१९९० च्या सुरुवातीला एम. ए.च्या आम्हा पाच विद्यार्थ्यांना एस. टी.च्या साध्या लाल बसनं धनागरे सर ‘मासूम’ या संस्थेचं काम दाखवण्यासाठी माळशिरस या दुष्काळी गावात घेऊन गेले होते. कोणत्याही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिसंवादात वैचारिक वादात कोणालाच हार न जाता सभेचे संकेत पाळून खिंड लढवणारे सर आम्ही नेहमीच पाहत आलो होतो; पण माळशिरस गावातल्या लहान लहान गल्ल्यांमधून फिरताना त्यांच्यातला नम्र समाजशास्त्रीय संशोधक आम्हाला दिसत होता. तिथं ते आमच्यासोबत अगदी सामान्य लोकांना, बलुतेदार, विविध धर्माच्या लोकांना साधे साधे प्रश्न विचारत त्यांच्याशी संवाद साधत होते. परत आल्यावर वर्गात त्या संवादाचा सूक्ष्म तपशील देत ते त्यात दडलेले धागे उलगडून सांगत होते. या गोष्टींचा वापर करून ते स्वत:च्या सैद्धान्तिक चौकटीची पुनर्माडणी करत असत.

योगायोगाची गोष्ट अशी की, मी एम. ए.ला असताना माझ्या वर्गाला त्यांनी सगळ्यात जास्त अभ्यासक्रम शिकवले. विभागातल्या अनपेक्षित घटनांचा फायदा आमच्या बॅचला झाला होता. त्यांचे हातखंडा विषय ‘अग्रेरिअन सोशल स्ट्रक्चर अँड चेंज’ आणि ‘विकासाचे समाजशास्त्र’ हे तर त्यांनी तन्मयतेनं शिकवलेच; पण त्याचबरोबर अचानक शिकवावा लागलेला ‘इंडियन सोसायटी : स्ट्रक्चर अँड चेंज’ हाही अभ्यासक्रम त्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीनं हाताळला. त्यांचे तास दुपारचे असत. खुर्चीवर ब्रिटिश पद्धतीनं बसून हातातल्या टिपणांचा आवश्यक तिथं आधार घेत ते संथपणे बोलत विषय विवेचन करत. सूर टिपेचा कधीच नसे. मधेच एखादा फ्रेंच शब्द किंवा पारिभाषिक शब्द, लेखकाचे किंवा ग्रंथाचे नाव आले की उठून खडूने फळ्यावर ते सुवाच्य अक्षरात लिहीत. सत्राच्या काळात त्यांना एकदा रशियाला आणि एकदा भारत सरकारच्या अभ्यास दौऱ्यासाठी चीनला जावं लागलं होतं. तेव्हा परतल्यावर त्यांनी सगळा बुडालेला अभ्यासक्रम जादाचे तास घेऊन भरून काढला होता. चीनच्या दौऱ्यावर ते निघाले तेव्हाची एक आठवण आहे. ते सोबत नेण्याचे अभ्यासाचे कागद विद्यापीठातल्या त्यांच्या ऑफिसात विसरले होते. विमानतळावरून त्यांनी श्रीधरला (त्यांच्या मोठय़ा मुलाला) फोन करून संबंधित कागद टेबलाच्या कोणत्या खणात, कोणत्या फाईलमध्ये आहेत ते नेमकं सांगितलं. ते चुकणं शक्यच नव्हतं. त्यांच्या शेवटच्या आजारपणातही ते घरातल्या पुस्तकांची, कागदांची व्यवस्था लावण्याबद्दल बोलत असताना ‘दिव्यकुंज’मध्ये कोणत्या शेल्फात कुठे काय ठेवलं आहे, हे त्यांना माहीत असे.

वक्तशीरपणा, टापटीप आणि त्यांची शिस्त याबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे; पण त्यापाठीमागे समाजशास्त्रज्ञ आणि विद्यापीठीय शिक्षक म्हणून असलेली त्यांची भूमिका ठाम होती. अध्यापन-संशोधनाचा आपला व्यवसाय त्यांनी आता दुर्मीळ होत चाललेल्या गांभीर्यानं घेतलेला होता. आपण दिल्ली, लंडन किंवा केंद्रीय विद्यापीठात नाही आहोत, ही खंत त्यांच्या दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींसाठी कधीच कारण झाली नाही.

