राधिका विंझे
सायटीमध्ये नवीन मेरीगो राउंड आल्यामुळे सगळ्या लहान मुलांचे ते आकर्षण बनलं होतं. ईशासुद्धा रोज त्यावर खेळायला जात असे. ईशाला त्यात बसून गोल गोल फिरायला मजा वाटे. आज शाळेतून घरी येताना मात्र ती काही प्रश्न डोक्यात घेऊन आली. आल्यावर आजोबांना म्हणाली, ‘‘आज आम्हाला सरांनी शाळेच्या मैदानावर एक वर्तुळ आखून दिलं आणि त्या गोलाकार रेषेवर धावायला सांगितलं. आम्ही जसे धावायला लागलो, तसं आम्हाला जाणवलं की, काहीतरी शक्ती आपल्याला त्या वर्तुळाच्या केंद्राकडे खेचून घेते आहे. आम्हाला थांबताच येत नव्हतं. मला सांगा, ही कोणती शक्ती/ बल आहे जे मला त्या केंद्राकडे खेचत होतं?’’
आजोबा म्हणाले, ‘‘अगदी बरोबर अनुभवलंस तू. त्या बलाला अभिकेंद्री बल ( centripetal force) म्हणतात. वस्तूची गोलाकार हालचाल अभिकेंद्री बलामुळे होते.’’ विचारात पडलेल्या ईशानं आजोबांना पुन्हा विचारलं, ‘‘म्हणजे सगळ्या गोलाकार हालचालीत हे बल कार्य करतं? मी मेरीगो राउंडमध्ये गोल फिरते तेव्हासुद्धा?’’
आजोबा म्हणाले, ‘‘हो. इतकंच काय, आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हासुद्धा हे बल कार्य करतं. तुम्हाला शाळेत ते अणूचं मॉडेल दाखवलं होतं, त्यातसुद्धा इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्राभोवती फिरतात ते या अभिकेंद्री बलामुळे. आपल्या घड्याळात अर्धगोलाकार फिरणाऱ्या दोलकाची ( pendulum) हालचालसुद्धा अभिकेंद्री बलामुळे होते.’’ तेवढ्यात ६ वाजले. घड्याळाचा गजर झाला आणि ‘आज मेरीगो राउंडमध्ये बसून ही अभिकेंद्री बलाची गोष्ट मैत्रिणींना सांगायची.’’ असं ठरवून ईशा खेळायला पळाली.