अग्रलेखासारख्या नाही म्हटले तरी तात्कालिक व घाईगर्दीच्या लेखनप्रकाराला वाङ्मयीन मूल्य आणि वैचारिक अधिष्ठान देणे हे संपादकाच्या ताकदीवर अवलंबून असते. तळवलकर अशाच समर्थ संपादकांपैकी आहेत..

प्रयोगशील चित्रपटांच्या एका दिग्दर्शकांनी प्रायोगिक व अन्य चित्रपटांतील अंतर विशद करताना एक मोठा अन्वर्थक दाखला दिला होता. ते म्हणाले की, देशातील कोणत्याही मोठय़ा इंग्रजी दैनिकाचे संपादक कोण, हे आपल्यापैकी पुष्कळांना माहीत नसते. परंतु तसे आपण नित्य वाचतो त्या मराठी अगर देशी भाषी दैनिकांचे नाही. तसेच चित्रपटांचे आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक तळवलकर आहेत हे मराठी वाचकांना माहीत आहे आणि असते. इंग्रजी वृत्तपत्रांशी आपली तोंडओळख असते. उलट, मराठी वृत्तपत्रांशी आपले नाते असते. मराठी दैनिकांना अजून तरी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. या व्यक्तित्वात सर्वात मोठा वाटा असेल तर तो त्या दैनिकाच्या संपादकांचा. बहुतेक वृत्तपत्रे व नियतकालिके त्यांच्या संपादकांवरूनच ओळखली जातात. महाराष्ट्रात ही प्रथा फार जुनी आहे. तळवलकर उणीपुरी बारा वर्षे म. टा.चे संपादक आहेत. या प्रदीर्घ अवधीत त्यांनी असंख्य विषयांवर सातत्याने लेखन केले. दैनिकातील लेखन व त्यातील अग्रलेख अगर संपादकीये यांचे आयुष्य क्षणिकच मानले जाते. त्यांचे स्वरूपही प्रामुख्याने प्रतिक्रियात्मक असते. परंतु मराठी वृत्तव्यवसाय व त्यातल्या त्यात काही व्युत्पन्न मतीच्या व्यासंगी, सव्यसाची व शैलीदार संपादकांनी प्रतिक्रियात्मक क्षणिक संपादकीय लेखनालाही दीर्घायुष्य आणि विचारगर्भता बहाल केली आहे. महाराष्ट्रात असे जे थोडेफार संपादक आहेत त्यात तळवळकरांचा क्रम पहिल्या श्रेणीत लागतो. आपल्या शैलीचा, खोचक आणि रोचकपणाचा व फटकळ तर्कपद्धतीचा तळवलकरांनी मराठी वाचकांना अक्षरश: लळा लावला आहे. वाचकांची व त्यांची तार इतकी जुळलेली असते, की ज्या घटनेचा वाचकाच्या बुद्धीने व मनाने सहजी वेध घेतलेला असतो त्या घटनेवर तळवलकर काय व कसे लिहितात याची तो उत्कंठेने वाट बघत असतो.

तळवलकरांनी जे अग्रलेख लिहिले त्यांतले निवडक असे शे-सव्वाशे ‘अग्रलेख’ त्याच नावाच्या ४०० पानी ग्रंथात नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. त्याद्वारे १९६९ ते ८० पर्यंतच्या काळाचा वैचारिक आलेखच आपल्या दृष्टीसमोर उभा राहतो. १९६९ साली इंदिरा गांधींनी फुटकळ विचार प्रसृत करून काँग्रेस पक्षात पहिली फूट पाडली. मोरारजी, निजलिंगप्पा वगैरेंना त्यांनी पक्षातून बाहेर काढले. या घटनेपासून अगदी ८० सालात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अंतुले यांनी शिवाजीमहाराजांच्या भवानी तलवारीचा जो ध्यास घेतला तिथपर्यंतच्या भिन्न राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विचारांचा चिरेबंद प्राकारच तळवलकर आपल्यासमोर आणून उभा करतात. वृत्तपत्रीय लेखन काळाच्या दृष्टीने तात्कालिक संदर्भाचे असते ही गोष्ट तळवलकरांचे हे निवडक अग्रलेख वाचल्यावर खोटी पडते. उलट, एका व्यासंगी, चिकित्सक आणि तटस्थ निरीक्षकाच्या विचाराचा ताळेबंदच आपल्याला बघायला मिळतो.

