|| डॉ. महेश केळुसकर

‘‘तुमच्या वडिलांनी तुमचे लेखनगुण तुम्हाला लिहायला प्रतिबंध करून मुरवत ठेवले, हे चांगले झाले. त्यामुळे ते अधिक गाढ आणि पक्व झाले. आता या मोहरा तुम्ही खळखळा ओतत राहा.’’

– कवी वसंत सावंत यांचं आनंद अंतरकर यांनी लिहिलेलं व्यक्तिचित्रं ‘हंस’च्या एका अंकात वाचल्यावर, ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांनी पत्र लिहून हा अभिप्राय पाठवला होता. तो किती सार्थ आणि साक्षेपी आहे, याचा प्रत्यय देणारा आनंद अंतरकर यांचा ‘सेपिया’ हा नवा व्यक्तिचित्र संग्रह अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. साहित्य आणि कलाक्षेत्रातील नामवंतांचं अंतरकरांनी केलेलं हे व्यक्तिचित्रण म्हणजे मराठी ललित साहित्यातील दहा लखलखीत मोहराच आहेत. वाचनश्रीमंत होणं म्हणजे काय, याचा अनुभव हे लेखन आपल्याला देतं.

‘हंस’चे संस्थापक-संपादक अनंतराव अंतरकर, अरविंद गोखले, शांता शेळके, पु. भा. भावे, सी. रामचंद्र, गंगाधर गाडगीळ, म. द. हातकणंगलेकर, द. पां. खांबेटे, राजेन्द्र बनहट्टी आणि पु. वि. तथा राजाभाऊ बेहेरे यांच्या व्यक्तिचित्रांना लेखकानं जी शीर्षकं दिली आहेत. (उदाहरणार्थ, अनंतरावांना ‘मंत्र’, सी. रामचंद्र यांना ‘रूपक’ वगैरे) ती त्या-त्या व्यक्तिमत्त्वाचा प्राणविशेष अधोरेखित करणारी आहेत. (लेखाला, कथेला अचूक शीर्षक देण्याचा हा प्रातिभगुण आपल्या वडिलांकडून आनंद अंतरकरांकडे संक्रमित झालेला दिसतो.)

I love my magazines more than my family, more than my own life हा अनंत अंतरकर यांचा जीवनमंत्र होता. अत्यंत अभिजात जीवननिष्ठा, जीवनतत्त्व आणि ध्येयवाद काय असतो, हे त्यांनी ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ ही मासिकं चालवताना दाखवून दिले. त्यापायी स्वत:ची आणि कुटुंबाची सहनशक्ती पणाला लावली. त्यांची कडक शिस्त, भाषाविचार, संपादनातला साक्षेप, अथक परिश्रम, कलासक्ती, धारदार विनोद आदी गुणांचं दर्शन घडवताना व्यक्तिचित्रकार म्हणून लेखकानं स्वत:च स्वत:च्या साक्षेपीपणाची परीक्षा घेतली आहे. अनंतराव हे वडील असले, कर्तृत्ववान संपादक असले, तरी हाडामांसाचे माणूस होते, ही वस्तुनिष्ठता आनंद अंतरकरांनी ठेवली आहे.

आनंद अंतरकर मुळात छायाचित्रकलेत प्रवीण आहेत. ‘सेपिया’मध्ये त्यांनी लेखणीचा कॅमेरा केलेला आहे, इतकंच. ‘सेपिया’ हा छायाचित्रकलेच्या परिभाषेतला इंग्रजी शब्द संग्रहाच्या शीर्षकासाठी योजताना ते म्हणतात, ‘कृष्ण-धवल छायाचित्रावर विशिष्ट कालांतराने रासायनिक घटकांमुळे जी एक लालसर तपकिरी रंगाची छटा चढते, तिला ‘सेपिया’ म्हणतात. छायाचित्रामध्ये त्यामुळे आपोआपच प्राचीनत्वाच्या भासाचं किंवा ऐतिहासिक दुर्मीळतेचं मोल निर्माण होतं.’ संग्रहातील व्यक्ती कालवश होऊन बराच काळ लोटलेला आहे. त्या प्रत्येकाबद्दल लेखकाला आत्मीयता आणि ममत्व आहे. पण लेखक म्हणून लेन्समागे जो डोळा अंतरकरांनी लावलेला आहे, तो नितळ आणि त्याचवेळी भेदक आहे. मोठमोठय़ा नामवंतांच्या व्यक्तिमत्त्वालाही कुठे एखाद् दुसऱ्या ठिकाणी सुरकत्या पडलेल्या असतात, कुठे थोडीशी शिवण उसवलेली असते, कुठे दिसेल न दिसेल असा ठिपका पडलेला असतो – हे सगळं छायाप्रकाशाचा पोत आणि लेन्सचा तोल, ताल, गती सांभाळून अंतरकर स्वच्छपणे टिपतात. म्हणूनच ही सगळी व्यक्तिचित्रे ‘जिवंत’ झाली आहेत.

