डॉ. श्रीकृष्ण काकडे
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सामाजिक परिवर्तनाच्या आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या चळवळी नव्याने उभ्या राहिल्या. त्यातूनच दलित, ग्रामीण, जनवादी, स्त्रीवादी, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांच्या साहित्यप्रवाहांना वाट मिळाली. चळवळ आणि साहित्य एकमेकांच्या हातात हात घालून चालण्याचा पहिला आवेग ओसरल्यानंतर पुढे या प्रवाहांची वस्तुनिष्ठ वाङ्मयीन चिकित्सा होऊ लागली. त्यामुळे घोषणाबाज अनुभवांच्या आवर्तात सापडलेल्या साहित्याच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या. या पुनर्मांडणीत आदिवासी साहित्यासारख्या प्रवाहांचे सामर्थ्य मात्र नव्याने अधोरेखित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी संपादित केलेले ‘आदिवासी साहित्य : एक मुख्य प्रवाह’ हे पुस्तक अशाच प्रयत्नांचा दस्तऐवज आहे.
डॉ. मुनघाटे हे आदिवासी साहित्याचे अभ्यासक असून, विद्यापीठीय अकादमिक स्तरावर त्यांनी अनेकदा आदिवासी साहित्याची चर्चा घडवून आणली आहे. आदिवासींचे आदिम संचित, त्यांचे सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी आदिवासी साहित्य निर्मिती या अनुषंगाने त्यांनी स्वत: घेतलेला धांडोळा आणि अन्य आदिवासी अभ्यासक यांच्या दीर्घकालीन चर्चेचा वृत्तांत या पुस्तकात संपादित केलेला आहे.
पुस्तकाच्या बीजभूमिकेतून प्रारंभी डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आदिवासींची आदिमता, त्यांचे प्राचीन-मध्ययुगीन व वर्तमानकाळातील विस्थापन आणि आदिवासींचे भाषिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात झालेले शोषण यांची चिकित्सा केली आहे. समकालीन आदिवासी साहित्याच्या प्रेरणा त्यांच्या आदिम आदिबंधातून घेणे कसे शक्य आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले आहे. आदिवासींची निसर्गनिष्ठ जीवनशैली आणि नैतिकता, त्यांचा धर्म आणि श्रद्धा, त्यांच्या लोककला आणि मिथके हेच आदिवासी साहित्याचे मौलिक संचित आहे, असे त्यांना वाटते. मात्र आदिवासींच्या तथाकथित विकासाच्या संदिग्ध धोरणातून निर्माण झालेले प्रश्न कसे जटिल आहेत आणि जागतिकीकरणाच्या नव्या वसाहतवादातून आदिवासींचे कसे शोषण सुरू आहे, याचेही त्यांनी विस्तृत विवेचन केले आहे. नक्षलवादी चळवळ, प्रकल्पग्रस्तांचे विस्थापन, सरकार-पोलीस-नक्षलवादी यांच्या संघर्षात होणारी आदिवासींची होरपळ यांचेही तपशील त्या विवेचनात येतात.
‘आदिवासी साहित्याची संकल्पना आणि स्वरूप’ या शीर्षकांतर्गत डॉ. मुनघाटे यांनी समकालीन आदिवासी साहित्याचा साक्षेपी आढावा घेतला आहे. दुसऱ्या भागात ‘आदिवासी साहित्याचे अधिष्ठान’ या विषयावर गोविंद गारे यांनी मराठीतील आदिवासी साहित्य प्रवाहाचा प्रारंभ आणि त्याच्या प्रेरणा स्पष्ट केल्या आहेत. ‘आदिवासी जीवन, कला आणि साहित्य’ या विषयावर डॉ. विनायक तुमराम यांनी आदिवासींची सांस्कृतिक अस्मिता, साहित्य चळवळ आणि समकालीन राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आदिवासी लेखकांच्या वाट्याला आलेला संघर्ष, यांची मांडणी केली आहे. या संघर्षाचे संदर्भ ते आर्य-अनार्य यांच्यातील प्राचीन संघर्षापर्यंत नेतात. समाजशास्त्राच्या प्राध्यापक व आदिवासी अभ्यासक डॉ. शैलजा देवगावकर यांनी आदिवासींच्या साहित्याचे मौखिक स्वरूप आणि लोकसाहित्याची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. माजी आमदार नेताजी राजगडकर यांनी आदिवासी भाषांचे वर्गीकरण, त्यांचे सामर्थ्य आणि त्यांच्या विकासाच्या समस्या यावर आकडेवारीसह नेमकेपणाने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. आदिवासी लेखिका उषाकिरण आत्राम यांनी त्यांच्या लेखात आदिवासींच्या सांस्कृतिक व राजकीय वस्तुस्थितीवर परखड भाष्य केले आहे. तर विनोद कुमरे यांनी ‘समकालीन आदिवासी साहित्य’ या लेखात समकालीन आदिवासी मराठी साहित्यातून व्यक्त होणाऱ्या जाणिवांचा वेध घेतला आहे. ‘आदिवासी मराठी कादंबरी : भू-सांस्कृतिक वैशिष्ट्ये’ या लेखात सुनील पखाले यांनी देशीवादाच्या अंगाने आदिवासी कादंबऱ्यांची चिकित्सा केली आहे. तर नरेंद्र आरेकर यांनी सुरेश द्वादशीवार यांच्या ‘हाकुमी’, मधुकर वाकोडे यांची ‘झेलझपाट’ व एकनाथ साळवे यांच्या ‘एनकाउंटर’ या कादंबऱ्यांतील आदिवासी-गैर आदिवासी संबंधांचा आढावा घेतला आहे.
