सुबोध जावडेकर
कुण्या एकेकाळी रहस्यकथांइतक्याच किंवा त्याहून अधिक त्याज्य समजल्या जाणाऱ्या विज्ञानकथा प्रांतात जयंत नारळीकर लिहू लागल्यानंतर या साहित्य प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले गेले. रोबो, अंतराळप्रवास, परग्रहवासी या ठरावीक चौकटीत अडकून न ठेवता सामान्य माणसांच्या आयुष्यात विज्ञान कुठे असते हे दाखवून देण्याचे काम त्यांनी केले. ‘विज्ञान प्रसाराचे साधन’ म्हणून हयातभर कथात्मक लेखनाला व्रतासारखे सांभाळताना ‘प्रचारकी’ म्हणून समीक्षकांनी केलेल्या टीकेकडे कायम दुर्लक्ष केले. त्यांच्या विज्ञानकथेने नक्की काय दिले याची दोन पिढ्यांतील विज्ञानकथा लेखकांकडून पडताळणी आणि लेखनापलीकडल्या नारळीकरांच्या कार्यावर अवकाश विज्ञान अभ्यासकाचे टिपण…
जयंत नारळीकर यांचं नातं मराठी विज्ञानकथेशी घट्ट जोडलेलं आहे. विज्ञानकथा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव येतं ते नारळीकरांचं. मराठीत विज्ञानकथांना प्रतिष्ठा आणि लोकप्रियता प्राप्त झाली ती त्यांनी सत्तरच्या दशकात विज्ञानकथा लिहायला सुरुवात केली तेव्हापासून. त्याआधी मराठीत विज्ञानकथा लिहिल्या जात असत. पण त्यांच्याकडे काहीसं हेटाळणीनंच पाहिलं जात असे. कराडच्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवतांनी नारळीकरांच्या विज्ञानकथांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि रसिकांचं लक्ष या साहित्यप्रकाराकडे गेलं. विज्ञानकथा हा प्रकार मराठीत रुजला.
आज नारळीकर आपल्यात नाहीत. पण त्यांनी रुजवलेलं विज्ञानकथेचं रोपटं मात्र बहरताना दिसत आहे.
आज जरी विज्ञानकथा हा साहित्यप्रकार रसिकमान्य झाला असला तरी त्याची सुरुवात काहीशी अडखळत झाली. कारण नारळीकर विज्ञानकथेकडे ‘विज्ञान प्रसाराचे साधन’ या दृष्टीनं पहात असत. त्यामुळे विज्ञानकथा आणि विज्ञानकादंबऱ्या हा साहित्याचा भाग मानावा की नाही, यावर समीक्षकांच्या मनात संभ्रम होता.
विज्ञानकथा कोणत्या उद्देशाने लिहिल्या जाव्यात या विषयीची आपली भूमिका नारळीकरांनी १९७९ साली प्रसिद्ध झालेल्या ‘यक्षांची देणगी’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात लिहून ठेवली आहे. ते म्हणतात, ‘विज्ञानाची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा प्रचार आवश्यक आहे. माझ्या मते या कामासाठी विज्ञानकथा या तंत्राचा बराच उपयोग होईल. विज्ञानकथा या उद्देशाने लिहिल्या जाव्यात, असे मला वाटते. निदान मी लिहितो त्या कथा तरी याच उद्देशाने लिहिलेल्या आहेत.’
विज्ञानकथा ही जर कलाकृती असेल – आणि तशी ती असायलाच हवी, तर तिला विज्ञानप्रसाराच्या कामाला लावायची नारळीकरांची भूमिका अनेक समीक्षकांना पटली नाही. जर विज्ञानप्रसाराचं साधन म्हणून तिच्याकडे बघायचं असलं तर तिला साहित्याचे निकष कसे लावता येतील? असा त्यांचा रास्त सवाल होता.
विज्ञानकथेकडे पाहायच्या नारळीकरांच्या या भूमिकेचा परिणाम असा झाला की व. दि. कुलकर्णी, चंद्रकांत पाटील आणि दीपक घारे यांच्यासारखे काही मोजके अपवाद सोडले तर मराठीतल्या बहुतेक सर्व समीक्षकांनी नारळीकरांकडे (आणि विज्ञानकथांकडे) पाठ फिरवली. त्यांच्या साहित्याची दखलच घेतली गेली नाही. इतकी उपेक्षा झाली की नारळीकर २०२१ मध्ये जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हाही त्यांच्या साहित्यावर फारसं काही समीक्षात्मक लिहून आलं नव्हतं.
