‘लोकरंग’ पुरवणीतील (२ एप्रिल) ‘आदले-आत्ताचे’ या सदरात ‘धाकटे आकाश’ या मनोहर शहाणे लिखित कादंबरीवर लेख प्रसिद्ध झाला आहे. १९६३ च्या आसपास प्रकाशित झालेल्या या माझ्या आवडत्या कादंबरीवर सुमारे साठ वर्षांनंतर, आत्ताच्या पिढीतील तरुण लेखकाने आवर्जून लिहावे, यामुळे मला खूप बरे वाटले आणि त्याचवेळी मनात विचार आला तो कादंबरीचे लेखक मनोहर शहाणे यांच्याशी या कादंबरीबद्दल थेट संपर्क साधायचा!
प्रदीर्घकाळ नाशिकमध्ये वास्तव्य आणि ‘अमृत’ या मराठी डायजेस्ट मासिकाचे, संपादक असलेले मनोहर शहाणे, हे निवृत्तीनंतर पुण्यात त्यांच्या चिरंजीवांकडे येऊन राहतात, असे काही वर्षांपूर्वी समजले होते. मग त्यांच्या चिरंजीवांचा फोन मिळवून मी शहाणेंपर्यंत फोनमार्फत पोहोचलो!
आता ९१ वर्षे वय असणारे आणि आजारी असल्याने घरी केअर टेकरच्या मदतीने उपचार घेत असलेल्या शहाणेसरांचे वय आणि प्रकृतीचा विचार करता, ते फोनवर बरेच सविस्तर बोलले. काही जुन्या गोष्टींचे थोडे विस्मरण असले तरी त्यांनी ‘धाकटे आकाश’ या कादंबरीवर ‘लोकसत्ता’मध्ये आलेला लेख वाचला होता. त्यांच्या या पहिल्या कादंबरीचा जो लेखनप्रवास त्यांनी उलगडून सांगितला, तो विलक्षण अद्भुत होता. १९३० मधील जन्म असणाऱ्या शहाणे सरांनी, १९४७-४८ च्या आसपास, म्हणजे देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले, त्या काळात, त्यांच्या वयाच्या १७/१८ व्या वर्षी, मॉट्रिक परीक्षेला बसले असताना, या कादंबरीचे लेखन सुरू केले. नाशिकमध्ये त्यांचा वाचन-लेखनप्रिय मित्रांचा ग्रुप दर रविवारी एकत्र जमून, आवडलेले साहित्य वाचत असे आणि स्वत:चे ताजे लेखनही सारे मित्र वाचून त्यावर चर्चा केली जाई. शहाणे यांनी याच निमित्ताने लेखन
केले. ते म्हणाले, ‘तुमचा विश्वास बसो की न बसो, पण मी सांगतो की मला लेखनाची सुरुवात आधी सुचली आणि मग कसलाही आराखडा न करता मी पुढे त्यावर लिहीत राहिलो. माझे नंतरच्या कादंबऱ्यांचे लेखनही असेच झाले आहे.’
त्यांच्या बोलण्यातून पुढे असे समजलेकी, ‘धाकटे अकाश’ मधील ‘धाकटा’ म्हणजे ते स्वत: असून, ही कादंबरी हे त्यांचे सारे ‘आत्मकथन’च आहे! वयाच्या १८ व्या वर्षी स्वत:च्या बालपणापासूनच्या घडामोडी, ठिकाणे, नातलग, भोवतालची विविध माणसे या साऱ्या गोष्टींचे तपशील त्यांनी त्यांच्या खास स्वत:च्या अशा चित्रमय शैलीत मांडले आहेत.
कादंबरी लिहून झाल्यावर शहाणे सरांनी, त्यांच्या काही वर्षे आधी निधन पावलेल्या थोरल्या भावाचे मित्र आणि ‘साधना’ प्रकाशनाचे संपादक यदुनाथ थत्ते यांना ती वाचायला दिली. त्यांनी ती ‘साधना’मध्ये छापली. त्यानंतर ‘मौज’ प्रकाशनाचे श्री. पु. भागवत हे घरी आले आणि त्यांनीही मौज प्रकाशनासाठी ही कादंबरी मागितली. ‘साधना’ आणि ‘मौज’ या दोन प्रकाशनांकडून १९६३ मध्ये प्रसिद्ध झालेली अशी एकमेव मराठी कादंबरी, अशी माहिती शहाणे यांनी दिली. स्वातंत्र्यपूर्व काळातील छोटी गावे व शहरांतील निम्नमध्यम वर्गातील कुटुंबातील माणसांचे जीवन किती विदारक होते, दारिद्रय, आजारपण, कमी वयात मृत्यू पावण्याचे एवढे प्रमाण की, मृत्यू अवती-भवतीच फिरतोय असे वाटावे. कमी वयात लग्ने, अनपेक्षित जबाबदारीने पिचलेली, मोडलेली माणसे, त्यांचे राग-लोभ, प्रेम – दु:ख- वैराग्य- संताप- वेड लागणे अशा साऱ्या भावभावनांचे उग्र दर्शन या धाकटय़ाला होत राहते. आई, आजी, आजा, मामा, थोरला भाऊ, वहिनी, तिचे बाळ, घरात येऊन राहणारी माणसे, आजूबाजूची गल्लीतील मुलंमुली अशा कितीतरी व्यक्तिरेखा या धाकटय़ाच्या बालवयातून किशोर आणि तरुण वयाकडे जाण्याच्या प्रवासात आपल्याला भेटतात. अनिल साबळे यांनी म्हटल्याप्रमाणे कादंबरीच्या सुरुवातीपासून मृत्यू आणि नियतीचे काळकुट्ट आभाळ आपला पाठलाग करीत राहते.
