द हशतवादी पत्रकारितेनं चालवलेल्या धिंगाण्यानं अमेरिका चिंतित आहे. म्हणूनच यंदा मार्क वॉरन या पत्रकारानं लिहिलेल्या ‘एस्क्वायर मॅगझिन’मधल्या लेखाला पत्रकारितेतल्या ‘फीचर’ (वृत्तलेख-रिपोर्ताज) या गटातलं पुलित्झर बक्षीस मिळालं. या लेखाचं शीर्षक आहे Right- Wing Media and the Death of an Alabama Pastor : An American Tragedy. (उजव्या माध्यमांची अमेरिकी शोकांतिका.) लेख स्मिथ स्टेशन नावाच्या एका पाच हजार ७४० वस्तीच्या गावातल्या ‘पास्टर’वर आहे. फर्स्ट बॅप्टिस्ट चर्चमध्ये पास्टर हा धर्मोपदेशक ख्रिास्ती समुदायाला उपदेश देतो, त्यांच्या आध्यात्मिक गरजा भागवतो. चर्चच्या भाषेत बोलायचं तर तो मेंढपाळ असतो, समुदायाचा मार्गदर्शक असतो. तर अशा या बुबा कोपलॅण्ड नावाच्या धर्मोपदेशकाने आत्महत्या केली. आत्महत्या का केली? कारण ‘१८१९’ (वन एट वन नाइन) नावाच्या एका पत्रानं बुबावर क्रेग माँगर या प्रतिनिधीनं लिहिलेला एक लेख प्रसिद्ध केला. बुबाचा खासगी व्यवहार आणि सवयींचं चटकदार वर्णन या लेखात होतं. बुबा रात्री कसे स्त्रियांचा पोशाख करतो, या कपड्यात कसा स्वत:ला आरशात पाहतो, कसे फोटो काढून ठेवतो वगैरे. इकडून-तिकडून गावगप्पा गोळा करून हा लेख लिहिलेला होता. प्रतिनिधी क्रेग माँगर स्मिथ स्टेशन या गावात गेला नव्हता, तिथल्या कोणालाही भेटला नव्हता, बुबाशीही तो बोललेला नव्हता. मॅगझिनचा संपादक (मालक, प्रकाशक) ब्रायन डॉसन याला स्मिथ स्टेशन या गावाबद्दल ‘ओ’ का ‘ठो’ माहीत नव्हतं. बुबावरचा लेख छापून तो मोकळा झाला. एक नव्हे दोन लेख त्यानं छापले.
बुबा हा गावातील लोकप्रिय असामी. तो दोन वेळा आपल्या गावाचा मेयर होता. गावात त्याचं एक दुकानही होतं. दिवसाच्या कोणत्याही प्रहरात गावातलं कोणी कोणत्याही कामासाठी, गरजेसाठी त्याच्याकडं आलं तरी तो हजर असे. गावात एकदा चक्रीवादळ झालं. गावातली एक वस्ती उद्ध्वस्त झाली. दोन दिवस-रात्री बुबा घटनेच्या जागी हजर होता, ढिगाऱ्यातून प्रेतं उपसणं, जखमींना रुग्णालयामध्ये पोहोचवणं, जगलेल्यांचं सांत्वन करणं यात तो गढलेला होता. गावात अर्धे काळे आणि अर्धे गोरे होते. बुबा गोरा. बुबा काळा-गोरा पाहात नसे.
बुबाला अहम नव्हता. गावातला कोणी चांगला वक्ता असेल तर त्याला प्रवचनाला बुबा उभा करत असे, व्यासपीठ आपलीच मालमत्ता आहे, असं तो मानत नसे. एकूण सर्व समुदायांत निर्माण होणारी वादळं आणि मतभेद याही फर्स्ट बॅप्टिस्ट चर्चमधेही होत असत. गावात कर्मठ म्हातारे होते आणि उदारमतवादी तरुण होते. त्यांच्यात घनघोर वैचारिक मारामाऱ्या होत. गावात समलिंगी बरेच होते. बुबानं त्यांना प्रेमानं वागवलं, त्यांना तो प्रार्थनेत सामावून घेत असे, त्यांना उपदेश आणि आशीर्वाद देत असे. कर्मठांना ते मान्य नव्हतं. त्यांनी मोठ्या स्तरावर बुबा समलिंगींना आशीर्वाद देतो याबद्दल निषेध नोंदवला. गावात त्यावर चर्चा झाली. बुबानं शांतपणे निषेध बाजूला सारला. एकदा प्रवचनात त्यानं बायबलमधली वचनं सांगितली, त्यात देव सर्वांवर प्रेम करतो असं सांगितलं. समलिंगी संबंध निसर्गाला पसंत नसले तरी ती माणसंच आहेत, देव माणसांवर प्रेम करतो, हे बुबानं सप्रमाण प्रवचनात मांडलं.
