यशोधरा काटकर
देशातल्या बालकामगारांचे शोषण रोखण्यासाठी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या ‘बचपन बचाओ’ आंदोलनाचे संस्थापक -प्रवर्तक कैलाश सत्यार्थींनी वाचवलेले प्रत्येक मूल त्यांच्यासाठी अनमोल होते. त्यातल्या बारा ‘केस स्टडीज’चे कहाणीस्वरूप लिखाण सत्यार्थींच्या ‘तुम पहले क्यों नहीं आए?’ या संग्रहातून उमटले. त्या कहाण्या व्यक्तिश: सत्यार्थींसाठी दिशादर्शक ठरल्या होत्या, एवढेच नव्हे तर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पटावर सामाजिक -न्यायिक-प्रशासकीय बदल घडवत, बालकामगारविरोधी चळवळीला सकारात्मक वळणे देत गेल्या. त्या कहाण्यांचा ‘तू आधी का नाही आलास?’ हा लीना सोहोनीकृत अनुवाद सॅम पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकामुळे बालकामगारविषयक समस्येमागची कारणे, स्वरूप, व्याप्ती तसेच त्याविरुद्ध अनेकस्तरीय संघर्षाची निकड स्पष्ट करणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज मराठी वाचकांना उपलब्ध झाला आहे.
या कहाण्यांचे अल्पवयीन न-नायक/नायिका दगड /अभ्रकांच्या खाणी, वीजभट्ट्या, गालिचा विणण्याचे कारखाने, सर्कस, शेती, रेशीम उद्याोग अशा क्षेत्रात, तर काही घरगडी तर काही भिकारी म्हणून गुलामीचे जिणे जगण्यासाठी मजबूर केले गेले होते. यातला ‘प्रदीप’नरबळीपायी हत्या होताना वाचवला गेला, तर ‘नंदी’, ‘साहिबा’ लैंगिक अत्याचाराच्या सापळ्यातून मुक्त केल्या गेल्या होत्या. या कहाण्यांमधून वर्गविषमता, धर्मजातीभेद, अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, स्त्री-मुलींबाबतीत नाकारलेपण अशा सडक्या धारणांमुळे भारतासह जगभरातली लाखो मुले आजही किती महाभयंकर संकटांचा सामना करत आहेत ते चित्र उभे राहते, तितकीच त्याच्याशी टक्कर देण्यासाठी आंदोलन उभे करणाऱ्या सत्यार्थी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची या चळवळीप्रति असणारी निष्ठा, मेहनत आणि भावनिक गुंतवणूक प्रत्ययाला येत जाते. भारतातील बहुसंख्य बालकामगार अनुसूचित जाती/ जमाती आणि अल्पसंख्याक अशा उपेक्षित सामाजिक गटातील आहेत. पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा हे बालमजुरीमागचे सर्वात मोठे कारण आहे. त्यात बेरोजगारी, निरक्षरता, शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणाचा अभाव, सांस्कृतिक घटक, विभेदित सामाजिक रचना हे घटक भर घालतात. तसेच महामारी आणि नैसर्गिक आपत्ती आणि साथीच्या रोगांमुळे मुले शोषणचक्रात खेचली जात या समस्येचा पट व्यापक होत जातो, तिथे ‘बचपन बचाओ’सारख्या चळवळींचे प्रयत्न मुलांना त्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी किती महत्त्वाचे ठरतात ते दिसून येते.
