– डॉ. राधिका विंझे
सुटीत नवीन काहीतरी शिकायचं म्हणून ईशा बाबाबरोबर स्विमिंग शिकायला जाऊ लागली. हातपाय मारण्याच्या सरावानंतर प्रशिक्षक सरांनी कसं पोहायचं याचं प्रात्यक्षिक दिलं. सरांनी सांगितलं, ‘‘पोहताना हाताने पाणी मागे ढकला म्हणजे पुढे जाल.’’
ईशाला प्रश्न पडला, ‘‘असं का करायचं?’’ तिने बाबाला याबद्दल विचारलं. बाबा म्हणाला, ‘‘तू हाताने पाणी मागे ढकलतेस तेव्हा पाण्यावर बल लावतेस. त्याच वेळी पाणी तुझ्यावर विरुद्ध दिशेने बल लावतं, त्यामुळे तुला पुढे जायला मदत होते. आपण चेंडू भिंतीवर टाकतो तेव्हा चेंडू भिंतीवर बल लावतो. त्यावर भिंतीकडून विरुद्ध दिशेने बल लावलं जातं व चेंडू आपल्याकडे परत येतो. भिंतीवर चेंडू टाकणं ही झाली क्रिया व तोच चेंडू विरुद्ध दिशेने आपल्याकडे परत येणं ही झाली प्रतिक्रिया.’’
ईशा म्हणाली, ‘‘पण बाबा, भिंतीवर चेंडू हळू टाकला तर तो आपल्याकडे हळू येतो, पण जोरात टाकला तर मात्र आपण तो पटकन पकडू शकतो.’’
‘‘हीच तर गंमत आहे. आपण क्रिया करताना जेवढं बल लावू, तेवढंच बल प्रतिक्रियेत विरुद्ध दिशेने लावलं जातं. चालताना आपण जमिनीवर जेवढं बल लावू, तेवढंच बल जमिनीकडून विरुद्ध दिशेने आपल्यावर लावलं जातं. बंदुकीतून गोळी मारल्यावर विरुद्ध दिशेला बंदूक विस्थापित होते. बॅडमिंटन खेळताना हवेत कॉक उडवण्यासाठी रॅकेटनं त्यावर बल लावलं की रॅकेट विरुद्ध दिशेला विस्थापित होतं. कॉक लांब जाण्यासाठी तू ते जोरात मारतेस तेव्हा रॅकेट जास्त मागे जातं, हळू मारलंस तर थोडीच मागे जातेस. या क्रिया-प्रतिक्रियेचं तत्त्व म्हणजे न्यूटनचा गतीचा तिसरा नियम. प्रत्येक क्रियेला विरुद्ध दिशेने समान प्रतिक्रिया असते.’’
ईशा म्हणाली, ‘‘होऽऽऽ, म्हणून सीसॉवर खेळताना आपण जमिनीवर खालच्या दिशेने बल लावतो व वर जातो.
‘‘बरोबर!’’ बाबा म्हणाला.