मीना गुर्जर 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांनी सातत्यानं वाचत राहावं, काही जुन्या महत्त्वाच्या लेखकांच्या पुस्तकांची नव्या पिढीला ओळख व्हावी यासाठी ज्योत्स्ना प्रकाशन सातत्यानं प्रयत्न करीत असतं. याचाच एक भाग म्हणून यावेळी त्यांनी साधारण ९ ते १३ वयोगटाच्या मुलांसाठी आणला आहे एक अनोखा साहित्य नजराणा. आता काही निवडक लेखकांच्या पाच छोटय़ा कथा संक्षिप्त स्वरूपात छोटय़ा दोस्तांसाठी प्रकाशित केल्या आहेत. त्यात  प्र. के. अत्रे, जी. ए. कुलकर्णी, पु. शि. रेगे, मधु मंगेश कर्णिक, श्रीनिवास कुलकर्णी अशा दिग्गज लेखकांच्या कथांचा समावेश आहे. दर्जेदार साहित्याबरोबरच काही मानवी जीवनातील महत्त्वाच्या मूल्य कल्पना – संदेश यांचा समावेश असलेल्या कथांची निवड करण्यात आली आहे. मुलांच्या जडणघडणीच्या वयात अशा विविध प्रकारच्या लालित्यपूर्ण पाच कथा बालवाचकांपुढे ठेवण्याचे उल्लेखनीय काम त्यांनी केले आहे.

नामवंत साहित्यिकांची ओळख व्हावी, त्यांच्या मूळ पुस्तकाकडे मुलांनी वळावे, त्यांची आणि इतरही लेखकांची पुस्तकेवाचावीत, त्यांचा परिचय करून घ्यावा, अशी प्रेरणा व्हावी अशीच ही पुस्तके आहेत.

या पुस्तकासाठी मोठय़ांच्या साहित्यातून अशा मजकुराची निवड अशा तऱ्हेने केली आहे की ते मुलांच्या भावविश्वाशी जोडलं जाईल. ही निवड करताना मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही होईल याची काळजी घेतली आहे. या कथांची निवड आणि संपादन माधुरी पुरंदरे आणि संजीवनी कुलकर्णी यांनी केली आहे यातच सर्व आले.

मधु मंगेश कर्णिक यांची ‘चोरी’ ही कथा पूर्णपणे वास्तवाला धरून आहे. तरीही त्यात गोपूची बालसुलभ मजेदार वृत्ती दिसतेच. अजाणतेपणामुळे आईपेक्षा जास्त तांदूळ मिळवायचे या ईर्षेतून तो पोपटाच्या ढोलीतून ओंब्या घेतो; पण आत्यंतिक गरिबीत, कष्टमय जीवनातही त्याची आई त्याला नैतिकतेचे धडे देते आणि गोपूही ती चोरी न करण्याची मूल्य कल्पना सहज शोषून घेतो.

आचार्य अत्रे यांच्या – ‘टाकाने लिहिलेली गोष्ट’ यात मेणबत्ती, टाक, दौत या निर्जीव वस्तू बोलतात, विचार करतात. त्यांना एक व्यक्तिमत्त्व, स्वभाव आहे. दौत शांत तर टाक मिश्कील! मेणबत्ती आढय़ताखोर, रूपगर्विता! तिला बाकीचे सर्व तुच्छ वाटतातच, पण सूर्यदेखील नोकर वाटतो. दौत – टाक हे आनंदी वृत्तीचे तर मेणबत्ती सदा कुरकुरणारी. अशा लोकांना शेवटी कसा त्रास होतो याचे चित्रण या कथेत आहे.

‘जीएं’ची ‘पेरू’ ही कथा अद्भुताचा स्पर्श असणारी! सत्कृत्य करणाऱ्या शिपायाचा हुद्दा वाढून तो कोतवाल बनतो, तर उद्धट आणि कंजूष बागवानाला लाकडाचा पाय येतो, त्याचे सर्व पेरू नाहीसे होतात, झाडासाठी गरम पाणी देणाऱ्या माणसाच्या चेहऱ्याच्या जागी पेरू येतो. अशा गमतीदार कल्पना या कथेत आहेत.

