प्रज्ञा दया पवार यांची प्रमुख ओळख आहे ती कवयित्री म्हणून. तीव्र संवेदनशीलता, प्रखर सामाजिक भान, समस्यांचं सम्यक आकलन, कार्यकर्त्यांचा परिवर्तनवादी दृष्टिकोन, सुगम, परंतु प्रभावशाली भाषा अशा गुणवैशिष्टय़ांमुळे कवितांबरोबरच त्यांचं ललित आणि वैचारिक लेखनही स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व जाहीर करतं.
पाच-सहा कवितासंग्रहांच्या जोडीला कथासंग्रह, ललितगद्य, नाटक, संपादन यामुळे मराठी साहित्यात अलीकडच्या दोन दशकात त्यांनी आपलं स्वत:चं असं स्थान निर्माण केलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक दया पवार यांची कन्या म्हणून कदाचित त्यांनी आपली लेखन कारकीर्द सुरू केली असेल, पण आजघडीला त्यांनी तो लेखनवारसा स्वकर्तृत्वाने अधिक पुढे नेला आहे. ‘टेहलटिकोरी’ या त्यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ललित-वैचारिक लेखसंग्रहाने त्यांचे हे मूल्यमापन ठळकपणे अधोरेखित होते, एवढेच.
‘टेहलटिकोरी’ या- बहुधा मूळ हिंदीतील- आकर्षक आणि लेखसंग्रहाला चपखल बसणाऱ्या शब्दाचा अर्थ आहे- प्रयोजनविरहित स्वैर भटकंती. पुस्तकातील लेख वाचताना मात्र त्याचं प्रयोजन यथार्थपणे दृग्गोचर होतं. प्रत्येक लेखाचं स्वतंत्रपणे आणि सर्वाचं मिळून एकत्रितपणेही. हे असं होतं याचं कारण लेखांचं प्रासंगिक निमित्त आणि विषय भिन्न असले तरी लेखिकेची जीवनविषयक दृष्टी आणि जगाविषयीचं भान हेच यातल्या सर्व लेखांचं प्रमुख मार्गदर्शक सूत्र राहिलं आहे. त्यामुळे अनेक स्फूटलेखांचा संग्रह ही मर्यादा ओलांडून त्यातील सेंद्रिय एकात्मता प्रभावीपणे जाणवते आणि पुस्तकाचा एकसंध परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कुठल्याही चांगल्या स्तंभलेखनाने हेच उद्दिष्ट साध्य व्हावे अशीच बहुधा संपादकांची अपेक्षा असते. या संग्रहात ३८ लेख आहेत. त्यातील काही निवडक लेखांचे अवलोकन केले तरीही या निरीक्षणांना काही आधार प्राप्त होतो. उदाहरणार्थ ‘वेश्येचे डोळे..’ हा लेख. तृतीयपंथी सेलेब्रिटी लक्ष्मी त्रिपाठी यांनी एका मुलाखतीत वेश्या व्यवसायाच्या केलेल्या छुप्या समर्थनाच्या आणि उदात्तीकरणाच्या निमित्ताने हा लेख सुरू होतो. या व्यवसायाबद्दल असलेले वाद-प्रतिवाद, मतभिन्नता यांचा पूर्वपक्ष अतिशय सहानुभूतीने मांडल्यानंतर आणि अशा भूमिका घेणाऱ्या संबंधित कार्यकर्त्यांबद्दल आदर बाळगूनही लेखिका त्याविरुद्ध असलेले आपले मतप्रदर्शन तर्कसुसंगत आणि विवेकी पद्धतीने मांडते, तेव्हा तो सामाजिक सदसद्विवेकबुद्धीचा प्रातिनिधिक आविष्कार आहे असे वाटते. ‘जातिव्यवस्था संपायला हवी, पुरुषसत्ता संपायला हवी, विषमता संपायला हवी असं आपण म्हणत असू, तर वेश्या-व्यवसायाचं समर्थन कदापि होऊ शकणार नाही. वेश्या-व्यवसाय संपवण्यासाठी प्रयत्न करणं हेच आपलं सर्वाचं अंतिम उद्दिष्ट असायला हवं. वेश्या-व्यवसाय हा स्त्रीसाठी सन्मानाने जगण्याचा मार्ग नाही..’ या निष्कर्षांपर्यंत लेखिका येऊन पोहोचते. परंतु लेखाचा हा शेवट नाही. तो उत्कर्षबिंदूपर्यंत गेला आहे ते लेखिकेच्याच पूर्वप्रकाशित एका कवितेने. कवितेचं शीर्षकच आहे- ‘वेश्या’! चर्चेचं सगळं परिमाणच बदलणारी ही कविता. कवयित्रीच्या कवितेची आणि वैचारिक लेखनाचीही जातकुळी एकच असल्याची ग्वाही देणारी.
