कलाशिक्षणानं, भोवतालच्या ‘कलाविश्वा’नं काही बंधनंही आपसूक येतात आणि बहुतेक कलावंत ही बंधनं तोडूनच पुढे जातात. पण हे करताना शकुंतला कुलकर्णी यांनी स्त्रीच्या स्थितीबद्दलचे प्रश्न फक्त तरबेज चित्ररसिकांपर्यंत नव्हे, तर सामान्यांपर्यंतही पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला…
कोणाही व्यक्तीभोवती इतिहासाची, त्या इतिहासातून तयार झालेल्या सांस्कृतिक/ सामाजिक/ राजकीय/ आर्थिक वर्तमानाची तटबंदी असतेच. ती तटबंदी बाहेरून बघणाऱ्या इतरांना ती निराळी (आगळीवेगळी, अनोखी इत्यादी) किंवा उत्तुंग, प्रेरक, सुंदर वगैरे भासू शकते; पण आतल्या व्यक्तीला ठरवावंच लागतं- अंधाराच्या, प्रकाशाच्या जागा हेरून बाहेरचं जग नुसतंच पाहायचं की, तटबंदी फोडून त्या जगालाही आपलंसं करायचं.
हे असे प्रयत्न शकुंतला कुलकर्णी यांनी केले. तटबंदी फोडलीच, पण त्याआधी ही तटबंदी नेमकी किती उंच, किती कणखर आहे आणि बाहेरच्या लोकांना तिच्याबद्दल काय वाटतंय याचाही अदमास घेतला.
म्हणजे नेमकं काय केलं? त्यांच्याभोवतीची ती तटबंदी कोणती होती?
कलाशिक्षणाची तटबंदी
जेजे स्कूल ऑफ आर्टमधल्या रेखा व रंगकला शिक्षणाचा दरारा इतका की, ‘बडोद्यात (महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कला विभागात) चित्रकला शिकलेल्यांना माणसासारखा माणूस काढताच येत नाही’ असं मुंबईत, कोल्हापुरात, सांगलीत म्हटलं जायचं . ते वरवर पाहता खरंही होतं. कारण ‘जेजे’चा भर हुबेहूब व्यक्तिचित्रणावर असायचा. व्यक्तिचित्रामध्ये तुम्ही रंग कसा लावता, स्ट्रोक्स कसे आहेत यावरूनच तुम्ही किती कल्पक आहात हे ठरायचं. याउलट बडोद्यात, किंवा शांतिनिकेतनच्या ‘कलाभवन’मध्येही- मानवाकृती तुमच्या चित्रात काय करते आहे, तिची स्थिती कशी आहे, त्या दृश्य-स्थितीमधून तुम्हाला त्या माणसाबद्दल आणि एकंदर मानवांबद्दल काय सांगायचंय, त्या सांगण्यातून तुम्ही कुठलं कथ्य किंवा कथानक (नॅरेटिव्ह या अर्थानं) पुढे नेताहात आणि स्वत:सुद्धा स्वीकारताहात, हे सगळं महत्त्वाचं मानलं जायचं. शांतिनिकेतनात याला लालित्याची, पौर्वात्य दृश्यवैशिष्ट्यांची जोड मिळावी असा आग्रह असायचा… तोही इतका की, पश्चिम बंगालभर डाव्या विचारसरणीचा जोर (त्या वेळी) वाढतोय आणि हे कसले अद्यापही नाजुकसाजुक लालित्य, पौर्वात्य वगैरे कुरवाळत बसलेत असं म्हणत काहींना त्या कलाभवनातल्या शिक्षणाची मोडतोडही करावीशी वाटली होती- ती करता येईना म्हणून चरफडलेले काहीजण (सत्यजित राय, रुत्विक घटक यांचा आदर्श ठेवून) चित्रपट माध्यमाकडे वळू लागले होते.
