कोकण खऱ्या अर्थाने पाहायचे किंवा अनुभवायचे असल्यास गौरी-गणपतीइतका दुसरा उत्तम मुहूर्त सापडायचा नाही. मुंबई-पुणे आणि इतर शहरांपासून येथे जाणारी वाहतुकीची सगळीच यंत्रणा वेठीस धरणारा हा उत्सवकाळ. रस्त्यांचे खड्डे होवोत किंवा कोंडीने परिसीमा गाठोत… तरीही मखराच्या-रोषणाईच्या वस्तूंना तसूभरही इजा न घडविता गणेशाचा कोकणीभक्त गावात सुखरूप पोहोचणार. इथला घरटी सणसोस साधेपणातून साकारलेला; पण व्यंजनांपासून ते वाजत-गाजत चालणाऱ्या उत्साही आरत्यांपर्यंत आणि कुटुंबापासून ते मित्र-मंडळींच्या परमोच्च पाहुणचाराची खूण म्हणून हा पाच ते दहा दिवसांचा आनंदमाहोल वर्षभर पुरून उरणारा. काय काय होते या काळात येथे, त्याची शब्द झलक…
निसर्गस्वादाचा माहोल…
उन्हाळ्यात आटलेल्या विहिरींमुळे, रखरखाटामुळे ओसाड वाटणारा साराच परिसर या काळात अद्भुत निसर्गसौंदर्याने नटलेला असतो. विविधरंगी रानफुलं, जंगली अळू आणि केळ्यांचे डोळ्यांना फक्त रान दिसते. स्थानिक नद्या आणि ओहळाचे ( वरकोकणात वल्हे) वाहते जलस्वर कानात साठवून घेण्याची ही सर्वोत्तम वेळ. धुवाधार पावसाचा काळ वगळला तर कित्येक पक्ष्यांचे कुजनदेखील मन तृप्त करणारे. कोकण रेल्वेच्या मार्गावर आधीपासून असलेल्या किंवा डोंगरफोडीने तयार झालेल्या धबधब्यांचे पर्यटन या काळात आलेल्या पाहुण्यांना करून देणे, हे गावकऱ्यांचे आद्या कर्तव्य. तेरड्याची फुले रानभर इतकी फुलतात की संपूर्ण वरकोकणात गौरीच्या मूर्तीऐवजी तिचा मुखवटा तेरड्याच्या फुलांनाच लावून पूजा केली जाते. गणपतीसोबत या मुखवटे आणि फुलांसह मग गौरीचे विसर्जन केले जाते.
नृत्य आणि फुगड्या…
गणपतीला जागवण्यासाठी पुरुषांचा बाल्यानाच आणि गौरीसमोर आपापली गाऱ्हाणी मांडण्यासाठी बायकांच्या फुगड्या वरकोकणापासून तळकोकणापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने सादर होतात. रात्रीची जेवणं आटोपल्यानंतर गावातील प्रत्येक घरात नाच्यांची मंडळे गणपती जागवतात. पहाटे पाचपर्यंत विशिष्ट आळीपर्यंत चालणारी ही नृत्य पाहणे हा स्थानिक यजमान आणि पाहुण्यांसाठी सोहळा असतो. मालवणमध्ये फुगड्यांची मंडळे आहेत. सासूसुनांच्या एकमेकींशी चालणाऱ्या वादसंवादांची विविध रूपेदेखील या फुगड्यांमधून सादर केली जातात. बायकांच्या बऱ्याच गजाल्या या फुगड्यांमधून व्यक्त होतात.
भक्तिसंगीताचा सडा…
दरएक घरटी गणपती येण्याच्या आधी बाजारात या वर्षी चलनात असलेल्या रोषणाईचा वापर मखराभोवती किंवा ऐपतीनुसार घराच्या अंगणात दिवाळीहून अधिक केला जातो. पण सर्वात महत्त्वाचे असते ते सांगीतिक वातावरण. कॅसेट, सीडी काळदेखील ओसरला असल्याने आता ‘यूएसबी’वर चालणाऱ्या साऊंड सिस्टीमवर मराठी गजाननगीते लावली जातात. बहुतांश घरांत ऐंशीनव्वदच्या दशकापासूनच्या कित्येक गाण्यांत बदल झाला नाही. ‘गजानना श्री गणराया आदी वंदू तुज मोरया’, ‘बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे’, ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा’ ही शहरांतील मोठ्या स्पीकरवर वाजणारी गाणी इथेही मंदस्वरात ऐकायला मिळतात. त्यात दरवर्षी हिंदी उडत्या चालीवर बसविले गेलेले नवीन मराठी गीतही शामील होते. स्टुडिओ रेकॉर्डिंग अलीकडच्या काळात स्वस्त झाल्यामुळे स्थानिक गणपती गीतांची भर होत आहे.
