रतन टाटा यांच्यानंतर टाटा उद्योगसमूहाचे चार वर्षांपूर्वी निवडले गेलेले उत्तराधिकारी सायरस मिस्त्री यांची नुकतीच अध्यक्षपदावरून तडकाफडकी गच्छंती करण्यात आली. त्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपांचे रणकंदन सुरू आहे. टाटा समूहाचा आजवरचा आदर्श, मूल्याधिष्ठित कारभार आणि नावलौकिक याला हे खचितच साजेसे नाही.
मोरारजी देसाई पंतप्रधान असतानाची ही गोष्ट. त्यांचे आणि जेआरडी टाटा यांचे संबंध कधीच सौहार्दाचे नव्हते. पन्नासच्या दशकात मोरारजी मुंबईत संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री असताना जेआरडींच्या वीज कंपनी प्रयत्नांना त्यांचा विरोध होता. मुंबईला विजेची गरज नाही, असं देसाई यांनी टाटांना सुनावलं होतं. मोरारजी केंद्रीय अर्थमंत्रीही होते. तो लायसन राजचा काळ. सरकार ज्यात त्यात नाक खुपसायचं. त्यावेळी टाटा स्टीलला- म्हणजे तेव्हाची टिस्को- समभाग बाजारात आणायचे होते. तर त्याची किंमत किती असावी, हेसुद्धा मोरारजी देसाई यांनाच ठरवायचं होतं. त्यावरनंही त्यांनी जेआरडी टाटांची कोंडी केली. आणि पुढे पंतप्रधान झाल्यावर देसाई यांनी जेआरडींना टाटा मूलभूत संशोधन संस्था (टी. आय. एफ. आर.), अणुऊर्जा आयोग अशा सगळ्याच संस्थांवरनं दूर करायचा चंग बांधला. आणि त्यात एके दिवशी भल्या सकाळी जेआरडींना निवृत्त हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल पी. सी. लाल यांचा फोन आला. कोलकात्याहून. जेआरडी मुंबईत होते. एका पत्रकाराला त्यांनी मुलाखतीसाठी ताजमध्ये वेळ दिली होती.
त्या फोननं जेआरडींना खूप दु:ख झालं. लाल त्यांना म्हणाले : पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा आदेश आहे. एअर इंडियाच्या अध्यक्षपदाची सूत्रं त्यांनी ताबडतोब हाती घ्यायला मला सांगितलंय. मी काय करू?
जेआरडी उत्तरले : आदेशाचा आदर करायलाच हवा. त्या आदेशामुळे माझा अनादर होतोय किंवा काय, याचा विचार तू करायचं कारण नाही. तू पंतप्रधान म्हणतायत तसंच कर.. एअर इंडियाची सूत्रं हाती घे.
खुद्द जेआरडीच त्यावेळी एअर इंडियाचे अध्यक्ष होते. आणि पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अत्यंत असभ्यपणे देशातल्या पहिल्या हवाई कंपनीच्या या संस्थापकाला पदावरनं दूर केलं होतं. जेआरडी अत्यंत खिन्न झाले. पण मनाच्या त्या अवस्थेतही त्यांनी मुलाखतीची वेळ पाळली. त्या पत्रकाराला जो काय झाला तो प्रकार त्यांनी सांगितला. ही घटना इतकी मोठी होती, की जेआरडींच्या अपमानाच्या निषेधार्थ के. जी. अप्पुस्वामी आणि नरी दस्तुर या एअर इंडियाच्या दोन संचालकांनी लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला. जेआरडींची गच्छंती वादळीच होती. इतक्या मोठय़ा व्यक्तीला पंतप्रधान इतक्या असभ्यपणे कसं काय पदावरनं दूर करू शकतात? सगळ्यांना वाटलं, जेआरडीही प्रक्षुब्ध असतील.. संतापलेले असतील. पंतप्रधान देसाई यांच्या नावानं बोटं मोडतील. याच भावनेनं त्या पत्रकारानं जेआरडींकडे प्रतिक्रियेच्या अपेक्षेनं पाहिलं. जेआरडी इतकंच म्हणाले..
