हा मराठी विज्ञानलेखनातील एक नावीन्यपूर्ण आणि अभिनव म्हणावा असा प्रयोग आहे. वैज्ञानिक माहिती आणि संकल्पना ओव्यांच्या स्वरूपात विशद करून सांगण्याचा प्रयत्न करून डॉ. पंडित विद्यासागर यांनी विज्ञानलेखन सुबोध आणि रंजक करायचा प्रयत्न केला आहे. यात एकंदर ९२ प्रकरणे असून त्यातून जवळपास ८० वैज्ञानिकांची आणि त्यांच्या संकल्पनांची ओळख करून दिली आहे. पायथागोरस, आर्किमिडिज, लिओनार्दो दी विंची, कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, लुई पाश्चर, आल्फ्रेड नोबेल, रॉबर्ट कॉख अशा पाश्चात्त्य आणि रामानुजन, सी. व्ही. राम, सत्येंद्रनाथ बोस, बिरबल सहानी, जगदीशचंद्र बोस, जयंत नारळीकर अशा भारतीय वैज्ञानिकांचा आणि त्यांचा कामाचा परिचय विद्यासागर यांनी ओवी आणि स्पष्टीकरण या स्वरूपात करून दिला आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे. वैज्ञानिक माहिती व संकल्पनांविषयीचे लेखन हे काहीसे दुबरेध होते. तो प्रकार या पुस्तकात फारसा झालेला नाही. त्यामुळे यातील ओव्यांची गुणवत्ता काय टक्केवारीची आहे, यापेक्षा हा वेगळा प्रयोग म्हणून कसा आहे, या दृष्टीने या पुस्तकाकडे पाहायला हवे. अशा प्रकारचे प्रयत्न सतत होत राहिले तर विज्ञानविषयक लेखन जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास, त्यांना त्यात रुची निर्माण होण्यास मदत होईल.
‘ओवी गाऊ विज्ञानाची’ – डॉ. पंडित विद्यासागर, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, पृष्ठे – २२१, मूल्य – ३९५ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतीसाठी दाही दिशा
सातारा जिल्ह्य़ातील शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर करू पाहणारे, त्यासाठी जगभरच्या शेतीचे प्रकार समजून घेणारे राजेंद्र सरकाळे यांचे हे पुस्तक जगातील शेतीच्या आधुनिक तंत्राची ओळख करून देते. युरोपसह जगातील २५ देशांचा दौरा करून तेथील शेती व्यवसाय त्यांनी समजावून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. यात आकडेवारी, कोष्टके यांची संख्या थोडी जास्त झाली असली तरी या लेखनाला प्रत्यक्ष अनुभवाचा आधार आहे. या पुस्तकात एकंदर १२ प्रकरणे आहेत. इतर देशांतील शेतीबद्दल सांगायला सुरुवात होते ती चौथ्या प्रकरणात आणि तीही अर्थातच इस्रायलपासून. त्यानंतर चीन, ऑस्ट्रेलिया, जपान-न्यूझीलंड, युरोपीय देश, सिंगापूर, ओमान, दुबई, जॉर्डन, मलेशिया यांचा समावेश आहे. या पुस्तकातून या देशांतील शेतीतंत्राची तोंडओळख होते. ती कृषिशास्त्राचे अभ्यासक, शेतकरी यांच्यासाठी महत्त्वाची आहे.
‘कृषीसंजीवनी’ – डॉ. राजेंद्र सरकाळे, सरकाळे मित्रपरिवार, सातारा, पृष्ठे – २३६, मूल्य – ३५० रुपये.

अर्निबधतेला लगाम कायद्याचा
या पुस्तकाचे उपशीर्षक आहे ‘माहिती अधिकाराची विजयगाथा’. माहिती अधिकाराचा कायदा आधी महाराष्ट्रात आणि नंतर देशात सर्वत्र लागू झाला. त्यानंतर या कायद्याचा वापर करून सरकार आणि प्रशासन यांना चांगल्या गोष्टींसाठी धारेवर धरणं पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना शक्य होऊ लागलं. त्यामुळे काही अर्निबध गोष्टींना पायबंद बसायला सुरुवात झाली. पत्रकार विनिता देशमुख यांनी पुणे शहरातून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बेकायदा पद्धतीने अधिक जमीन बळकावण्याचा केलेला प्रयत्न आणि डाऊ या कंपनीची लबाडी, या दोन्ही गोष्टी माहिती अधिकाराचा वापर करून उघड केल्या. त्यांना वाचा फोडली. परिणामी प्रतिभा पाटील यांना माघार घ्यावी लागली, तर डाऊ कंपनीनं पुण्यातून काढता पाय घेतला. पुणे जिल्ह्यातल्या या दोन्ही महत्त्वाच्या घटना आहेत. त्यांची साद्यंत हकिकत या पुस्तकात आहे.
‘सत्ता झुकली’ – विनिता देशमुख, अनुवाद- भगवान दातार, मेनका प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १५७, मूल्य – १८० रुपये.

वाचण्यासारख्या ग़ज़्ाला
या नव्या संग्रहात मनोहर रणपिसे यांच्या १०५ ग़ज़्ाला आहेत. प्रेम, विरह, विद्रोह, सामाजिक असे या ग़ज़्ालांचे विषय आहेत. ज्यांना ग़ज़्ाला आवडतात, त्यांच्यासाठी हा संग्रह एकदा चाळून, हाताळून पाहण्यासारखा आहे. या संग्रहातील ग़ज़्ाला आधीच्या संग्रहाच्या लौकिकाला साजेशा आहेत, असे रणपिसे यांनी स्वत:च म्हटले आहे, जिज्ञासूंना त्याचीही पडताळणी करून पाहता येईल.
‘निर्वाण’ – मनोहर रणपिसे, सोमनाथ प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १२७, मूल्य – १२५ रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multipal book review
First published on: 25-08-2013 at 01:01 IST