दैनिकाच्या संपादकांच्या बाबतीत पुष्कळदा असे होण्याचा संभव असतो की, त्याच्या लेखणीतून उतरलेला अग्रलेख कालांतराने त्यालाच विसंगत व हास्यास्पद वाटू लागतो. वैचारिक पिंड तयार नसेल, दृष्टी परिपक्व नसेल आणि चिंतन वरवरचे असेल तर असाच अनुभव येण्याची शक्यता जास्त. तळवलकरांच्या अग्रलेखांतून आरपार वैचारिक स्पष्टता आणि सुसंगती दिसून येते.

राजकीय घडामोडींचे विश्लेषण करताना तळवलकरांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा, यशवंतराव मोहिते, मोरारजीभाई, जगजीवनराम, शरद पवार, बाळासाहेब देसाई, मधुकरराव चौधरी, मधु लिमये, बाळासाहेब देवरस, कॉ. डांगे, विठ्ठलराव गाडगीळ अशा अनेक व्यक्तींविषयी त्या, त्या वेळच्या घटनांच्या अनुरोधाने लिहिले आहे. या व्यक्तींविषयीची त्यांची अनुमाने व त्यांच्या विचारांचे आकलन इतके स्पष्ट आणि निर्दोष आहे की, त्यात या क्षणीही बदल करण्याची गरज भासत नाही अथवा गफलत झाल्याचे आढळत नाही. इंदिरा गांधींनी नंतर सरळसरळ लोकशाही गुंडाळून ठेवली व आपली एकाधिकारशाहीच लादली. तळवलकरांचे इंदिरा गांधींविषयीचे आकलन आरंभापासूनच बिनचूक होते. आपल्या ६९ सालच्या व या ग्रंथातील पहिल्याच अग्रलेखात (सत्तावादाचा बळी) तळवलकर लिहितात, ‘मोरारजी देसाई हे इंदिरा गांधी यांच्या समाजवादाचे बळी झाले नसून ते सत्तावादाचे बळी झाले आहेत.’ इंदिरा गांधींविषयी तळवलकरांचे आकलन निश्चित व वास्तव होते. मोठमोठे मुत्सद्दी फसले; परंतु तटस्थपणे इंदिरा गांधींचे राजकीय चरित्र न्याहाळणारा संपादक अधिक ठाम आणि सुसंगत ठरला.

तळवलकरांच्या अग्रलेखांना दीर्घकालीन मूल्य लाभते ते त्यांच्या व्यासंगी व वस्तुनिष्ठ निरीक्षणशक्तीने. पहिल्या राजकीय भागात जे ३५ अग्रलेख देण्यात आले आहेत, त्यात किमान दहा अग्रलेख इंदिरा गांधींच्या राजकीय विचारांची व आचारांची निर्भीड चिकित्सा करणारे आहेत.