समीक्षकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती. ती म्हणजे नारळीकरांची भूमिका जरी प्रबोधनाची असली तरी ती त्यांची स्वत:ची भूमिका होती. सर्वच विज्ञानसाहित्य विज्ञानप्रसाराच्या हेतूनं लिहिलं जातं, असा गैरसमज करून घेण्याचं काही कारण नव्हतं. ‘‘विज्ञानकथा या प्रबोधनाच्या उद्देशाने लिहिल्या जाव्यात असे मला वाटते. पण ते सर्व विज्ञानकथा लेखकांना पटेल असे नाही.’’, असं स्वत: नारळीकरांनी स्वच्छ लिहूनच ठेवलेलं आहे. त्यामुळे ‘एखादी साहित्यकृती प्रबोधनाच्या भूमिकेतून लिहिली तर तिला गौणत्व येउ शकते’, हे व. दि. कुलकर्णीं यांचे म्हणणं योग्य असलं तरी नारळीकरांची भूमिका हीच जणू काही विज्ञानसाहित्याची व्याख्या असं मानून या साहित्यप्रकारालाच वाळीत टाकलं, हे उचित झालं नाही.
विज्ञानाचा प्रचार करण्यासाठी, विज्ञान समजावून सांगण्यासाठी नारळीकर विज्ञान कथा लिहितात, असं गृहीत धरून त्यांच्या साहित्याची सैद्धांतिक समीक्षा झाली नाही. पण नारळीकरांच्या कथा-कादंबऱ्या खरोखरच प्रचारकी आहेत का? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न कुणी केला का? त्यांच्या कथा या विज्ञानाच्या कथा आहेत की माणसांच्या कथा आहेत, हे मुळातून तपासून मगच त्यांच्या साहित्यावर ते प्रचारकी असल्याचा शिक्का मारावा, असं कुणाला कसं वाटलं नाही?
वस्तुस्थिती अशी आहे की त्यांच्या बहुसंख्य विज्ञानकथा या माणसांच्या कथा आहेत, निव्वळ विज्ञानाच्या नाहीत. त्यांच्या चार संग्रहात मिळून २७ विज्ञानकथा आहेत. त्या पैकी २० कथांमध्ये विज्ञान असलं तरी त्या विज्ञान समजावून सांगण्यासाठी लिहिलेल्या कथा नाहीत. विज्ञानामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांना सामोरं जाणाऱ्या माणसांच्या कथा आहेत, तीनचार उदाहरणं बघूया.
‘धूमकेतू’ या कथेत एक नवीन धूमकेतू पृथ्वीच्या दिशेने येत असतो आणि तो पृथ्वीवर आदळण्याची दाट शक्यता असते. हे समजताच सामान्य माणसांची काय अवस्था होते, ते कसे घाबरून जातात आणि याउलट वैज्ञानिक या संकटाचा कसा सामना करतात, ते ही कथा सांगते. सर्वसामान्य भारतीय माणसं यज्ञयाग आणि पूजाअर्चा करायला सुरुवात करतात. वैज्ञानिक मात्र धुमकेतूचा मार्ग बदलून तो पृथ्वीवर आदळणार नाही, अशी तजवीज करतात. धुमकेतूचा मार्ग कसा आणि कोणत्या उपायानं बदलला जातो, त्याबद्दलची वैज्ञानिक माहिती कथेत येत नाही, माणसांच्या घाबरण्याच्या स्वभावाचे, त्यांच्या यज्ञयागावरील अंधश्रद्धेचे वर्णन येते. वैज्ञानिक प्रयोगातून पृथ्वीवरचं संकट टळतं. मात्र त्या धुमकेतूचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाची बायकोसुद्धा त्याचं श्रेय विज्ञानाला देत नाही, तिनं केलेल्या यज्ञालाच देते! मनुष्यस्वभावाच्या विसंगतीची ही कथा उघडच माणसाची आहे, विज्ञानाची नाही.
