महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याचे साक्षेपी अभ्यासक तसेच समीक्षक अशी प्रा. गो. मा. पवार यांची ओळख आहे. ‘विनोद : तत्त्व आणि स्वरूप’ हा त्यांचा विनोदविषयक सिद्धान्ताची मांडणी करणारा महत्त्वाचा समीक्षाग्रंथ आहे. प्रा. पवार यांचे ‘सुहृद आणि संस्मरणे’ या शीर्षकाचे एका वेगळ्या विषयावरील पुस्तक सुविद्या प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झाले आहे. या लेखसंग्रहातील लेख हे विविधस्वरूपी आहेत. मुख्यत्वे व्यक्तिचित्रे, आठवणी, संस्मरणे, लेखकांची वाङ्मयीन कामगिरी व अनुभवकथनाचे स्वरूप या लेखांना आहे. प्रा. गो. मा. पवार यांना ज्या सुहृदांचा सहवास लाभला त्यांच्याविषयी अतिशय आत्मीयतेने व आस्थाभावाने केलेले हे लेखन आहे. प्रा. पवार यांच्या सहवासातील या व्यक्ती मुख्यत्वे वाङ्मयक्षेत्रातील तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रांतीलही तसेच कुटुंबातील व्यक्तीही आहेत. या व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या प्रसंगानिमित्ताने घडलेले हे लेखन आहे.
‘सुहृद आणि संस्मरणे’ या लेखसंग्रहातील व्यक्तिचित्रे प्रसंगपरत्वे लिहिलेली आहेत. काही आनंद कारणनिमित्ताने तर काही दु:खकारणाने लिहिली गेली आहेत. वा. ल. कुलकर्णी, भगवंतराव देशमुख, व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ, म. द. हातकणंगलेकर, त्र्यं. वि. सरदेशमुख, रा. ग. जाधव, भालचंद्र नेमाडे या लेखकांच्या व्यक्तिमत्त्वाचे व लेखनाचे विविधस्पर्शी पलू व संस्मरणीय आठवणी उलगडून दाखविणारे हे लेखन आहे. साहित्यिक मित्रांबरोबरच, सहकारी प्राध्यापक, कुंटुबातील तसेच सार्वजनिक जीवनातील व्यक्तींबद्दलच्या सुहृदभावाच्या आठवणी या संग्रहात आहेत. भालचंद्र नेमाडे यांचा सार्वजनिक जीवनातला वावर, साधेपणा, सुसंस्कृतपणा, जीवनावरची निष्ठा व नमुनेदार नागरिकत्वाचे भान दर्शविणारे नेमाडे यांचे व्यक्तिचित्र विविध प्रसंगांतून घडविले आहे. नेमाडे यांच्या व्यक्तिस्वभावाचे वर्णन करताना त्यांनी लिहिले आहे, ‘अगदी उंच-भक्कम अंगकाठी, जाड िभगाच्या चष्म्यातून समोरच्याचा वेध घेणारे डोळे, वरती वरती चढणाऱ्या कपाळावरच्या आठय़ा आणि खास निगा न ठेवता वाढू दिलेल्या ओठावरच्या भरघोस मिशा असे त्यांचे अपरिचितांना उग्रपणाचे दर्शन घडते.’ हे सांगून त्यांच्या अंत:करणातल्या मार्दवतेचा व कोमलतेचा प्रत्यय देणारे अनेक प्रसंग पवार यांनी नोंदविले आहेत. अध्यापननिष्ठा आणि वाङ्मयीन ऊर्जा जागृत ठेवणारे वा. ल. कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व असो किंवा भगवंतराव देशमुख यांच्या मिश्किल स्वभावाचे गुण त्यांनी बारकाईने टिपले आहेत. सुधीर रसाळ यांच्या कुटुंबातील वातावरण, त्यांचा स्वयंपाकघरातील वावर, विविध गोष्टींबद्दलची रुची याविषयीचे बारकावे पवार यांच्या लेखांत आहेत. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्यासंबंधी लिहिताना त्यांनी लिहिले आहे, ‘त्यांच्या सहवासात मला सतत वाटत राहायचे, की ते इथले, या लौकिकातले नाहीत. त्यांचे मन या लौकिकापलीकडच्या कशाचा तरी वेध घेण्यात गुंतलेले आहे. एक प्रकारची संन्यस्तता व विरागीपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे.’ असे सरदेशमुखांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले आहे. अशा अनेक व्यक्तींचे निर्मळभावाने ओथंबलेली सुहृदचित्रे पवार यांच्या लेखनात आहेत. मत्रभावातील अकृत्रिम स्नेहभावांनी व सृजनत्वाच्या गहिऱ्या रंगांनी आकाराला आलेले हे लेखन आहे. प्रा. पवार यांचा अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर व सोलापूर या गावांशी संबंध आला. त्यामुळे या गावातील व्यक्तींबरोबरच तेथील वाङ्मयीन व सामाजिक वातावरणाचे काहीएक चित्र या लेखसंग्रहात आहे.