कर्मठ गप्प बसले, पण बहुधा आतून धुसफुसत राहिले. सध्या अमेरिकाभर ट्रम्प यांच्या विचारांचा प्रभाव वाढला आहे. हा विचार समलिंगींचा आणि लिंगबदल करणाऱ्यांचा द्वेष करतो, त्यांचं अस्तित्वच असू नये असं मानतो, त्यांना मारहाण करण्याला प्रोत्साहन देतो. ‘१८१९’ हे वृत्तपत्र आणि त्याचा मालक डॉसन ट्रम्पियन विचारांचा. त्यांना बुबा आणि लिबरल विचारांना बदनाम करायचं होतं.
‘एस्क्वायर’मधील लेखासाठी पत्रकार मार्क वॉरन स्मिथ स्टेशन या गावात गेला. बुबाच्या माजी पत्नीला भेटला, बुबाच्या मुलाला भेटला. चर्चचे विश्वस्त, समुदायातले पुढारी, गावातली नामांकित माणसं यांना भेटला. त्या सर्वांचं मत गोळा करून मार्कनं लेख लिहिला. अर्थात त्यामुळं लेख मोठा, १२ हजार शब्दांचा झाला. झटपट श्राद्ध उरकणाऱ्या पत्रकारितेत दीर्घ लेखन बसत नाही. त्यामुळं ‘१८१९’ सारख्या वृत्तपत्रात अशा लेखाला स्थान नसतं. ‘एस्क्वायर’ मासिकाच्या नऊ दशकांच्या इतिहासात- ज्यात गे तलिस, नोरा एफ्रॉन, टॉम जुनोद यांसारखे दिग्गज वृत्तलेख लिहिणारे पत्रकार घडले, त्याला पहिल्यांदाच यंदा त्यातल्या अतिसंवेदनक्षम विषय हाताळणीसाठी पुलित्झर पारितोषिक मिळाले. एका बाजूला लोकांना भरकटवणारी पत्रकारिता सुरू असताना, त्यांचा बुद्धिभेद करून एखाद्याबाबत सामुदायिक रोष निर्माण केला जात असताना, केवळ सत्य आणि तथ्यांचा पाठपुरावा करणाऱ्या या लेखाच्या पुलित्झर सन्मानाचे उदाहरण म्हणूनच महत्त्वाचे.
बुबाचं सविस्तर चरित्र मार्क वॉरन यानं नोंदलं. बुबा ‘ट्रान्स’ होता. तो मनानं स्त्री, शरीरानं पुरुष होता. आपलं हे दुभंग व्यक्तिमत्त्व त्यानं आपली पत्नी, मुलगा, सासरा यांना सांगितलं होतं. समाज आपल्या ट्रान्स असण्याला स्वीकारणार नाही हे माहीत असल्यानं तो मानसिक तणाव दूर करण्यासाठी खासगीत स्त्रीचे कपडे घालत असे. बुबाचा मुलगा समलिंगी होता. बुबानं त्याचं व्यक्तिमत्त्व मान्य केलं होतं, कारण समलिंगीही माणसंच असतात, देव सर्व माणसांवर प्रेम करतो ही धारणा बुबा बाळगत होता.
