-निशा शिवूरकर

रमेश ओझा आणि श्याम पाखरे यांनी लिहिलेली ‘नोआखाली : माणुसकीचा अविरत लढा’ हे पुस्तक कादंबरी लिखाणाचा वेगळाच प्रयोग आहे. देशाच्या नजीकच्या इतिहासात घडलेल्या एका नाजूक पर्वाचा लेखाजोखा या कादंबरीत आहे. इतिहासातील घटनांशी प्रामाणिक राहत, त्यात फेरफार न करता कथानक रचणे सोपे काम नाही. लेखकद्वयींनी हे भान सांभाळत ही कादंबरी लिहिली आहे. नोआखालीतील गांधीजींचे वास्तव्य हे कादंबरीचे कथानक आहे. या कथानकात तत्कालीन राजकीय, सामाजिक वास्तव लेखकांनी अंर्तभूत केले आहे. कथानक केवळ घटनांची मालिका राहत नाही, तर त्या काळातील जनतेच्या मनातील आंदोलनांचा आरसा ठरते.

गांधीजींच्या जीवनातील अंतिम काळातील घटना हा कादंबरीचा विषय आहे. फाळणीपूर्व हिंसाचाराने व्यथित झालेले गांधीजी शांततेच्या मार्गाने हिंसा थांबविण्यासाठी निवडक सहकाऱ्यांसह सध्याच्या बांग्लादेशातील नोआखालीतील अल्पसंख्य हिंदूंचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी येतात. चार महिन्यांच्या काळातील वृद्ध गांधीजींची पदयात्रा ‘कबीर’ या रेव्हील्युशनरी सोशालिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्याच्या नजरेतून वाचकांसमोर लेखकांनी उभी केली आहे. कादंबरीची दृश्यात्मकता वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाचकही या पदयात्रेत चालायला लागतो. त्यांच्याही डोळ्यात आसवे येतात. काहीशा गोंधळलेल्या कबीरला गांधीजींचा शोध घ्यायचा आहे. त्याच्या मनात अनेक प्रश्न आहेत. वाचकांच्या मनातही गांधीजींविषयी कुतूहल व प्रश्न आहेत. कबीरच्या या शोधात वाचकही सहभागी होतात.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

कादंबरीचा नायक महात्मा गांधी आणि कबीरही आहे. कलकत्त्यात राहणारा कबीर १९७१ च्या ऑगस्ट महिन्यातील एका सकाळी स्टेटसमन वर्तमानपत्रातील ‘नोआखालीतील जोयाग येथील गांधी आश्रमातील चार कार्यकर्त्यांची पाकिस्तानी सैनिकांकडून गोळ्या झाडून नृशंस हत्या’ ही बातमी वाचतो. हे चार कार्यकर्ते कबीरचे आदर्श आणि एकेकाळचे सहकारी होते. नोआखाली सोडून जाताना गांधीजींनी आश्रमाचा संचालक चारू चौधरीला सांगितले, ‘‘मी परत येईन. तोपर्यंत तू येथेच राहा आणि आश्रमाचे कामकाज सुरू ठेव.’’ देशाची फाळणी झाली. नोआखाली पूर्व पाकिस्तानात गेले. गांधीजींची हत्या झाली. ते तिथे पुन्हा जाऊ शकले नाहीत. चारू चौधरीने गांधीजींना दिलेला शब्द पाळला. ही कादंबरी गांधीजींच्या प्रेरणेने नोआखालीत राहून समाजसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या चारू चौधरी, देवेंद्रनाथ सरकार, मदनमोहन चट्टोपाध्याय, अजितकुमार डे, जीवन कृष्ण साहा आणि इतर अज्ञात कार्यकर्त्यांच्या स्मृतीस अर्पण केलेली आहे.

हेही वाचा…लहानग्यांसाठी कार्व्हरची पुन्हा ओळख

वर्तमानपत्रातील बातमी कबीरला भूतकाळात १९४६ मध्ये घेऊन जाते. तेव्हा कबीर चोवीस वर्षांचा होता. १९४२ च्या चळवळीत तुरुंगात असताना कबीरची बिजॉय चक्रवर्ती या रेव्हील्युशनरी सोशालिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्याशी भेट होते. त्याच्याशी झालेल्या चर्चेतून कबीरला मार्क्सवादाचे आकर्षण वाटते. गांधी विचारांसंबंधी प्रश्न निर्माण होतात. नोआखालीच्या पदयात्रेत गांधींसोबत निघालेल्या कबीरला स्वत:च्या मनाचा व गांधीजींचा शोध लागतो. त्याचे क्षुब्ध मन शांत होते.