वाशिमसारख्या छोटय़ा गावातून शिकून धनागरे नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी गेले. तिथं त्यांना मॅसॅच्युसेट्स-अमहर्स्ट येथील अमेरिकन स्कॉलर एडविन ड्रायव्हर हे शिक्षक म्हणून लाभले. त्यांच्यासोबत एका प्रकल्पावर काम केल्याने त्यांनी या चुणचुणीत विद्यार्थ्यांला अमेरिकेत पीएच.डी. करण्यासाठी संधी दिली आणि बोलावून घेतले. यादरम्यान तिथं सुरुवातीला केलेल्या कोर्सेसच्या संधीमुळे युद्धोत्तर काळातील अमेरिकन प्रत्यक्षार्थवादी समाजशास्त्रातील संख्यात्मक अभ्यासपद्धती, प्रकार्यवादी सैद्धान्तिक मांडणी यांचं मिळालेलं सखोल शिक्षण त्यांनी पुढच्या काळात नीट वापरलेलं दिसतं. अर्थात ते काही वैयक्तिक कारणांमुळे परत आले. आग्रा विद्यापीठ आणि आयआयटी- कानपूर इथं अध्यापनाच्या काही कालावधीनंतर पुढे कॉमनवेल्थ फेलोशिपवर निवड झाल्यानं त्यांनी इंग्लंडमधील ससेक्स विद्यापीठात तीन र्वष टॉम बॉटममोर आणि बार्बू यांच्या मार्गदर्शनाखाली डी. फिल. पूर्ण केलं. हामझा अलावी, एरिक वॉल्फ यांच्यासोबतच रणजित गुहा यांच्यासारख्यांचा वैचारिक संवाद या काळात त्यांना लाभला. सैद्धान्तिक आकलन, मांडणी आणि वादविवाद यांचं काटेकोर, कठोर आणि गंभीर असं शिक्षण त्यांना तिथं मिळालं; जे त्यांनी शेवटपर्यंत आग्रहपूर्वक आम्हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. त्याचबरोबर सैद्धान्तिक मांडणीच्या तुरुंगातही त्यांनी स्वत:ला कधी कैद होऊ  दिलं नाही.

कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दोन दशकांत झालेला भारतीय पातळीवरील संचार आणि विविध समाजशास्त्रज्ञांशी आलेला संबंध आणि उत्तर भारतातलं राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक वास्तव यामुळे त्यांचा दृष्टिकोन कायमच व्यापक आणि सर्वसमावेशक राहिला.