पण वृत्तपत्रानं एकतर्फी चटकदार वर्णन दिलं. बुबाचं म्हणणं त्यानं दिलं नाही. बुबाच्या मुलानं वृत्तपत्राचा मालक आणि लेख लिहिणारा यांना पत्र लिहिलं, फोन करायचा प्रयत्न केला. त्यांनी दखल घेतली नाही. बुबाविषयी आधी प्रसिद्ध झालेल्या आक्रस्ताळ्या वर्णनांनी गावात बोंब झाली. बुबाला ओळखणारे आणि त्याच्यावर प्रेम करणारेही अस्वस्थ झाले. त्यांना बुबाचा राग आला नाही, पण बुबा ‘असा’ असेल असं त्यांना वाटलं नव्हतं, त्यांना धक्का बसला. स्मिथ स्टेशन चर्चच्या विश्वस्तांना फोन यायला लागले की त्यांनी बुबाला हाकलून द्यावं. त्यांनी बुबाला हाकललं नाही, पण त्यांनाही धक्का बसला होता.
वृत्तपत्राचे लोक खूश झाले. त्यांनी त्याच विषयावर आणखी एक चटकदार लेख प्रसिद्ध केला. बुबाला हे सारं असह्य झालं. त्यानं कानशिलात गोळी मारून घेतली. एस्क्वायरच्या लेखकानं शोध घेऊन या पेपराच्या वृत्तांकनामुळे बुबासमोर तयार झालेली दहशतच मांडली. त्याचं म्हणणं किती खरं आहे याची प्रचीती गेल्या १० वर्षांतल्या अमेरिकन समाजातल्या घटनांवरून येते. २०२०ची निवडणूक ट्रम्प हरले होते. निवडणूक आणि मोजणी प्रक्रिया योग्य पद्धतीनं घडली होती असं रिपब्लिकन राज्याच्याच गव्हर्नरांनी सांगितलं. पण आपण जिंकलोय, आपलं यश बायडेननी हिरावलंय असं ट्रम्प बोलत राहिले. खोट्या मतपत्रिका कशा पेटीत टाकल्या गेल्या याची रसभरीत वर्णनं करत राहिले. अमेरिकेतली कित्येक वर्तमानपत्रं, वाहिन्या त्यांची खोटी वर्णनं छापत राहिले. शेवटी दहा-वीस हजार गुंडांना ट्रम्प यांनी संसदेवर पाठवून दंगाही केला. आणि नंतर ‘त्या दंग्याशी माझा संबंधही नाही’ असं ट्रम्प म्हणून मोकळे झाले.
एका गावात मेक्सिकन लोक गोऱ्या अमेरिकन लोकांचे कुत्रे मारून खातात असं ट्रम्प म्हणाले. मेक्सिकन लोकांना बदनाम करण्यासाठी. बातमीदार त्या गावात गेले, सर्वांच्या मुलाखती घेतल्या, तसं काहीही घडत नव्हतं. पण वर्तमानपत्रं आणि वाहिन्या कुत्रे खाल्ले जातात या बातम्या छापतच राहिले.
समाजातली विविधता, समाजाची एकात्मता इत्यादी विषय विद्यापीठांनी शिकवू नयेत, असा आदेश ट्रम्प यांनीही काढला. अमेरिकेत विविध धर्माची माणसं आहेत, विविध रंगांची माणसं आहेत, विविध देशांतून आलेली माणसं आहेत, विविध लैंगिक जाणिवांची माणसं आहेत. ही विविधता हे अमेरिकेचं वैशिष्ट्यं आहे. काळ्यांना स्वीकारणं या मुद्द्यावर अमेरिकेत सिव्हिल वॉरही झेललं. ट्रम्पवादी लोकांना इतरांना सामावून घेणं मान्य नाही. म्हणून हे विषय शिकवायचेच नाही, असा आदेश ट्रम्प यांनी काढला. बहुसंख्य प्रतिष्ठित विद्यापीठांनी आदेश पाळायला नकार दिला. हार्वर्ड इत्यादी विद्यापीठांनी ट्रम्प यांचे आदेश अमेरिकन राज्यघटनेशी विसंगत आहेत हे नोंदवलं. तरीही फॉक्स न्यूज, ब्राईटबार्ट, सोशल ट्रूथ आणि कित्येक उजवी दहशतवादी वृत्तपत्रे हार्वर्डला बदनाम करण्यात गुंतलेले आहेत.