शकुंतला कुलकर्णी (माहेरच्या मुर्डेश्वर ) यांचं कलाशिक्षण जेजे, बडोदा आणि शांतिनिकेतन या तीन्ही ठिकाणी झालं. एकंदर भारतीय कलाशिक्षणाची- कलेत भारतीयता असलीच पाहिजे वगैरे अपेक्षांची तटबंदी त्यांना तिथंच जाणवू लागली. चित्राचे विषय हे त्या तटबंदीच्या बाहेर जाण्याचं दार आहे असं कलाशिक्षणानंतरच्या काही वर्षांपर्यंत त्यांना वाटत असावं, हे त्यांच्या त्या वेळच्या चित्रांमधून उमगतं. इथे पुढे ज्या चित्रांबद्दल लिहिलं जाणार आहे, ती सर्व चित्रं कुणालाही shakuntalakulkarni.com या संकेतस्थळावर पाहता येतात, तर शकुंतला कुलकर्णींच्या त्या घरातला पुरुष किंवा मध्यमवर्गातलंच लग्नाच्या रिसेप्शनला उभं राहिलेलं जोडपं ‘मुखवटे’ या नाटकाची आठवण देणारं – एक बाई आणि तिच्या भोवती प्रभावळीसारखे म्हणा किंवा मागेच पाच फण्यांचा भीतिदायक नाग असल्यासारखे पुरुषाचे पाच मुखवटे हे चित्र- अशा रेखाचित्रांमधून अभिव्यक्तीच्या स्वत:च्या वाटा त्या शोधत होत्या. चित्रांतून माणसाची सामाजिक वैशिष्ट्यं ओळखू यायची. याला छेद देणं म्हणजे विषयच नाकारणं. अमूर्तचित्रांकडे वळणं. ही अमूर्तचित्रं पेनानं केली किंवा झिंकप्लेटवर एचिंग म्हणून मुद्राचित्रणाच्या पद्धतीनं केली- तरीही त्यातल्या रेषारेषांची पुनरावृत्ती गवतासारखी नसेल कशावरून. किंवा अवकाशविभाजन हे माळरान- डोंगर असंच नसेल कशावरून यांसारखे प्रश्न आता ती त्या वेळची चित्रं पाहणाऱ्याला पडतील. मात्र नंतरची ‘अॅबस्ट्रॅक्ट’ मालिका रेषांना पूर्णपणे टाळून, मोठमोठे आणि अगदी लहान आकार यांचा खेळ मांडणारी होती. पण चित्रविषयाला नाकारण्याचा पिंड नसावाच शकुंतला कुलकर्णींचा. स्त्रियांची चित्रं त्यांनी रंगवली. ती रेखाचित्रं नव्हती. जलरंगातली चित्रं होती. या स्त्रिया बसल्या आहेत. कुठेतरी चालत निघाल्या आहेत. एकमेकींशी बोलत आहेत. यापैकी बरीच चित्रं गच्चीत किंवा मोकळ्या- पण विशिष्ट नेपथ्यासारख्या अवकाशात घडतात. एका चित्रात मात्र काळ्या साड्या नेसलेल्या स्त्रिया आणि फक्त तिरक्या रेषारेषांनी भरलेला अवकाश दिसतो. त्या स्त्रिया चारचार- पाचपाच जणींच्या गटागटानं कुठेतरी चालल्या आहेत. त्यांच्यामागे थोड्या अंतरावरून, पण विरुद्ध दिशेनं आणखी काही स्त्रिया चालत आहेत… ती मागची, विरुद्ध दिशेनं निघालेली रांग चित्रपटात मागचं दृश्य ‘ब्लर’ दिसतं तशा धुरकट दिसताहेत. हे चित्र महत्त्वाचं, कारण त्यात मानवाकृतींच्या आकारांत शकुंतला कुलकर्णी यांनी घडवलेला बदल पाहता येतो. या मानवाकृतींचे आकार अधिक मोकळेपणानं रेखाटलेले, अधिक अभिव्यक्तीवादी- एक्स्प्रेशनिस्ट होऊ लागले. बाह्यरेषांनी ‘बद्ध झालेले’ असे हे आकार नव्हते. उलट बाह्यरेषेतून आकाराची हालचालही दिसू-भासू शकत होती. या स्त्रीआकृती वाजवीपेक्षा थोड्या उंच- अगदी अल्बेर्तो जिआकोमेत्तीच्या शिल्पांइतक्या नाही, पण लांबट म्हणाव्यात अशा होऊ लागल्या. त्या आकृतींतला ताण प्रेक्षकापर्यंत पोहोचू लागला.