असे म्हणतात की, यशवंतराव चव्हाण व शरद पवार या दोघांविषयी तळवलकरांना खास ममत्व असल्याने त्यांची लेखणी इतरांचे जेवढे वाभाडे काढते तेवढय़ा वेगाने ती या दोघांच्या बाबतीत चालत नाही. व्यक्तिश: कोणाचे काय संबंध असतील ते असोत; विचारांशी त्यांची गल्लत होऊ नये, हे खरे. यशवंतरावांविषयी तळवलकरांनी ‘साफ चूक’ व ‘काँग्रेसजनांपुढील पर्याय’ यामधून सडेतोड मतप्रदर्शन केले आहे. जनता पक्षाविषयी यशवंतरावांनी जे विश्लेषण मुंबईत माथाडी कामगारांच्या सभेत केले होते, त्याचे जोरदार खंडन तळवलकरांनी केले असून यशवंतरावांच्या चुका स्पष्टपणे दाखविल्या आहेत. ते म्हणतात, ‘जनता पक्ष म्हणजे जनसंघ, हे समीकरण वस्तुस्थितीला धरून नाही. जनसंघाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले की ते पुरोगामी ठरतात आणि इतर पक्षांत गेले तर तो पक्ष प्रतिगामी बनतो, असा यशवंतराव यांचा युक्तिवाद दिसतो व तो अजब आहे. या युक्तिवादाचा अवलंब केल्यामुळे काँग्रेसने जे राजेमहाराजे निवडणुकीत उभे केले ते सर्व पुरोगामी व जनता पक्षात जनसंघ सामील असल्याने चंद्रशेखर, मधु लिमये हे जनसंघवादी म्हणजे प्रतिगामी असे मानावयाचे काय?’ याच अग्रलेखात तळवलकर त्यांचे मित्र शरद पवारांनाही पट्टय़ावर घेताना दिसतात. जनता पक्षाच्या राजवटीत आवश्यक वस्तूंचे भाव चढले व श्रीमंतांना लागणाऱ्या लवंगांचे मात्र कमी झाले. या टीकेचा समाचार घेताना तळवलकर पवारांना इंदिरा गांधींच्या राजवटीतील महागाईची आठवण करून देतात व म्हणतात की, ‘तेव्हा भाव भडकले असल्याबद्दल टीका करणे शरद पवारांना शक्य नव्हते. त्यावेळी फक्त वीस कलमीचा गजर व इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचा नामजप.’

इंदिरा गांधी चिकमंगळूरच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर काँग्रेसजनांत परत एकीकरणाची लाट सुरू झाली. यशवंतरावांना अशा वेळी तळवलकरांनीच प्रश्न विचारून पेचात टाकलं आहे. काँग्रेसमधील बहुमत काय म्हणते ते बघू व मगच काय ते ठरवू, असे यशवंतरावांनी तेव्हा मत दिले होते. तळवलकर त्यावर म्हणतात, ‘असे करण्याने प्रवाहाबरोबर वाहत जाण्याखेरीज त्यांना गत्यंतर उरणार नाही. अशा रीतीने त्यांनी बहुमताचा मान राखण्याचे ठरविले तर त्यात पक्षांतर्गत लोकशाहीची बूज राखली असे ठरणार नसून इंदिरा गांधींपुढील ती शरणागती आहे. आणि इतरांप्रमाणे यशवंतरावही सत्तेत वाटा मिळावा म्हणून इंदिरा गांधींच्या दिंडीत सामील झाले आहेत असाच लोकांचा ग्रह होणार आहे.’ पुढचे तळवलकरांचे भाकीत भविष्याइतके खरे निघाले आहे. ते म्हणतात, ‘इंदिरा गांधी खरोखरच राज्यावर आल्या तरी त्या यशवंतरावांना बिलकूल थारा देणार नाहीत. शिवाय असे मेहरबानीने मिळालेले स्थान महाराष्ट्रात आणि बाहेरही यशवंतरावांची अब्रू घालविणारेच ठरेल.’

तळवलकर हे शैलीदार अग्रलेख लिहिणारे संपादक आहेत. त्यांच्या या शैलीचा घाट जसा ललित आहे तसाच तो विचाराची घनता व्यक्त करणाराही आहे. अग्रलेखाच्या मथळ्यापासूनच त्यांच्या शैलीचा प्रत्यय येतो. ‘यशवंतराव (मोहिते) वीस कलमे, विरक्तांची वंचना, इनामदारांचा बाळू, मधुवाणी, मुंबईतील व्रात्यस्तोम विधी, महाराष्ट्राचा ‘सभ्य गृहस्थ’, पंडित माऊंटबॅटन, विचारवंतांचे योगवासिष्ट, समाजवादी लक्षभोजन, संन्याशाचा सदरा, सचिवालयातील मेहूण, पुण्यश्लोक नामजोशी, नवे व्यासपर्व’ अशा आकर्षक मथळ्यांचे अग्रलेख तळवलकरांनी विपुल लिहिले आहेत. वाचकांचे लक्ष चटकन् वेधण्याची त्यांची क्षमता व शब्दावरील प्रभुत्व यावरून जाणवते.