खोटं बोलणं, फेक न्यूज तयार करणं, फेक व्हिडीओ तयार करणं, इंटरनेट, सेलफोन, सोशल मीडिया, वृत्त वाहिन्यांतून खोटा, द्वेषमूलक, हिंसक मजकूर पसरवणं यांची अमेरिकेत लाटच आलीय. आणि भारतात काय वेगळं चाललंय?
पहलगाम घटनेनंतर भारतीय माध्यमं, वृत्तमाध्यमं आणि वाहिन्याच युद्ध खेळत आहेत. पदार्थ खाण्यायोग्य व्हावा म्हणून मीठमसाला लावणं समजू शकतो. पण पदार्थात ९८ टक्के मीठमसाला असेल तर खाणाऱ्याचं काय होईल?
पाकिस्तानचं दहा युनिट नुकसान झालं असेल तर भारतीय माध्यमं ते १०० युनिट झाल्याचं दाखवत आहेत. भारताचं नुकसान झालंच नाही; १० युनिट नुकसान झालं असेल तर जेमतेम एखाद युनिट झालंय असं सांगत आहेत. हरी नारायण आपटेंनाही लाज वाटेल इतकी रसभरीत नाटकं आणि कादंबऱ्या भारतातली माध्यमं पत्रकारितेच्या नावावर खपवत आहेत. जुन्या कुठल्या तरी युद्धांची, कुठल्या तरी तिसऱ्याच ठिकाणी झालेल्या युद्धांची दृश्यं, एआयच्या मदतीनं ‘मॉर्फ’ करून ताज्या घटना म्हणून माध्यमांत दाखवल्या जात आहेत. खऱ्या-खोट्याची खातरजमा माध्यमं करत नाहीयेत. वाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या कार्यालयांत बसून बातम्या पिकवल्या जात आहेत.
हे झालं सध्याच्या युद्धाचं. पण पहलगाम होण्याच्या आधी काय चाललं होतं? सत्ताधारी पक्षाला अडचणीचा होईल असा कोणताही मजकूर प्रसिद्ध करायला ना बहुसंख्य वाहिन्या तयार आहेत, ना वृत्तपत्रं. विरोधी पक्षाच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला नसलेल्या माणसांबद्दल माध्यमांतून अत्यंत वाईट आणि खोटा मजकूर प्रसिद्ध केला जातो. अशा मजकुराचं प्रमाण इतकं मोठं आहे की त्यात ‘सत्य’ गुदमरून जातंय. पाकिस्ताननं जैश- ए- मोहम्मद, हक्कानी साखळी, लष्कर- ए- तय्यबा असे ‘नॉन स्टेट अॅक्टर’ युद्धासाठी वापरले, तसंच सोशल मीडिया सत्ताधारी पक्ष करत आहे. पारंपरिक माध्यमांपेक्षा किती तरी अधिक प्रमाणात मजकूर समाजमाध्यमांतून समाजावर फेकला जात आहे. सोशलमीडियातून पेरला जाणारा मजकूर लोकांच्या दैनंदिन बोलण्यात ऐकायला येतो. ट्रम्प हे भारताचे मित्र आहेत, त्यामुळंच ते भारताचं कल्याण करणार आहेत, देशद्रोही लोक ट्रम्प यांना विरोध करत आहेत असं आता लोक मासळी बाजारात आणि नाक्यावरच्या बारमध्ये बोलतात. सोशलमीडिया ही भारत सरकारचं म्हणणं पुढे रेटणारी माध्यमं बनली आहेत.
काही माध्यमं सत्य छापतात. एखादी धाड, एखादी अटक पुराव्याशिवाय झाली, अधिकाऱ्याला अधिकार नसतानाही त्यानं कारवाई केली, असं कधी तरी हळूच लोकांच्या लक्षात येणार नाही अशा रीतीनं छापलं जातं.
