scorecardresearch

‘एकच प्याला’.. शंभर वर्षांचा!

‘एकच प्याला’ची आजच्या काळाच्या नजरेतून भेट घेण्याची संधी पुण्याच्या ‘नाटक कंपनी’ या नाटय़संस्थेमुळे मला मिळाली.

‘एकच प्याला’तील एक प्रसंग
एकच प्यालाहे नाटक शंभर वर्षांनंतरही लोकांच्या लक्षात राहते म्हणजे काय होते? एखादे नाटक लोकप्रिय, ‘क्लासिकबनते की विशिष्ट समाज ते बनवतो? नाटक त्यातल्या गाण्यांसाठी, ती गाणाऱ्या अव्वल नटासाठी लक्षात राहते की त्यातल्या सकसपणाच्या कसोटीवर लक्षात राहते? ‘एकच प्यालाच्या शताब्दीनिमित्त या मुद्दय़ांचाही परामर्ष घेणे गरजेचे आहे.

बालगंधर्वाच्या रंगभूमीवरल्या कारकीर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘रत्नाकर’ मासिकाने १९३१ मधल्या जुलैचा अंक ‘गंधर्व अंक’ काढला होता. त्यानिमित्ताने ‘बालगंधर्वाची सर्वोत्कृष्ट भूमिका कोणती?’ असा प्रश्न वाचकांना विचारून सर्वेक्षण केले होते. तेव्हा वाचकांनी त्यांच्या ‘एकच प्याला’मधल्या  सिंधूला सर्वाधिक पसंती दिली होती. नंतरच्या काळातही कितीतरी थोरामोठय़ांनी ‘एकच प्याला’ केलं, त्यातल्या वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आणि त्याबद्दल लिहिलं. यात चित्तरंजन कोल्हटकर, शरद तळवलकर, डॉ. श्रीराम लागू इथपासून ते मोहन गोखलेंनाही ‘एकच प्याला’ करायचे होते, असे माझ्या एका मैत्रिणीकडून कळले. याशिवाय राज्य नाटय़स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा आणि पारंपरिक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात दारू पिण्यातून होणाऱ्या नीती-अनीतीबद्दलच्या दबक्या चर्चातून ‘एकच प्याला’ची चर्चा होऊन दारू पिण्याविषयीचा हेटाळणीयुक्त आणि सुधारकी ढोंगी सूर वेळोवेळी निघतच असतो. मग असं लक्षात येतं, की ‘एकच प्याला’ हे एक नावाजलेलं नाटकच नाही, तर विशिष्ट मूल्यधारणा असणाऱ्या वर्तुळांमध्ये फिरणारे एक मिथकही आहे.

‘एकच प्याला’ची आजच्या काळाच्या नजरेतून भेट घेण्याची संधी पुण्याच्या ‘नाटक कंपनी’ या नाटय़संस्थेमुळे मला मिळाली. दिग्दर्शक आलोक राजवाडे आणि ओंकार गोवर्धन यांच्याबरोबर विचार करत आकाराला आलं ‘नाटक कंपनी’ निर्मित ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ हे माझं वॉटरमार्क प्रकाशनाने प्रकाशित केलेलं नाटक. ‘एकच प्याला’ किती ग्रेट आहे किंवा त्यात काय कमी आहे, या चर्चेपेक्षा महाराष्ट्रातल्या एका संस्कृती-समाजाच्या व्यवस्थेचा आणि चलनवलनाचा मागोवा घेत आजच्या काळात ‘एकच प्याला’कडे बघण्याचा प्रयत्न मी माझ्या या नाटय़लेखनातून केला. आजच्या काळातील विवाह-कुटुंबसंस्थेची बदलती रूपे, स्त्री-पुरुषांमधले गुंतागुंतीचे नातेसंबंध, जात-धर्माच्या अंगावर येणाऱ्या भिंती, व्यक्तिस्वातंत्र्याचा होणारा संकोच आणि कलारूपांची नावीन्यपूर्ण रूपे या पाश्र्वभूमीवर ‘सिंधु, सुधाकर, रम आणि इतर’ या नाटकाची उभारणी झाली. यानिमित्ताने राम गणेश गडकरी नव्याने समोर आले. त्यांच्याबरोबरीने देवल, कोल्हटकर, खाडिलकरही आले आणि तो वेगळा काळही आला. ‘एकच प्याला’त लिहिलंय तसं ‘आकाशातील नक्षत्रांच्या शर्यती’चा, भाषिक-सामाजिक-राजकीय घुसळणीचा आणि देवाणघेवाणीचा हा काळ. ‘एकच प्याला’ आले म्हणजे टिळकयुग संपेपर्यंतचा १९२० पर्यंतचा काळ आला. सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य, सनातनी आणि पुरोगामी ब्राह्मण्य, ब्राह्मणी-अब्राह्मणी चळवळी, नैतिकतेच्या बदलत्या कल्पना, बालविधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण, पुरुषी वर्चस्व, धर्म आणि स्त्री-पुरुष नाते, शारदा कायदा, राष्ट्रवाद, शेक्सपीअर, कालिदास, शोकांतिका, संगीत नाटक, नाटक कंपन्यांची भरभराट होत होत त्यांचे कर्जबाजारी होणे.. असे सारे आले. मधल्या काळात मूकपट-बोलपट आले. शिवाय मराठी नाटक पाहणाऱ्यांच्या मनावर प्रभाव टाकणारे ‘बालगंधर्व’ युग बहरले तेही याच काळात.

