‘लोकरंग’मधील (२१ एप्रिल) ‘बहरहाल’ या गिरीश कुलकर्णी यांच्या सदरातील ‘हंसाचं काय अन् कावळ्याचं काय!’ या लेखात जी. ए. कुलकर्णीच्या कथेतील मानससरोवरातील हंस व कावळे यांचा दृष्टांत दिला आहे. आणि ‘हंसांना मानससरोवरातून हद्दपार करणाऱ्या कावळ्यांचे हे दिवस आहेत, की ते सदासर्वदा तसेच असतात आणि सत्य नावाची काही चीज अस्तित्वातच नसते?’ असा चिंतनात्मक प्रश्न उपस्थित केला आहे.

राजेशाही आणि हुकूमशाहीमध्ये एकाच व्यक्तीच्या हातात अनिर्बंध सत्ता एकवटलेली असते. याला उतारा म्हणून लोकशाही ही समाजव्यवस्थेची पद्धत अवलंबली गेली. या व्यवस्थेत ‘समानता’ आणि ‘स्वातंत्र्य’ ही अपरिवर्तनीय मूल्ये मानली गेली. याचा वापर करून ‘अधिक लोकांना मान्य असणारे’ सरकार निर्मिता येते.

समानता हे मूल्य एकदा मानले, की एखाद्याने सारासार विचार करून अत्यंत विचारपूर्वक केलेले मतदान आणि एखाद्याने अत्यंत निर्बुद्धपणे केलेले मतदान याची किंमत तंतोतंत समान असते. थोडक्यात, हंस आणि कावळे यांत ‘गुणात्मक’ भेद करताच येत नाही. जे ‘संख्येने जास्त’ तेच वरचढ! दुसरे म्हणजे, स्वातंत्र्य हे मूल्य एकदा स्वीकारले, की विचारसुद्धा ‘वेगवेगळे’ असू शकतात. ते चांगले किंवा वाईट असे असूच शकत नाहीत. दोघांच्याही विचारांचे मूल्य तंतोतंत समानच असते. त्यामुळे हंस कोण आणि कावळे कोण, हेही निव्वळ सापेक्षच उरते.

यामुळे शेवटी लोकशाहीमध्ये ‘चांगले’ अथवा ‘वाईट’ सरकार निवडता येते हा केवळ भ्रामक आशावादच ठरतो. लोकशाहीत केवळ ‘अधिक लोकांना मान्य असणारे’ सरकार निवडता येते, हे सत्य राजकारण्यांना अतिशय चांगले कळलेले आहे. म्हणून चांगली मूल्ये जोपासण्यापेक्षा जास्तीत जास्त ‘संख्येने’ मताधार मिळवणे याचाच त्यांच्याकडून प्रयत्न होणे स्वाभाविक ठरते. राजकारणी लोक धर्म, जात, प्रदेश, शहरी, गरीब, मागास वा अशाच काही सामूहिक कल्पना वापरून (अथवा गरजेप्रमाणे नवीन निर्माण करूनही) स्वत:ला पाठिंबा देणाऱ्या मोठय़ा झुंडी तयार करू शकतात. त्यांच्यात अस्मिता निर्माण करून ‘आपण आणि ते’ असा भेदही निर्माण करू शकतात. लोकशाहीत जिंकणे हे शेवटी संख्याबळावरच ठरत असल्याने ज्याची झुंड मोठी तोच अंतिम विजेता.

कुलकर्णीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, सत्य हे ‘सोयीस्कर’ अर्थाने वापरण्याचे मूळही यातच दडलेले आहे. आणि त्यांची ‘लोकशाही हे कळपांना बळ देणारे साधन नसून व्यक्तीला न्याय, स्वातंत्र्य आणि समता देऊ  करणारी व्यवस्था आहे हे समजून घेत कुठल्याही कळपाचा भाग न होण्याची मानसिकता घडवायला हवी’ ही अपेक्षा रास्त वाटली तरी लोकशाहीच्या नियमात फक्त ‘संख्यात्मक’ विजयच मान्य असल्याने ती पूर्ण होणे दुरापास्तच ठरते. थोडक्यात, ‘हंसाच्या प्रियेचं एकल प्रामाणिक मत विकसित करायला हवं’ ही अपेक्षा योग्य वाटली, तरी लोकशाहीतील इतर सोयीस्कर नियमांच्या आधारे जोपर्यंत जिंकणे शक्य आहे, तोपर्यंत कावळेच संख्येच्या जोरावर जिंकणार हे वास्तव आहे.

– दीपक गोखले, पुणे</p>