पण विशेष म्हणजे धाकटा, त्याच्या भोवतालच्या प्रत्येक गोष्टीकडे निरागस कुतूहलाने पाहत राहतो. दु:खाकडे सुद्धा तेवढय़ाच निरागसपणे निरखून पाहत, तो अनुभव स्वीकारत पुढे जातो. आजूबाजूला एवढय़ा लहानपणी तणावाचे, उग्र, दु:खाचे प्रसंग घडत असतानाही धाकटा त्याच्या भोवतालच्या घडामोडीतील आनंद देणारे, सुखावणारे प्रसंगही तेवढय़ाच निरागसतेने आणि तन्मयतेने टिपताना दिसतो. थोरल्या भावाचे टी.बी. झाल्याने शारारिक आणि मानसिक पातळीवर खचत जाणे पाहणारा ‘धाकटा’ हा कादंबरीच्या अखेरीस अकाली प्रौढ होण्याकडे वाटचाल करत असलेला दिसतो!
मी ही कादंबरी वाचली तेव्हा कॉलेजमध्ये शिकणारा आणि १७/१८ वयाचाच होतो, हा योगायोग! लहान वयातले अबोध मन, निरागस भावविश्व आणि टिपकागदाप्रमाणे टिपलेले अनेक अनुभव आणि परिणाम करून गेलेले क्षण, लेखक इतक्या पारदर्शक आणि चित्रमय शब्दशैलीत मांडू शकतो, हे मला विस्मयकारक होते. या लेखनशैलीचा माझ्यावर सखोल परिणाम झाला. त्या भरात मी कॉलेजच्या मासिकात लहान मुलाचे भावविश्व मिश्कीलपणे मांडणारी ‘भीमाच्या मिशा’ अशा नावाची कथा लिहिल्याचे आठवते.
मात्र बालपणीच्या निरागस समजूतदारपणातून, स्वातंत्र्यपूर्व काळातील या दैन्यावस्थेतील मुलांनी स्वीकारलेले, पचवलेले विदारक वास्तव अतिशय दाहक असणार आणि ते कैक पिढय़ा चालत आलेले असणार, हे मला त्या वेळीही भेदकपणे जाणवत होते. विलक्षण भाग म्हणजे, या दाहक वास्तवात कोमेजून न जाता पुढच्या जीवनाला सशक्तपणे सामोरे जाणारे हे धाकटय़ाचे व्यक्तिमत्त्व आहे, हे मला फार फार भावत राहिले आहे. ‘धाकटे आकाश’ ही कादंबरी अभिजात साहित्यिक कलाकृती आहे ती त्यामुळेच! पुढे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची अशीच लहान मुलाचे भावविश्व चितारणारी ‘डोह’ ही कादंबरीही अभिजात सहित्यिक कलाकृती ठरली. ‘धाकटे आकाश’ च्या मुखपृष्ठावरील पद्मा सहस्त्रबुद्धे यांच्या लोभस चित्राचाही या कलाकृतीच्या परिणामकारकतेमध्ये महत्त्वाचा वाटा होता. नंतरच्या काळात मी जेव्हा सत्यजित राय यांचा ‘पथेर पांचाली’ ही चित्रपट पाहिला, तेव्हा मला त्या चित्रपटातील ‘अप्पू’ आणि ‘धाकटा’ यांच्यात खूप साम्य जाणवले. बालवयात जीवनातील रखरखीत वास्तव अनुभवताना, पचविताना जीवनातील सुखद आनंद देणारे क्षण आणि घडामोडीसुद्धा हे दोघे जण तेवढय़ाच मनस्वीपणे टिपून घेत आपले व्यक्तिमत्त्व सशक्तपणे घडवित राहतात.
हे मात्र खरे की, मुलांप्रमाणे मुलींचे असे बालपणीचे त्या काळातील भावविश्व फारसे शब्दांकित झालेले नाही, ही जाणीव बोचरी आहे. मनोहर शहाणे सरांशी बोलणे झाल्यामुळे लेखकाचे सुरुवातीचे ललित लेखन हे आत्मकथात्मक असते आणि म्हणून ते अधिक प्रत्ययकारी असते, असे जे सांगितले जाते, त्याचा अनुभव आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ६० वर्षांपूर्वीच्या कादंबरीवर ‘लोकसत्ता’मधील लेखाच्या निमित्ताने, वाचकाच्या मनात निर्माण होणाऱ्या उत्कट अशा अस्वस्थ विचारांची देवाणघेवाण, मूळ कादंबरीकाराबरोबर वाचकाला करता आली! सर्जनाचे वर्तुळ आता पूर्ण झाले!!