संग्रहातील काही लेख हे लेखकांच्या वाङ्मयीन वैशिष्टय़ांचा परामर्श घेणारे आहेत. आपल्या वैशिष्टय़पूर्ण संवेदनशीलतेने ज्या लेखकांनी नव्या वाटा निर्माण केल्या, अशा लेखकांविषयी स्वतंत्र आणि वेगळी, वैशिष्टय़पूर्ण ठरावी अशी मीमांसा त्यांनी केली आहे. भालचंद्र नेमाडे, गंगाधर गाडगीळ व व्यंकटेश माडगूळकर यांच्या एकंदरीत साहित्याचे मर्म सांगणारे व त्यांच्या लेखनकामगिरीचे स्वरूप विशद करणारे हे लेखन आहे. व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखक म्हणून असणाऱ्या संवेदनशीलतेचा, बहुमुखी जाणकारीचा, गावरहाटीच्या आकलनाचा, देशीय भानाचा तसेच सभोवतालच्या जैवसृष्टीचा वेध घेणाऱ्या अखंड अशा प्रातिभ ऊर्जेची नोंद पवार यांनी घेतली आहे. या दृष्टीने अभिरुचीसंघर्षांच्या दर्शनिबदूवरून भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांचे आकलन केले आहे ते सर्वस्वी नव्या स्वरूपाचे आहे. नेमाडे यांच्या साहित्यातील सौंदर्यनिर्माणक परिकल्पनांचा आणि महाकाव्यसदृश रूपविस्ताराची त्यांनी घेतलेली नोंद महत्त्वाची ठरते. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या साहित्यसमीक्षेचा कळिबदू हा संन्यस्त आध्यात्मिकता आहे, हे निरीक्षण अथवा समकालीन वाङ्मयव्यवहाराला तात्काळ व अनावर, उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याची वृत्ती आणि आस्वादात्मकता ही
रा. ग. जाधव यांच्या समीक्षेची वैशिष्टय़े असून, जाधव यांच्या समीक्षेचा उल्लेख ते ‘संस्कृतिसमीक्षा’ असा करतात.
राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील व्यक्ती, सहवासाबद्दलचीही संस्मरणे या संग्रहात आहेत. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, शिवाजीराव देसाई, दत्ता गायकवाड, ए. आर. डी. शेख यांच्या सहवासातील त्यांच्या कार्याचे वेगळेपण सांगणारे व्यक्तिविषयक लेख आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या भेटीतील अनेक प्रसंगातून उलगडलेले यशवंतराव मांडले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सुसंस्कृतपणाचा, मानवीयतेचा व सद्भावाचा ठसा त्यांच्या मनावर कसा उमटला ते वेगवेगळ्या आठवणींमधून सांगितले आहे. कुटुंबातील वडीलबंधू तसेच सहधर्मचारिणी पत्नी यांच्यावरील लेखही आहेत. या संग्रहात काही प्रवासवर्णनपर लेखन आहे. इंग्लंडमधील प्रवासाचे कथन त्यामध्ये आहे. तसेच त्यांच्या गावावरील आत्मपर स्वरूपाचा लेखही आहे. लेखसंग्रहाच्या अखेरीस ज्येष्ठ समीक्षक प्रा. सुधीर रसाळ यांचा प्रा. गो. मा. पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग उलगडून दाखविणारा ‘नवनीतमृदू आणि व्रजकठोर मित्र’ हा लेख समाविष्ट केला आहे.
या व्यक्तिचित्रणात्मक व आत्मपर लेखनाचे वैशिष्टय़ म्हणजे पवार यांची व्यक्ती व जीवनाकडे पाहण्याची आत्मीय व आस्थाभावाची दृष्टी. सहवासातील माणसांचे जग त्यांनी सुहृदभावाने समजून घेतले आहे. मत्रीच्या नात्यांतून व अनेक व्यक्तींच्या सहवासातून जीवनाला संपन्नता व समृद्धता लाभली त्याविषयीचे हे निवेदन आहे. पवार यांच्या प्रेममय अंत:करणाचा तसेच समाज आणि साहित्यदृष्टीचा स्पर्श या लेखनास आहे. माणसांविषयी व साहित्याविषयीचा उदार आणि समंजस दृष्टिकोन त्यातून व्यक्त झाला आहे. वर्तमानात लुप्त होत असलेला मत्रभाव व आत्मीय कुलभावाच्या पाश्र्वभूमीवर या सजीव संस्मरणाचे मोल अधिक आहे. या लेखसंग्रहाचे स्वरूप हे दुहेरी स्वरूपाचे आहे. सहवासातील सुहृदांच्या संस्मरणाबरोबरच त्यांच्या साहित्यविषयक कामगिरीचे, कार्यकर्तृत्वाचे विहंगमावलोकनदेखील त्यामध्ये आहे. या लेखकांच्या जीवनजाणिवेचा, प्रतिभाधर्माचा व संवेदनस्वभावाचा प्रत्यय घडवून देणारे हे लेखन आहे. जवळच्या आणि मोठय़ा व्यक्तिमत्त्वांचे मर्म प्रा. पवार यांनी प्रकट केले आहे. हे करत असताना पवार यांची गुणग्राहकता प्रकटते. व्यक्तिचित्रे, संस्मरणे, आठवणी, अनुभवकथन आणि साहित्यचिंतन या दृष्टीने हे लेखन महत्त्वपूर्ण ठरते. व्यक्तिगत स्नेहबंधातून पाहतानाही प्रा. पवार तटस्थतेने साहित्यविषयक कामगिरीचे मूल्यमापन करतात हा या लेखनाचा महत्त्वाचा विशेष आहे. प्रा. गो. मा. पवार यांच्या लेखनाचा एक वेगळा पलू या ग्रंथात बद्ध झालेला आहे. या संग्रहात ख्यातनाम चित्रकार प्रभाकर कोलते व नितीन खिलारे यांनी रेखाटलेली सुबक अशी रेखाचित्रे आहेत.
‘सुहृद आणि संस्मरणे’ – गो. मा. पवार
सुविद्या प्रकाशन,सोलापूर
पृष्ठे- १८०, मूल्य- २०० रुपये.
प्रा. रणधीर शिंदे