डॉ. शुभा थत्ते
वाचनाची प्रक्रिया लहानपणापासूनच सुरू व्हायला हवी. हल्ली मुलांची सुरुवात मोबाइलवरील कार्टूनने होते. त्याऐवजी पालकांनी आजीच्या पोतडीतील गोष्टींप्रमाणे गोष्टीरूपाने संवाद साधला तर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊ शकते. मुलांचे मन संस्कारित होईल. कुटुंबीयांनीही आपल्या घरातील वातावरण, वर्तन सजग ठेवायला हवे.
शाळांमध्येही अभ्यासाबरोबर मुलांच्या मनाची मशागत होईल अशा वैविध्यपूर्ण पुस्तकांची पारायणे व्हायला हवीत. परिणामी, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. हॅरी पॉटर वाचला म्हणजे आपल्या मुलाने बालसाहित्यातीत सगळेच वाचले, असा अनेक पालकांचा समज आहे. परंतु मराठी साहित्यात त्याहून उत्तमोत्तम साहित्य आहे याचा विसर पालकांना पडला आहे. मुलांना हॅरी पॉटर वाचायला द्या, पण त्याआधी मराठी बालसाहित्याचीही ओळख होऊ द्या. आपली मुले मराठीतले उत्तम साहित्य वाचतील याकडे पालक आणि शिक्षकांनीही लक्ष देणे गरजेचे आहे.