“There is always way of doing things gracefully. If you have to do something, do it with dignity.ll” जे काही करायचं त्यात अदब, आब आणि सभ्यता हवी..
जेआरडी इतकंच बोलून थांबले नाहीत. त्यांना हटवलं म्हणून राजीनामा देणाऱ्या अप्पुस्वामी आणि दस्तुर यांना ते म्हणाले, पंतप्रधानांनी मला काढलं तो त्यांचा निर्णय आहे. अधिकार आहे. तो मी मान्य करायला हवा. तुम्ही जे केलंत ते योग्य नाही. पंतप्रधानांच्या विरोधात असं दबावतंत्र वापरण्याचं काहीही कारण नाही. We don’t do that at Tatas.
ही गोष्ट १९७८ सालातली.
त्यानंतर जवळपास ३८ वर्षांनी सायरस मिस्त्री या उत्तराधिकाऱ्यानं जेआरडींचं विधान खोटं ठरवलं. पदावरनं दूर केल्यावर ज्या पद्धतीनं सायरस मिस्त्री वागले, ते टाटा समूहाच्या प्रमुखाला शोभा देणारं खचितच नव्हतं. त्यातून या पदासाठी आपली निवड किती चुकीची होती, हेच सायरस यांनी दाखवून दिलं. त्यात एका गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष झालं.
ते म्हणजे- औद्योगिक विश्वात मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा अध्यक्ष हा अन्य कोणत्याही नोकरासारखा नोकरच असतो. पद कितीही मोठं असलं तरी त्याचं नोकरपण लपू शकत नाही. संचालकांनी- मग ते समभागधारक असोत किंवा खासगी व्यक्ती- एकदा का अविश्वास दाखवला, की पदत्यागाखेरीज त्यास दुसरा कोणताही मार्ग नाही. हा अविश्वास कितीही अन्यायकारक किंवा चुकीचा असला तरी तो शिरसावंद्य मानावाच लागतो. ती त्या पदाची नियती असते.
सायरस मिस्त्री यांना आपण यास अपवाद ठरू असं वाटलं असावं. त्यामागचं कारण म्हणजे अर्थातच टाटा समूहात त्यांचा असलेला मालकी-वाटा. वास्तविक मिस्त्री घराण्याकडे टाटा कंपनीचा इतका मोठा वाटा जाऊ देण्यास खुद्द जेआरडींचा तीव्र विरोध होता, हा इतिहास आहे. जमशेटजी जेव्हा टाटा समूहाची मुहूर्तमेढ रोवत होते तेव्हा शापुरजी पालनजी मिस्त्री बांधकाम व्यवसायात.. म्हणजे बिल्डर.. नशीब अजमावत होते. ग्रँट रोड परिसरातल्या चाळीत राहायचे ते. पुढे यातूनच सर सोराबजी पोचखानवाला आणि फ्रामरोज एडलजी दिनशॉ यांची घरं त्यांनी बांधली. या दिनशॉ यांनी टाटांना वीज कंपनी उभारण्यासाठी त्यावेळी दोन वेळा एकेक कोट रुपये दिले होते. जमशेटजी यांच्या आकस्मिक निधनानंतर दोराब टाटा यांना त्यांची मदत होती. पण टाटा काही हे पसे परत करू शकले नाहीत. त्यांनी त्या बदल्यात दिनशॉ यांना कंपनीची मालकी दिली. पण नंतर दिनशॉच गेले. त्यावेळी दिनशॉ यांचा हा मालकी-वाटा शापुरजी यांच्याकडे गेला. ते त्यांनी कसं केलं, त्याबाबत गूढ आहे. जेआरडींचे पूर्वसुरी नवरोजजी सकलातवाला यांच्याकडे टाटा समूहाची धुरा असताना हे घडलं. त्याही वेळी जेआरडींनी त्याविषयी संताप व्यक्त केला होता.
