‘लोकरंग’ (२१ ऑगस्ट) मधील वसुंधरा काशीकर-भागवत यांनी लिहिलेला ‘मराठीने नुक्ता स्वीकारावा का?’ हा लेख वाचला. मराठीत पूर्वी नुक्ता होता. नंतर केव्हातरी तो गेला. परंतु ‘च, ज, झ’ या वर्णाच्या दोन उच्चारांची प्रामाणिक अडचण सोदाहरण मांडून भागवतांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला हे बरेच झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ या संस्थेने १९६२ साली मराठी शुद्धलेखनाचे नियम केले. या नियमांमध्ये काही बदल करण्यासाठी या संस्थेने २००८ सालापासून प्रयत्नांना सुरुवात केली. त्या वेळी त्यांनी काही निवडक व्यक्तींना १० प्रश्नांची एक प्रश्नावली पाठवली. त्या प्रश्नावलीतही संस्थेने ‘मराठीत नुक्ता पुन्हा आणावा का?’ अशा आशयाचा प्रश्न विचारलेला आहे.   त्याचप्रमाणे, दिनांक ६ नोव्हेंबर २००९ रोजी महाराष्ट्र शासनाने वर्णमाला आदेश काढला. त्यातील वर्णमालेच्या तक्त्यात ‘अतिरिक्त चिन्हे’ या मथळ्याखाली नुक्त्याचे चिन्ह दाखवले असून त्याला ‘अधोिबदू’ असे म्हटलेले आहे. पुढे ‘लेखनविषयक विशेष सूचना’ या मथळ्याखाली अशी सूचना दिली आहे की, ‘‘च’ व ‘झ’ या व्यंजनांचे दंततालव्य आणि तालव्य उच्चार दर्शवण्यासाठी अधोिबदू (नुक्ता) देण्याची गरज नाही. परंतु शब्दकोशामध्ये व इतरत्र स्वतंत्रपणे जर उच्चारभेद कंसांत दाखवायचे असतील तर अधोिबदूचा वापर करावा.’ या सूचनेत ‘ज’ या व्यंजनाचा उल्लेख करायचा राहिला असला, तरी उच्चारभेद दाखवण्यासाठी नुक्त्याची गरज शासनानेही मान्य केल्याचे दिसते.

अशा प्रकारे उच्चारभेद दर्शवणाऱ्या चिन्हांना इंग्लिशमध्ये ‘diacritical marks’ आणि मराठीत ‘उच्चारभेददर्शक चिन्हे’ म्हणतात. सारख्याच दिसणाऱ्या दोन अक्षरांमध्ये असलेला उच्चारभेद दाखवण्याकरता त्यातल्या एका अक्षरासाठी अशा चिन्हाचा वापर केला जातो. खरे तर मराठीत सध्या आपण असे एक चिन्ह वापरतो. ‘तंग’ या शब्दात ‘त’वर असलेल्या टिंबाला आपण अनुस्वार म्हणतो. परंतु आता पुढील दोन शब्दप्रयोग पाहा- ‘समुद्राचा तळ’, ‘सुंदर तळं’. यांमध्ये ‘तळ-तळं’ या शब्दांच्या अंत्य अक्षराच्या उच्चारांमध्ये भेद आहे आणि तो आपण एका टिंबाने दाखवतो. परंतु या संदर्भात या टिंबाला अनुस्वार न म्हणता ‘शिरोबिंदू’ किंवा ‘शीर्षिबदू’ असे म्हणायचे असते. या प्रकारच्या उच्चारभेदासाठी वेगळे चिन्ह निर्माण न करता आपण ‘टिंब’ या एकाच चिन्हावर ‘अनुस्वार’ आणि ‘शीर्षिबदू’ अशी दोन कामे सोपवली आहेत. परंतु लेखनात काहीतरी भेद दिसल्यामुळे वाचताना उच्चारभेद करण्याची सूचना आपल्याला मिळते. मात्र ‘च’, ‘ज’, ‘झ’ या वर्णाचे दोन उच्चार दाखवण्यासाठी यांच्या लेखनात कोणताही भेद केला जात नसल्यामुळे कोणता उच्चार केव्हा करायचा असा प्रश्न पडतो, ही अडचण प्रामाणिक आहे.