‘ऑनर किलिंग’बद्दल अलीकडे बरीच चर्चा सुरू आहे आणि ‘सैराट’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. ‘दुस्तर हा प्रेमघाट’ या लेखात हाच विषय चर्चेला आला आहे. निमित्त आहे- सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचे. एका आंतरजातीय विवाहातून झालेल्या भीषण हत्याकांडाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हेगाराला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करताना केलेला युक्तिवाद लेखिका पुढे मांडते. न्यायालयाने म्हटले आहे, ‘सुषमाचा भाऊ हा काही अट्टल गुन्हेगार नाही. आपल्या लहान बहिणीने केलेल्या या ‘असाधारण’ कृतीसाठी समाज आपल्यालाच (थोरला भाऊ म्हणून) दोषी धरणार असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याचा हा गुन्हा कितीही गर्हणीय असला तरी त्याच्या या गुन्ह्य़ाला तो एकटा जबाबदार नाही. म्हणून आपण त्याची शिक्षा कमी करत आहोत.’ यावर लेखिका आपलं मत देताना म्हणते, ‘अब्रूसाठी होणाऱ्या हत्या या कायमच जातीय वा धार्मिक वा घराण्याच्या खोटय़ा प्रतिष्ठेपायी होतात. अशा हत्या करणाऱ्या व्यक्ती सामाजिक मागासलेपणाच्या गुलाम असतात. जर या कारणाने त्यांच्या शिक्षेमध्ये घट व्हायला लागली तर ऑनर किलिंगचं प्रमाण कमी होईल की वाढेल? मग याच न्यायाने बलात्कार करणारा पुरुष हा पुरुषत्वाचा गुलाम असतो, सुनेचा छळ करणारं तथाकथित सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंब अंतर्बाह्य़ सरंजामी जाणिवेचं गुलाम असतं. मग अशा घटनांमधल्या गुन्हेगारांनाही मोकाट सोडणार का?
अलीकडेच नगर जिल्ह्य़ातील ‘कोपर्डी’ या गावात घडलेल्या भीषण बलात्कार आणि हत्येच्या संदर्भात व्यक्त झालेले तीव्र जनमत आणि त्यातील राजकारण किंवा बसपच्या नेत्या मायावती यांच्याबद्दल भाजपच्या राज्यस्तरीय नेत्याने केलेली गलिच्छ टीकाटिप्पणी आणि त्यावरून संसदेत झालेला सर्वपक्षीय निषेध या घटना भारतीय समाजातील काहींची ही ‘असाधारण’ सडकी मनोवृत्ती अधोरेखित करते. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय चुकीचा पायंडा पाडणारा असून, ‘प्रेमाला गोत्र, जात, धर्म, वंश, राष्ट्रीयतेच्या सुळावर चढवणारा पायंडा’ असं त्याचं वर्णन लेखिका करते.
स्वातंत्र्य, समता, न्याय यांचं मूल्यभान असणारा, विवेकी, आधुनिक आणि मानसिकदृष्टय़ा आरोग्यसंपन्न समाज निर्माण व्हावा, ही लेखिकेची मूलभूत धारणा त्यांच्या अनेक लेखांतून वारंवार प्रकट होताना दिसते, ही या लेखसंग्रहाची बीजखूण आहे.
स्तंभलेखनाचं निमित्त तात्कालिक आणि प्रसंगविशिष्ट असलं तरी त्यात व्यक्त झालेलं जीवनभान त्याचं आयुष्य वाढवीत असतं. तत्कालीन समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यमापनाचं ते एक परिमाणही असतं. यादृष्टीने प्रज्ञा पवार यांच्या आणखी काही लेखांतील मतप्रदर्शन वाचकांच्या निदर्शनास आणून देणं उपयुक्त होईल.
साहित्यविषयक प्रश्नांच्या संदर्भात लिहिताना त्या म्हणतात, ‘नेमकं कसं आहे आजचं मराठी साहित्यविश्व? सामाजिक आणि राजकीय बाबी तर सोडूनच द्या; पण अगदी सांस्कृतिक आणि साहित्यविश्वातल्या प्रश्नांसंदर्भातदेखील भूमिका न घेणं हा मराठी साहित्यिकांचा खास गुण राहिलेला आहे. साहित्यिकांची राजकारणाबद्दलची उदासीनता ही सत्ताधारी राजकीय वर्गाच्या सोयीची असते. या उदासीनतेची योग्य किंमत त्यांना त्यांच्या ‘निखळ’ साहित्यसेवेच्या बदल्यात दिली जाते. साहित्यिकांची जबाबदारी असते तरी काय? भीती, दहशत किंवा लालूच यांना बळी न पडता आपल्याशी प्रामाणिक राहून भवतालाचा उभा-आडवा पट त्याच्या हजारो विसंगतींसह थेटपणे मांडणे. यासाठी साहित्यिकाच्या अंत:प्रेरणेइतकीच लोकशाही अंगी रुजलेल्या समाजाचीही गरज असते.’