आणि पुढे जेआरडींचा सख्खा भाऊ दाराब यानंही तेच केलं. तो चक्रम होता. रागीट तर होताच होता. एकदा जेआरडींवर तो इतका रागावला, की टाटा समूहातला आपला वाटा त्यानं थेट मिस्त्री कुटुंबीयांना विकला. त्याही वेळी जेआरडी हताश झाले. ‘‘मनानं हताश झालेल्याचा गरफायदा मिस्त्री यांनी घेतला,’’ अशी त्यावर जेआरडींची प्रतिक्रिया होती.
गेल्या आठवडय़ात पदत्यागानंतर टाटा समूहावर शाब्दिक हल्ला चढवणारे सायरस हे त्या मिस्त्री घराण्यातले. ज्या अर्थी अवघ्या चार वर्षांत त्यांना पदावरनं दूर केलं गेलं, त्या अर्थी टाटा समूहातील अन्य धुरंधर आणि रतन टाटा यांचं आणि सायरस यांचं समीकरण जुळलं नाही, हे उघड आहे. या काळात टाटा समूहाची किती मूल्यवृद्धी झाली याचा दाखला सायरस समर्थकांकडून दिला जातो आणि त्याचवेळी समूहातले तोटय़ातले उद्योग त्यांनी कसे बंद करत आणले, हेदेखील कौतुकानं सांगितलं जातं. यातले बरेचसे तोटय़ातले उद्योग रतन टाटा यांनी सुरू केले होते. सबब रतन टाटा यांच्यासाठी महत्त्वाच्या उद्योगांवर टाच आणल्यानं ते रागावले आणि सायरस यांना काढलं गेलं, असं या वर्गाचं म्हणणं.
ते हास्यास्पद आहे. कारण टाटा समूहाला तोटय़ाचं वावडं नाही. जमजेटजी हयात असताना, त्यांच्यानंतर दोराब यांच्या हाती समूहाची सूत्रं असताना आणि नंतर जेआरडी यांच्याकडे कंपनीचं कप्तानपद असतानादेखील टाटा समूहाला अनेकदा मोठय़ा तोटय़ास तोंड द्यावं लागलेलं आहे. खेरीज ज्यातनं काहीही फायदा होत नाही असे टीआयएफआर, टाटा कॅन्सर रीसर्च सेंटर, बंगलोरमधली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (हिच्या उभारणीसाठी तर जमशेटजी टाटांनी आपल्या खासगी इमारती विकल्या!), मुंबईतली हाफकिन संस्था, त्यानंतर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, हडाप्पा मोहंजोदडोचं उत्खनन, मुंबईतल्या प्रिन्स ऑफ वेल्स कलासंग्रहालयातला अमूल्य कलासंसार असे आतबट्टय़ाचे कित्येक उद्योग टाटा समूहानं उभे केले, किंवा त्यात मोठी गुंतवणूक केली. यातनं काहीही नफा मिळण्याची शक्यता नव्हती.. आजही नाही. तेव्हा केवळ तोटा हे काही टाटा समूहासाठी प्रमुखास पदावरनं दूर करण्याचं कारण असू शकत नाही.
पण समूहाला दिशा देण्यातलं आणि दिलेला शब्द राखण्यातलं अपयश हे टाटा समूहाच्या प्रमुखासाठी जीवघेणं ठरतं.
सायरस मिस्त्री यांच्याबाबत हेच घडलं का?