‘गुलाबी कोडे’ टाकण्याबरोबर ‘स्मशानातले गाणे’ आणि प्रसिद्ध असे ‘श्री महाराष्ट्र गीत’ लिहिणारे राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज ऊर्फ बाळकराम हे प्रमाण मराठी भाषेतून वाचकांच्या मनाचा खोलवर जाऊन ठाव घेणाऱ्या साहित्यनिर्मितीचे कर्ते. भाषेचा अभिमान बाळगणाऱ्यांसाठी निश्चितच नवं काही शिकविणारा, भारावून टाकणारा विसाव्या शतकातला पहिल्या काही दशकांतला हा काळ. काही लोक भेटायला गेल्यावर एकमेकांना मिठाई किंवा इतर काही भेटवस्तू देतात. इथे राम गणेश गडकरी गो. ब. देवलांना भेटायला गेल्यावर ‘वंदन नाटय़मिलिंदा गोविंदा तव पदारविंदाना’ या ओळीने सुरू होणाऱ्या आर्या त्यांनी भेट केली. एकमेकांचे जिगरी दोस्त असलेले गडकरी आणि बालकवी एकमेकांना न कळविता आपल्या कवितेचा विषय निवडत. पुढे एकमेकांच्या कवितेला प्रतिसाद देत आपापल्या कविता लिहीत. असा हा काळ आणि राम गणेश गडकरी वेगवेगळ्या काळांत समोर येत राहतात. यावेळचे निमित्त.. ‘एकच प्याला’!