तळवलकरांची तर्कपद्धती, युक्तिवादाची लकब व मधूनच विरोधकांची रेवडी उडविण्याची हातोटी त्याची स्वत:ची व विशेष अशी आहे. जयप्रकाशजींविषयी त्यांना नितांत आदर आहे. परंतु भूदान, ग्रामदान आंदोलनांतील भोंगळपणा त्यांना त्याज्य वाटतो. पूर्णियाच्या आव्हानावर लिहिताना मधूनच ते जगजीवनराम यांचा नक्षा उतरवून ठेवतात.

आचार्य अत्रे यांचे तळवलकरांनी मार्मिक मूल्यमापन केले आहे. फटकळपणे ते लिहितात की, ‘अत्र्यांच्या प्रकृतीला व प्रवृत्तीला संयम माहीत नसल्याने त्यांनी आपल्या लेखणीचा व वाणीचा अमर्याद उपयोग करून अनेकांना अपमानित केले.’ अत्र्यांच्या अग्रलेखांची खूण मात्र त्यांनी नेमकी सांगितली. ते म्हणतात, ‘कोणत्याही विषयावरील अत्र्यांचा लेख हा कोणालाही ओळखू येत असे आणि कोणालाही तो समजत असे.’

व्यक्तिगत विभागातील त्यांचे चार्ली चॅप्लिन, ग. दि. माडगूळकर, पु. भा. भावे, तात्यासाहेब केळकर, दत्तो वामन यांच्यासंबंधीचे लेख चटका लावणारे आहेत. या लेखांना सूक्ष्म निरीक्षणाच्या बरोबरच कारुण्याची व विषादाची तरल झालर असलेली दिसते. ‘एक मैफल संपली’ व ‘एक वादळ शांत झाले’ हे मृत्युलेख तर भावनोत्कटतेचे उत्कृष्ट नमुने ठरावेत. मराठी पत्रसृष्टीत मृत्युलेख लिहिण्याचे कौशल्य काकासाहेब नवरे व आचार्य अत्रे यांच्याइतके इतरांत क्वचितच आढळते. तळवलकरांचा हा ‘अग्रलेख’ संग्रह वाचून या दोन नावांत त्यांच्याही नावाची भर घालणे आवश्यक आहे हे पटते.

तळवलकरांची वैचारिक बैठक व दृष्टी पक्की आणि स्वच्छ असल्याने त्यांच्या एकूण लिखाणात व विवेचनात कुठेच विसंगती आढळत नाही. त्यांनी निष्णात संपादकाच्या मरातबाने जनमताला आकार दिला आहे. लोकशिक्षण केले आहे. आणि शिक्षणाबरोबर लोकांच्या माहितीत सातत्याने भर टाकली आहे. त्यांचा स्वत:चा व्यासंग फार दांडगा आहे. त्याचा त्यांना फार उपयोग झाला आहे.

तळवलकर दोन हात करण्यात व एखाद्याला झोडून काढण्यात पटाईत आहेत. पुष्कळदा ते टोकाला जाऊन झोडतात असे वाटते. परंतु त्यात केवळ टीकेकरिता टीका ही वृत्ती नसते, तर वैचारिक निष्ठांविषयी तळमळ असते. उपहास, परिहास, व्यंजना यांचे उत्कृष्ट नमुने बघावयाचे असतील तर या संग्रहातील ‘विरक्तांची वंचना, इनामदारांचा बाळू, विचारवंतांचे योगवाशिष्ट, संन्याशाचा सदरा, सचिवालयातील मेहूण, शालिनीबाईची खंडणी, मोहिते यांचे जांभूळझाड, नवे व्यासपर्व’ हे अग्रलेख वाचावेत. विषयाचे गंभीर प्रतिपादन चालू असताना मध्येच तळवलकर चार-दोन ढुसण्या देऊन अगर चिमटे काढून पुढे निघून जातात. नंतर काय झाले ते लक्षात येते. ‘शिंदे घरी आले, सावधान’ या लेखात त्यांनी म्हटले आहे- ‘सुशीलकुमार स्वगृही परतले. छान झाले. भटकंती संपली हे काही वाईट नाही. इंदिरा काँग्रेसमध्ये अशा अनेक भटक्यांची गर्दी झाली आहे. भटक्या व विमुक्त राजकारणी जातींची ही वसाहत भरभराटत आहे.’

