अरुंधती देवस्थळे  arundhati.deosthale@gmail.com

म्युनिकमधील इंटरनॅशनल जुगेन्द बिब्लिओथेकच्या तीन महिन्यांच्या फेलोशिपवर असताना काही वेगळी म्युझियम्स पाहायला मिळाली. म्युनिकमध्येच ३२ म्युझिअम्स आहेत. पण मिळणारं मानधन जेमतेम पुरणारं. तेव्हा चाळिशीच्या आतबाहेरल्या आम्हा सगळय़ांच्या जीवनात हॉस्टेलचा गुजरा हुआ जमाना दोबारा आलेला, म्हणून तंगीतसुद्धा मजा असायची. कुठलं म्युझियम कुठल्या दिवशी फुकट पाहता येतं यावर घारीची नजर ठेवून असायचो. असंच मॉस्को युनिव्हर्सिटीतल्या इरिनामुळे म्युनिकहून ट्रेनने दोन तासांवर असलेल्या मुरनाऊ या खेडय़ातल्या ‘मुंटर हाऊस’मध्ये असलेलं वासिली कांदिंस्की (१८६६-१९४४), गॅब्रिएला मुंटर (१८७७-१९६२) आणि ‘ब्लाऊ राईडर’ (१९११-१४) यांचं म्युझियम पाहायला मिळालं.

500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

घराला वेगळंच निळं छप्पर, दारं खिडक्यांनाही तशीच निळी चौकट. काही दारांवर, कपाटावर आणि पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या लाकडी जिन्यावरही कांदिंस्कींची प्रसन्न रेखाटनं. कांदिंस्की आणि गॅब्रिएलानं त्यांच्या या घरात चित्रकारांची गळचेपी करणाऱ्या सरकारी धोरणांच्या विरोधात फ्रान्झ मार्क, त्याची बायको मेरी, ऑगस्ट मॅके वगैरे समविचारी मित्रांबरोबर ‘ब्लाऊ राईडर’ या अल्पजीवी मंडळाची स्थापना केलेली. कागदोपत्री नऊ सदस्य, त्यात पॉल क्लेईही होते, पण धुरा फ्रान्झ आणि कांदिंस्कींवरच होती. तळमजल्यावर या मंडळाचा पत्रव्यवहार, त्यांची चित्रं आणि इतर गोष्टी इथे सांभाळून ठेवल्या आहेत. त्या दोघांनी लावलेली फुलबाग आणि व्यक्तिमत्त्वाचाच भाग असलेल्या शैलीत सजवलेलं घर बघणं हा एक वेगळाच अनुभव. ती दोघे चारचौघांसारखी नव्हतीच, चित्रांतून आध्यात्मिक आनंदाचा शोध आणि नातं प्रेम आणि द्वेषाच्या अंतर्विरोधाने धगधगतं.

वासिली कांदिंस्की यांचा जन्म १८६६ मध्ये मॉस्कोतल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला. चारचौघांसारखं कायदा आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि युनिव्हर्सिटीत हे विषय शिकवू लागले. पण मनात तीव्र अस्वस्थता;  कारण बालपणापासूनच कला आणि संगीताची ओढ होती. एकदा ते रिचर्ड वॅग्नरचा विख्यात ऑपेरा- लोहेन्ग्रीन पाहायला गेले आणि त्यांना त्या संगीतात रंग आणि रेषांचा आभास होऊ लागला. अनेक वर्षांनी झालेल्या त्यांच्या कामाच्या पुनर्मुल्यांकनात काही समीक्षकांनाही त्यांच्यातील ‘सीनेस्थीसिया’ म्हणजे दोन इंद्रियांपासून एकत्र होणाऱ्या सौंदर्यबोधाची सुरुवात वाटते. हे सूर आणि रंगांचं नातं पुढे कांदिंस्कींच्या शैलीचं वैशिष्टय़ बनणार होतं, रंगांमधून सूर छेडले जाणार होते. म्हणूनच बारकाईने बघितल्यास कांदिंस्कींच्या अनेक चित्रांची नावं संगीतातल्या शब्द आणि अभिव्यक्तीशी नातं सांगणारी दिसतात. काही चित्रांत रंगांचा उत्फुल्ल जल्लोष असतो तर काहींत अंतर्द्वद्वाचा कोलाहल. मॉनेंबद्दल अपार आदर बाळगणाऱ्या कांदिंस्कींच्या सुरुवातीच्या चित्रांत अनेक रंगांचं मिश्रण असे. मानवी मनातल्या जाणिवा आणि नेणिवांसारखं, एखाद्या सुरावटीत असलेल्या वेगवेगळय़ा सुरांसारखं. याबद्दल कांदिंस्की म्हणतात : 

Color is the keyboard, the eyes are the hammers, the soul is the piano with its many chords. The artist is the hand that, by touching this or that key, sets the soul vibrating automatically.