अवघं चौतीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या राम गणेश गडकऱ्यांची ‘प्रेमसंन्यास’ (१९१३), ‘पुण्यप्रभाव’ (१९१७), ‘एकच प्याला’ (१९१९), ‘भावबंधन’ (१९२०) व ‘राजसंन्यास’ (१९२२. अपूर्ण) एवढीच नाटय़लेखन कारकीर्द. (त्यांनी अजून एक नाटक लिहिलेले आहे अशी नोंद आहे. परंतु मी ते वाचलेलं नाही.) याचबरोबरीने ‘गोविंदाग्रज’ या नावाने लिहिलेला ‘वाग्वैजयंती’ (१९२१) हा कवितासंग्रह आणि ‘संपूर्ण बाळकराम’ (१९२५) या नावाचा त्यांचा विनोदी लेखसंग्रह प्रकाशित आहे. १९६२ मध्ये ‘अप्रकाशित गडकरी’ या नावाने प्रल्हाद केशव अत्रे यांनी गडकऱ्यांच्या उर्वरित लेखनाचे संपादन केले आहे. शिवाय किर्लोस्कर नाटक मंडळीत सुरुवातीला गडकऱ्यांनी डोअर-कीपर म्हणून काम केलेले. एवढय़ा नाटय़लेखन कारकीर्दीवरून त्यांना ‘महाराष्ट्राचा शेक्सपीअर’ वगैरे उपमा दिल्या आहेत, हेही वैशिष्टय़पूर्ण! व्यक्तिस्तोम माजवून नानाविध विशेषणांचा अबीर-गुलाल उधळणाऱ्या मराठी समाजात हे काही आश्चर्यजनक नाही. इथे शेक्सपीअरशी तुलना करताना वसाहतवादी वृत्ती तर दिसतेच; पण एकाहून एक सरस अशी नाटय़-रूपभान असणाऱ्या, बहुआयामी नाटके लिहिलेल्या शेक्सपीअरच्या ३७ नाटकांशी चार-साडेचार नाटके लिहिलेल्या नाटककाराची तुलना करण्याचे आततायी धाडस हे गडकऱ्यांच्या प्रखर आणि उग्र लेखणीसारखेच! इथे किती नाटके लिहिली, हा मुद्दा नाही; तर मुद्दा असा आहे, की अशी ढोबळ तुलना न करताही गडकऱ्यांचे महत्त्व किंवा काही असेल ते अधोरेखित करता आले असते. शिवाय एका बाजूला शेक्सपीअरच्या रंगभानाबरोबरच त्याच्या आगेमागे आकारलेल्या पाश्चात्त्य संस्कृतीतले त्याचे थोरपण समजावून घेत, दुसऱ्या बाजूला मराठी संस्कृतीत आकारत गेलेल्या (इतिहासाने नोंदवलेल्या, तसेच झाकलेल्या) ज्ञात-अज्ञात सादरीकरणाच्या परंपरा,  कलाकार आणि कलाकृतींचाही साकल्याने विचार करता आला असता. मग ‘महाराष्ट्राचा शेक्सपीअर’ ही उपमा चपखल आहे का, असाही विचार आपल्याला करता येईल. काही असो; पण ‘एकच प्याला’ हे नाटक चुचकारते, विचार करायला लावते. नाटक इतके ओपन आहे, की त्यात चांगल्या अभिनेत्याला स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते. बालगंधर्वासारख्या अव्वल गायकाला कोणतेही पौराणिक वा ऐतिहासिक संदर्भ नसलेली ‘सिंधु’ या पात्राची भूमिका करावीशी वाटली, यावरून हे नाटक त्याकाळी किती महत्त्वाचे असावे याचा अंदाज यावा. पात्रात शिरून त्याचे मनोवकाश समजून घेण्याचे अभिनय तंत्र आत्मसात करून मराठी नाटय़ उभे करणाऱ्यांना ‘एकच प्याला’तील लांबलचक स्वगते, पल्लेदार आणि भावविवश करणारी भाषा जवळची वाटू शकते याचे मला आश्चर्य वाटत नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात नवसुशिक्षित वर्ग नाटक पाहायला येऊ  लागला तसे रंगमंचावरील भावप्रकटन व व्यक्तित्वदर्शन या दोन्ही बाबी महत्त्वाच्या मानल्या जाऊ  लागल्या. लोकप्रिय आणि व्यवसाय करणाऱ्या नाटक कंपन्यांना नटांना भाषण चांगले करायला येणे महत्त्वाचे वाटू लागले. समकालीन मराठी मध्यमवर्गाला प्रमाण भाषेचे एक उत्तम मॉडेल ‘एकच प्याला’सारख्या नाटकात दिसले.