तळकोकण असो किंवा वरकोकण… गणपतीचा संपूर्ण महिना तिथल्या आणि तिथे जाणाऱ्या गणेेशभक्तांना सर्वार्थाने नाचवणारा. पेणच्या पुलाअलीकडच्या कोंडीत मुंबईतून महाडपर्यंत जाण्यासाठी जिला ‘परी’ म्हणणे या शब्दाचा अपमान ठरेल अशा मातकट लाल रंगाच्या एसटीत १८ ते २० तास अडकल्याच्या कथा दरएक पिढीच्या वेगवेगळ्या असतील. रेल्वे झाल्यानंतर तीत मुंगीलाही जागा न ठेवणारे, तिकीट आरक्षण शून्य मिनिटांत संपविणारे, केवळ या सणाला सुट्टी मिळत नाही म्हणून वाटेल ती मखलाशी करीत गणेशप्रेमी असतील त्या शहरातून कोकणात रवाना होतात. खासगी वाहनांसह भाजी-फळ अथवा मालगाड्या, वृत्तपत्रे घेऊन जाणाऱ्या वाहनांतून देखील पाहुण्या-राहुण्यांना गाव आणि गणपती दर्शन घडविण्याचा घाट केला जातो. या काळात ‘चार्टर विमानसेवा’ तयार केली, तर तिच्यावरदेखील उत्साहाने ताण आणू शकतील इतका गणपती काळात कोकणकर माणसाचा सणसोस.
भारतीय संस्कृतीतल्या सण आणि उत्सवांचं निसर्गाशी घट्ट नातं. श्रावणापासून ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो आणि निसर्गात पाना-फुलांचे रंग बहरू लागतात. बा. भ. बोरकरांच्या ‘वेली ऋतुमती झाल्या गं’ या काव्यपंक्तींचा अनुभव इथं प्रत्यक्ष येत असतो. आघाडा, दुर्वा, फुलं हाळी न देताही परसातच उपलब्ध असतात. जास्वंदीचा लाल भडक रंग आणि मानवी स्पर्शानंही कोमेजणाऱ्या नाजूक प्राजक्ताचा दरवळ आसमंतात जाणवू लागतो. त्याचबरोबर अनेक पारंपरिक धार्मिक-सांस्कृतिक सण-उत्सवांची मालिका सुरू होते. श्रावणी सोमवार, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी. कोकणच्या कौटुंबिक-सांस्कृतिक जीवनाचा अनोखा प्रत्यय देणाऱ्या गणरायाच्या आगमनाची ही जणू प्रसाद चिन्हं! कोकणामध्ये या सणाला वेगळंच महत्त्व असतं. कारण इथे ‘गणेशोत्सव’ नसतो, तर ‘घरोघरी गणपती’ येत असतात.
कोकणचं वैशिष्ट्य म्हणजे, अजूनही सुमारे ७० ते ८० टक्के कोकण ग्रामीण भागामध्ये वसलेलं आहे. तिथे फार मोठ्या बाजारपेठा नाहीत. खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली अशी काही तालुक्याची प्रमुख ठिकाणं सोडली तर बाकी स्थानिक पातळीवर छोटी छोटी दुकानं आणि त्या पद्धतीचे छोटे छोटे व्यवहार. पण या वातावरणामुळेच इथलं कोकणपण टिकून आहे. गणेशोत्सव आणि शिमगा या दोन प्रमुख सण-उत्सवांच्या निमित्ताने त्याचा प्रकर्षाने अनुभव येतो. घाटावरच्या मोठ्या शहरांमध्ये किंवा अगदी तालुका पातळीवरसुद्धा गणेशोत्सवाचं स्वरूप मुख्यत्वे ‘सार्वजनिक’ झालेलं आहे. खरं तर तिथंही अनेकांच्या घरी गणपती बसतात, पण त्यांचं प्रमाण कमी, त्याहीपेक्षा मुख्य आकर्षण या सार्वजनिक गणेशोत्सवाचं. कोकणातली परिस्थिती नेमकी उलट. रत्नागिरी जिल्ह्यात घरोघरी बसवल्या जाणाऱ्या गणपतींची संख्या सुमारे दीड-दोन लाख आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात मिळून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं दीडशेसुद्धा नाहीत. जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा जेमतेम ३०-४० सार्वजनिक मंडळं आणि त्यापैकी निम्मी सरकारी खात्यांची. शहरातल्या या मंडळांचीही गंमत अशी की, बहुतेक कार्यकर्त्यांच्या घरी गौरी-गणपती असतो. त्यामुळे त्यांना निरोप दिल्यानंतरच या मंडळाच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. तोपर्यंतचे पाच-सात दिवस केवळ प्रतिष्ठापना आणि दैनंदिन पूजाअर्चा. कारण घरचा गणपती अधिक महत्त्वाचा!