सरकारला जे करायचं असेल ते सरकारनं करावं. सरकार चालवणाऱ्या सत्ताधारी पक्षानं त्यांना हवं ते करावं. त्यांच्या स्वतंत्र गरजा आहेत, त्या त्यांनी भागवाव्या. पण त्यांचे उद्याोग माध्यमांनी का उरावर घ्यावेत? सरकार म्हणजे देश नव्हे, सत्ताधारी पक्ष म्हणजे देश नव्हे, हे जनतेनं आणि संबंधितांनी लक्षात घ्यायला हवं. ‘देशभक्ती म्हणजे काय?’ हे ठरवण्याचा मक्ता सरकारकडं नाही. देशभक्ती इत्यादींच्या व्याख्या सरकारच्या प्रचारावर अवलंबून नाहीत, नसाव्यात.
सर्व बाजू मांडणं हे पत्रकारितेचं काम आहे. सरकारची बाजू मांडावी आणि सरकारची नसलेली बाजूही मांडावी. सत्ताधारी पक्षाची बाजू मांडावी आणि इतरांचीही बाजू मांडावी. मुख्य म्हणजे कोण काय म्हणतं यापेक्षा वास्तव काय आहे, ते छापावं. पत्रकारिता म्हणजे ‘पब्लिक रिलेशन्स’ नाही. पत्रकारिता म्हणजे कविता-कादंबरी-नाटक यासारखं कल्पित लिखाण नाही. सरकार आणि सरकारी यंत्रणांना त्यांची कामं करू द्यावीत. सर्व बाजू मांडणं हे काम पत्रकारितेनं करावं.
सुरुवातीला उदाहरण दिलेल्या पुलित्झर पारितोषिक विजेत्या पत्रकाराने पाठपुरावा करीत उजव्या माध्यमांनी ग्रासलेली पत्रकारिता जिवघेणी कशी बनू शकते याचा एक दाखला जगासमोर दिला. आजच्या पत्रकारितेचं रूप त्यानं उघड केलं. ते जितकं अमेरिकेबाबत खरं आहे तितकंच भारताबाबतही.
यंदाचा पुलित्झर…
एकीकडे लोकांचा बुद्धिभेद माध्यमांतून, वृत्तपत्रांमधील एकांगी बातम्यांमधून आणि समाजमाध्यमांतील प्रचारतंत्रांतून जोरदार सुरू असला, तरी अमेरिकेत सजग पत्रकारिता करणाऱ्या संस्था अद्याप शाबूत आहेत. ‘पुलित्झर’ हा तिथल्या पत्रकारितेतील परमोच्च सन्मान. इलोन मस्क यांची राजकारण्यांशी सलगी आणि हस्तक्षेप यांचे तपशील वृत्तमालिकांतून झळकविल्याबद्दल ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या बातमीदारांना, गर्भपात कायद्यामुळे झालेल्या दिरंगाईत एका गर्भवती मातेच्या मृत्यूबद्दल केलेल्या बातमी मालिकेबाबत ‘प्रोपब्लिका’ या वृत्तपत्राला, शोधपत्रकारितेसाठी रॉयटर्सच्या पत्रकारांना, ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याबाबतच्या सखोल वृत्तांकनासाठी ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या पत्रकारांना ‘पुलित्झर’ने गौरविण्यात आले. सत्य आणि तथ्य मांडण्यात कुचराई न करणाऱ्या पत्रकारितेला पुलित्झर सन्मानित करते. आपल्याकडे अशा पत्रकारितेची उदाहरणे दुर्दैवाने कमी उरली आहेत.
समाजमाध्यमांचा जाच…
समाजमाध्यमं ही भारत सरकारला आपलं म्हणणं पुढे रेटण्यास मदत करणारी माध्यमं कशी बनत चालली आहेत त्याचा अनुभव गेल्या वीसेक दिवसांत प्रत्येकाला पाहायला मिळतोय. खोट्या आणि बनवलेल्या बातम्यांचा (‘प्रोपगंडा’) पूरच तेथे आलेला दिसतो. समाजाला दोन बाजूंमध्ये सारण्याचा, विचारसरणींवरून एकमेकांच्या विरोधात तावातावाने भांडण्याचा, दुसऱ्याला खोटे ठरविण्याचा खेळ कधी झाला नव्हता इतका आता होतोय. ही मानसिक दुही ‘एकते’च्या तत्त्वाला हळूहळू पोखरत चालली आहे, हे शहाणपण आपल्याला उशिरानेच येण्याची शक्यता.
parth.mn13@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)