अभिज्ञ साहित्यप्रेमी आणि व्यासंगी शान्ताबाई शेळकेंचं ‘स्टर्लिग मेरिट्स’ (हे विशेषण लेखकाचंच) व्यक्तिचित्र अंतरकरांनी रंगवले आहे. ‘माझ्या आकाशातलं ऊध्र्व स्वस्तिकावरचं नक्षत्र’ असे त्यांनी शान्ताबाईंचं मोठेपण अधोरेखित केलं आहे. शान्ताबाई शब्दांच्या अचूक निवडीबाबत कशा आग्रही होत्या हे सांगताना, जी. ए. कुलकर्णीसारख्या प्रगल्भ लेखकाने ‘कुसुंबगुंजा’च्या ऐवजी ‘कुसुमगुंजा’ हे चुकीचं शीर्षक आपल्या कथासंग्रहाला दिल्याबद्दल शान्ताबाईंनी खेदयुक्त आश्चर्य प्रगट केल्याचा किस्सा अंतरकरांनी खुलवला आहे. ‘तोच चंद्रमा नभात’ल्या लोकप्रिय गीताची निर्मिती, विद्यार्थ्यांचे पेपर्स तपासत असताना तुकडय़ा-तुकडय़ांनी कशी झाली, त्याचाही किस्सा आहे. पण अशा किश्शांबरोबरच शान्ताबाईंचा भाषाविचार, शब्दविचार, भाषाशैली यांबाबतही आपली मर्मग्राही निरीक्षणं लेखकानं नोंदवली आहेत. शान्ताबाईंची मान खाली घालून प्रस्फुट हसायची लकब, त्यांचं मार्जारप्रेम, उत्कटता, रसिकता, माधुर्य आदी विविधरंग या व्यक्तिचित्रात भरत असताना, त्यांच्या आवाजालाही काव्यात्म न्याय देताना लेखक म्हणतात, ‘त्यांच्या अंतरीच्या बोलांना स्वरयंत्रातून बाहेर पडताना एका अभिष्ट लाघवाचं व्यंजन लाभत असे.’

बहुविध रसाविष्कार करणारे चतुरस्र लेखक द. पां. खांबेटे मराठी समीक्षकांनी दुर्लक्षित ठेवल्याबद्दल अंतरकरांनी खंत व्यक्त करीत असतानाच मराठी समीक्षाव्यवहाराच्या संकुचितपणावर व पक्षपातीपणावर झोत टाकला आहे. ‘चिं. वि. जोशींनंतरचा दुसरा प्रसन्न विनोदी शैलीचा लेखक’ असे खांबेटेंचे सार्थ वर्णन अंतरकरांनी केले आहे. कुठलाही विषय असला, तरी त्याच्याशी एकरूप आणि एकाग्र होण्याची खांबेटे यांची संविदिष्णुता (Sensitivity) उच्च कोटीची होती. त्यांनी विनोदी लेखनाला मानसशास्त्रीय परिमाण दिलं. विज्ञान-काल्पनिका लिहिल्या आणि १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धकाळात प्रसिद्ध झालेल्या ‘हंस’च्या युद्धकथा विशेषांकातील समग्र लेखन एकहाती केलं. खांबेटेंच्या एका लेखामुळे चिडून जाऊन आचार्य अत्रे यांनी त्यांची बदनामी करण्यासाठी काही सामग्री मिळते का म्हणून कसे जंग जंग पछाडले; पण भेटेल त्याने खांबेटे हे कसे सज्जन गृहस्थ आहेत याचे दाखले दिल्याने अत्रेंची कशी निराशा आणि पंचाईत झाली, याचे रोखठोक लेखापरीक्षण अंतरकरांनी केले आहे. मोठे प्रतिभावंत, मग ते अत्रे असोत की गंगाधर गाडगीळ, त्यांच्याही पायांना माती चिकटलेली असते हे दाखवून देताना आपल्या वडिलांप्रमाणेच आनंद अंतरकर निर्भीड होतात आणि त्यामुळेच त्यांची व्यक्तिचित्रे नैसर्गिक होतात, सजीव होतात.

अरविंद गोखले, पु. भा. भावे, म. द. हातकणंगलेकर, राजेन्द्र बनहट्टी, पु. वि. बेहेरे यांच्या व्यक्तिचित्रणांमधून जे भावदर्शन लेखकाने घडवले आहे, ते त्यांच्या सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारे आहे. प्रतिभावंत संगीतकार सी. रामचंद्र यांच्या सुरेल स्मृतींना ‘सेपिया’ अर्पण करताना अंतरकर म्हणतात, ‘आजही तुमचे सूर वातावरणात गुंजू लागले, की पहाटतारे होऊन ते माझ्या काळजात नाचू लागतात.’

‘सेपिया’मधले हे दहा तारेही वाचकांच्या काळजात दीर्घकाळ लखलखत राहणार आहेत.

  • ‘सेपिया’- आनंद अंतरकर,
  • हंस प्रकाशन, पुणे,
  • पृष्ठे – २४०, मूल्य – २५० रुपये

maheshkeluskar@gmail.com