खरं तर आषाढ महिन्यापासूनच इथल्या लोकांना गणपतीचे वेध लागायला लागतात. त्याची पहिली पायरी म्हणजे घरच्या गणपतीसाठी मूर्तीची (चित्रशाळेत) नोंदणी. शहरांमध्ये या मूर्तीच्या विक्रीचे स्टॉल किंवा दुकानं दिसतात. पण कोकणात पेण-हमरपूर इथून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या न रंगवलेल्या मूर्ती इकडं आणतात आणि इथं सर्व रंगकाम करून विकल्या जातात. हे कामही कौशल्याचं असतं. विशेषत: श्री गजाननाचे डोळे (आखणी) किती रेखीव आहेत यावर मूर्तीचं सौंदर्य अवलंबून असतं. मूर्तींच्या या रंगकामाचे कौटुंबिक पातळीवरचे छोटे छोटे कारखाने या ग्रामीण भागात पाहायला मिळतात. इथे त्यांना ‘चित्रशाळा’ म्हणतात. संबंधित कुटुंबाकडून पिढ्यान् पिढ्या चालणाऱ्या या चित्रशाळांमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच हळूहळू कामाला सुरुवात होते आणि आषाढ संपता संपता आसपासच्या खेड्यांमधले बहुसंख्य लोक तिथं आपल्या मूर्तीची नोंदणी करतात. या नोंदणीची पद्धतही, आगाऊ रक्कम देण्यापेक्षा फक्त एक पाट देऊन केली जाते. तो दिला म्हणजे मागणी नोंदवली. गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी चित्रशाळेतून या पाटावरूनच श्री गणराय भक्ताच्या घरी रवाना होतात. संबंधित कुटुंबाकडून विशिष्ट चित्रशाळेमध्ये वर्षानुवर्षं अशा प्रकारे पाट देऊन मूर्तीची नोंदणी केली जाते. तिचा आकार, रूप, उंची वगैरे कायम ठरलेली असते. त्यामुळे निवडीचा फारसा प्रश्न नसतो. सुमारे दीड-दोन फुटापासून पाच फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती इथे उपलब्ध असतात आणि वाढत्या महागाईनुसार त्यांची किंमत सुमारे अडीच-तीन हजार रुपयांपासून सुरू होते. दरवर्षी गणपती नेणाऱ्या घरातून एखाद्या वर्षी पाट आला नाही तर गेल्या वर्षभरात त्या कुटुंबात काहीतरी दुर्घटना घडली असावी, असं आपोआप कळतं.
चित्रशाळेत मूर्ती रंगत असताना गावोगावी वाड्यावरच्या घरांमध्ये तिच्या स्वागतासाठीही जोरदार तयारी सुरू होते. आधी घराची साफसफाई, आवश्यक असेल तर भिंतींना रंगरंगोटी, घरातली जमीन आणि अंगणाला सारवण अशा कामांची लगबग चाललेली असते. बाप्पासाठी सुंदर मखरं तयार केली जातात. त्याभोवती घरातल्याच कापडाचे रंगीबेरंगी पडदे, एकदाच खरेदी करून वर्षभर जपून ठेवलेली प्लास्टिकच्या फुलांची आणि दिव्यांची माळ सोडून आरास केली जाते. घरात मुंबईतून येणारा नोकरदारवर्ग असेल तर ही आरास जास्त रंगतदार असते. प्रत्यक्ष उत्सव सुरू झाला की, निसर्गातल्या पाना-फुलांची आणि काही प्रमाणात फळांचीही त्याला जोड मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मखराच्या पुढे लाकडी चौकटीवर फळं आणि भाज्या बांधून तोरण केलं जातं. त्याला ‘माटोळी’ म्हणतात. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर ऋतुचक्राच्या नव्या पर्वातलं उत्पन्न प्रथम देवाला अर्पण करण्याची भावना त्यामागे असते.
