-रणधीर शिंदे

महात्मा गांधींच्या जीवनकार्याचा भारतीय जनमानसावर मोठा प्रभाव आहे. कला वाङ्मयीन क्षेत्रात महात्मा गांधींविषयीचे अनेक पडसाद उमटले आहेत. ते जसे सकारात्मक आहेत तसेच नकारात्मकही आहेत. महात्मा गांधींकडे जगभरात प्रेम, आदरभाव तसेच द्वेषभावनेने पाहिले जात आहे. याशिवाय आजच्या सामाजिक जीवनात गांधी प्रतिमानाचा अनेक पद्धतीने वापर केला जात आहे. अजय कांडर यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या संग्रहातील कवितेतून महात्मा गांधींविषयीच्या विविध भावजाणिवा प्रकटल्या आहेत.

महात्मा गांधीजींच्या आदरभावातून स्फुरलेली ही दीर्घकविता आहे. निवेदकाच्या मनावर बालपणापासून महात्मा गांधींचे जे पडसाद उमटले त्याची भावरूपे या दीर्घकवितेत आहेत. ‘मला तुझ्यात निष्पाप लहान मूलही दिसतं. बुद्धाच्या चेहऱ्यासारखं निष्कलंक’ या रीतीने ही भावजाणीव प्रकटली आहे. एक प्रकारच्या विरोध द्वैती भावातून ही कविता निर्माण झालेली आहे. महात्मा गांधींचा जीवनपट, भूतकाळ, त्यांची तत्त्वसरणी, साधेपण, आदर्शवतता आणि त्यांच्या उत्तरकाळात समकाळातील त्याला छेद देणाऱ्या काळपटाच्या विरोधचित्रांतून गांधीदर्शनाची रूपे प्रकटली आहेत. ‘सत्यमेव जयतेचे असत्यमेव जयते’मध्ये रूपांतरण झालेल्या काळजीवनाचे चित्र या कवितेत आहे. गांधींजींच्या जीवनातील साधनशुचिता आणि आताच्या काळातील त्याला शह देणाऱ्या घटनांमधील विरोधचित्रांतून ही कविता साकारली आहे.

हेही वाचा…जंबुद्वैपायनाचा कर्मयोग…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तू असा एकमेव आहेस, या भूमीवरती, स्वकीयांनाही आपलासा वाटतो, आणि विरोधकांनाही’ किंवा ‘तुमचा राम वेगळा आणि त्यांचा राम वेगळा’ या द्वंद्वरूपातून महात्मा गांधींची बृहत प्रतिमा कवितेत रेखाटली आहे. या दीर्घकवितेत महात्मा गांधींची आकाशव्यापी प्रतिमा आहे. गांधीजींच्या या प्रतिमानामागे भारतीय जनमानस आणि भारतीय समाज वाटचालीचे संदर्भ आहेत. आजच्या काळातील मानवी समाजाच्या दुटप्पी दांभिकपणाची चित्रे गांधीनिमित्ताने व्यक्त झाली आहेत. गांधीविरोधक या विरोध प्रतिमानामागे एक प्रकारची आत्मसमूह टीका आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनातील सत्यप्रियता, सुहृदयता, प्रेममयता, साधेपणा, त्यागमयता नैतिकता, मानवता मूल्यांच्या जाणिवा या कवितारूपात आहेत. म. गांधीजींचे ग्रामराज्याचे स्वप्न, देशीयता, परंपरा आणि आजच्या भोगवादी आधुनिक भांडवली संस्कृतीतील अंतरायाची जाणीव आहे.

‘अजूनही जिवंत आहे गांधी’ – अजय कांडर, हर्मिस प्रकाशन, पुणे, पाने- ६०, किंमत – १२० रुपये