गांधीजींचे सचिव प्यारेलाल यांचे ‘द लास्ट फेज- अनुवाद अखेरचे पर्व- ब्रिजमोहन हेडा’ आणि गांधी विचारांचे अभ्यासक व मानववंशशास्त्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचे ‘माय डेज विथ गांधीजी अनुवाद- गांधीजींच्या जीवनाचे अखेरचे पर्व- सरिता पदकी’ ही पुस्तकं नोआखालीचा इतिहास सांगणारी आहेत. कादंबरीत हा इतिहास विविध व्यक्तींमधील संवादाच्या रूपाने मांडला आहे.

निर्मलकुमार बोस, प्यारेलाल, चारू चौधरी, परशुराम, मनु गांधी, आदिल, ठक्कर बप्पा, मौलाना आझाद, सुशीला नायर, जवाहरलाल नेहरू, साथी राममनोहर लोहिया, सरहद गांधी खान अब्दुल गफ्फार खान, राजेंद्रप्रसाद ही या कादंबरीतील पात्रे आहेत. पिशिमा, सत्यप्रियासारख्या हिंसाचाराचा परिणाम भोगणाऱ्या अनेक व्यक्तीही वाचकांना भेटतात. तत्कालीन पूर्व बंगालचे मुख्यमंत्री सुहराववर्दी आणि हिंदुत्ववादी संघटनेचा अनिरुद्धही आहे. कबीर ज्या सौदतपूर आश्रमात राहत होता त्या आश्रमाचे प्रमुख सतीश बाबू आणि त्यांच्या पत्नी माँ आहेत. या सगळ्यांमध्ये गांधीजी आहेतच. प्रोमीथियस या ग्रीक देवतेची आठवण देत माँ कबीरला म्हणतात. ‘‘महात्माजींनी आपल्या कल्याणासाठी प्रेम, करुणा, सत्य व अहिंसा ही मूल्ये दिलीत. आज आपण कृतघ्न झालो आहोत आणि महात्माजींना प्रोमीथियससारख्या वेदना देत आहोत.’’ हिंसेने होरपळलेल्या वातावरणात निर्भयपणे करुणा व प्रेमाचा संदेश देणारे गांधीजी वाचकांना या कादंबरीत भेटतात.

हेही वाचा…देश बदल रहा है…

पूर्व बंगालमध्ये घडणाऱ्या या कथानकाला गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांची पार्श्वभूमी आहे. कबीर आणि गांधीजींच्या सोबत सतत या कविता आहेत. कादंबरीत आपल्याला ‘बाउल’ काव्यही वाचायला मिळते. बाउल गीत गाणारे सनातन बाबा कबीरला विचारतात. ’‘बडे बाउल बाबा कुठे आहेत?’’ कबीर त्यांना विचारतो ’‘बडे बाउल बाबा म्हणजे?’’ सनातन बाबांचा साथीदार खुदाबक्ष म्हणतो- ‘‘गांधी बाबा.’’ सनातन बाबा सांगतात, ‘‘गांधीजींचा आणि आमचा मार्ग एकच, तो म्हणजे प्रेम आणि करुणेचा. सर्वस्वाचा त्याग करून त्या मार्गावरून चालणाऱ्याला हे जग वेडा बाउलच समजते. बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याचा सामना अहिंसेने करून पाहणाऱ्याला कोणीही वेडाच समजेल. त्यांचा तो ‘आतला आवाज’ म्हणजे आमचा ‘मनेर मानुषच’ आहे.’’ बाबा त्याला सांगतात, रवींद्रनाथही एक महान बाउल होते. कबीरचा सनातन बाबांशी झालेला संवाद हा कादंबरीतील हृदयस्पर्शी भाग आहे. सनातन बाबा कबीरला म्हणतात, ‘‘बेटा, तू आपल्या हृदयाच्या खिडक्या, दरवाजे उघड. तुझ्यामध्ये मला एक चांगला बाउल बनण्याच्या शक्यता दिसतात.’’ वाचकांच्या हृदयाच्या खिडक्या उघडण्याचे काम कादंबरी करते.