‘पुत्रवती भव’ ही कथासुद्धा माणसाचीच कथा आहे. हमखास मुलगा किंवा मुलगी होईल असं औषध शोधून काढता आलं, तर काय होईल या विषयावर ती आधारलेली आहे. ते औषध कसं शोधून काढलं, त्यामुळे नक्की काय होतं, हमखास मुलगा कसा होऊ शकतो, याबद्दलची शास्त्रीय माहिती कथेमध्ये फारशी नाही. मात्र असं एखादं औषध खरोखरच निघालं तर त्याचा परिणाम काय होईल, हे ती कथा सांगते. कथेतला शास्त्रज्ञ म्हणतो, ‘‘असं झालं तर निसर्गाचा समतोल पूर्ण ढासळेल. मुलग्यांचे प्रमाण भरमसाठ वाढेल. त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतील.’’
लक्षात घ्या, नारळीकरानी ही कथा १९७५ मध्ये लिहिली. तेव्हा १००० मुलग्यांमागे ९६२ मुली असं प्रमाण होतं. त्यानंतर गर्भजल परीक्षा आली. पुढं त्यावर बंदी आली. तरीसुद्धा आज हे प्रमाण १००० मुलग्यांमागे फक्त ९३९ मुली इतकं खाली घसरलं आहे. सोनोग्राफी आणि गर्भलिंग परीक्षेवर बंदी आली नसती तर हे प्रमाण आणखी किती खाली गेलं असतं, याचा विचारच करवत नाही. विज्ञानकथा ही भविष्यातला धोका आजच दाखवून देऊन जागल्याचे काम करत असते, याचं ही कथा हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
‘अहंकार’ या कथेत कृष्णविवरातून उर्जा काढायचा प्रयोग आहे. पण तो फक्त पार्श्वभूमीला आहे. खरं तर ही कथा एक स्त्री आणि तिच्यावर प्रेम करणारे दोन पुरुष, या प्रेमाच्या सनातन त्रकिोणाची आहे. संकटकाळातसुद्धा माणूस कसा क्षुद्रपणे वागतो ते त्यात दिसतं. त्या दोघांतला एक पुरुष प्रचंड अहंकारी असतो. आपल्याला ती स्त्री वश होत नसल्यामुळे दुखावला जाऊन स्वत:सकट सर्वांचाच बळी द्यायला निघालेला असतो. त्या शास्त्रज्ञाच्या अहंकाराचाच उपयोग अंतराळयानाचा कॅप्टन कसा हुशारीने करून घेतो आणि संकटातून सर्वांची सुटका करतो, हे या कथेचं सूत्र आहे. कथेचा फोकस हा विज्ञानावर नाही, तर माणसांच्या मनात लपलेल्या स्वार्थ, अभिलाषा, अहंकार, सूड या विकारांवर आहे.
‘लपलेला तारा’ ही ‘अंतराळातील भस्मासुर’ या संग्रहातील एक सुंदर विज्ञानकथा. एक आख्खा ताराच आकाशातून हरवतो, दिसेनासा होतो. या घटनेचा मागोवा घेत असताना आपल्यापेक्षा प्रगत अशा एका जीवसृष्टीचा शोध लागतो, या कल्पनेवर ही विज्ञानकथा बेतलेली आहे. पण जीवसृष्टीचा शोध हा काही या कथेचा आत्मा नाही. तर त्या शोधाचा मानवजातीवर होऊ घातलेला परिणाम नारळीकरांना कथेतून वाचकाला जाणवून द्यायचा आहे. सृष्टीतल्या सर्व कोड्यांची उत्तरं विनासायास आपल्या हातात गवसली तर स्वावलंबनाने नवीन शोध लावण्याची जिद्द मानवजात गमावणार तर नाही ना, हा विचार वाचकांपर्यंत पोचवायचा आहे.
नारळीकर विज्ञानाच्या नाही तर माणसांच्या कथा लिहित, हे सिद्ध करण्यासाठी ही चार उदाहरणं पुरेशी आहेत. ‘अथेन्सचा प्लेग’, ‘पॉल झीरोला न्याय केव्हा मिळेल?’ या सारख्या काही थोड्या कथांतून नारळीकर आवश्यकतेपेक्षा जास्त वैज्ञानिक माहिती देतात, हे खरं असलं तरी त्यांच्या बहुसंख्य विज्ञानकथांतून ते विज्ञान शिकवत नसून माणसांच्या मनातल्या भावभावना, त्यांचा जीवनसंघर्ष चित्रति करत आहेत, हे सहज दिसून येईल.