या सगळ्या कहाण्यांना सुखात्म अंत लाभलेला नाही, पण यातल्या प्रत्येक बलिदानातून हजारो बालकामगारांच्या मुक्तीचे स्फुल्लिंग उमटत गेले. लहानशा बाबीपायी तापलेल्या सांडशीचे चटके खाल्लेल्या ‘अशरफ’ आणि त्याच्या आईच्या जिद्दीमुळे घरगुती बालमजुरीवर बंदी घालणाऱ्या कायद्याचा पाया घातला गेला. सर्कंसमध्ये लैंगिक अत्याचाराला सामोऱ्या जाणाऱ्या ‘भावना’च्या रागाने जेव्हा मूर्त रूप धारण केले तेव्हा त्याची परिणती मुलांची खरेदीविक्री, तस्करी रोखणाऱ्या फौजदारी कायद्यात झाली. गालिचा विणण्याच्या कारखान्यात बंदिवान केल्या गेलेल्या ‘कालू’ने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पोटतिडकीने विचारलेल्या प्रश्नाचा अप्रत्यक्ष परिणाम या कार्यासाठी जागतिक स्तरावर मिळणारा निधी अनेकपटीने वाढण्यात झाला. या मुलांनी परिवर्तनाच्या चक्राला गती देऊ पाहणाऱ्या सत्यार्थींच्या प्रयत्नाला भक्कम बळ दिले, शासकीय-प्रशासकीय बदल घडवले, सामाजिक जागरूकता वाढवली आणि त्यामुळे पुढे गुलामगिरीतून सोडवलेली अनेक मुले समाजात सामावून सन्मानपूर्वक जगू लागली असे सकारात्मक चित्र इथे उभे राहते.
या प्रत्येक लेकराला वाचवण्यासाठी सत्यार्थी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. माफिया, तस्कर आणि गुंडांचा सामना करताना अनेकदा त्यांच्या प्राणांवर बेतले, पण त्यांच्यातला संवेदनशील कार्यकर्ता कोणताही मेलोड्रामा निर्माण न करता ही कहाणी अतिशय संयमाने सांगत जातो. या लेकरांना मायेने पोटाशी घेणाऱ्या त्यांच्या पत्नी सुमेधा, त्यांची मुले भुवन आणि अस्मिता, बाल आश्रमातल्या रामकृपालगुरुजी आणि कॉंम्रेड उमाशंकरांसारख्या अनेक निष्ठावान सहकाऱ्यांची चित्रणे अगदी अल्पसा अवकाश लाभूनही अतिशय लोभस उमटली आहेत. पण या भल्या मोठ्या विस्तारित कुटुंबाच्या केंद्रस्थानी असणारे सत्यार्थी सगळे श्रेय त्या कहाणीच्या नायक/नायिकेला आणि आपल्या सहकाऱ्यांना देत अतिशय अलिप्त राहतात तेव्हा त्यांच्या महानतेचा हा पैलू वाचकाला नवी दृष्टी देत जातो.
नोबेल परितोषिकाने सन्मानित सत्यार्थींच्या लेखणीतून अवतरलेल्या या लिखाणाचा लीना सोहोनी यांनी केलेला अनुवाद इतका उत्तम झाला आहे की या कहाण्या जणू मराठीमध्येच लिहिल्या गेल्या आहेत असे वाटावे. मूळ लिखाणातला संयम आणि नम्रतेचा सूर कायम ठेवत, समर्पक शब्दयोजना, वाक्यरचना आणि सहजता यामुळे हा अनुवाद प्रवाही झाला आहे. चंद्रमोहन कुलकर्णींनी चितारलेले मुखपृष्ठ – त्यावरील प्रतिमांची रचना आणि रंगसंगती – अतिशय अर्थवाही, तसेच राजू भावसार यांनी केलेली मांडणी वाचनीयतेत भर घालते.
अल्पवयीन मुलांच्या मुक्तीचा नवा अध्याय लिहिणारे सत्यार्थी संग्रहाच्या शेवटी दिलेल्या परिशिष्टातून वाचकाला त्याचे छोटेसे पाऊलही किती महत्त्वाचे ठरू शकते त्याबद्दल जागरूक करून त्याच्या अंतरंगात कृतिशीलतेची दिवली पेटवून ठेवतात. आजूबाजूच्या घरात, दुकानात, धर्मस्थळी एखादे अजाण लेकरू ‘तू आधी का नाही आलास?’ हा प्रश्न घेऊन वाट बघत असते ही जाणीव देत वाचकाला साथीदार बनवत त्यांची लढाई पुढे सुरू राहणार असते.
– ‘तू आधी का नाही आलास?’, मूळ लेखक- कैलाश सत्यार्थी, अनुवादक- लीना सोहोनी
सॅम पब्लिकेशन्स, पाने- २५६, किंमत- ४३०
lekhikaat12a@gmail.com