अलीकडच्या काळात असहिष्णुतेवरून निर्माण झालेल्या चर्चाविश्वात हे मत व्यक्त झाल्याचे आपणास वाटेल. पण हे तसे नाही. ते बरेच आधीचे आहे. आपण पुढे सरकत नाही आहोत, या सामाजिक वस्तुस्थितीचे हे एका अर्थाने प्रातिनिधिक उदाहरण आहे.
१) अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्राच्या तमाशाला लोकनाटय़ात रूपांतरित केलं.
२) आज महाराष्ट्रात जर कोणती एक बाब अभावानेच सापडत असेल, तर ती विचारांची व्यापकता आणि उदारता हीच आहे. आज महाराष्ट्राला कधी नव्हे एवढय़ा संकुचिततेच्या फे ऱ्याने वेढलेलं आहे.
३) भारतीय समाजाचं भवितव्य अवघड आहे. हा समाज एकसंध कधीच नव्हता; परंतु या समाजाच्या विखंडितपणाच्या आजच्या जाणिवा जितक्या तीव्र दिसतात, तितक्या तीव्र याआधी असतील असं वाटत नाही.
४) भावना दुखावण्याचा रोग हा असा सर्वव्यापी आहे. त्यामुळे लेखकासमोर दोनच पर्याय उपलब्ध असतात. एक तर सर्व भावना म्यान करून ‘भाव’निरपेक्ष साहित्य निर्माण करणं, नाहीतर ‘भाव’वाढ करणाऱ्या साठेबाजांविरुद्ध सरळ लढाई करणं.
५) बाबासाहेबांचे दैवतीकरण, ‘प्रॉफेटी’करण ही बाब बाबासाहेबांच्या वैचारिक वारशालाच पायदळी तुडवणारी आहे. एका अर्थाने आजच्या बेभान, अविवेकी वातावरणाशी सुसंगत अशीच ही बाब आहे.
६) विशिष्टता आणि वैश्विकता यांना जोडणारा आंबेडकरी वारसा आजची आंबेडकरी चळवळ पुढे नेते आहे का? या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच खेदाने द्यावं लागतं.
संपूर्ण पुस्तकात लाह्य़ा फुटाव्यात तसे भावनांचे आणि विचारांचे असे विस्फोट आणि लखलखीत विचारशलाका आहेत. ते संदर्भ सोडून, बाजूला काढून पुस्तकाचा आणि लेखिकेचा परिचय करून घेणे काहीसे अन्यायकारक होईल. त्यामुळे लेखिका स्वत:बद्दल आणि स्वत:च्या लेखनाबद्दल काय म्हणते ते सांगून या विवेचनाचा समारोप करणे अधिक प्रस्तुत होईल.
‘चांगलं लिहिण्यासाठी कवी-लेखकांना खूप बघावं लागतं, खूप अनुभवावं लागतं. ‘कम्फर्ट झोन’च्या पलीकडे जाण्याची तयारी ठेवावी लागते. त्यासाठी प्रसंगी पडेल ती किंमत चुकवावी लागते.. मी स्वत:ला फक्त लेखक मानत नाही. कारण मी स्त्री आहे, दलित स्त्री आहे याचं भान नाकारून मी ना जगते, ना लिहिते. पण याचा अर्थ बाई म्हणून, दलित म्हणून वाटय़ाला येणाऱ्या सर्व बाबी मी अंधपणे स्वीकारत नाही..’
या पुस्तकात अनेक विषय आहेत. गंभीर आहेत, हलकेफुलके आहेत. पण लेखिकेचे त्याकडे पाहण्याचे गांभीर्य सुटलेले नाही. यातल्या काही विषयांकडे पाहताना एखादी स्त्री आक्रमक आणि आक्रस्ताळी होऊ शकली असती. परंतु विचार आणि भूमिका ठाम असतील तर संयमित भाषेत किती निर्धारपूर्वक लिहिता येते याचा वस्तुपाठ या पुस्तकात पाहायला मिळतो. प्रज्ञा पवार या स्वत: कवयित्री असल्याने आणि नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ आणि इतरही काही कवींवर त्यांनी फार संवेदनशीलतेने लिहिलेले असल्याने अनेक कवितांची संगत आपल्याला इथे लाभते. या पुस्तकाचे हेही एक वेगळेपण.
‘टेहलटिकोरी’ – प्रज्ञा दया पवार,
अक्षर प्रकाशन,
पृष्ठे- १९२, मूल्य- २०० रुपये
सदा डुम्बरे – sadadumbre@gmail.com