नारळीकरांनी पाच विज्ञानकादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘प्रेषित’ या कादंबरीत सायक्लॉप्स नावाच्या दुर्बिणीतून प्रगत जीवसृष्टीचा शोध घेतला जातो. ‘वामन परत न आला’ या कादंबरीत पृथ्वीवर पूर्वी राहून गेलेल्या प्रजातींची कहाणी येते. प्राचीन काळातील मोनाद संस्कृती आणि कोनाद संस्कृती यांच्यातील संघर्ष हा या कादंबरीचा विषय. ‘अंतराळातील स्फोट’ ही किशोरवयीन मुलामुलींना डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेली कादंबरी आहे. ‘स्फोट’ नावाच्या कथेचीच ती वाढवलेली आवृत्ती आहे. तारकास्फोट हा विश्वात घडणाऱ्या घटनांपैकी एक सामान्य घटना. पण तिचे परिणाम मानवी संस्कृतीवर किती दूरगामी होतात हे त्यातून दाखवलं आहे. अंतराळातील घटनेपुढे मानवी जीवन किती क्षुद्र आहे, हे वाचकाला त्यातून जाणवतं. ‘व्हायरस’मध्ये परग्रहावरील सजीवांनी संगणकप्रणालीत विषाणू सोडून पृथ्वीवर केलेले छुपे आक्रमण आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी ही परग्रहावरील अतिप्रगत सजीवांनी प्रयोगादाखल उभारलेले अभयारण्य आहे या कल्पनेवर ‘अभयारण्य’ ही कादंबरी बेतलेली आहे.
या सर्व कादंबऱ्यांना कादंबऱ्यापेक्षा दीर्घकथा म्हणणं योग्य होईल. कारण कादंबरीला आवश्यक असलेले बहुपेडी कथानक त्यात आढळत नाही. ‘प्रेषित’ ही कादंबरी सोडली तर इतर कादंबऱ्या नारळीकरांच्याच कथांइतक्या रसरशीत उतरलेल्या नाहीत. त्यातल्या व्यक्तिरेखा पुरेशा सशक्त झालेल्या नाहीत. पण तरीही त्यातून लोकांपर्यंत विज्ञान पोचवण्यापेक्षा वैज्ञानिक विश्वातला थरार पोचवण्याचा लेखकाचा प्रयत्न निश्चितपणे जाणवतो. वरवर पहाता ‘प्रेषित’ ही एक साधी, सरळ रहस्यकथा आहे, असं वाटतं. पण त्यातलं मर्म समीक्षक दीपक घारे यांनी त्यांच्या एका लेखात उलगडून दाखवलं आहे. अज्ञाताची भीतीयुक्त ओढ ही माणसाला बरे-वाईट निर्णय घ्यायला भाग पाडत असते. त्यात आशावाद आणि आजपर्यंतच्या अनुभवातून आलेली सावधता दोन्ही असते. विज्ञानाच्या अंगाने कथेची रहस्यमय मांडणी करत असतानाच, प्रेषित या कल्पनेच्या आधारे, जीवनाबद्दलची एक व्यापक जाणीव वाचकाला करून देण्यात नारळीकर यशस्वी झाले आहेत.
सारांश, विज्ञान प्रसाराच्या हेतूनं आपण विज्ञानकथा लिहितो असं नारळीकरांनी म्हटलं असलं तरी ते प्रचारकी वाङमय म्हणता येणार नाही. त्या वाचून विज्ञानाचा प्रसार होत असला तरी तो अनुषंगिक फायदा आहे. त्यांच्या बहुसंख्य विज्ञानकथा साहित्याच्या निकषांवर खऱ्या ठरतात. इतकंच नाही तर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून उद्या काय होणार आहे याचं भविष्य त्यातल्या काही कथा आजच वर्तवतात. विज्ञानसाहित्याची जी बलस्थानं समजली जातात त्यातलं हे एक महत्वाचं बलस्थान आहे.Subodh.jawadekar@hotmail.com