त्यांचा डी. फिल.चा विषय ‘भारतातली कृषक आंदोलनं’ हा होता. आणि त्याच्या मुळाशी ससेक्समध्ये केलेलं भारताच्या सामाजिक इतिहासाचं सखोल वाचन होतं. त्याचबरोबर बॅरिंग्टन मूर ज्युनिअरसारख्या विद्वानांच्या मांडणीतून जाणवलेले विरोधाभास हेही होतं. डी. फिल. संशोधनावर आधारित त्यांचं ‘पेझन्ट मूव्हमेंट्स इन् इंडिया’ हे पुस्तक इतकं गाजलं, की आजही या विषयावरचा एक मानदंड म्हणून ते पाहिलं जातं. भारतीय समाजशास्त्रात सर्वेक्षण, एखाद्या खेडय़ाचा- त्यातही जातिसंस्थेचा सविस्तर अभ्यास हे तोपर्यंत संशोधनाचं रूढ प्रारूप होतं. याला छेद देणारा ऐतिहासिक पद्धतीचा अवलंब करून भारतीय कृषक समाजातल्या वर्गव्यवस्थेचा सविस्तर आलेख धनागरेंनी त्यांच्या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात मांडला होता. थेडा स्कॉचपॉल, बॉटममोर, बॅरिंग्टन मूर यांसारखे समाजशास्त्रज्ञ आणि ई. एच. कार यांच्यासारखे इतिहासकार यांच्या प्रभावातून धनागरेंचं पद्धतिशास्त्र विकसित झालं. त्यामुळेच त्यांनी स्वत:च्या लिखाणाला ‘ग्रामीण समाजशास्त्र’ या तेव्हापासून आजपर्यंत लोकप्रिय असणाऱ्या प्रकार्यवादी (फंक्शनलिस्ट) चौकटीत कैद होऊ  दिलं नाही. जात आणि वर्ग या दोनही पायाभूत संरचनांतला परस्परसंबंध आणि व्यत्यास त्यांच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी राहिला. त्यात ग्रामीण समाजशास्त्रात नेहमी आढळणाऱ्या भारतीय समाजाचे ‘एकमेवाद्वितीयपण’ आणि ‘जातिसंस्था’ हे प्राणतत्त्व या दोन्ही दोषांपासून त्यांनी स्वत:च्या मांडणीला कोतं होण्यापासून वाचवलं. मार्क्‍सवादी चिकित्सा पद्धती हा त्यांच्या सर्वच लिखाणाचा गाभा असला तरी ‘व्हल्गर मार्क्‍सिझम’मध्ये ते अडकले नाहीत. पी. सी. जोशी, हिरा सिंग यांसारख्या भारतातील जात-वर्ग संरचनांच्या ज्येष्ठ भाष्यकारांसोबत त्यांचा दीर्घकाळ संवाद राहिला. हरित क्रांतीचे सामाजिक दुष्परिणाम, त्यामुळे उत्तर भारतात वाढलेली विषमता हे त्यांच्या आस्थेचे विषय राहिले. स्वातंत्र्योत्तर काळात विकासाचं जे प्रारूप स्वीकारलं होतं त्याचे परिणाम १९९० च्या दशकात दिसू लागले. कृषक समाजात वाढलेली विषमता, पर्यावरणीय ऱ्हास, हरितक्रांतीच्या गौरवशाली आवरणाखाली दडलेलं नैसर्गिक स्रोतांचं स्खलन या विषयांना त्यांनी गंभीरपणे हात घातला आणि विकासाच्या खोटय़ा परिभाषेचं समाजशास्त्रीय दृष्टीनं विच्छेदन केलं. विकासाच्या प्रस्थापित संभाषिताची समाजशास्त्रीय पुनर्माडणी करण्याचा हा प्रयत्न होता.

कोणत्याही लोकशाहीत विषमतेला विरोध करण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सामाजिक आंदोलनांचे महत्त्व वादातीत असते. धनागरेंच्या सर्व लिखाणात आंदोलनांची अनुभवजन्य चिकित्सा आणि तात्त्विक मांडणी महत्त्वाची ठरली. आंदोलने, चळवळी, लढे यांपासून ते नागरी समाज यापर्यंत इंग्रजी व मराठीत त्यांनी विपुल भाष्य केले. शरद जोशींचा उदय झाल्यापासून ते शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा पाठपुरावा करत होते. त्यातूनच त्यांचं ‘पॉप्युलिझम अँड पॉवर : फार्मर्स मूव्हमेंट इन् वेस्टर्न इंडिया’ हे पुस्तक आकारास आलं.

उच्च शिक्षण क्षेत्रावर अनेक दशकं केलेल्या चिंतनावर आधारित लेखमाला त्यांनी लिहिली आणि त्याचं पुस्तकात रूपांतरही झालं. धनागरे सरांच्या एकूण प्रवासाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे समाजशास्त्राचं वर्तुळ ओलांडून त्यांची ओळख होती. त्याचं साधं कारण म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थानं व्यवहारात आणलेली आंतरविद्याशाखीयता! एशियाटिक सोसायटीसारख्या विविध सामाजिक संशोधन संस्थांचे ते मानद पदाधिकारी होतेच; परंतु विविध विद्यापीठांतल्या तरुण संशोधक विद्यार्थ्यांचे ते पालकही होते.