कांिदस्कींच्या चित्रकलेची डोळस सुरुवात तिशीच्या आतबाहेर झाली, म्हणजे जरा उशिराच. चित्रकलेच्या इतिहासात ही पिढी पोस्ट -इम्प्रेशनीस्टिक म्हणजे मॉने, मॅने, सेझाँ, गोगँनंतरची. त्यांच्या अ‍ॅब्स्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझममध्ये साधारणत: कुठली तरी एक भावना किंवा तिचं वेडंवाकडं रूप असायचं. कांदिंस्कींचं ब्रशशी फारसं जमलं नाही, पॅलेट आणि नाइफने कॅनव्हासवर संचार आवडे. ते उत्फुल्ल रंगात, पिगमेंट्सच्या मिश्रणातून कॅनव्हास, बोर्ड, लाकूड, काच, बोर्ड अशा वेगवेगळय़ा पृष्ठभागांवर चित्र काढत, माध्यम तैलरंग, जलरंग, शाई आणि पेन्सिल! शैली अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, सुरुवातीच्या काही चित्रांत भौमितिक आकार (प्रचंड गाजलेलं ‘स्क्वेअर्स विथ कॉन्सन्ट्रिक सर्कल्स’ हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण) आणि तोडमोडीचा मूड, चित्राला दिलेल्या नावांमुळे त्याच्या गाभ्याकडे जाता यावं! अनेक चित्रांना त्यांनी ‘कॉम्पोझिशन’ म्हटलं आहे. अमूर्त चित्रातून काहीतरी गहिरा, आध्यात्मिक संदेश जावा असं त्यांचं म्हणणं. कलेच्या शब्दातीत क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. गॅब्रिएलावर कांदिंस्की यांचा प्रभाव सर्वात जास्त पडला तो चित्रांच्या मुळाशी असलेल्या आध्यात्मिक प्रेरणेच्या अनुषंगाने.

म्यूनिकच्या कला विद्यालयात भेटलेली गॅब्रिएला मुन्टर ही कांदिंस्कींची मनस्वी विद्यार्थिनी, लवकरच जर्मन ‘अवां गार्द’ मूव्हमेन्टमधलं ठळक नाव ठरणारी! स्टील लाइफ, स्वत:ची किंवा कांदिंस्कींची केलेली ‘पोट्र्रेट्स’ ही सुरुवात. गॅब्रिएलाचे स्ट्रोक्स ताकदीचे, भराभर मारलेले, दाट गहिऱ्या रेषा, त्यामुळे स्पष्ट आकार धारण करणारी, एक्सप्रेशनिस्ट चित्रं. नंतरच्या काळात कधी-कधी आतल्या संघर्षांचं, हताश एकलेपणाचं समोरच्या कॅनव्हासवर उतरणं.. दाट बोलके रंग, स्वत:ची अशी घोटीव शैली.

कांिदस्की विवाहित होते, पण गॅब्रिएला तरतरीत, बुद्धिमान आणि कलेची देणगी घेऊन आलेली.. आपल्या क्षेत्रातील घडामोडींशी जोडलेली. दोन वर्ष अमेरिकेतील वास्तव्यानंतर अधिकच सजग झालेली! दोघांना एकमेकांत आयुष्यातलं प्रेम सापडलं. अतिशय उत्कट प्रेम- साहचर्यातून फुलत जाणारं आणि शेवटी वादळासारखं ध्वस्त करून जाणारं. इथे आल्प्सच्या पायथ्याशी असलेल्या छोटय़ाशा टेकडीवरच्या या तिमजली घरात कांदिंस्की आणि गॅब्रिएला पाच-सहा वर्ष राहत होते (१९०९-१५). या निसर्गसुंदर घरात एकमेकांच्या साथीने बहरत दोघांनी भरभरून चित्रं काढली. ती एके ठिकाणी म्हणते, ‘‘मी चित्र काढायला बसते तेव्हा प्रवाहात उडी घेण्यासारखं असतं, उडी घेतल्यावर काय होणार याचा अंदाज मला नसतो. पण कांिदस्कीने मला पोहायला शिकवलं. भराभर काम करत तो स्फुरलेला क्षण कसा पकडावा हे दाखवून दिलं.’’ इम्प्रेशनिस्टीक शैलीत काढलेली गॅब्रिएलाची निसर्ग चित्रं अतिशय सुंदर आहेत. ‘ब्रेकफास्ट विथ बर्डस्, ‘क्रिसमस लाइफ’, ‘मॉशी इन टय़ुनिस’, ‘विंटरलॅण्ड्स इन बव्हेरिया’ ही तिची गाजलेली चित्रं. दोघेही चित्रकार, साथसंगत कलाप्रवृत्तीच्या मित्रमैत्रिणींची, त्यांच्यासोबतीने गॅब्रिएला काचेवर सुंदर पेंटिंगही करू लागली. तिचा स्वभाव खळाळता, पारदर्शक, प्रयोगशील, स्त्रियांना कलाक्षेत्रात मान्यता मिळवणं कठीण असल्यानं स्त्रीवादी विचार.

