निबंध-वैभव

केळूसकरांच्या लेखनाची सुरुवात झाली ती एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात.

Shivram Mahadev Paranjape
शिवराम महादेव परांजपे

अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- शिवराम महादेव परांजपे!

मागील लेखात आपण कृष्णराव अर्जुन केळूसकर यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. केळूसकरांच्या लेखनाची सुरुवात झाली ती एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात. याच दशकाच्या उत्तरार्धात लेखनाला सुरुवात होऊन विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ज्यांच्या लेखनाला बहर आला अशांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे- शिवराम महादेव परांजपे. १८९८ साली त्यांनी ‘काळ’ हे साप्ताहिक पत्र सुरू केले. हे चार पृष्ठांचे पत्र दर शुक्रवारी प्रकाशित होत असे आणि त्यातील सारे लेखन परांजपे हेच करत असत. ‘काळ’च्या सुरुवातीच्या अंकात परांजपे लिहितात,

‘‘इतिहासाच्या साधनानें काळाच्या उगमाकडे आणि ज्योति:शास्त्राच्या साधनानें काळाच्या मुखाकडे जाण्याविषयीं मनुष्याचे सतत प्रयत्न चालले आहेत; पण त्यांना कितीसें यश आलें आहे? उपलब्ध साधनांपैकीं अतिशय प्राचीन असे जे वेद त्यांच्या कालमानाविषयींच्या वादाच्या भानगडींत न पडतां स्थूलमानानें वेद सहा हजार वर्षांचे जुने आहेत असें कांहींच्या मताप्रमाणें घटकाभर मानलें- तरी काय? सहा हजार वर्षांपासूनच काळाला सुरुवात झाली असें त्यावरून कोणाला म्हणतां येणार आहे? किंवा आजपासून पुढे सहा हजार वर्षांनीं ग्रहांची स्थिति अमुक अमुक होईल, त्यांचीं अमुक अमुक फळें येतील, हें जरी कळलें तरी काय? त्या मुदतीच्या पुढें काळाची गति खुंटणार असें कोणा ज्योतिषाला सांगतां येणार आहे? सारांश, परमेश्वराप्रमाणेंच काळ हा आद्यान्तरहित आहे आणि आदि व अन्त ह्य़ांनीं विरहित हा काळ असल्यामुळें परंपरेनें ह्य़ाच्याहि अंगांत पुष्कळ विलक्षण शक्तींचा समावेश झालेला आहे. परमेश्वर हें सगळ्यांचे मुख्य कारण आहे आणि काळ उपाधीभूत आहे. काळ हा जसा अनादि आणि अनंत आहे तसाच तो सर्व ठिकाणीं आणि सर्व वेळीं असतो. म्हणून जगांत आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी घडून आल्या त्या त्या सर्व काळानें पाहिल्या आहेत व ह्य़ापुढें ज्या ज्या गोष्टी घडून येणार असतील त्याहि सर्व काळाला पाहावयाला सांपडतील. अशा प्रकारचें काळाचे भव्य, उदात्त, गंभीर आणि अतक्र्य स्वरूप लक्षांत आणलें म्हणजे कांहीं कांहीं तत्त्ववेत्ते काळ हें निराळें द्रव्य न मानतां त्याचें परमेश्वराशीं तादात्म्य मानितात तें किती यथार्थ आहे, हें चांगलें लक्षांत येईल. आणि त्याच तत्त्वाला अनुसरून थोडय़ाशा लाक्षणिक रीतीनें बोलावयाचें म्हटलें, तर आजपर्यंतच्या सर्व अनंत गोष्टी काळानें केलेल्या आणि पाहिलेल्या आहेत असें म्हणण्याला हरकत नाहीं.. वास्तविक पाहतां उत्पत्ति, स्थिति आणि लय या तिन्हीला हाच (काळ) कारणीभूत आहे. अशा दृष्टीनें पाहिलें असतां ब्रह्मा, विष्णु आणि शिव ह्य़ा तिन्ही देवतांचा हा एकवटलेला अवतार आहे. वास्तविक हा त्रिमूर्तिमय असून कधीं कधीं फक्त शिवाची आणि त्याची एकरूपता आहे असें वर्णन करण्यांत येतें. पण हें भ्रममूलक आहे. दूरदर्शी राजकारणी पुरुषांप्रमाणें यानें पुढें काय काय गोष्टी करावयाच्या तेंसुद्धां सर्व ठरवून टाकलें आहे. कोणतें निरुपयोगी म्हणून पाडून टाकायचें आणि कोणतें नवीन बांधावयाचें, कोणत्या रानांतील जागा रानें लावण्यासाठीं मोकळी करून द्यावयाची आणि कोणत्या रानांतील जागा साफ करवून नवीन शहरें वसवावयाचीं, कोणत्या राजांना तक्तावरून खाली ओढावयाचें आणि कोणाला नेऊन तेथे बसवावयाचें, कोणत्या लोकांच्या गळ्यांत विजयश्रीकडून माळा घालावयाच्या आणि कोणाच्या पायांत गुलामगिरीच्या बेडय़ा अडकवावयाच्या, हें सर्व यानें कायम करून ठेविलें आहे.. अशा प्रकारची व्यापक कल्पना काळ हा शब्द उच्चारला म्हणजे मनांत येते, – आणि हाच काळ या शब्दाचा मूळचा अर्थ. पण शब्दांच्या अर्थाची मर्यादा प्रसंगविशेषीं कमी किंवा जास्ती होत असते. इंग्रजींत ‘टाइम्स’ हा शब्द कांहीं विवक्षित पत्राचें नांव म्हणून उपयोगांत आणलेला आढळतो. मूळचा ‘काळ’ आणि ‘टाइम्स’ या दोन्ही शब्दांचा अर्थ जवळजवळ एकच आहे. परंतु ‘टाइम्स’ या शब्दाच्या अर्थविस्ताराला मर्यादित करून ज्याप्रमाणे वर्तमानपत्राच्या नांवासाठीं त्याचा उपयोग इंग्रजींत केलेला आहे, त्याचप्रमाणें ‘काळ’ या शब्दाचा अर्थ संकुचित करून वर्तमानपत्राच्या नांवासाठी त्याचा मराठींत उपयोग करण्यास कांहीं हरकत आहे असें नाहीं.’’