– विजय सबनीस, पुणे</strong>
नव्या पिढीसाठी मार्गदर्शक लेख
‘लोकरंग’ मधील (३० एप्रिल) ‘चॅटजीपीटी आणि करियर दशसूत्री’हा चिन्मय गवाणकर यांचा लेख वाचला. कृत्रिम बुद्धिमता (एआय) तंत्रज्ञान माध्यमातून येत्या काही वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा बदल होणार आहे, त्यासाठी सर्वानी त्याचा विचार केला पाहिजे. त्यानुसार आपल्या करियरमध्ये बदल केले पाहिजेत हे सांगताना करियर दशसूत्री खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आहे. डिझाइन व इतर क्षेत्रामध्ये असे बदल होणार आहेत व त्यानुसार आपली नोकरी टिकविण्यासाठी स्वत:त कसे बदल केले पाहिजेत हे योग्य प्रकारे मांडले आहे. आताच्या पिढीने भरपूर वाचन व लेखनाची सवय लावली पाहिजे या मुद्दय़ावर लेखकाने लक्ष केंद्रित केले आहे. वेगवेगळय़ा विषयावर आपण वाचन केले पाहिजे, त्याबरोबर अनेक घरांमध्ये अगदी रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवयसुद्धा बऱ्याच घरात हल्ली अस्ताला चाललेली आहे हे वाक्य तरुण-पिढीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. लेख खूप अप्रतिम पद्धतीने लिहिला आहे. तसेच आपल्याकडे असलेले ज्ञान वेगाने कालबाह्य होत आहे. नवीन काहीतरी शिकत राहणे हे कायम सुरू ठेवले पाहिजे.
– विश्वनाथ खांदारे, बदलापूर
मनाने माणदेशात गेलो ‘जांभळाचे दिवस पुन्हा पुन्हा..!!’
(३० एप्रिल) हा वसिमबारी मणेर यांचा लेख वाचताना माणदेशात गेल्यासारखे वाटले. ग. दि. माडगूळकर यांच्या ‘जांभळाचे दिवस’ या पुस्तकाची व त्यातील कथांची ओळख झाली. माझे नातेवाईक डॉ. भीमसेन धमके नाझरे हे सांगोला येथे काही वर्षांपूर्वी राहत होते तेव्हा काही निमित्ताने माणदेशी जाणे होत असे. तेथील वातावरण पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे असे. मोकळी माळराने, छोटी नदी, ओढा, पावसाळय़ातच निसर्गरम्य व इतर वेळी काहीसा भकास वाटणारा परिसर असला तरी या परिसरातील साधीभोळी माणसे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण असली तरी माणुसकीची होणारी जपणूक मोठी असे. त्यांचा संघर्ष, दुष्काळी परिस्थितीत परिस्थितीवर मात करण्याची जिद्द मोठी आहे. आपल्या वाटय़ाला आलेले जीवन जगताना त्यांच्या मनातील विचार, निर्माण होणारी हतबलता याचे चित्रण मनाला बेचैन करणारे असते. पण ही जीवनाची बाजू आहे व यावरही आपल्या पद्धतीने जमेल तसा संघर्ष करणाऱ्या व्यक्ती मनात दीर्घकाळ वास्तव्य करतात.
– प्रफुल्लचंद्र काळे, सातपूर, नाशिक
दशसूत्री उपयोगी ठरेल
‘लोकरंग’ मधील (३० एप्रिल) ‘चॅटजीपीटी आणि करियर दशसूत्री’हा चिन्मय गवाणकर यांचा माहितीपूर्ण लेख आवडला. या लेखाच्या माध्यमातून चॅटजीपीटी तंत्रज्ञानाची सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत ओळख करून दिली आहे. त्यामुळे आपल्या व्यावसायिक जीवनात काय आणि कसा बदल घडवून आणला जाईल हेसुद्धा समजले. नव्वदच्या दशकात कम्प्युटरच्या आगमनानंतर असाच व्यावसायिक बदल घडून आला होता. या लेखाच्या सुरुवातीला सांगितले आहे तसे सध्या मात्र सर्वच क्षेत्रांत बदलांमुळे होणारे परिणाम खूप जलद दिसून येत आहेत. बदलांना सामोरं जाऊन टिकून राहणं ज्यांना जमेल तेच स्पर्धेत उरतील अशी परिस्थिती निर्माण होते आहे. यासाठी लेखकाने सुचविलेल्या दशसूत्री नक्की मदतीस येणार आहेत. मात्र त्यासाठी लागणारे श्रम, वेळ आणि पैसे यांची सांगड घालणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. – नकुल संजय चुरी, विरार