आपल्या वर्णमालेतल्या ‘क ते म’ या पहिल्या २५ व्यंजनांचे ‘क, च, ट, त, प’ असे पाच वर्ग केलेले असून त्यापकी ‘च’ वर्गात येणाऱ्या ‘च, छ, ज, झ, ञ’ या व्यंजनांना ‘तालव्य’ व्यंजने असे म्हटले जाते. म्हणजे यांचा उच्चार जीभ टाळूला लावून करावा लागतो. ही वर्गवारी केवळ संस्कृतचे उच्चारण लक्षात घेऊन केली गेली आणि मग मराठीसाठीही आपण तीच स्वीकारली असे दिसते. कारण संस्कृतमध्ये ‘चकित’पासून ‘च्युति’पर्यंत, ‘जगत’पासून ‘ज्वाला’पर्यंत आणि ‘झंकार’पासून ‘झिल्ली’पर्यंत सर्व शब्दांचा उच्चारारंभ केवळ ‘तालव्य’च आहे. त्याचप्रमाणे ‘अचल’पासून ‘स्वजन’पर्यंत कोणत्याही शब्दात ही व्यंजने दुसऱ्या स्थानावर आली, तरीही त्यांचा उच्चार ‘तालव्य’च होतो. मराठीचे आद्य व्याकरणकार मोरो केशव दामले यांनीही त्यांच्या ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ या ग्रंथातल्या ‘वर्णाचे वर्गीकरण’ या अध्यायात ‘दंततालव्य’ या मथळ्याखाली ‘च, ज, झ’ ही व्यंजने दाखवली असून पुढे ‘हा उच्चार निवळ मराठी आहे’ अशी टीप घातली आहे. यावरून ‘च, ज, झ’ या व्यंजनांचा दंततालव्य उच्चार संस्कृतात होतच नाही हे दिसते. म्हणूनच उच्चारानुसार केलेली व्यंजनांची ही वर्गवारी केवळ संस्कृतचे उच्चारण लक्षात घेऊन केली गेली आहे असे म्हणता येते. मराठीत मात्र ‘चकोट’पासून ‘च्यावम्याव’पर्यंत, ‘जंजाळ’पासून ‘ज्वारी’पर्यंत आणि ‘झकपक’पासून ‘झेलणे’पर्यंत सर्व शब्दांचा उच्चारारंभ ‘तालव्य’ असलेले अनेक शब्द जसे आहेत; तसेच ‘चकणा’पासून ‘चौसष्ट’पर्यंत, ‘जकात’पासून ‘जोहार’पर्यंत आणि ‘झगडा’पासून ‘झोळी’पर्यंत सर्व शब्दांचा उच्चारारंभ ‘दंततालव्य’ असलेलेही अनेक शब्द आहेत. त्याचप्रमाणे ‘अचाट’पासून ‘सूचना’पर्यंत दुसऱ्या स्थानावर तालव्य उच्चार असलेले अनेक शब्द जसे आहेत, तसेच ‘अचरट’पासून ‘सुचणे’पर्यंत दुसऱ्या स्थानावर दंततालव्य उच्चार असलेलेही अनेक शब्द आहेत. उच्चारभेददर्शक अशी ही शब्दसंख्या केवळ अपवादात्मक नसून तिचे प्रमाण खूप आहे. म्हणूनच मराठीतला हा उच्चारभेद लक्षात घेऊन लेखनातही तो दाखवण्यासाठी वेगळ्या चिन्हाची गरज रास्त ठरते.

