय़ा भावाला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये घातले होते. अध्र्या पेन्सिलीसुद्धा खूप महाग वाटायच्या. पण बाबा कष्टाने पसे मिळवून त्याच्यासाठी लागणारी सर्व सामग्री आणायचे. गोपिनाथकाकांना याची खंत वाटून ते म्हणायचे, ‘गोिवदा, तू एकटाच एवढे कष्ट का करतोस? तुझ्या भावांनासुद्धा काम करायला लाव.’ पण बाबांनी कधीच भावांना कामाला लावले नाही. लग्न झाल्यावरही ते सगळा पगार वडिलांच्या हातात देत असत. पण वडिलांच्या तोंडाचा पट्टा कधी थांबला नाही. बाबा न बोलता कष्ट करीतच राहिले. हे सर्व बाबांनी आम्हाला कधीही सांगितले नाही. पण आई, गोपिनाथकाका आणि जुन्या शेजाऱ्यांनी सांगितले.

२०१४ साली अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये चुका व अमानुष हाल होऊन आई गेली. त्या शोकातून ते कधी सावरले नाहीत. अलीकडे आजारपणात ‘शकुन मी आलो’ असे आईला उद्देशून ते हाका मारत असत. मानसिक व शारीरिक ताणाने श्वासाचा त्रास वाढमून त्यांना धाप लागू लागली की द्विजेन्द्रलाल रॉय यांचे हेमंतकुमारनी गायलेले गाणे आम्ही यूटय़ूबवर टीव्हीवर लावायचो.

‘धनधान्नो पुष्पेर भरा, आमादेर एई वसुंधरा

..शेजे आमार जन्मभूमी॥’

यातील भारतमातेचे सुंदर वर्णन ऐकून बाबांना एकदम मन:शांती लाभायची. हे गीत आपले राष्ट्रगीत व्हायला पाहिजे असे त्यांचे मत होते. पूर्वी काश्मीरला दल सरोवरात विहार करताना त्यांनी ते प्रथम ऐकले होते. भारतावर त्यांचे अतीव प्रेम होते.

२३ मार्चनिमित्त भगतसिंगावर त्यांना लेख लिहायचा होता. जाण्यापूर्वी आठवडाभर ते भगतसिंगाचे नाव घेत होते. बोलण्याची ताकद राहिली नव्हती. क्षीण आवाजात बोलायचे. दिवाळी अंकांसाठी त्यांचे सात लेख डोक्यात तयार होते. त्यातील दोन ‘साधना’साठी होते. आम्हाला रोज त्याबद्दल बाबा सांगत. भगतसिंग यांचे वाचन, तिबेटमधील अत्याचार, इंदिरा गांधींनी काँग्रेस मोडली, पण इतर पक्षांची अवस्था काय होती व आहे, इंदिरा गांधी, जे.पीं.च्या पक्षाची अवस्था, लेनिन, गोअिरगचा भाऊ अशा वेगवेगळ्या विषयांवर ते लिहिणार होते. भाजपला पर्याय कसा निर्माण करायचा याचाही ते विचार करीत होते. अनेक रात्री ते झोपत नव्हते तेव्हा रात्री सारखे हेच बोलायचे. नेहरू, गांधी, अक्साई चीनचे धोरण, नेहरूंचे इंदिरा गांधींबद्दलचे मत..

एका रात्री हॉस्पिटलमध्ये ते गंभीररीत्या आजारी होते. आपण कोठे आहोत, विचारल्यावर दरवेळी मुंबई सांगायचे. त्या रात्री त्यांना निरुपमाचे नाव आठवले नाही. तिला ते सारखे ‘शकुन, शकुन’ म्हणत होते. सुषमाचे नाव त्यांना फार कष्टाने आठवले. पण त्याच वेळी त्यांनी  आम्हाला नेहरूंचे इंदिरा गांधींबद्दल काय मत होते, ते कुठच्या पुस्तकात आहे, त्या लेखासाठी त्यांना कुठची पुस्तके पाहिजे आहेत, हे बरोबर सांगितले. मुद्दे सांगितले. मधेच ते म्हणायचे की, हे पान नीट लावलंय का ते बघ. गेले काही दिवस ते पेपर वाचू शकत नव्हते. आम्ही त्यांना वाचून दाखवीत होतो. मुंबई, पुणे व इतर ठिकाणच्या नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल काय लागणार याची त्यांना उत्सुकता होती. आम्ही निकाल वाचून दाखविला तरी त्यांना भारतातील मित्रांकडूनच प्रत्यक्ष काय घडले व का, याची माहिती पाहिजे होती. काँग्रेसची अधोगती झालेली बघून त्यांना वाईट वाटले. मुंबई व इतर नगरपालिकांतील भाजपचे यश हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आहे, असे बाबा म्हणाले. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा निकाल काय लागणार याबद्दल उलटसुलट बातम्या येत होत्या. आम्ही बाबांना निकाल वाचून दाखविला तेव्हा ‘मोदींचे हे यश आहे,’ असे बाबा म्हणाले. आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री करणार, असे भारतातील मित्रांनी त्यांना सांगितले व बाबांनी त्यावर लेख लिहिला पाहिजे असेही सुचवले. आदित्यनाथांचे प्रताप ऐकून बाबा भयंकर अस्वस्थ झाले होते.

ज्योतिरादित्य शिंदे व सचिन पायलट यांना काँग्रेसची धुरा सांभाळायला दिली तर काँग्रेसला काहीतरी आशा आहे, असे बाबा म्हणाले. राहुलने त्याचे आजोबा फिरोज गांधी यांचा कित्ता गिरवावा, असा लेख त्यांनी २२ ऑक्टोबर २०१५ च्या ‘आउटलुक इंडिया’च्या अंकात लिहिला होता.

भारतातील सध्याच्या असहिष्णुतेबद्दल त्यांना वैषम्य वाटे. पण ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी’ असे म्हणून ते भारताबद्दल आशावादीच होते.

आता तर बाबाच गेले..

कृष्णाकाठी कुंडल आता पहिले राहिले नाही॥

डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर

stalwalkar@hotmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daughters remembering father govind talwalkar
First published on: 02-04-2017 at 02:22 IST