संजय मोने

आपल्या देशात राजकीय पक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नाना पक्ष आणि त्यांचे नेते यांची वीण फोफावते आहे. विविध जाती-धर्माच्या लोकांना आटोक्यात ठेवण्यासाठी नेते अत्यंत आवश्यक असतात, हे आता सगळ्यांनाच पटत चाललं आहे. त्यातून पूर्वीचे बरेच मातब्बर नेते आता थकले आहेत. शिवाय सत्ता हातातून गेली की नेत्यांना जास्तच थकवा येतो. परत सत्ता बदलली की आधीच्या नेत्यांच्या नशिबात कोर्ट खटले, त्यांच्या सत्ताकाळात त्यांच्या खात्याने घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दल शंका-कुशंका, त्यातून निष्पन्न होणाऱ्या आíथक घोटाळ्यांच्या मालिका, त्यामुळे करायला लागणाऱ्या कोर्टकचेऱ्या, याहून अधिक दुर्दैवी असलेल्या नेत्यांना घडणारी तुरुंगाची वारी या सगळ्या गोष्टी घडू लागतात. कालपरवापर्यंत त्यांच्या आसपास असणारे ‘निष्ठावंत’ साथ सोडून दुसरा घरोबा करतात. सत्ताकाळात कुठे बाहेर पडलं की मिळणारे सलाम, मुजरे कमी होऊ लागतात. इतकं सगळं होतं तरीही नेत्यांची संख्या काही कमी होत नाही. याचा साधा अर्थ इतकाच, की या सगळ्या व्यापांत काहीतरी फायदा नक्कीच आहे. कोणताही व्यवसाय जसा कधी चढतो किंवा कधी कधी पडतो, पण खरा ‘धंदेवाला’ तो करायचं सोडत नाही. उलट, पुढे कधीतरी बरे दिवस नक्की येतील, या आशेवर तो जगत राहतो, तसे आजकाल अनेक नेत्यांचे झाले आहे. याचाच अर्थ- आज राजकारण हा एक ‘धंदा’ झाला आहे. बाकी म्हणायला जरी ते ‘असिधाराव्रत’ वगैरे असलं तरी तसं ते बिलकूल नाहीये. (या देशातल्या किती नेत्यांना ‘असिधाराव्रत’चा अर्थ माहीत असेल?)

आपण कायम एक ओरड नेहमीच ऐकतो- ‘मराठी माणूस धंदा करायला घाबरतो’! पण राजकारणाचा हा धंदा तसा करायला सोपा आणि कठीणही आहे. एकदा का त्यात जम बसला की पुढे फारसं काही करावं लागत नाही. मात्र, त्यात जम बसवणं तसं कर्मकठीण असतं. शिवाय दर पाच वर्षांनी निवडणुका आल्या की पुन्हा या धंद्याचे जमाखर्च नव्याने मांडावे लागतात. असं सगळं असलं तरीही राजकारणी व्हायचं असेल तर काय काय करावं लागतं, ते बघू या.

या धंद्यात दोन गोष्टी आहेत.. तुमच्या घरात आधीच हा धंदा परंपरेने चालत आलेला असेल तर तुम्हाला फारसे कष्ट करावे लागत नाहीत. नव्याने सुरुवात करायची असल्यास मात्र ‘मूलगामी’ तयारी करावी लागते. (मी राजकीय विचारवंतांकडून हा शब्द उसना घेतलेला आहे. पण गरज संपली की तो साभार परत केला जाईल.)

शाळा आणि महाविद्यालयांत जाऊन शिक्षण घेण्याबरोबरच त्याचा उपयोग सध्या  राजकारणासाठीही केला जातो, हे प्रथम लक्षात घ्या. तेव्हा राजकारणात यायचे असेल तर पुढील सर्व गोष्टी जमायलाच हव्यात.

१) महाविद्यालयातील निवडणुका लढवा आणि आजूबाजूला गर्दी जमवायला शिका. त्यासाठी हल्ली पसे खर्च करावे लागतात. पण ते भांडवल समजा. आणि जर का तुम्हाला हा धंदा जमलाच, तर पुढेमागे ते दसपटीने वसूल करता येईल, हे हजार टक्के सत्य आहे.