‘पु. शि. रेगे’ यांची ‘भुईचाफा’मधील बकुळीचं झाड मुळातच आनंदी! ते सर्वावर खूश आहेच; पण स्वत:वरही खूश आहे. सर्व सृष्टीच्या कौतुकाचा विषय आपण आहोत, आकाशातले सर्व तारे माझ्यासाठीच चमकतात याची त्याला खात्री आहे. तसं ते दुष्ट वगैरे नाही; पण आपली मुळं ते विसरलेय, आपल्या जडणघडणीतली म्हातारी त्याच्या आठवणीतही नाही; पण ही जाणीव झाल्यावर तो भुईचाफ्यावर आपली फुलं ढाळतो. आकाश – तारे छानच आहेत; पण माती – दगड हेच आपले जीवन आहे. आपल्या घट्ट उभे राहण्यामागे, आपल्या ताप्यासारख्या फुलांमागे कोणाचे तरी कष्ट आहेत हे त्याला उमजतं. मोठय़ांनाही जागं करणारी कथा आहे.

श्रीनिवास कुलकर्णी यांची ‘फुलपाखरू’ ही नितांत सुंदर कथा. वडील आणि मुलगा यांचे छोटेसे विश्व! एकमेकांत गुंतलेले त्यांचे भावजीवन! मुलाचे अतोनात प्रश्न आणि बाबांची तशीच चटपटीत उत्तरं; पण उत्तरं माहीत नसतील तर बाबांची तशीही सहज कबुली. मोकळं पारदर्शी नातं. आई पडद्यामागे असली तरी तीही या खेळात सामील आहेच. रोज रात्री गाणी-गोष्टी सांगून झोपवणारा बाबा, ‘डोंगराचा पंख’, ‘पाण्याचा पंख’ या त्याच्या अजब कल्पना विश्वात रंग भरणारा बाबा, ‘सुरवंटामधून फुलपाखरू’, ‘फुलपाखराच्या सहा लाथा’, ‘त्यांचं जेवण म्हणजे मध’ अशा गोष्टींतून सहजगत्या फुलपाखराची माहिती सांगणं, शिवाय सकाळी लवकर उठावं म्हणून फुलपाखराचीच कहाणी सांगणं- एक सुंदर नातं. मुलांसाठी ही कथा खरीच, पण आई-बाबांसाठी वस्तुपाठ!

चित्र सुखावह असणं, बारीक बारीक तपशील भरणं, चेहऱ्यावरचे भाव, हावभाव, गती जाणवणं इ. विशेष म्हणजे पुस्तके मुलांसाठी असूनही अतिशय तरल, प्रसन्न रंगांचा वापर केला आहे.  मेणबत्ती, टाक, दौत यांसारख्या निर्जीव वस्तूंनाही हावभावांसहित जिवंत केलं आहे. मकरंद डंभारे यांनी चितारलेले मेणबत्तीचे सुरुवातीला ताठ उभे असणे आणि क्रमाक्रमाने विरघळणेही छानच!

‘पेरू’मध्ये तन्वी भट यांनी गावचा बाजार, पेरूवाला, साधू, माणसांचा जमाव, पेरूंनी लगडलेलं झाड इ. तपशिलाने रंगवले आहेतच, पण बागवानाचा संताप, कोतवाल आणि जमावाचं हसणं याबरोबरीनेच ‘‘साधू शांतपणे निघून गेला’’ या वाक्यातला शांतपणाही चित्रित केला आहे.

‘चोरी’मध्ये गोपूचे सगळे विभ्रम, त्याच्या नजरेतलं कुतूहल, विस्मय, शेतीची सर्व कामे, ओंब्या घेऊन बाणासारखे हिरवेगार पोपट, झाडे हे सर्व अफाट आसमंताच्या विराट पार्श्वभूमीवर रेखाटले आहे. हा सर्व चौकट नसलेला परिसर इथे साकार झाला आहे.

‘भुईचाफा’ आणि ‘फुलपाखरू’मधील चित्रे चंद्रमोहन कुलकर्णीची आहेत. ‘पाण्याचा पंख’  वा ‘डोंगराचा ढगाचा पंख’ या केवळ कल्पना चित्रातूनही तलमपणे व्यक्त होतात. ‘फुलपाखरांनी शोभिवंत झालेली भिंत’ वा लगडलेलं झाड ताप्यांनी चमचमणारं आकाश, फुलांनी बहरलेलं बकुळीचं झाड, भुईचाफ्यावर ताप्यासारख्या फुलांचा वर्षांव करणारी बकुळ स्वप्नमय भारलेल्या प्रदेशात घेऊन जातात. यातली काही चित्रे तर चित्राकृती (पेंटिंग) म्हणून सरळ भिंतीवर लावाव्यात इतक्या छान आहेत. पुस्तकाचं दर्शनी रूप पाहूनच पुस्तक वाचायची ओढ लागेल. आतला मजकूर तर छान आहेच! मुलांसकट मोठय़ांनाही भुरळ पडेल अशी ही पुस्तके आवर्जून वाचावी अशी आहेत.

पेरू’ – जी. ए. कुलकर्णी,

पाने- १६, किंमत- ६५ रुपये.