पण इथवरच्या प्रवासात सपाट प्रतलावरच्या रूढ चित्रसाधनांची जी मर्यादा कायम होती, तीही शकुंतला कुलकर्णी यांनी ओलांडली. साधारण १९८५ नंतर अनेकजण ही मर्यादा ओलांडून भूमिकला, कृतिकला, मांडणशिल्प आदी प्रकारांमध्ये थोडेफार प्रयोग करू लागले होते. शकुंतला कुलकर्णी यांनी भूमिकला या प्रकारात केलेली एक रचना ‘मार्ग शोधा’ अशी कोडी असतात त्यासारखी दिसते. ‘मेझ’ अशा इंग्रजी नावाची ही रचना काटक्यांच्या कुंपणानं बनलेली आहे. पण कुठल्यातरी शेतघराजवळ केलेली ती रचना पुढे २००१ सालात बांबू आणि काळं कापड अशा रूपामध्ये ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त शकुंतला कुलकर्णी यांनी मांडली. ‘रिड्यूस्ड स्पेसेस’ हे त्या प्रदर्शनाचं शीर्षक. हल्ली ‘इमर्सिव्ह एक्स्पीरियन्स’ हा शब्दप्रयोग व्हिडीओकला वगैरेंबद्दल अती वापरला जाऊ लागला आहे. पण २००१ सालचं ‘रिड्यूस्ड स्पेसेस’ हे प्रदर्शनही बुडून जायला लावणारा अनुभव देणारं होतं.
ते कसं, याबद्दल नंतर. पण मुळात कागद, पेन्सिल, पेन, रंगाच्या ट्यूब या साधनांची साथ सोडून १९९८ मध्ये शकुंतला कुलकर्णी यांच्या स्त्री- आकृती ‘गोधडी’वर आल्या. स्त्रियांची चित्रं आणि स्त्रियांपुरतं मर्यादित केलं गेलेलं गोधडी करण्याचं कौशल्य यांचा तो संगम होता. माध्यमाच्या मर्यादा ओलांडून शकुंतला कुलकर्णी यांनी केलेलं ते पहिलं कलाप्रदर्शन. मग तीनच वर्षांत ‘रिड्यूस्ड स्पेसेस’ मध्ये व्हिडीओकला आणि मांडणशिल्प यांचा संगम पाहायला मिळाला. त्यानंतरच्या तीन वर्षांनी ‘आजींच्या गोष्टी’ ही महत्त्वाची व्हिडीओ-कलाकृती शकुंतला कुलकर्णी यांनी केली. मुंबईच्या खार उपनगरात सारस्वतांची वस्ती बरीच वर्षं आहे. तिथं लग्नानंतरची ५० ते ७० वर्षं राहिलेल्या या सहा-सात आज्या… लहानपणच्या खेळांपासून ते लग्न, संसार इथपर्यंतच्या आठवणी शकुंतला कुलकर्णी यांनी व्हिडीओवर आणल्या. ‘डॉक्युमेण्टरी मोड’मधला खरेपणा ‘आजींच्या गोष्टी’त पुरेपूर होता. पण आर्ट गॅलरीत एकाचवेळी मान इकडेतिकडे करून पाहता येतील अशा सहा टीव्हींवर या आज्या आलटून पालटून यायच्या, एखादी बोलत असेल तेव्हा दुसरीच्या फक्त सुरकुतलेल्या, थरथरत्या हातांचा क्लोजअप दिसायचा हे सगळं आजींच्या जवळ नेणारं होतं.
व्हिडीओ हा शकुंतला कुलकर्णी यांच्या कलाप्रवासातला महत्त्वाचा टप्पा ठरला आहेच. पण तोही का आणि किती वापरायचा, हे त्यांचं भान पक्कं आहे. रेखाचित्रं, त्यातल्या रेषांमधून जाणवणारी हालचाल त्यांच्या अभिव्यक्तीची मुळाक्षरं ठरली, त्यावर आधारलेलं काम आजही त्या करतात. एका प्रदर्शनात तर अन्य प्रकारच्या कलाकृतींसह स्वत:च्या स्टुडिओतले पाचसहा मोठे पांढरे फलकच मांडलेले होते. त्या फलकांवर रेखाचित्रं करणं, ते पुसणं, त्याजागी दुसरं रेखाचित्र करणं, तेही बदलून तिसरं रेखाचित्र आकाराला येणं ही प्रक्रियाही महत्त्वाचीच. या प्रक्रियेची क्षण-चित्रं त्या फलकांवर होती.