मराठी संपादकाला जवळजवळ सर्व ब्रह्मांडाचा व्यापच आपल्या अग्रलेखाच्या मर्यादेत सांभाळावा लागतो. त्याला काही वज्र्य मानता येत नाही. आचार्य रजनीशांपासून अध्यात्मापर्यंत व पोटापाण्याच्या प्रश्नापासून मोक्षापर्यंत कोणत्याही विषयावर त्याला मतप्रदर्शन करावे लागते. व्यासंगाचा आवाका नसेल तर ही प्रतिसृष्टी सांभाळली जाणे कठीणच. त्यातही वैचारिक बैठक पक्की असेल तर मग कुठेच दर्जा घसरत नाही. यावरून मराठी वृत्तपत्राचा संपादक सर्वज्ञ असतो असा दावा करता येणार नाही. तथापि, त्याचे अभ्यासाचे, चिंतनाचे विश्व व्यापक असावे लागते व त्याचे वैचारिक व्यक्तित्व बरेचसे सम्यक असावे लागते, एवढे मात्र खरे. तळवलकरांनी जुन्या, व्यासंगी संपादकांची परंपरा नुसतीच सांभाळली नाही तर तिला आपल्या परिस्थितीला व काळाला साजेल असा उजाळा दिला.

संपादक म्हणून त्यांची दृष्टी एका विधायक लोकशाहीवाद्याची आहे. सत्ताधारी पक्षावर ते कोरडे ओढतात, तेवढीच टीका ते विरोधी पक्षावरही करतात. विरोधी पक्षांनी केवळ विरोधासाठी विरोध करू नये, तर आवश्यक तेथे सहकार्यही केले पाहिजे, यावर ते सर्वत्र भर देताना आढळतात. तळवलकरांची मानवतावादी दृष्टी धर्म आणि जुन्या इतिहासाविषयीचा अभिनिवेश यांनी शबलित  झालेली नाही. चातुर्वण्र्याचे समर्थन करून उगाच गोल गोल युक्तिवाद करणाऱ्या गोळवलकरांनाही त्यांनी कठोरपणे खडसावले आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तथाकथित पुरोगाम्यांनी फारच सवंग करून टाकला आहे. त्यांची हजेरी घेऊन तळवलकर मुस्लीम जातीयवादाचीही यथेच्छ खरडपट्टी काढतात. राष्ट्रवादावर भर देत असतानाच तळवलकर हा राष्ट्रवाद आक्रमक बनणार नाही याची काळजी घेतात.

देशांतर्गत प्रश्नांइतकाच त्यांचा देशाबाहेरील प्रश्नांचा व्यासंग आहे. भारताचे परराष्ट्र धोरण अलिप्ततेच्या नावावर जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा रशियाधार्जिणे बनले, त्या प्रत्येक वेळी तळवलकरांनी स्वच्छपणे बजावले आहे. समतावादी असूनही रशियामध्ये साम्यवादाच्या बुरख्याखाली जी हुकूमशाही शासन व पक्ष बळकावून बसली आहे, त्यावरही त्यांनी वेळोवेळी लख्ख प्रकाश टाकला आहे. पुष्कळदा असे होते की, दैनंदिन प्रश्नांवर लिहिण्याचाच अधिक सराव पडत असल्याने गहन अशा तात्त्विक विषयावर लिहिणे अवघड जाते. मराठी पत्रसृष्टीत तात्त्विक विषयावर लिहिणारे दोन संपादक प्रसिद्ध आहेत. कै. ह. रा. महाजनी व  प्रभाकर पाध्ये. तळवलकरांनी ती वाटही सामर्थ्यांने चोखाळलेली दिसते. मार्क्‍स, लेनिन, माओ, जयप्रकाश, विनोबा आणि गांधी यांच्याविषयीही त्यांनी लिहिले आहे.