लोकशाही समाजाच्या यशस्वीतेचा खरा गाभा त्या समाजातल्या विविध संस्थांच्या उत्तम आरोग्यावर अवलंबून असतो. व्यक्तिविकार आणि जातीपातीच्या हुकमाच्या एक्क्यांपलीकडे जाऊन अधिकारपदावरील व्यक्ती स्वत:च्या पदाची प्रतिष्ठा सांभाळतात का, नियम पाळतात का, यावर या व्यवस्थेचं यश अवलंबून असतं. प्रशासक म्हणून त्यांची शिवाजी विद्यापीठातली कुलगुरूपदाची कारकीर्द अतिशय गाजली. त्याआधी ते पुणे विद्यापीठात समाजशास्त्राचे विभागप्रमुख होतेच. त्यानंतर ते आयसीएसएसआर या संस्थेचे सदस्य सचिव होते.

समाजशास्त्रातील नवनवे प्रवाह येताना त्यातील काहींबाबत त्याविषयी आपलं वाचन झालेलं नाही, हेही ते खुलेपणानं मान्य करत. विविध समाजशास्त्रीय इंग्रजी आणि मराठी नियतकालिकांमधून ते नियमित लेखन करीतच; पण प्रत्येक तरुण संशोधकालाही ते हेच सांगत की, वर्षभर मनन आणि अभ्यास करून चांगलं लेखन नियतकालिकांतून प्रसिद्ध करीत राहणं हेही गरजेचं आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या छोटय़ा-मोठय़ा उपक्रमांना आणि संशोधनाच्या प्रयत्नांना ते खुलेपणानं दाद देत असत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पदांवर अनुभव घेतल्यानंतर सहसा सार्वजनिक कार्यक्रम व उपक्रमांकडे तुच्छतेनं पाहण्याचा दृष्टिकोन येतो; पण धनागरे सर याला अपवाद होते. त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या कार्यक्रमांना व चर्चासत्रांना श्रोता म्हणूनही ते नम्रपणे उपस्थित असत. आणि त्यांची केवळ उपस्थितीही मोठी आश्वासक वाटे. त्यांना पदवी परीक्षेत मराठी विषयातलं सुवर्णपदक मिळालेलं होतं. त्यांच्या भाषेचा परिचय त्यांच्या बोलण्यातूनही येई. तो त्यांच्या ‘हिरवे अनुबंध’ या ‘मौज’नं प्रकाशित केलेल्या ललित लेखांमधूनही आपल्याला प्रत्ययाला येतो. त्यांचा विनोद धारदार आणि सूक्ष्म असे. अलीकडे ते एआयआयएस- सिमला येथे नॅशनल फेलो होते. तिथं संशोधन-अभ्यासाव्यतिरिक्त मिळालेल्या विविध अनुभवांबद्दल ते उत्साहानं सांगत. राष्ट्रीय पातळीवर आपल्या संशोधनाची पुरेशी दखल घेतली गेली नाही, ही त्यांची खंत होती. पण त्यामुळे अखेपर्यंत त्यांचं लेखन काही थांबलं नव्हतं. निधनाआधीच्या आदल्या दिवसापर्यंत ते कार्यरत होते. त्या दिवशीही त्यांनी एक दीर्घ लेख पूर्ण केला होता.

धडपडणारे तरुण संशोधक आणि विद्यार्थ्यांविषयी त्यांना प्रेम होते. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेले, त्यांचे कधीही विद्यार्थी नसणारे, पण केवळ त्यांची व्याख्यानं ऐकून प्रेरित झालेले आणि जोडलेले कितीतरी विद्यार्थी त्यांच्या आजारपणात त्यांना भेटून जात होते आणि शुश्रूषेसाठी थांबतही होते. विविध शाखांमधील व्यापक विचारविश्वातून ज्ञानाची निरंतर साधना करत असतानाच त्याच्या प्रत्यक्ष उपयोजनाचाही विचार करणारा हा व्रती समाजशास्त्रज्ञ होता. त्यांची ज्ञानावर असलेली निष्ठा, व्यावसायिक शिस्त ही येत्या पिढय़ांमधून संक्रमित झाल्यास ते संशोधनाला आणि त्या-त्या विद्याशाखांनाही लाभदायी होऊ  शकेल.

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत.)

श्रुती तांबे shruti.tambe@gmail.com