लोकांना गुलामगिरीची जाणीव करून देऊन त्यांच्यात स्वातंत्र्याची आकांक्षा उत्पन्न करणे हे ‘काळ’चे जणू उद्दिष्ट होते. हे करताना परांजपेंनी चातुर्याने उपहास व उपरोधपर शैलीचा वापर केला. पुढे १९०८ साली परांजपेंवर राजद्रोहाचा खटला होऊन ते तुरुंगात गेले आणि ‘काळ’ बंद पडले. या दशकभरात परांजपेंनी सुमारे एक हजार लहान-मोठे लेख त्यात लिहिले. त्यातील निवडक लेखांचे ‘काळातील निवडक निबंध’ या शीर्षकाने दहा खंडांत प्रकाशित झाले. ते आपण आवर्जून वाचावेत.

७ सप्टेंबर १९०६ च्या ‘काळ’च्या अंकात परांजपेंनी ‘सह्य़ाद्रीच्या तावडींत सांपडलेली कल्पनाशक्ति’ या शीर्षकाचा अग्रलेख लिहिला होता. त्यात सुरुवातीलाच- ‘हा पर्वत परमेश्वरानें हिंदुस्थानला हिंदुस्थानच्या स्वतंत्रतेकरितां दिला आहे,’ असे सांगून परांजपेंनी पुढे लिहिले आहे-

‘‘..हिंदुस्थानांत स्वदेशद्रोही लोक आहेत. आणि त्यामुळें सह्य़ाद्रीसारख्या भिंतीचीही उंची ठेंगणी झाली आहे, आणि मजबुती कमकुवत होऊन गेली आहे. तरी पण परमेश्वराचे हेतु सर्वथैव विपरीत कधींहीं होऊ शकणार नाहींत. जो स्वतंत्रतेचा पर्वत म्हणून परमेश्वरानें निर्माण केला, त्यानें हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासांत नुकतीच एकदां स्वतंत्रतेची कामगिरी बजाविलेली आहे. शिवाजीमहाराजाचे मावळे हे याच पर्वताच्या पोटामधून बाहेर पडले, आणि यांच्याच वंशजांनीं स्वतंत्रतेचे झेंडे चंदीचंदावरपासून अटकेच्या अटकेपर्यंत नाचविले. ज्याच्या पोटांत असली प्रजोत्पत्ति करण्याचें सामर्थ्य आहे त्याच्या पोटांतून फिरूनही कदाचित् तसलीच प्रजा निर्माण होणार नाहीं म्हणून कशावरून? परमेश्वराची लीला अगाध आहे!