आर्थिक प्रश्नांवरचे तळवलकरांचे अग्रलेख आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांइतके बिनतोड व चिरेबंद आहेत असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. तरीदेखील एका मोठय़ा दैनिकाचे संपादक म्हणून त्यांना अनेक आर्थिक प्रश्नांवरही मतप्रदर्शन करावे लागले आहे. आम्ही आरंभी जे म्हटले की, तळवलकरांची वैचारिक बैठक तयार व व्यापक आहे त्याची साक्ष त्यांचे आर्थिक विषयांवरचे अग्रलेख देतात. सर्वत्र एकच वैचारिक पिंड व सुसंगत चिंतनाचे अधिष्ठान बघावयास मिळते. लोकशाही, स्वातंत्र्य, जबाबदार नागरिकाची कर्तव्ये असल्या मूलगामी प्रश्नांवर तळवलकर कुठल्याच क्षेत्रात धरसोड करीत नाहीत. मग जनता पक्षावरही ते तुटून पडतील व त्या पक्षाची सांगता करा, असा सल्ला देतील. समाजवादाच्या स्वस्त व विपरीत कल्पनांची हजेरी घेताना ते राष्ट्रीयीकरणाची भंबेरी उडवतील; परंतु मक्तेदारीच्या वाढीवरही तुटून पडतील. रशिया आणि साम्यवाद यांचे ते कडवे टीकाकार आहेत हे खरे, परंतु त्यामुळे ते अमेरिकेला फुकाचे झुकते माप देणारे नाहीत. वॉटरगेटवर याच संग्रहात त्यांचे किमान चार अग्रलेख छापण्यात आले आहेत. लोकशाही मतलबी व संकुचित झाली तर ती तळवलकरांच्या दृष्टीने क्षम्य ठरत नाही.

अग्रलेखासारख्या नाही म्हटले तरी तात्कालिक व घाईगर्दीच्या लेखनप्रकाराला वाङ्मयीन मूल्य आणि वैचारिक अधिष्ठान देणे हे संपादकाच्या ताकदीवर अवलंबून असते. तळवलकर अशाच समर्थ संपादकांपैकी आहेत. त्यांची शैली एखाद्या खटय़ाळ प्रेयसीसारखी आहे. हवीहवीशी वाटणारी, बेजारी ही या शैलीची खास ढब आहे. ती चिमटे काढते, प्रसंगी बोचकारते, क्वचित अंत पाहते; परंतु आरंभापासून शेवटपर्यंत तिचा खळाळ निर्मळ झऱ्यासारखा प्रसन्न असतो.

तळवलकरांच्या लेखनसामर्थ्यांचे दर्शन प्रामुख्याने घडते ते जेव्हा अण्णा माडगूळकर, पु. भा. भावे, जयप्रकाशजी व चार्ली चॅप्लिनविषयी लिहितात तेव्हा. कारुण्य आणि भावनोत्कटता यांनी थबथबलेले शब्द नव्हे, मनाच्या अवस्थाच त्यांनी आपल्या लेखांत शब्दांकित केल्या आहेत. चार्ली चॅप्लिनविषयी ते लिहितात, ‘चार्ली चॅप्लिन यांना इंग्लंडच्या राणीने पुढे ‘सर’ ही पदवी दिली. पण ‘सर चार्ली चॅप्लिन’ हे ‘पद्मभूषण बालगंधर्व’ यासारखेच कानाला खटकते व मनाला पटत नाही. उलट, साधे चार्ली चॅप्लिन म्हटले की त्यांच्या अनेक असामान्य भूमिका डोळ्यांपुढून जातात आणि त्यांच्या निधनाने ‘नमन नटवरा विस्मयकारा’ असे उद्गार आपोआपच निघतात.’ तळवलकरांच्या अंतरंगाचे हे दर्शन होय.

अनंत भालेराव

‘अग्रलेख’- गोविंद तळवलकर, प्रेस्टीज  पब्लिकेशन्स.

( १९८२ मध्ये ‘दैनिक मराठवाडा’च्या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झालेले परीक्षण)