पण ‘शकुंतला कुलकर्णी’ हे नाव घेताच जी प्रतिमा जगभर आठवायला हवी, ती आहे वेताचे अलंकार आणि प्रावरणं यांची प्रतिमा. वेताचे डूल, कंठा, कंबरपट्टा, वेगवेगळ्या आकाराचे मुकुट आणि शिरोभूषणं … वेतापासून बनवलेला परकर, अंगरखा किंवा चिलखतासारखी भासणारी प्रावरणं. स्त्रीचा कणखरणा हे या पारदर्शक प्रावरणांना शकुंतला कुलकर्णी यांनी दिलेलं अर्थाचं अस्तर आहे. वेताच्या या कलाकृती पहिल्यांदा प्रदर्शित झाल्या, तेव्हा काळ्या कपड्यांवर त्या पिंजरावजा कलाकृती परिधान करून स्वत:ची काही छायाचित्रंही शकुंतला कुलकर्णींनी मांडली होती. यापैकी काही छायाचित्रांतली स्त्री सुपरवूमनसारखी दिसत होती.
अशी सुपरवूमनची फॅण्टसीच शकुंतला कुलकर्णींना अभिप्रेत नसावी, हे त्यांच्या अन्य कलाकृती सांगत होत्या. स्त्रीच्या संरक्षणासाठी समाजानं उभारलेले पिंजरे अपरिहार्यच आहेत का, हा प्रश्न प्रेक्षकांपर्यंत यातून पोहोचत होता. ‘ऑफ बॉडीज, आर्मर अॅण्ड केजेस’ हे त्या प्रदर्शनाचं शीर्षकही त्याच प्रश्नाकडे नेणारं होतं. याच प्रकारातल्या कलाकृतींचं पुढलं प्रदर्शन संस्कृतींच्या सीमा ओलांडणारं होतं. त्यातली शिरोभूणं किंवा चेहऱ्यावरले हेल्मेटवजा मुखवटे हे आफ्रिकनही भासत होते. वेताचं प्रत्यक्ष काम जरी ईशान्य भारतातल्या कौशल्यवंतानं केलं असलं तरी त्या प्रावरणांचं रूप शकुंतला कुलकर्णी यांनीच रेखाचित्रांतून ठरवलेलं असतं. वेतापासून या प्रावरणवजा, पोकळ शिल्पवजा कलाकृती बनत असल्यामुळे त्या अंगावर घालण्यासाठी हलक्या, पण देहाचा अवकाश वाढवणाऱ्या. अनेकपरींच्या कल्पना या न-पोशाखांतून करता येऊ शकतात. व्हिडीओ एडिटिंगचं तंत्र वापरून एका व्हिडीओत अशी वेताची प्रावरणं परिधान केलेल्या स्त्रियांची फौजच शकुंतला कुलकर्णी यांनी उभारली होती. ते पाहून ज्या कुणाला त्यांच्या ‘त्या’ जुन्या चित्राची आठवण आली असेल, काळ्या साडीतल्या स्त्रियांची रांग, दूरवर मागे धुरकट दिसणाऱ्या स्त्रियांची रांग हे त्या चित्रातलं दृश्य आठवलं असेल, त्यांना शकुंतला कुलकर्णी यांच्या ‘तटबंदी फोडण्या’च्या प्रवासातला फॉर्मल किंवा आकारनिष्ठ अव्याहतपणा जाणवला असं म्हणावं लागेल.
आकारांना कल्पनांचे किंवा वैचारिक भूमिकांचे पंख असावे लागतात. ‘डिऑर्’ या प्रख्यात फॅशन हाउसनं मध्यंतरी त्यांची ती वेताची प्रावरणं फॅशन शोमध्ये मांडली होती हे काहीजणांना धक्कादायक वाटेल, पण त्याआधी मुंबईच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालया’नं (पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम) या कलाकृती अन्य ऐतिहासिक प्रावरणांच्या मध्येच बेमालूमपणे मांडल्या होत्या, हे ‘वेताची प्रावरणं’ या फॉर्मच्या कल्पनाविश्वाची साक्ष देणारं ठरतं.