पात्रांमधील संवाद हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. निर्मलकुमार बोस, डॉ. लोहिया, सरहद गांधी, नेहरू, ठक्कर बप्पा, मनु गांधी यांच्याशी कबीरच्या झालेल्या संवादातून या व्यक्तींना हिंसाचाराने झालेल्या वेदना आपल्यापर्यंत पोहचतात. ही सगळी गांधींची माणसं आहेत. त्यांच्याच मार्गाने जाऊन हिंदू- मुसलमानांमध्ये निर्माण झालेला द्वेष संपवण्याचा आणि प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

कादंबरीच्या रचनेत असलेली संगीत आणि काव्याची अजोड जोड सतत जाणवते. अणवाणी पदयात्रा करणाऱ्या, चरख्यावर सूत कातणाऱ्या, दु:खितांचे अश्रू पुसणाऱ्या गांधीजींचे व्यक्तित्व लेखकांनी उत्कटपणे उभे केले आहे. गांधी वाचकांच्या हृदयाला स्पर्श करतात. या महात्म्याच्या दर्शनाने वाचकही अस्वस्थ होतो. त्यांच्या शब्दाने कबीरला मिळाली तशीच मनाची शांती वाचकालाही मिळते.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : प्रयोगांची शाळा

कबीर हा समाजवादी कार्यकर्ता आहे. डॉ. लोहिया त्याला सांगतात, ‘‘तू, गांधीजी काय करतात याच्याकडे लक्ष दे. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये समाजवाद आहे. आपण समाजवाद्यांनी जर आपला विचार व कृतींना गांधीरूपी साध्यसाधन विवेकाचा फिल्टर लावला, तर शुद्ध समाजवादी व्यवस्था निर्माण करू शकू. अरे, आपणच सच्चे गांधीवादी आहोत, पण आपण अछूत गांधीवादी आहोत.’’ वर्तमानकाळात कबीर लोहियांच्या बोलण्याचा विचार करतो. त्याला जाणवते, भारतातील समाजवाद्यांसमोर केवळ भांडवलशाहीचे आव्हान नव्हते, तर हिंदुत्ववाद्यांचे देखील होते. भारतात समाजवादाचा पराभव झाला, तर ती पोकळी भरून काढण्यासाठी हिंदुत्ववादी सज्ज होते. असे झाले तर ती एक मोठी आपत्ती असणार होती. समाजवाद्यांच्या खांद्यावर मोठी ऐतिहासिक जबाबदारी होती. कबीरने सांगितलेले संकट आज देशापुढे उभे आहे.

हिंदू-मुस्लीम प्रश्न देशाची एकात्मता, फाळणी, हिंसा-अहिंसा, स्त्री-पुरुष समता, अस्पृश्यता निर्मूलन, जातीप्रथा, गांधीजींचे ब्रह्मचर्य या विषयांची चर्चा कादंबरीतील पात्र आपापसात करतात. त्यातून गांधी विचार आणि गांधीजींची कार्यपद्धती वाचकांपर्यंत पोहचते. काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, मुस्लीम लीग यांच्या विविध भूमिका समजून घ्यायला कादंबरी मदत करते.

हेही वाचा…आठवणींचा सराफा : ‘उफ! क्या आदमी था।

अन्वर हुसेन यांचे मुखपृष्ठ व मांडणी गांधीजींची वेदना व शांततेचा प्रयत्न आपल्यापर्यंत पोहचवते. श्याम पाखरे व रमेश ओझा गांधी विचारांचे अभ्यासक कार्यकर्ते आहेत. दोघांची वैचारिक एकरूपता कादंबरीत जाणवते. नोआखालीच्या पार्श्वभूमीवरील ही कादंबरी लिहिताना लेखकाच्या नजरेसमोर वर्तमानकाळ आहे. सांप्रतकाळातील सांप्रदायिक हिंसाचाराचे उत्तर या कादंबरीत मिळू शकते. मानवतेच्या रक्षणासाठी आजही गांधी विचारांपासून प्रेरणा मिळू शकते, असा विश्वास लेखकांना आहे. हाच विश्वास वाचकांपर्यंत पोहचतो हेच या कादंबरीचे यश आहे.

‘नोआखाली’ माणुसकीचा अविरत लढा,- रमेश ओझा, श्याम पाखरे, मनोविकास प्रकाशन, पाने- २०७, किंमत-२७०

advnishashiurkar@gmail.com