२) तुमच्यापेक्षा वरच्या पातळीवरील नेत्याकडे सतत राबता ठेवा. ते म्हणतील ती प्रत्येक गोष्ट अमलात आणा. त्यासाठी काही वेळा दाम आणि दंड वापरावा लागेल. पण काळजी नको. त्याचे परिणाम तो नेता बघून घेईल.

३) पुढे जाऊन त्या नेत्याचा आपल्याला काटा काढायचा आहे, हे कायम लक्षात ठेवा. काटा काढायचा म्हणजे त्याला अस्तित्वहीन करून टाकायचं. कारण कुठल्याही नेत्याला- लोक आपल्याला विसरले, ही भावना मृत्यूपेक्षाही भयानक वाटते.

४) ‘निष्ठा’ ही गोष्ट नेहमी तात्पुरती असते हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे ती बदलली म्हणून कोणीही तुम्हाला व्यभिचारी म्हणणार नाही. असल्या व्यभिचाराला राजकारणात ‘दूरदृष्टी’ म्हणतात.

५) तुमच्या विभागातल्या काही वरिष्ठ, पण निरुपयोगी माणसांना आशीर्वाद हवा म्हणून अधूनमधून भेटत जा. जशी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तसेच या माणसांच्या आशीर्वादाने तुम्हाला काहीही फरक पडणार नाही.

६) तुमच्या मतदारसंघात ठिकठिकाणी बेकायदेशीर विक्रेत्यांची संख्या सतत वाढती ठेवा. तुमच्या आसपासच्या कार्यकर्त्यांचा पोटाचा प्रश्न त्यांच्यामुळे सुटतो आणि तुमचा खिसाही सुरक्षित राहतो.

७) वेगवेगळ्या उत्सवांना आणि त्यानिमित्ताने मंडप बांधायला अप्रत्यक्षपणे पाठिंबा द्या.

८) उन्हातान्हाची पर्वा न करता आपल्या विभागात फिरत राहा. मात्र, गाडी वातानुकूलित असेल याची काळजी घ्या. गाडीत नेहमी पाच-सहा थंड, बर्फाळ पाण्याच्या बाटल्या बाळगा आणि अशी फेरी मारताना रस्त्यावर उभे राहिलेल्या पोलिसांना त्या द्या. या समाजसेवेचीही बातमी करणारे पत्रकार तुमच्या सुदैवाने आज अस्तित्वात आहेत.

९) काही पत्रकार पदरी ठेवा. त्यांच्याशी सलगीत बोला. तुम्ही त्यांना बाळगले आहे याचा सुगावा त्यांना लागता कामा नये. त्यांना थेटपणे भेटी देऊ नका; मात्र त्यांची मुलंबाळं, आई-वडील यांना अधूनमधून काहीतरी देत राहा.

१०) पुढच्या दरवाजाने कायम पुरोगामी असल्याचे दाखवत चला; मात्र मागच्या दरवाजाने प्रतिगामी लोकांना चुचकारत ठेवा.

११) अंधश्रद्धेच्या विरोधात कायम हिरीरीने मत मांडा; पण वारीबिरीला अर्थसाहाय्यही करा.

१२) तुमच्या आसपास होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारांत तुमचा हिस्सा ठेवायला विसरू नका.

१३) नेतेपदाकडे मार्गक्रमणा करताना तुमच्यासमोर एखाद्या मोठय़ा नेत्याने कितीही फडतूस विनोद केला तरी त्यावर खदाखदा हसायची सवय स्वत:ला जडवून घ्या. मात्र, आपण स्वत: नेते झाल्यावर बकवास विनोद करायची उबळ दाबून ठेवा. ते नाहीच जमलं तर आसपास खदखदा हसणारे कार्यकत्रे जमवून ठेवा. (याची फारशी गरज पडणार नाही, कारण त्या कार्यकर्त्यांत एखादा भावी नेता असेल तर तो तुमच्या विनोदावर हसेलच.)