या नुक्त्याचा संबंध शब्दांच्या सामान्यरूपांशीही येतो. महामंडळाच्या शुद्धलेखन नियमांतील एक नियम असे सांगतो की, जाकारान्त पुल्लिंगी नामांची सामान्यरूपे जाकारान्तच ठेवावीत, ज्याकारान्त करू नयेत. वास्तविक पाहता मराठीत काही मोजके अपवाद सोडता आकारान्त पुल्लिंगी नामांची सामान्यरूपे याकारान्त होतात; जसे- घोडा-घोडय़ाला. परंतु या नियमानुसार ‘आजा, मोजा, राजा, सांजा’ यांसारख्या दंततालव्य आकारान्त पुिल्लगी नामांची सामान्यरूपे ‘आजाला, मोजात, राजाला, सांजाच्या’ अशी जाकारान्तच ठेवावी लागतात. मात्र या सर्व सामान्यरूपांचे उच्चार तालव्य आकारान्त होतात. त्यामुळे दंततालव्य ते तालव्य असा उच्चारात होणारा विकार हेच सामान्यरूप मानले आहे, म्हणून लेखनात हा फरक आपण दाखवत नाही. परंतु त्यामुळे उच्चारात फरक करायचा आहे हे दाखवले जात नाही. नुक्त्याचा वापर केला, तर हे शब्द त्यांच्या मूळ रूपात लिहिताना नुक्तायुक्त जाकारान्त लिहिले जातील, आणि सामान्यरूपांमध्ये विनानुक्ता जाकारान्त लिहिले जातील. त्यामुळे हे लेखन अनुक्रमे दंततालव्य आणि तालव्य अशा उच्चारभेदाचे निदर्शन करेल.

–  अरुण फडके, ठाणे</strong>

पालथ्या घडय़ावरचे पाणी

‘लोकरंग’ (२१ ऑगस्ट)च्या अंकात वि. वि. करमरकरांच्या ‘ऑलिंपिकसाठी नित्याचे नक्राश्रू’ या लेखात त्यांनी क्रीडा क्षेत्रात आपले कुठे चुकते आहे ते दाखवून दिले आहे. अर्थात, भारतीयांच्या पद्धतीप्रमाणे ते पालथ्या घडय़ावरचे पाणी ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे, भारतीयांपैकी फार थोडय़ा लोकांजवळ राष्ट्राभिमान आहे. बहुतांश वृत्ती ‘मी आणि माझे खिसे बरे. बाकी देश खड्डय़ात का जाईना.’ अशीच आहे. राजकारणात हेच आणि क्रीडा क्षेत्रातही हेच. पेस-भूपती जोडी घ्या, बीसीसीआय घ्या, नाही तर प्रादेशिक संघटना घ्या, सर्वत्र हेच दिसते. दुसरी गोष्ट अशी की, आपल्या देशाच्या भूमीला सहन होत नाही इतकी लोकसंख्या वाढली आहे. मनाजोगत्या क्रीडांगणांना जागा नाही. देश गरीब, त्यामुळे पुरेसे पैसे उपलब्ध करता येत नाहीत आणि करण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्ष क्रीडा क्षेत्रात त्यातला कितपत पोहोचेल याची शंका. त्यामुळे हे सर्व असेच राहणार आहे. त्यातूनही जे खेळाडू खडतर प्रयत्न करून पदके मिळवतात, त्यांचे कौतुक करण्यात आपण कसूर करू नये, इतके  तरी वैयक्तिक पातळीवर करता येईल.

 स. सी. आपटे, पुणे</strong>

वाचनीय वर्धापन दिन विशेषांक

‘लोकरंग’ पुरवणीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्तची विशेष पुरवणी वाचनीय आणि मनाला भावणारी वाटली. या पुरवणीतले सगळेच लेख या आधी वाचलेले असले, तरी ज्यांच्यावर हे लेख लिहिले गेले ते वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर; आणि ज्यांनी हे लेख लिहिले तीही दिग्गज व्यक्तिमत्त्वे असल्याने हे सर्व लेख एक प्रकारे महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहेत. ज्या व्यक्तींबद्दलचे लेख या विशेष पुरवणीत आहेत त्या सर्वानीच आपापल्या क्षेत्रात अत्युच्च कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा या व्यक्ती म्हटल्या पाहिजेत. गेल्या पंचवीस वर्षांत ‘लोकरंग’ पुरवणीद्वारे वाचकांना अनेकविध विषयांची माहिती तसेच साहित्यिक मेजवानी प्राप्त झाली आहे.

– सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokrang readers reaction on article
First published on: 04-09-2016 at 01:01 IST