या स्वतंत्रतेच्या पर्वताला आपल्या सभोंवतालची स्थिति पाहून खात्रीनें अतिशय वाईट वाटत असलें पाहिजे. प्रतापगड, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड वगैरे ठिकाणचें पूर्वकालीन राजांचें वैभव आणि स्वतंत्रतेचें सामर्थ्य नाशाप्रत गेलेलें पाहून यांचीं उंच उंच शिखरें अतिशय खिन्न होतात, आणि झऱ्यांच्या विशुद्ध पाण्याच्या रूपानें त्यांच्या डोळ्यांतील अश्रु टपटप खालीं गळत असलेले प्रवासी लोकांच्या नेहमीं नजरेस पडतात! मी स्वतंत्रतेचा पर्वत; परंतु हल्लीं मी परतंत्रतेंत आहे, असें पाहून वणव्याच्या रूपानें या पर्वताचें ह्रदय जळत असतें. आणि स्वतंत्रतेच्या दरवाजावरील आपल्या रखवालदाराचा कांहीं उपयोग झाला नाहीं ही गोष्ट मनांत आणून तो पर्वत सोसाटय़ानें वाहणाऱ्या वाऱ्याच्या मिषानें रात्रंदिवस दु:खाचे दीर्घ श्वास टाकीत असतो. तो आपल्यावरील दगडांना आणि कंटकांना म्हणतो कीं, ‘‘हें दगडांनो, दुष्ट लोक दुसरीकडे, आणि तुम्ही येथें पडून काय करतां? हे कंटकांनो, कांटय़ानें कांटा काढावा म्हणून ज्या तुमची उत्पत्ति, ते तुम्ही येथें निरुद्योगी काय बसलां?’’ अशा अनेक रीतींनीं हा स्वतंत्रतेचा पर्वत गेलेल्या स्वतंत्रतेबद्दल विलाप करीत असतो!’’

‘काळ’ बंद पडल्यानंतर पुढे दशकभर परांजपेंनी प्रत्यक्ष राजकीय चळवळीत भाग न घेता साहित्यविषयक लेखन केले. मात्र १९२० मध्ये असहकाराच्या चळवळीत ते सहभागी झाले. त्याच वर्षी त्यांनी ‘स्वराज्य’ हे साप्ताहिकही सुरू केले, मात्र त्यास ‘काळ’सारखी लोकप्रियता लाभली नाही.

साहित्याच्या विविध प्रकारांत परांजपेंनी लेखन केले. ‘गोविंदाची गोष्ट’ व ‘विंध्याचल’ या दोन कादंबऱ्या; ‘संगीत कादंबरी’, ‘मानाजीराव’, ‘रामदेवराव’ आदी नऊ नाटके आणि ‘तर्कभाषा’, ‘तर्कसंग्रहदीपिका’, ‘पूर्वमीमांसेवरील अर्थसंग्रह’ आदी संस्कृत ग्रंथांवर आधारित पुस्तकेही त्यांनी लिहिली. १९२८ साली त्यांनी ‘मराठय़ांच्या लढायांचा इतिहास’ हे पुस्तक लिहिले. १८०२ ते १८१८ या काळात झालेल्या चौदा लढायांवरील विवेचनात्मक लेखांचे हे पुस्तक अलीकडेच पुनर्मुद्रित झाले आहे, ते आपण अवश्य वाचावे.

कादंबरीकार ना. सी. फडके यांनी १९२६ साली सुरू केलेल्या ‘रत्नाकर’ या नियतकालिकातही परांजपेंनी लेखन केले. ‘रत्नाकर’मध्ये त्यांनी चित्र-शिल्पकला व कलाविषयक समीक्षा यांविषयी लिहिलेल्या लेखातील हा उतारा पाहा-