चित्रशाळेत आधीच नोंदवलेली गणेशाची मूर्ती चतुर्थीच्या दिवशी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात घरी आणली जाते. खेडोपाडी भटजी मिळणं शक्य नसल्यामुळे अनेक जण स्वत:च भक्तिभावाने या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. सकाळची पूजा आणि नैवेद्या कुटुंबाच्या पातळीवर होत असला तरी संध्याकाळी मात्र वाडीतले गावकरी प्रत्येक घरी जथ्याने फिरून टाळ-मृदुंगाच्या तालावर आरत्या म्हणतात. त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप होतं. तिथून पुढल्या घरी. त्यामुळे एकमेकांच्या एकत्रित गाठीभेटी होतात, ख्याली-खुशाली विचारली जाते, जुन्या स्मृतींना उजाळा मिळतो. घरच्या उत्सवालाही सामूहिक स्वरूप प्राप्त होतं.
अशा प्रकारे घरोघर फिरून आरतीचा कार्यक्रम रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत पार पडला की, मंडळी जेवून पुन्हा नव्या दमाने नाचासाठी बाहेर पडतात. कोकणातलं जाखडी नृत्य सर्वत्र प्रसिद्ध आहे. काही गावांमध्ये हौशी मंडळी त्यासाठी खास रंगीबेरंगी पोशाख शिवून घेतात. तसं जमलं नाही तरी एकत्र जमून पारंपरिक नाच-गाणी होतातच. अलीकडे त्यात हिंदी चित्रपट गीतांच्या चालींची भेसळ झाली आहे, पण ‘श्रावण बाळ जातो काशीला, जातो काशीला’ किंवा ‘गणा धाव रे, गणा धाव रे’ सारखी गीतं सुरू झाली की उपस्थित अबालवृद्ध आपोआप डोलायला लागतात. महिलांचेसुद्धा स्वतंत्र गट रात्री उशिरापर्यंत घरोघर फिरून नाच करत असतात. थोडं जास्त कौशल्य असेल तर टिपरी आणि त्याहीपेक्षा कुशल तरुणींचा गट असेल तर गोफ विणणं आणि सोडवण्याचं बहारदार नृत्य पाहायला मिळतं. नाचता आलं नाही तरी त्या जथ्याबरोबर घरं घेत फिरण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठीही काही जण सामील होतात. त्यामुळे या दिवसांमध्ये अगदी पहाटेच्या पहिल्या प्रहरापर्यंत कोकणच्या वाड्या-वस्त्यांवर ताल-सूर घुमत असतात.
पंचांगानुसार तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौराईचं आगमन होतं. काही समाजांमध्ये विहीर किंवा ओढ्यावरचे खडे चंबू किंवा तांब्यामध्ये आणून पुजले जातात, तर काही समाजांमध्ये सुंदर मुखवट्याची भरजरी शालू नेसलेली गौर उभी केली जाते. घरातलं उपलब्ध साहित्य वापरून केलेली ही सजावट पाहण्यासारखी असते. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि भोजन. काही समाजांमध्ये हा नैवेद्या सामिषही असतो.
बघता बघता उत्सवाचे पाच-सात दिवस निघून जातात आणि लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. वाडीत एकमेकांना आवाज देत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात मूर्ती घराबाहेर पडतात. तिथून खाडी, नदी किंवा ओहोळासारख्या विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत सर्व गणपतींची सवाद्या मिरवणूक निघते. तिथं पोहोचल्यावर सामूहिक आरती. त्यानंतर वाडीतल्या ग्रामस्थांचे नवस बोलले जातात. यामध्ये आजारपण, बेकारी, काही कौटुंबिक समस्या दूर करण्यापासून अगदी एखाद्याचं लग्न जमवून देण्यापर्यंतचं साकडं सर्व जण मिळून विघ्नहर्त्याला घालतात. तसंच यदाकदाचित कुणाला तो पावला असला तर ते नवस फेडलेही जातात. अशा प्रकारे सर्व कार्यक्रम यथासांग पार पडल्यावर घराघरांतून आलेला प्रसाद एकत्र करून सर्व उपस्थितांना वाटप केलं जातं आणि उत्सवाची सांगता होते.