कांिदस्कींना घटस्फोट मिळत नव्हता आणि जर्मनीत तेव्हा लिव्ह-इन नाती मंजूर नसल्याने तिच्यावर आईवडिलांसकट सर्वाचंच दडपण. पॅरिसला गेले तर दोघांना एकत्र खोली मिळायला लज्जास्पद धडपड करावी लागली होती. ती एक गुणी चित्रकार होती. ग्राफिक आर्टमध्ये आवश्यक असलेली रेखांकनावरील तिची पकड असामान्यच होती. पॅरिसमधल्या इम्प्रेशनिझमने भारलेल्या वातावरणात स्वत:ला शोधणं तिला आवडत होतं, पण कांिदस्कींना त्यापलीकडे जायची आस लागली होती, ते आपल्या तंत्र आणि शैलीशी प्रयोग करू पाहत होते. त्यांच्यातील बेबनावाला कारणं मिळत गेली.. नात्याची रयाच गेली. वैयक्तिक जीवनात झगडून स्वातंत्र्य मिळवलेल्या कांिदस्कींना कामाऐवजी या इतरच भानगडी घुसमटवू लागल्या. दोघे युरोपात खूप िहडले. पण कांिदस्कींच्या मनाचा ठाव लागत नसल्याने आयुष्यात स्थैर्य नसल्याची खंत गॅब्रिएलाने लिहून ठेवली आहे. या काळात पेटिंगशी थेट संबंध तुटल्याने जबरदस्त अपूर्णता दोघांच्या मनाला वेढून राहिली होती. पहिल्या महायुद्धाने दोघांवर काही वर्ष विभक्त राहायची वेळ आली. गॅब्रिएला नाझी राजवटीच्या विरोधात, कलेतून तिच्यापरीने खडी होणारी आणि कांिदस्की रशियन असल्याने त्यांच्यावर कायम संशयाची नजर. या सगळय़ांचा प्रचंड तणाव त्यांच्या मनावर आला. दोघांच्या १२-१३ वर्ष टिकलेल्या नात्याच्या दरम्यानचा पत्रव्यवहार पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला आहे. पत्रव्यवहारात गॅब्रिएलाला वाटणारी भावनिक असुरक्षितता, कांदिंस्कींवर येणारा संशय आणि त्यांचं या सगळय़ाला आणि प्रतिकूल परिस्थितीला वैतागणं हेही प्रेमाइतकंच स्पष्ट दिसतं. गॅब्रिएला नंतर जर्मनीत परतली, दहा वर्षांच्या घुसमटीच्या कालखंडानंतर परत चित्रांकडे वळली. जोमाने चित्र काढू लागली- ती आयुष्याच्या अखेरीपर्यंत. आयुष्याची शेवटची ३०-३१ वर्ष ती या तिच्या लाडक्या घरात राहिली. अनेक वर्षांनी कांिदस्की म्युनिकमध्ये परतलेही, पण गॅब्रिएलाला भेटायचं नाकारलं. गॅब्रिएलाने त्यांना जे शेवटचं पत्रं लिहिलं, ते ४०-४२ पानांचं होतं- कटुतेने भरलेलं. तिला अर्थातच उत्तर आलं नाही. त्या पत्रातले काही अंशही अनेक पुस्तकांच्या पानांतून फिरत राहिले. कांदिंस्कींच्या माघारी ‘ब्लू रायडर’, ‘कॉम्पोझिशन’, ‘इम्प्रोव्हिझेशन’सारख्या मालिका आणि ‘स्मॉल वल्र्ड’, ‘लिरीकल’, ‘कॉँट्रास्टींग साऊंड्स’ काही मूळ, तर काही प्रतिकृतींतून जगातल्या वेगवेगळय़ा कलासंग्रहालयांत दाखल झाल्या. घराच्या तळघरात सांभाळून ठेवलेली स्वत:ची, कांदिंस्कींची आणि ब्लाऊ रायडरच्या सदस्यांची चित्रं, नव्वद तैलचित्रं, तीनशेहून जास्त जलरंगांतील चित्रं, असंख्य स्केचेस, लिथोज आणि दोनेक हजार छायाचित्रं गॅब्रिएलाने लेबेन हाऊस आणि म्युनिकच्या कलासंग्रहालयाला दान करून टाकली, हे मात्र कलेसाठी वैयक्तिक राग-लोभापलीकडे जाणारं, दूरदृष्टी आणि मनाच्या मोठेपणाचं!