१४) कलावंत आणि लेखकबिखक मंडळींशी अगदी सुरुवातीपासून तुमचे अत्यंत चांगले संबंध असल्याचे दाखवून द्या. मनोरंजनासाठी ते तुम्हाला उपयोगी येतील. शिवाय जर चुकूनमाकून सत्ता हातातून निसटलीच, तर जो मोकळा वेळ उरतो, तो या लोकांच्या संगतीत मजेत जाईल.

१५) आपण ज्या जातीचे असाल त्या जातीच्या लोकांबद्दल आपल्याला कायम कळवळा आहे हे दाखवून देणारी वक्तव्ये करत राहा. मात्र, तुमच्या आजूबाजूला इतर वेळी कायम बिल्डर, उद्योगपती यांचाच घोळका गोळा करा.

१६) आपण घरी मागच्या दोन पिढय़ांत तुळशीचेसुद्धा रोप जरी लावले नसले तरी शेती या विषयावर सतत टीका करीत राहा. (सत्तेत नसाल तर!) अन्यथा शेतीच्या आपल्या राज्यातील प्रगतीबद्दलचे आकडे मीडियाच्या मदतीने सतत लोकांसमोर फेकत राहा.

१७) आपल्याला ज्या विषयांत कळत नाही त्या विषयांवर सर्वात जास्त जोरात मते मांडत जा. सत्तेत असाल तर तुमच्या विधानांनी तुमचे सत्ताप्रमुख अडचणीत येतील. त्यांचा मार्ग अधिकाधिक बिकट कसा होईल, हेही तुम्हाला पाहिले पाहिजेच.

१८) विरोधक असाल तर सतत नवीन कुरापती काढून वातावरण संभ्रमित करा. सत्तेत असाल तर तुमची जागा अजून वरची होईल यासाठी वाटेत येणाऱ्या स्वपक्षीयांना नेस्तनाबूत करा.

१९) शक्य असेल तर आहात त्या पक्षातून बाहेर पडून स्वत:चा एखादा पक्ष स्थापन करा. मात्र, तो कधीही विलीन करता येईल अशा तयारीत राहा. त्यासाठी तुमच्या विचारांना किंवा कृतींना कितीही कोलांटउडय़ा मारायला लागल्या तरीही विचलित होऊ नका.

२०) तुमच्याविरुद्ध कोणीही काहीही टीका केली तरी, किंवा तुम्हाला कुणी एखादे खुले पत्रबित्र लिहिले तरी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका. लिहिणारा पुढे तीन दिवस मिळणारी प्रसिद्धी डोळ्यासमोर ठेवून किंवा लेखाबद्दल मिळणारा मोबदला डोळ्यासमोर ठेवून लिहितो, हे ध्यानात ठेवा. आणि अगदी वाटलंच तर तुमच्या पदरी असलेले धुरंधर बुद्धिवादी मग कधी कामाला येणार? त्यांना परस्पर त्या लेखाला किंवा पत्राला उत्तर द्यायला सांगा.

हा जरी वीस कलमी कार्यक्रम असला, तरी त्यात कसलीही सक्ती नाही. तुम्हाला झेपत असेल तर तो अमलात आणा.

आणि जाता जाता.. आज आपण ज्यांना फार मानत नाही अशा सगळ्या महान नेत्यांनी आयुष्यात कधी ना कधी तरी कुणाला ना कुणाला तरी त्यांच्या वेळेची पर्वा न करता मदत केलेली होती. त्यावेळी कुठलाही विचार किंवा पुढेमागे मिळणारा फायदा वगरे त्यांच्या मनात नव्हता. आपण ‘आपल्यावर नाही ना आला प्रसंग? मग आपण बरं की आपलं घर बरं!’ असं म्हणून दरवाजा बंद करून घेतो. हे सगळे महान नेते त्या- त्या प्रसंगांत कुणाचीही फिकीर न बाळगता त्या प्रसंगांना निधडय़ा छातीने सामोरे गेले होते.

sanjaydmone21@gmail.com