कोकणात गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर साजरा होणाऱ्या गणपतीचा सोहळा असा हृद्या, कौटुंबिक, सांस्कृतिक असतो. त्यामुळेच वर्षभर नोकरी-धंद्यामुळे गावाकडे येऊ न शकणारे चाकरमानी या उत्सवासाठी, प्रसंगी गैरसोय सहन करून, गावोगावी दाखल होतात आणि इतर महिने उजाड असणारी गावं माणसांनी फुलून जातात. गावातल्या जुन्या एकत्र कुटुंबाचा, सामूहिक नृत्य, गायनाचा आनंद लुटतात आणि पुन्हा त्या गजाननाप्रमाणेच पुढच्या वर्षी लवकर येण्याची हमी एकमेकाला देत निरोप घेतात.
गणपतीपुळेचे वेगळेपण…
कोकणातलं गणपतीपुळे हे जगभरात प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ आहे. सुमारे अडीचशे घरं असलेल्या या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे, इथे घरोघर गणपती बसवला जात नाही, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व ग्रामस्थ देवस्थानाच्याच गणपतीचं दर्शन घेऊन उत्सव साजरा करतात. याबाबत तशी आख्यायिका सांगितली जाते की, सोळाव्या शतकात त्या वेळचे या भागातले खोत भिडे यांना दृष्टांत झाला की, माझं वास्तव्य इथल्या डोंगरात असून तो परिसर साफ करून तिथे पूजा-अर्चा सुरू कर. त्यानुसार भिडे यांनी ती जागा शोधून शिळारूप गणपतीची पूजा सुरू केली. त्यामुळे इथे असलेल्या मंदिरातल्या गणपतीच्या मूर्तीला फक्त छाती व पोटाचा भाग दिसतो आणि त्याची सोंड फुलांच्या पाकळ्यांनी रेखाटली जाते. पण या मंदिरालगतच असलेल्या डोंगराला प्रदक्षिणा घातली असता अर्ध्या प्रदक्षिणेत शुंडस्थान दिसून येतं. त्यामुळे ही प्रदक्षिणा पूर्ण केल्यावरच या गणपतीचं दर्शन पूर्ण झाल्याचं मानलं जातं. या परिसरात गणपतीपुळ्यासह नेवरे, काजीरभाटा, मालगुंड आणि भंडारपुळे या गावांमध्येसुद्धा घरात गणपती न बसवता या देवस्थानच्या गणपतीचं पूजन केलं जातं. भाद्रपद प्रतिपदा ते पंचमीपर्यंत हा उत्सव चालतो. त्यापैकी चतुर्थीच्या दिवशी सर्व ग्रामस्थांना धूत वस्त्रांवर गाभाऱ्यात जाऊन दर्शनाची मुभा असते. त्या दिवशी दुपारी साडेचार वाजता पालखी सोहळा होतो. सुमारे तासाभराच्या या सोहळ्यात चार ठिकाणी आरती होते आणि पंचमीला कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होते.
आप्तमित्रांना दाखवायचा सण…
पेणमाणगाव ते खेड आणि रत्नागिरी ते मालवणपर्यंत जिल्ह्यांची नावे, बोलीभाषा, व्यंजनं आणि आरत्याअर्चना भिन्न असल्या तरी या एकाच सणामध्ये कोकणी माणसांच्या हौसेला समसमान उधाण आलेले असते. शहरातले शेजारीपाजारी, मित्रमैत्रीण इतकेच काय परदेशातील स्नेह्यांना गाव दाखविण्याचा मोह या काळात पूर्ण करता येतो. त्यामुळे प्रत्येक घर माणसांनी आणि भक्तिरसांनी ओथंबलेले दिसते. घरातल्या गणपतीच्या सजावटीचे सामान शहरातून दाखल होतेच. पण खोतांचे गणपती घरी सागाच्या पालखीने आणले जातात. वरकोकणातील बऱ्याच गावांतील मुले आखाती देशात काम करतात, ती तीन वर्षांनी मिळणारी सुट्टीदेखील गणपती सणाशी जुळवून परततात. विविध राज्यांतील आपल्या मित्रमंडळींना आपले कोकणातील घर दाखविण्यासाठी, केळीच्या पानात वाढल्या जाणाऱ्या विविध चवींचा आस्वाद घेण्यासाठी आणि सणाचा शहरापेक्षा प्रसन्न डामडौल अनुभवण्यासाठी यासारखा दुसरा मुहूर्त वर्षात नसतो.
pemsatish.kamat@gmail.com
(छायाचित्रे: प्रसाद जोशी आणि मकरंद पटवर्धन)