संगीत नाटकांतील पदे भारावून म्हणत ‘आमची संगीत नाटक परंपरा थोर’ असे म्हणतानाच या नाटकांतील गाणी नाटकाच्या संविधानकात सहज आणि ऑर्गॅनिकली येत नसत, हेही दिसत होतं. ‘एकच प्याला’ हे त्याचं उत्तम उदाहरण. नाटक गडकऱ्यांनी लिहिले, तर त्यातील पदे त्यांच्या ‘आज्ञे’ने वि. सी. गुर्जरांनी लिहिली. गुर्जरांनी लिहिलेली पदे किती उत्तम झाली वा नाटकात ती किती चपखल बसतात, हा विचार ज्याचा त्याने करावा. परंतु नाटय़-रूपाचा अभ्यास करणाऱ्याला नाटय़पदांची ही ‘ठिगळ’ लावण्याची तऱ्हा निश्चितच विचार करायला लावणारी आहे. सिंधूसारख्या मर्यादित आयाम असलेल्या पात्राची भूमिका बालगंधर्वासारख्या थोर गायकाने वठवली. सिंधूच्या अभिनयासाठी बालगंधर्वाना प्रसिद्धी मिळाली. या नाटकातल्या गाण्यांच्या चाली सुंदराबाई जाधवांनी लावल्या. परंतु सुंदराबाई कोण, कुठल्या, हे फारसं वाचायला मिळत नाही. त्या नाटय़ेतिहासातनं गायबच आहेत. लक्षात ठेवले गेलेत ते फक्त बालगंधर्व आणि गडकरी. त्याकाळच्या आणि नंतरच्या नाटकावरल्या लिखाणातून असे दिसून येते, की सिंधू या पात्रापेक्षा सिंधूच्या पदांत नटाला, नाटक कंपनीला आणि नाटय़विश्वाला अधिक रस वाटला आहे. पुढल्या काळात नव्या-जुन्या पिढीने आपापल्या परीने मराठीपणाच्या पोळ्या या गाण्यांवर भाजून घेतल्या. बालगंधर्व कसे गायले, त्यांनी हात कसा पुढे केला, मान कशी वळवली, वगैरेंवर कधी सिनेमावाल्यांनी, तर कधी ऑर्केस्ट्रावाल्यांनी, कधी एकपात्री अभिनयवाल्यांनी, तर कधी पहाटेची आणि रात्रीची गाणी गाणाऱ्यांनी आपापल्या परीने कमावले. अर्थात, हे सगळं होत असताना ना. सी. फडके यांनी केलेली कठोर चिकित्सा, प्र. के. अत्रे – रा. शं. वाळिंबे – स. गं. मालशे यांची समीक्षा, डॉ. अशोक दा. रानडे यांनी मांडलेले महाराष्ट्रीय संगीत-चिंतन, पं. वसंतराव देशपांडे या अवलिया गायकाचा आवाज आणि त्यांनी मांडलेला इतिहास विचार करायला लावणारा आणि नाटय़-इतिहासाच्या अभ्यासाला दिशा देणारा ठरला आहे.

समाजाच्या अभिरुचीवर प्रभाव टाकणारे गडकरी मला वेगळेच मिश्रण वाटत राहिले आहेत. म्हणजे इतक्या भारावून टाकणाऱ्या काळात ते ‘केसरी’सारखे वृत्तपत्र चोरून वाचत. ‘कीचकवधा’च्या वेळी ‘महाराष्ट्र लक्ष्मी’ नावाचे ‘जहाल’ नाटक त्यांनी लिहिले होते. पण ‘कीचकवधा’वर घातलेली बंदी पाहून त्यांनी आपले ते नाटक जाळून टाकले होते, अशी नोंद अत्रेंनी ठेवलेली आहे. टिळकांचा उल्लेख ‘एकच प्याला’मध्ये येत असला तरी स्वातंत्र्य चळवळ वा सामाजिक चळवळी यांबद्दलचे गुंते गडकऱ्यांच्या नाटकात येत नाहीत. ‘एकच प्याला’मधले ‘रामलाल’ हे पात्र तर सरळसरळ राष्ट्रवाद आणि स्त्रीचे पातिव्रत्य यांची सांगड घालत, अत्रे लिहितात त्याप्रमाणे हिंदू समाजामधील पारंपरिक मूल्यांचा पुरस्कार करताना दिसते.

याचा अर्थ असा नव्हे की, प्रत्येक लेखकाने त्याच्या समकालावर वा प्रत्येक घटनांवर प्रतिक्रिया द्यायला हवी किंवा तथाकथित भूमिका घ्यायला हवी. परंतु भवताल कवेत घेऊन आत्मशोध घेणाऱ्यांकडून नवनिर्मिती करणारे सकस साहित्य आकाराला येते, असा साधा विचार मनात ठेवून ‘एकच प्याला’ हे नाटक अशी साहित्यकृती आहे काय, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता त्याचे ‘नाही’ हे उत्तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना ऐकू येऊ  शकते.