तसं मानण्यास जागा आहे. टाटा स्टीलच्या निमित्तानं ब्रिटनमधील कंपनीला दिलेला आणि डोकोमोच्या निमित्तानं जपानी कंपनीस दिलेला शब्द सायरस यांनी पाळला नाही. या दोन्हीमागचं कारण एकच- तोटा. परंतु केवळ नफा होत नाही म्हणून दिलेला शब्द पाळायचा नाही, हे टाटा समूहानं कधीही केलेलं नाही. यातल्या दुसऱ्या प्रकरणात तर सायरस मिस्त्री यांनी रिझव्र्ह बँकेच्या नियमाचा आधार डोकोमो कंपनीला देणं असलेली रक्कम टाळण्यासाठी घेतला. ही बाब इतकी गंभीर होती, की डोकोमो कंपनीनं टाटांविरोधात आंतरराष्ट्रीय लवादात दावा ठोकला. समूहासाठी ही बाब अत्यंत लाजिरवाणी ठरली. सायरस मिस्त्री यांची गच्छंती त्यातूनच अटळ ठरत गेली. ती टळावी यासाठी सुचवलेल्या मार्गानं जाण्याचं चातुर्य सायरस यांनी दाखवलं नाही. शेवटी त्यांना काढावं लागलं.
ही घटना धक्कादायक आणि अभूतपूर्वच. एका अर्थानं ती सांस्कृतिक संघर्ष दाखवून देणारीही. उद्योग केवळ नफ्यासाठीच चालवायला हवा, ही विचारधारा एका बाजूला आणि दुसरीकडे नफ्याबरोबरीने नतिक मूल्यपालनाचा आग्रह.
हा संघर्ष भारतीय वातावरणात अधिकच तीव्र भासतो. त्याचं कारण संस्कृतीशी निगडित आहे. आपल्याकडे मुदलात अधिकारांचं संक्रमण सहजपणे होत नाही. मग ते संक्रमण राजकीय असो की आíथक. मावळती पिढी अधिकार सोडत नाही. आणि ते घेण्याचा प्रयत्न उगवत्या पिढीनं केला की वयाचा मान हा अतक्र्य मुद्दा पुढे आणला जातो. म्हणजे मग ज्येष्ठांचा मान राखणं, वगरे निर्थक आणि कालबाह्य़ चर्चा घडणं आलंच.
या खास भारतीय परंपरेला टाटा समूहानं आतापर्यंत तरी छेद दिलाय. रतन टाटांच्या हाती कंपनीची सूत्रं गेल्यावर जेआरडी कधीही कंपनी मुख्यालयात फिरकले नाहीत. आणि सायरस मिस्त्री यांची नियुक्ती झाल्यावर रतन टाटांनी त्यांच्यावर आपलं वजन कधीही ठेवलं नाही. तरीही हे सत्तांतर सुखेनव पार पडलं नाही. सायरस यांचं जाणं आणि नंतरचे त्यांचे आरोप यांनी नाही म्हटलं तरी कटूपणा आलाच.
तो टळायला हवा होता.
याचं कारण भारतात मुळात उद्योगपती वर्गात एकही मानक.. आयकॉन.. नाही. अपवाद फक्त टाटा. एक टाटा वगळता भारतीय उद्योगविश्व हे बनियांनी भरलेलं आहे. सरकारदरबारी लांडय़ालबाडय़ा करून दुनिया मुठ्ठी में घ्यायची, ही आपली उद्योगसंस्कृती. ती बदलण्याचा आदरणीय प्रयत्न टाटांचा. सायरस मिस्त्री प्रकरणानं त्यात अडथळा आलाय, हे निश्चित. तो लवकरात लवकर दूर व्हायला हवा. कारण प्रश्न फक्त टाटा समूहाचा नाही. तो उद्योग क्षेत्रातील या नायकशून्य देशाचा आहे. या एकमेवाद्वितीय मानकाचा मानभंग देशाला परवडणारा नाही. तसे एरवी अन्य अनेक क्षेत्रांत ‘सारेच दीप कसे मंदावले आता..’ ही अवस्था आपण अनुभवतो आहोतच. तेव्हा आहे तो दिवा तेवता राहावा यासाठी संबंधितांनी निदान जेआरडींचं वाक्य आठवावं.. ‘We don’t do that at Tatas.l’
girish.kuber@expressindia.com
@girishkuber
गिरीश कुबेर