‘‘..पौराणिक काळापासून आपल्यांत चालत आलेली जी आपली चित्रकलेची परंपरा तीं जुनीं देवळें, जुने राजवाडे, जुन्या गृहांतील लेणीं वगैरे ठिकाणांमधून अजूनहि आपल्या दृष्टोत्पत्तीस येते. प्राचीन काळीं लोक जेव्हां गुहांमधूनच राहात असत तेव्हां त्यांनीं त्या गुहांतील लेण्यांमधून जीं चित्रांची आणि मूर्तीचीं कामें करून ठेवलेलीं आहेत तीं खरोखर आश्चर्यकारक आहेत. देवतांच्या मूर्ति आणि देवतांचीं मंदिरें यांच्या द्वारानें आपल्या धार्मिक भावनांनींहि आपल्या शिल्पशास्त्रांच्या प्रगतीला पुष्कळ साहाय्य केलेलें आहे. बौद्ध, जैन, मुसलमान वगैरे आर्यधर्माहून भिन्न अशा धर्माचे लोक जरी हिंदुस्थानांत उत्पन्न झाले, तरी शिल्पशास्त्राच्या आणि चित्रकलेच्या बाबतींत सगळ्यांचा धर्म एकच होता. उत्तर हिंदुस्थानांत आर्य संस्कृतीच्या योगानें या कलांना ज्या वेळीं उत्तेजन मिळत होतें, त्याच सुमाराला दक्षिण हिंदुस्थानांत द्राविडी संस्कृतीच्या जोरावर शिल्पशास्त्रांतील अत्यंत अद्भुत व आश्चर्यकारक अशा मूर्तीच्या आणि मंदिरांच्या प्रचंड कल्पना मूर्त स्वरूपामध्यें आणण्यात येत होत्या. अशा रीतीनें ज्या कला आपल्यामध्यें उन्नतावस्थेला जाऊन पोंहोचलेल्या आहेत, त्यांतील रहस्याचा आस्वाद घेण्याची योग्यता आपल्यामध्यें उत्पन्न होण्यासाठीं, या चित्रकलेवरील, आणि शिल्पकलेवरील टीकेच्या शास्त्राची आपल्याला आजकाल फार आवश्यकता आहे. काव्य-नाटकादिकांवर जशा टीका केल्या जातात, तशा निरनिराळ्या चित्रांतील गुणदोषांचें आविष्करण करणाऱ्या टीका लिहिल्या गेल्या, तर त्यांपासून चित्रकलेचा तर फायदा होईलच होईल, पण त्यांपासून हल्लींच्या आपल्या ललितवाङ्मयामध्येंहि एका नवीन विषयाची भर पडल्यासारखें होईल. चित्रांची काव्यांइतकीच मोठी योग्यता असते; आणि चित्रकार हे एक प्रकारचे कविच असतात. कवीची कल्पकता चित्रकाराच्या मनांत असल्यावांचून त्याचें चित्र चांगलें वठावयाचें नाहीं. कल्पनेच्या अत्युच्च भराऱ्या या कवि आणि चित्रकार या दोघांनाहि सारख्याच अवगत असतात व या दृष्टीनें बोलावयाचें झाल्यास, कवि हा एक चांगला चित्रकार असतो आणि चित्रकार हा एक चांगला कवि असतो.. सारांश, चित्र ही एक कविताच आहे, आणि त्या कवितेंतील काव्य हे एखादें सामान्य काव्य नसून तें ध्वनिकाव्य आहे. त्या चित्रस्वरूपी काव्यामध्यें सजीव मनुष्याच्या मनांतल्याप्रमाणेंच सुखदु:ख, कामक्रोध, वगैरे नाना प्रकारचे मनोविकार अनुच्चारित स्थितीमध्यें भरून राहिलेले असतात. त्यांचें उद्घाटन करण्याकरितां टीकाशास्त्राची फार आवश्यकता आहे. आपल्या मुक्या प्राण्याचे मनोविकार कोणी बोलका प्राणी जगापुढें बोलून दाखविल काय म्हणून हीं सगळीं चित्रें वाट पहात बसलेलीं असतात. त्यांची आकांक्षा तृप्त करणें हें प्रत्येक सह्रदय प्रेक्षकाचें कर्तव्यकर्म आहे. शिवाय या चित्रांतून जसे काहीं गुण असतात तसे त्यांच्यांत कांहीं दोषहि अंतर्भूत झालेले असतात. ते दोष टीकेच्या रूपानें दाखविले गेले असतां दुसऱ्या चित्रांतून तसले दोष उत्पन्न होण्याचा संभव उरणार नाहीं. म्हणून मानसशास्त्राचा आणि मनुष्यस्वभावाचा ज्यांना पूर्ण परिचय झाला आहे अशा मर्मज्ञ लोकांकडून तें टीकेचें कार्य झालें, तर तें मार्गदर्शक झाल्यावांचून राहणार नाहीं.’’

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बहरू लागलेला मराठी लघुनिबंध खरे तर परांजपे यांच्या गंभीर, ललित लेखांमुळे आकारास आला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मराठी लघुनिबंधांची ही पाश्र्वभूमी समजून घ्यायची तर तब्बल तीन दशकभरांतील परांजपेंचे निबंध-वैभव वाचावयास हवे.

संकलन प्रसाद हावळे – prasad.havale@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivram mahadev paranjape role in marathi language development

ताज्या बातम्या