प्रदीप कोकरे

ज्या पर्यावरणात लेखक घडत असतो, त्यातील ज्या माणसांचे जगणे पाहत असतो त्यांच्या जगण्याला-आवाजाला मुखर करणे हे लेखकाचे कर्तव्य असते. त्यांच्याकडे डोळसपणे पाहून त्यांचा आवाज वाचकांपर्यंत लेखक पोहोचवतो. माझ्या पहिल्याच ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला राज्य आणि साहित्य अकादमी, युवा पुरस्कार मिळाला. त्यानंतर माझ्या लेखनाबातच्या जाणीवा आणखी गंभीर बनल्या.

लेखक म्हणून माझे कर्तव्य मी कधीच विसरणार नाही, हे मी स्वत:ला बजावले. रात्र शाळेत आणि कॉलेजात विविध स्तरांतील, वर्गातील मुलांबरोबर माझे शिक्षण झाले. मीसुद्धा त्यांच्यात काम करून शिकत होतो. माझ्या वाचनाची सुुरुवात बी.एच्या काळात झाली. काय वाचायचे, कसे वाचायचे माहीत नव्हते.

नेमाडेंना त्यावर्षी ज्ञानपीठ मिळाले होते. मग त्यांच्या कादंबऱ्यांपासून सुरुवात केली. त्यानंतर एक लेखक आवडला की त्याचे वाचन हा पुढली तीन वर्षे परिपाठ राहिला. नेमाडेंपासून चंद्रकांत खोतांचे आणि जयंत पवारांपासून जी. के. ऐनापुरे यांचे साहित्य वाचत सुटलो.

अरुण कोलटकर, दि. पु. चित्रे, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे आणि मन्या ओकच्या कविता वाचल्या. या साहित्यातून जे काही मांडले जातेय, ते आपल्या जाणिवेशी पडताळून पाहता आले. साठीच्या दशकात जे लिहिले गेले, त्याची तुलना मी माझ्या वाढीबरोबर करतो. मी मुंबईत स्थलांतरीत असल्याने इथे स्थलांतर करून आलेल्या, स्वत:मध्ये बदल करू इच्छिणाऱ्या लोकांची धडपड जवळून अनुभवली.

आपल्याकडे सांगण्यासारखी गोष्ट आहे हे यातून जेव्हा कळाले, तेव्हा माझी कादंबरी लिहून झाली. व्यवस्थेवर टीका करताना लेखक म्हणून काळजी करण्याची गरज नाही. ज्या पर्यावरणात लेखक वावरतो, तिथल्या लादल्या गेलेल्या गोष्टींचे दडपण किंवा ओझे तो घेत असेल, तर लेखक म्हणून त्याची वाढ खुंटेल.