‘एकच प्याला’ लिहीत असताना गडकऱ्यांसमोर शेक्सपीअरचे ‘हॅम्लेट’ नाटक होते असे दिसते. ‘एकच प्याला’मध्ये दारूच्या नशेत आपल्या वकिलीसह सर्वच गमावत चाललेल्या सुधाकर आणि त्याची पतिव्रता पत्नी सिंधूची शोकांतिका आहे. दारूच्या नशेत सुधाकर एका क्षणी आपल्या मुलालाही मारतो. पुढे सिंधूचाही मृत्यू होतो आणि सुधाकर आत्महत्या करतो. म्हणायला सुधाकर या पात्राचे थोडे कंगोरे या नाटकात येतात. सिंधू मात्र एकदम पतिव्रता.. काही झालं तरी नवऱ्याला आडवे न जाणारी दाखवली आहे. बालगंधर्वानी अजरामर केलेले सिंधू हे पात्र म्हणजे नवराशरण होताना पुरुषसत्ताक व्यवस्थेला शरण गेलेले ‘पॅसिव्ह’ पात्र आहे. तशीच बाकीची पात्रंही पुरुषीपणाची एकही संधी न सोडता वावरणारी. आता कुणी म्हणेल की, ‘अहो, हेच तर मांडायचेय ‘एकच प्याला’तून.. सिंधूसारख्या बाईची ट्रॅजेडी.’ माझ्या ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’मधले अ‍ॅपल हे पात्र विचारते : ‘आस्सं? जातो, काठी घेतो आणि दाणदिशी पोराच्या डोक्यात घालतो.. अश्शी ट्रॅजेडी होते?’ गडकऱ्यांनी ‘एकच प्याला’ ही ट्रॅजेडी लिहिली किंवा मराठीतील ट्रॅजेडी पुढे नेली, असा दावा केला जात असला तरी निव्वळ दारू पिण्याने होणाऱ्या वाताहतीच्या काही घटनांनी ट्रॅजेडी तयार होत नाही. ‘हॅम्लेट’ची ट्रॅजेडी फक्त हॅम्लेट आणि त्याच्या आई-बाबा-काका-कुटुंबापुरती राहत नाही, तर अख्खा समाज, सत्ताकारण, नातेसंबंध यांमधल्या परस्पर संघर्षांतून ‘हॅम्लेट’ येतो, म्हणून ती होते. नाटय़ावकाश मांडणीसाठी ‘एकच प्याला’मध्ये मर्यादित अवकाश दिसतो आणि विचक्षण वाचकाला नाटय़रचनेतला ढिसाळपणा दिसतो.

शंभर वर्षांनंतर नाटक लक्षात राहते म्हणजे काय होते? एखादे नाटक ‘लोकप्रिय’, ‘क्लासिक’ बनते, की विशिष्ट समाज ते बनवतो? एखादी कलाकृती आपोआप थोर होते, की वेळोवेळचे इतिहासलेखन तिला थोर करते? एखादे नाटक त्यातल्या गायलेल्या गाण्यांसाठी, गाणे गाणाऱ्या अव्वल नटासाठी लक्षात राहते, की त्यातल्या एकूण सकसपणाच्या कसोटीवर ते लक्षात राहते? अशा काही मुद्दय़ांचा नाटकीय वेध घेत मी ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ हे नाटक लिहिले. ते मला किती जमले, नाटक उभे करणारे कलाकार किती यशस्वी झाले, असे प्रश्न येतीलच. किंबहुना, कुठल्याही मुद्दय़ावर स्तोम माजवून माणसं आणि साधनसामग्री छिन्नविछिन्न करणाऱ्या भयग्रस्त समाजात प्रश्न विचारले जाणे, हे मला महत्त्वाचे वाटते. राम गणेश गडकरी आणि त्यांचे ‘एकच प्याला’ हे नाटक प्रश्न विचारण्याची संधी देतं, यासाठी मला ते नाटक आपलं वाटतं.

potdar.ashutosh@gmail.com

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hundred years of ekach pyala marathi sangeet natak