‘भुईचाफा’ – पु. शि. रेगे,

पाने- १४ , मूल्य ६५ रुपये.

उशिरा उठणारं फुलपाखरू

– श्रीनिवास कुलकर्णी,

पाने- २३, किंमत- ७५ रुपये.

‘चोरी’ – मधु मंगेश कर्णिक,

पाने- २३ / किंमत- ७५ रुपये.

‘टाकाने लिहिलेली गोष्ट’ – प्र. के. अत्रे, पाने- १२, किंमत- ६५ रुपये.

वाचकांचा कौल : डिसेंबर (२०२२) महिन्यात वाचकांकडून सर्वाधिक पुस्तकांची झालेली खरेदी..

(माहिती स्रोत: अक्षरधारा, पुणे. मॅजेस्टिक बुक डेपो, ठाणे. आयडियल बुक डेपो, दादर. ज्योती स्टोअर्स ग्रंथदालन, नाशिक.)

पंतप्रधान नेहरू’ : नरेन्द्र चपळगावकर

सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधानपद भूषविलेल्या पंडित नेहरूंच्या एकूण कार्याचे मूल्यमापन या पुस्तकात वाचायला मिळते. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेन्द्र चपळगावकर यांनी लिहिलेले राजकीय चरित्र असे या पुस्तकाचे स्वरूप. ‘नेहरूंच्या नेतृत्वाची जडणघडण’, ‘नेहरू आणि वल्लभभाई’, ‘काश्मीर आक्रमण’, ‘काश्मीरसाठी राज्यघटना’, ‘सरहद्दीचा तंटा’, ‘चीनचे आक्रमण’, ‘नेहरूंचा नवभारत’, ‘नेहरू पंतप्रधान आणि माणूस’ या विभागांतून नेहरूंच्या चरित्राची निर्मिती झाली आहे.

 मौज प्रकाशन गृह

फ्रॅक्चर फ्रीडम’ : कोबाड गांधी – अनुवाद : अनघा लेले

कोबाड गांधी यांच्या आत्मकथनाचा अनघा लेले यांनी केलेला अनुवाद. राज्य सरकारने या पुस्तकाच्या अनुवादासाठी दिलेला पुरस्कार काढून घेतल्यानंतर गेल्या दोन आठवडय़ांत या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या संपून बाजारात तिसरी आवृत्ती दाखल झाली. नक्षलवादाच्या आरोपाखाली दहा वर्षे तुरुंगात राहिलेले गांधी सधन पारशी कुटुंबात जन्मले. चार्टर्ड अकौंटंट बनण्यासाठी लंडनला गेले. तिथे मार्क्‍सवादाचा अभ्यास करून भारतात आल्यानंतर नक्षल प्रेरित युवक चळवळीत सहभागी झाल्यानंतरचा प्रवास या पुस्तकात आला आहे.

 लोकवाङ्मय गृह

विघ्न विराम : श्री अय्यर

‘हू पेण्टेड माय मनी व्हाइट’ या कादंबरीचा दीपक करंजीकर यांनी केलेला हा अनुवाद. भारतात २०१६ च्या अखेरीस अचानक नोटाबंदीचा निर्णय झाला. तो निर्णय कशासाठी घेण्यात आला होता, त्याचे कल्पनेच्या मुलाम्यातील सत्यकथन म्हणून या पुस्तकाकडे पाहिले जाते. श्री अय्यर यांनी इंग्रजीत स्वत:च प्रकाशित केलेली ही कादंबरी गाजली. त्यात नावे बदलून येणारी भ्रष्ट यंत्रणा आणि तिची ‘कार्यप्रणाली’ वाचकांना आपल्या खऱ्या भवतालाची ओळख करून देणारी वाटली. राजकीय थरारक रहस्यकथेसारखी ती वाचली जात आहे.

परम मित्र पब्लिकेशन्स

meenagurjar1945@gmail.com

बाजारात दाखल

पुटिंग विमेन फस्र्ट

(ग्रामीण भागातील स्त्रिया आणि त्यांचे आरोग्य)

राणी बंग, सुनंदा खोरगडे, रूपा चिनाय

अनु- सुनंदा अमरापूरकर,

पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

भारताचा अशांत शेजार

चीन आणि अफ-पाक

ब्रिगेडियर (निवृत्त) आर. आर. पळसोकर

संपादन- मधुकर पिंगळे

सुनिधी पब्लिशर्स

शिकता शिकता

नीलेश निमकर

समकालीन प्रकाशन

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi books peru by author g a kulkarni and ushira uthanar phulpakharu by author shriniwas kulkarni zws
First published on: 01-01-2023 at 01:01 IST