पुस्तकाच्या तिसऱ्या भागात ‘मेंढा : एका आदिवासी गावाची क्रांती’ या लेखात गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा (लेखा) या खेड्यात भोवतालच्या जंगलावर असलेल्या आदिवासींच्या निस्तार हक्कांसाठी केलेल्या लढ्याचा वृत्तांत मोहन हिराबाई हिरालाल यांनी तात्त्विक व वृत्तांतवजा स्वरूपात मांडला आहे. मेंढा गावातील आदिवासींनी तीन दशके न्यायालयीन लढाई करून स्वाभिमानाने ग्रामसभेची ताकद सर्व देशाला दाखवून दिली होती. वनहक्क, वनकायदे आणि ग्रामसभा यांच्या संदर्भात संपूर्ण देशात प्रथमच यशस्वी झालेल्या या लढ्याची प्रेरणादायक कहाणी या लेखात सांगितलेली आहे.
मध्य भारतातील आदिवासी आणि नक्षलवादाच्या समस्यांचा सातत्याने मागोवा घेणारे शोध-पत्रकार देवेंद्र गावंडे यांचा ‘आदिवासी आणि वन कायद्याचा वनवास’ हा लेख या पुस्तकात आहे. भारतातील ब्रिटिश वसाहतकाळात निर्माण झालेले वन-व्यवस्थापनाचे धोरण, कायदे आणि स्थानिक आदिवासींवरील अत्याचार यांची चिकित्सा या लेखात त्यांनी केली आहे. राजकारणासाठी आदिवासींच्या विकासाची घोषणा करणे आणि प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला येणारा वनवास, यातील विसंगतींचे ससंदर्भ तपशील त्यांच्या या लेखात येतात. स्वातंत्र्यानंतर नेहरूंचे आदिवासींबाबत धोरण आणि त्या पार्श्वभूमीवर डॉ. वुल्फगॅग कनाबे व छवी भारद्वाज यांच्या कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. मध्य भारतातील आदिवासी क्षेत्रात झालेल्या बांगलादेशींच्या पुनर्वसनाचीही चिकित्सा त्यांनी केली आहे. प्रा. सुनील कोडापे यांचा आदिवासींच्या ‘गोटूल’वरील संशोधनपर लेख आणि माधुरी साकुळकर यांचा भारतातील आदिवासी स्त्रियांच्या भीषण वर्तमानाची नोंद घेणारा लेखही अभ्यासकांसाठी मोठी उपलब्धी आहे.
थोडक्यात, आदिवासी संस्कृतीचे वेगळेपण, त्यांची जीवनशैली, कलामूल्ये, त्यांचा सांस्कृतिक संघर्ष या मराठीतील आदिवासी प्रवाहातील साहित्याची बहुपेडी चिकित्सा या पुस्तकात आलेली आहे. आधुनिकीकरणाच्या व विकासाच्या प्रक्रियेत आदिवासींच्या सांस्कृतिक अस्तित्वापुढेच आता अनेक आव्हाने उभी झाली आहेत. जल-जंगल-जमीन या संदर्भात पर्यावरणवादी कितीही चळवळी करीत असले तरी या आव्हानांची भीषणता अधिक तीव्र होत आहे. दुसरीकडे आदिवासींची निसर्गनिष्ठ जीवनशैली आणि त्यांची नैतिक मूल्ये हाच मानवी संस्कृतीचा मुख्य प्रवाह असून, साहित्याच्या संदर्भातही तोच मुख्य प्रवाह असावा, असे एकूणच या पुस्तकाचे मुख्य प्रतिपाद्या आहे. पुस्तकाच्या अखेरीस मराठीतील उपलब्ध आदिवासी साहित्याची सूची या पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढविणारी आहे. कोल्हापूरच्या भाषाविकास संस्थेचे प्रकाशन असलेल्या या पुस्तकाची निर्मिती अत्यंत देखणी असून चित्रकार अन्वर हुसेन यांचे मुखपृष्ठ लक्षवेधी आहे.
‘आदिवासी साहित्य : एक मुख्य प्रवाह’ – संपादन : डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रकाशक- भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर,
पाने- १८४, किंमत- ३४० रुपये.
kakadeshri@gmail.com