पण वैचारिक पातळीवर ‘सुरक्षा आणि पिंजरे’ या समीकरणाला मुळापासून हात घालणाऱ्या आणि स्वत:ची छायाचित्रं, व्हिडीओतला स्वत:चा सहभाग किंवा स्वत: केलेला ‘परफॉर्मन्स’ यांतून शक्तिशाली, आत्मविश्वासपूर्ण स्त्रीत्वावरच भर देणाऱ्या शकुंतला कुलकर्णी या केवळ ‘सुपरवूमन’ किंवा ‘फौज’ सारख्या कल्पनांच्या पलीकडल्या आत्मविश्वासाचा ध्यास घेताहेत, हे त्यांच्या एकंदर कलाप्रवासातून कळतं. ‘ती जेव्हा गर्जना करते तेव्हा विश्व हादरतं’ या अनेक रेखाचित्रांवर आधारलेल्या कलाकृतीचं शीर्षक कल्पनारम्य वाटलं, तरी ही रेखाचित्रं अशा इतिहासातल्या आणि मिथकांमधल्या स्त्रियांची आठवण देणारी होती की ज्यांनी खरोखरच जगाला हादरवलंय. त्यांच्या अनेक कलाकृती पाहिल्यावर हेही लक्षात येतं की, रोजचं जगणं जगणाऱ्या स्त्रियांकडूनही त्यांना हे अपेक्षित आहे. या सगळ्या कलाकृती मिळून जणू विचारताहेत : – आत्मविश्वास, प्रश्न विचारण्याची धमक, ताठ मानेनं पुढे जाण्यासाठी मेहनत करण्याची तयारी ही मानवी जीवनाला सुकर करणारी मूल्यं आहेत, मग ‘बऱ्याच स्त्रिया ‘बिचाऱ्या साध्या’ असतात ’ अशा काहीतरी समजुती करून घेऊन गप्प बसून कसं चालेल ?
यावर प्रत्युत्तरादाखल ‘गप्प बसावं, अशीच परिस्थिती अनेकदा असते’ वगैरे युक्तिवाद होतील. अगदी भेदरून जावं, अशीही स्थिती अनेकदा भोवताली असू शकते हे शकुंतला कुलकर्णींनी तरी कुठे नाकारलं होतं? पण भेदरण्याचा अनुभव घेतल्यानंतर प्रत्येक स्त्रीची स्वत:कडून अपेक्षा काय असते, या प्रश्नाच्या पाठपुराव्याला त्या महत्त्व देतात. ‘रिड्यूस्ड स्पेसेस’ मधून हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाला भिडला असेल.
‘रिड्यूस्ड स्पेसेस’ ही कलाकृती फक्त ‘पाहण्या’ची नव्हतीच. इथं प्रेक्षक अरुंद बोळवजा वाटांवरून आत- आत जायचे, आवाज आणि प्रकाशाचाही अदमास घेत- घेत व्हिडीओंपर्यंत पोहोचायचे. एका व्हिडीओत संतापलेल्या, अवमानित झालेल्या स्त्रियांच्या ओठांचे क्लोजअप. त्या काहीतरी बोलू पाहताहेत. बोलतही आहेत. पण प्रेक्षक तिचं ऐकू शकत नाहीयेत. दुसऱ्या व्हिडीओतल्या स्त्रिया अरुंद पॅसेजमधून दाराकडे जाताहेत. दरवजा खूप जड, घट्ट बंद झालेला असल्यास जोर एकवटून तो उघडावा लागतो आहे. हा पहिला दरवाजा उघडला, मग दुसरा, तिसरा… कष्टानं एकेक दार उघडतंय.
तटबंदीची दारं आणखी जड असतील. तीही उघडू शकतात, हे समजून घेण्यासाठीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शकुंतला कुलकर्णी यांचा इथवरचा कलाप्रवास.
Abhijit.tamhane@expressindia.com