‘लोकरंग’मधील (१३ ऑगस्ट) गिरीश कुबेर यांचा ‘हा फक्त चित्रपट नाही..!’ हा लेख वाचला. ओपनहायमर आणि आईन्स्टाईनसारखे प्रज्ञावंत आपल्या देशात तयार होत नाहीत. लिहिणाऱ्याची जात कोणती यावर टाळ्यांचा अगर जोडय़ांचा कार्यक्रम ठरतो. ही घटना चालू असेपर्यंत चिकित्सेला फारसे भवितव्य नाही. कलाम असोत वा भारतातला कोणताही शास्त्रज्ञ असो, विवेचन करण्याइतका निर्भयपणा वाटावा एवढे वातावरण त्याला अपेक्षित असते. ते वातावरणच आपल्या देशात आज उपलब्ध नाही हे मोठे शल्य; पण त्यासाठी किमान विचारवंतांनी तरी पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येक समाजाला एक सॉक्रेटिस हवा असतो, जो प्रस्थापित राजव्यवस्थेला, धर्मव्यवस्थेला, समाजव्यवस्थेला आव्हान देऊन आपल्या विचारासाठी, तत्त्वासाठी विष प्यायला तयार असतो हे लक्षात घ्यावे. ओपनहायमरला आपल्या विचारस्वातंत्र्याची फळे भोगावी लागली, कारण स्वत:च्या वंदनीय राष्ट्राच्या आदरणीय नेत्यांच्या चुका व मर्यादा त्याने सभ्य शब्दांत नोंदवल्या. त्याच्यावर राज्यकर्त्यांचे चिडणे समर्थनीय नसले तरी मी क्षम्य  मानतो, कारण जगातल्या सर्व राज्यकर्त्यांची जात एकच असते- आम्ही म्हणू तेच खरे; आम्ही दाखवू तीच पूर्व दिशा. आपल्याकडे हल्ली राजकारणी श्रद्धास्थानी असतात म्हणून विचारवंत एकाकी होत जातात. विचारवंताने निर्भय बनायचे असेल तर सर्वसामान्य लोकांनी आधी सुजाण व्हायला हवे.

उत्कर्ष अंभोरे.

सद्य:कालीन अतिरेकी उजव्या विचारांच्या संदर्भात महत्त्वाचा लेख

गिरीश कुबेर यांचा ‘ओपनहायमर’वरील ‘हा फक्त चित्रपट नाही..!’ हा लेख आवडला. तो लेख जसा ‘ओपनहायमर’ चित्रपटावरील नाही, तसा तो केवळ जागतिक महायुद्ध आणि त्या काळात झालेल्या वैज्ञानिक संशोधनांसंबंधी मर्यादित नाही असे मला वाटते. या लेखातील अनेक मुद्दे आजच्या काळातीत अतिरेकी राष्ट्रवादाने व धार्मिक मूलतत्त्ववादी राजकारणाने पछाडलेल्या जगभरच्या जनमानसाच्या संदर्भात मला महत्त्वाचे वाटतात. सध्याच्या भारतीय राजकारणाच्या संदर्भात तर हा लेख अधिकच अन्वर्थक वाटतो. लेखाच्या प्रारंभी अल्बर्ट आईन्स्टाईन आणि ओपनहायमर यांना त्यांच्या टोकाच्या राष्ट्रवादविरोधी (किंवा डावीकडे झुकणाऱ्या) भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांचा कसा रोष पत्करावा लागला याचे वर्णन येते. महायुद्ध आणि अणुबॉम्ब यांच्यात थेट कसा संबंध नाही आणि युरोपात त्या काळात विज्ञानात मूलभूत संशोधनाची पायाभरणी किती झपाटय़ाने सुरू होती, याचा ऐतिहासिक कालक्रमणानुसार धावता आढावा लेखकाने या लेखात घेतला आहे. आईन्स्टाईन यांनी आपली मातृभूमी सोडताना राष्ट्रवादाबद्दल काढलेले उद्गार मला आजच्या भारतातील प्रचारकी राष्ट्रवादाच्या संदर्भात महत्त्वाचे वाटतात. हिटलरचा फॅसिझम असो की रशियामधील कम्युनिझम- दोन्हींची आईन्स्टाईनला घृणा होती असे नोंदवून ‘‘फॅसिझम असो वा कम्युनिझम व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा संकोच करून त्यास गुलाम करणारी राजकीय सत्ता ही मानवतेची शत्रूच मानली जायला हवी. व्यक्तीस स्वविकासार्थ किती मोकळीक, स्वातंत्र्य दिले जाते यावर त्या समाजाचे बरेवाईटपण ठरते,’’ या आईन्स्टाईनच्या विधानाचा दिलेला दाखलाही आजच्या भारतीय राजकारणाच्या संदर्भात लक्षणीय वाटतो. या पार्श्वभूमीवर अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे मूल्यमापन केले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘ओपनहायमर’वरील सदर लेख फक्त युरोप-अमेरिकेतील वैज्ञानिक संशोधन आणि युद्धखोरीचा वेध घेणारा नसून (दूरान्वये)  भारतासारख्या लोकशाही देशातील सद्य:कालीन अतिरेकी उजव्या विचारांच्या संदर्भातही महत्त्वाचा आहे.

प्रमोद मुनघाटे, नागपूर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माटेंच्या शोध बिचारे उदासीन आहेतची आठवण

‘लोकरंग’मध्ये (१३ ऑगस्ट) गिरीश कुबेर यांचा ‘हा फक्त चित्रपट नाही’ हा उत्कृष्ट लेख वाचताना कुमारवयात पाठय़पुस्तकात वाचलेला श्री. म. माटे यांचा ‘शोध बिचारे उदासीन आहेत’ हा निबंध आठवला. अलीकडे विज्ञानविषयक संशोधन हे एकटय़ाने करायचे काम राहिलेले नाही. त्यात अनेक माणसे, प्रचंड पैसा यांची उपलब्धता आवश्यक असते आणि इथेच राजकारण, सरकार यांची मदत घेणे अनिवार्य होते. ज्याचे स्वत:चे काही जात नसते, जे स्वत: कायम सुरक्षित असतात असा वर्ग हे राजकारणी किंवा शासनाचे बऱ्याच अंशी खरेअसणारे वर्णन मान्य केले तरी वैज्ञानिकांना लागणारा निधी याच वर्गाच्या हातात असतो. त्यांच्या दृष्टिकोनातून उपयोजनच महत्त्वाचे असते, त्यामुळे शास्त्रज्ञ आणि शासन हे हातात हात घालून येतात तेव्हा दोन अगदी भिन्न, पण तुल्यबल गोष्टींमधील संघर्ष आकार घेतो. दोन्ही बाजू आपापल्या परीने खऱ्या असल्याने त्यांच्यातील क्रिया-प्रतिक्रियांचे नाटय़ आकर्षक बनते. चित्रपटाच्या निर्मितीमध्ये कलावंत आणि पैसे घालणारा निर्माता यांच्यात जे काही घडते ते शासन आणि शास्त्रज्ञ यांच्यात घडणाऱ्या नाटय़ात काही अंशी साम्य असते. म्हणूनच अशा कलाकृती प्रत्ययकारक ठरत असाव्यात. – गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर.