|| स्वाती दिवेकर
चैत्राचे दिवस. हवेतला उरलासुरला गारवा संपत चाललेला. हिवाळ्यात सकाळी धावायला जायचा ठाणेकरांचा उत्साह आता पहाटे लवकर भेटीला येणाऱ्या सूर्यनारायणाच्या प्रखर प्रकाशामुळे मावळून गेलेला. रात्र एसीच्या थंडाव्यात घालवल्यामुळे अंगाला जडत्व आलेलं. अशा अवस्थेत स्वत:वर बळजबरी करून आळोखेपिळोखे देतच मी पायात बूट चढवले.. मॉर्निग वॉकसाठी!
इमारतीबाहेर पडताच कोकिळ-सुरांनी स्वागत झालं आणि अंगातला आळस गळून पडला. या निसर्गसंगीताचा आनंद घेत तिथंच थबकायला झालं. रोजच्या धावपळीत आपण इतके गुरफटलेलो असतो की निसर्गाच्या या विलक्षण रागदारीला दाद द्यायची राहूनच जाते.
मग ठरवून टाकलं.. आज चालायचं ते व्यायाम म्हणून नव्हे. रमतगमत फिरताना आपला परिसर नव्यानं पाहू. तेवढय़ात नजर पडली आणखी एका स्वागतोत्सुक नजाऱ्याकडे! शंकासुराची झाडं आपल्या नाजूक कोवळ्या पोपटी पानांच्या जोडीने लाल-पिवळे-केशरी तुरे दिमाखात नाचवत जणू आपल्या स्वागतासाठी रांगेत उभी होती. थोडंसं पुढे जाताच रस्त्यावर डाव्या बाजूला जांभळांचा सडा पडलेला दृष्टीस पडला. कोणी आपल्याकडे बघत नाहीए ना, याची खात्री करून घेत मी पटकन् वाकून खाली पडलेलं टपोरं जांभूळ उचलून तोंडात घातलं. मनानं परकरी पोर झालेली मी मग मनातल्या मनात नाचत पुढे निघाले.
एव्हाना उन्हामुळे घामाच्या धारा लागलेल्या. आत्ता नको, संध्याकाळी मारूया ही ठरवलेली चक्कर- असा विचार मनात घोळायला लागणार इतक्यात मोहक सुगंधामुळे पाय तिथेच थबकले. हा मंद सुगंध येतोय तरी कुठून याचा माग काढत पावलं पुढे पडली आणि नेहमी भुर्रकन गाडीतून निघून जाताना भारदस्त असूनही नजरेआड गेलेला ‘कैलासपती’ लक्ष वेधून घेता झाला. या झाडाला लागणाऱ्या फळांच्या आकारामुळे याला ‘कॅनन बॉल ट्री’ असं म्हणतात. आपल्या घरापासून जेमतेम ३०० मीटर अंतरावर असलेल्या या झाडाच्या फुलांचा सुगंध पहिल्यांदाच अनुभवत होते. दोन फुटांच्या अंतरावरून ती फुलं आणि तोफेच्या गोळ्यासारखी वाटणारी गोल गरगरीत फळंही पहिल्यांदाच नीट निरखत होते.
आता मात्र नव्या उत्साहाने पुढे जायला निघाले. चार पावले गेल्यावर छानसा, संपूर्ण सावलीचा उतरंडीचा रस्ता लागला. डाव्या बाजूला गावठी आंब्याचे डेरेदार वृक्ष थंड सावली देत होते. आंब्यांच्या मोहोराचा मंद दरवळ आसमंतात पसरला होता. त्या सावलीचा आनंद लुटण्यासाठी बाजूच्या कुंपणाच्या भिंतीवर मी चक्क बसले. भिंतीवर बसून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यात वेळ मजेत चालला होता. समोर बघितलं तर गर्द हिरव्या रंगाची एक उंच भिंतच समोर उभी ठाकली होती. गोलसर आकाराच्या पानांचे रुंद, पण सरळ बुंध्याचे चार-पाच वृक्ष बाजूच्या इमारतीच्या उंचीशी स्पर्धा करीत होते. खोटय़ा बदामाची झाडं की काय ही? झर्कन् बालपण डोळ्यासमोर तरळून गेलं. शाळेसमोरच्या रस्त्यावर कित्येक वेळा थांबून जमा केलेली बदामफळे. ती ठेचून फोडून लालसर शिरांच्या कवचातून अलगदपणे बाहेर काढलेला बदाम. आठवणींच्या या ओढीने पाहायला लागले.. रस्त्यावर बदामफळे पडली आहेत का! मान वर करून फांद्यांवर फळं शोधत असताना दिसली गुलाबी-पांढरी टपोरी पावडर पफसारखी नाजूक फुलं! अरेच्चा! हा बदाम नाहीच. ही आहेत समुद्रफळाची झाडं! तकाकत्या हिरव्या पानांची ही झाडं किती दिमाखदार दिसतात.
उताराच्या रस्त्यावरून थोडं पुढे गेलं की उजव्या बाजूला रांगच रांग सुरू होते- जांभळट गुलाबी फुलांचे गुच्छ मिरवणाऱ्या हिरव्याकंच पानांच्या झाडांची. सुखद सावलीची कमान असलेला हा ‘प्रोमेनाड’! इथे आपली नजाकत दाखवतोय तो तामण. या प्रसन्न, लक्षवेधी फुलांनी लगडलेल्या सावलीतून चालायला मिळणं म्हणजे स्वप्ननगरीत वावरणंच!
याहून अधिक सुंदर, मनोहारी दृश्य आपल्याला आता काय दिसणार असा विचार मनात डोकावतो- न डोकावतो तोच दिसू लागते कचनाराच्या जांभळट किरमिजी रंगाची आरास! आपटय़ाच्या गोलसर पानासारखी, पण आकाराने थोडी मोठी पाने असणारा कचनार किंवा कांचन. लडिवाळ कांचनाच्या डुलत्या फांद्यांच्या मागे धीरगंभीर वृत्तीने उभे होते महोगनी. ही महोगनीची झाडं अद्याप बाल्यावस्थेत होती. पण वृत्तीने आत्तापासूनच प्रौढ भासली.
आता पाळी होती जानेवारी-फेब्रुवारीत आपलं हुन्नर दाखवणाऱ्या टाबेबुया आणि सातविणीची! रस्त्याच्या दुतर्फा या वृक्षांच्या ओळी आणि मधोमध उभी ख्रिसमस ट्रीसारख्या सरळसोट उंच वाढणाऱ्या, छोटय़ा छोटय़ा नाजूक पानांच्या टर्मिनेलिया मॅनटालीची रांग! किती शाही दिसतं हे दृश्य! हिरवाकंच सुखद थंडावा. हिवाळ्यात इथे चक्कर मारली तर जपानी चेरी ब्लॉसमची आठवण येईल अशी फिक्या गुलाबी रंगांची टाबेबुयाची फुलं दाटून आलेली असतात. सातविणीच्या नाजूक पांढऱ्या फुलांच्या मादक मसालेदार सुगंधाने आसमंत भरून गेलेला!
धिम्या गतीने मी पोचते सार्वजनिक उद्यानात. सगळेच रंग या उद्यानात उधळले गेलेले. पण पाय वळले लाजऱ्याबुजऱ्या हिरव्या चाफ्याच्या रांगेकडे. हिरव्या चाफ्याचा सुगंध असतोच तसा दिलखेचक. सकाळी व्यायामासाठी येणारे उत्साही, लाफ्टर क्लबचे खुशमिजाज, योगासने करणारे, बाजूच्या बाकांवर बसून बसल्या बसल्या हातपाय हलवणारे सीनियर सिटिझन्स.. अशा वातावरणात वाढणारी इथली झाडं जास्तच तरतरीत, आनंदी भासली. उद्यानात शिरता शिरता बहावा वृक्ष आपल्या भरभरून लगडणाऱ्या सोनसळी पिवळ्या घोसांनी येणाऱ्या-जाणाऱ्यांवर चवऱ्या ढाळताना दिसले. अमलताशाचा तो सतेज पिवळाधम्मक बहर सर्वाच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतो. पांढरी, गुलाबी, किरमिजी, केशरी, अबोली.. बोगनवेलीच्या किती या मनोहारी छटा! वाऱ्याच्या झुळकीबरोबर खाली घरंगळणाऱ्या या फुलांचा गालिचा तयार झालाय जमिनीवर. प्लुमेरिया वा फ्रांजीपानी दुरूनच हाका मारताहेत- आपल्याकडे बघ म्हणून. पण वाटेतल्या पारिजातकाला रुसवून तशीच पुढे कशी जाऊ? सकाळीच बरसून गेलेल्या प्राजक्ताची फुलं खरं तर एव्हाना कोमेजून गेली आहेत. पण त्यांचा दरवळ अजूनही तजेलदार. त्या छोटय़ाशा आमराईतली वाट मला घेऊन जाते प्लुमेरियांच्या दर्शनाला. मंद सुगंध, पाच पाकळ्या आणि पांढऱ्या रंगापासून गडद किरमिजी रंगांच्या अनेक छटा असलेली फुलं. देवचाफा. काहीजण या झाडांना ‘पॅगोडा ट्री’ असंही म्हणतात बहुदा. मी त्यांच्याकडे मनभरून पाहते. तेवढय़ात तिथे एक आजी पोचल्या. आपल्या काठीच्या आकडय़ांनी फुलं काढायचा प्रयत्न करू लागल्या. दोन-चार अयशस्वी प्रयत्नांनंतरही त्यांनी आपले प्रयत्न जिद्दीने चालूच ठेवलेले. मग काठी हातात धरून चक्क त्या उडी मारून फुलं काढायचा प्रयास करू लागल्या. कशीबशी चार फुलं त्यांच्या हाताला लागल्यावर काय गोड हसू पसरलं त्यांच्या चेहऱ्यावर! एखाद्या परकऱ्या मुलीसारखं! या कुसुमाकर वसंत ऋतूच्या जादूनं माझ्याच नाही, तर अनेकांच्या मनालाही पालवी फुटली आहे तर..!